Monday, September 28, 2015

सरत्या महिन्याचं एक पान (Movie Review - Calendar Girls)

सीबीआयच्या प्रादेशिक कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मोठ्या केबिनमध्ये दहा-पंधरा आरोपी उभे आहेत. मान खाली, दोन्ही हाताची 'विश्राम' स्थितीत जुळणी आणि स्तब्ध. वरिष्ठ अधिकारी खुर्चीत बसला आहे आणि त्याच्या बाजूला त्याचा एक कनिष्ठ अधिकारी उभा आहे. टेबलाच्या दुसऱ्या बाजूला खुर्चीत एक महिला बसली आहे आणि त्या महिलेला काही फोटो, कॉल रेकॉर्ड्स वगैरे दाखवून, तो उभा असलेला अधिकारी प्रश्न विचारतो आहे. आजूबाजूचे लोक 'आता काय होणार' ह्या विचाराने ग्रस्त.

हे दृश्य पाहत असताना मला क्षणभर भास झाला की हे सीबीआयचं कार्यालय नसून एखाद्या शाळेच्या मुख्याध्यापकांचं कार्यालय आहे व उभा असलेला अधिकारी एक शिक्षक आहे, जो काही द्वाड मुलांना मोठ्या सरांकडे घेऊन आला आहे आणि आता एकेकाला फैलावर घेतलं जात आहे.
असेच अजून काही पोरकट प्रसंग, बाष्कळ योगायोग वगैरे 'कॅलेण्डर गर्ल्स' मध्ये येत राहतात. अर्थात, हे सगळं किंवा अश्या प्रक्रारचं बरंच काही आपण अनेक चित्रपटांत 'सिनेमॅटिक लिबर्टी' म्हणून चालू देत असतो. कोर्ट सीन्सची अतिरंजित, हास्यास्पद चित्रीकरणं तर कित्येक होऊन गेली असतील. ऑब्जेक्शन माय लॉर्ड (सर्रास 'मिलॉर्ड' म्हटलं जाणं), ठहरिये जजसाहब, जो भी कहूँगा सच कहूँगा.., गवाहों के हालात.. ह्या सगळ्याच्या पारायणांची परंपराच आपण जपलेली आहे. त्यामुळे उपरोक्त सीबीआय चौकशीचं दृश्य अगदीच अशक्य व अतर्क्य असं नाहीच. मात्र, जेव्हा 'मधुर भांडारकर' हे दाखवत असतात, तेव्हा परिमाणं बदलायला हवीत. केवळ ह्यासाठी नाही की, भांडारकर आजच्या काळातल्या उत्तम दिग्दर्शकांपैकी एक आहेत. तर ह्यासाठीही की, 'कॅलेण्डर गर्ल्स'ची कहाणी त्यांच्यासाठी नवीन नव्हती. फॅशन दुनिया, चित्रपट विश्व आणि कॉर्पोरेट जगत ह्यांच्या 'इनसाईड स्टोरीज' ते हिरोईन, फॅशन, कॉर्पोरेट, पेज थ्री वगैरेसारख्या चित्रपटांतून मांडत आले आहेत. ह्या साऱ्याचा राजकारणाशी संबंध आणि ह्या सगळ्यांतलं अंतर्गत राजकारणसुद्धा त्यांनी नेहमीच दाखवलेलं आहे. पुन्हा एकदा तीच कहाणी मांडताना अधिक सफाई व नाविन्य ह्याची अपेक्षा रास्त ठरते आणि ती पूर्ण होत नाही.

पारोमा (सतरूपा पाईन), नाझनीन (अवनी मोदी), मयूरी (रुही सिंग), शॅरन (कायरा दत्त) आणि नंदिता (आकांक्षा पुरी) ह्या पाच तरुणींची एका बहुचर्चित, प्रसिद्ध हॉट अ‍ॅण्ड सेक्सी 'कॅलेण्डर'वर झळकण्यासाठी निवड होते. नाझनीन ही मूळची पाकिस्तानी, पण लंडनस्थित, तर बाकी मुली भारताच्याच विविध भागांतून असतात. कुणी घरच्यांचा विरोध पत्करून, कुणी अनेक स्वप्नं डोळ्यांत साठवून, कुणी स्वत:ला सिद्ध करण्यासाठी, कुणी आत्मसन्मानाच्या आग्रहाखातर आपापलं पूर्वायुष्य व शहर सोडून मुंबईत येतात. 'कॅलेण्डर'चं शूट होतं. ते 'कॅलेण्डर' नेहमीप्रमाणेच खूप गाजतं. मॉडेलिंगच्या क्षेत्रातलं हे एक मोठं पाउल त्यांनी टाकलेलं असतं आणि पाचही मुलींसाठी एका नव्या जगाचे दरवाजे उघडतात. पण ह्या नव्या जगाच्या नव्या समस्या असतात. ह्या समस्यांना त्या कश्या सामोऱ्या जातात. त्यांवर मात करतात का ? की त्यांची वाताहात होते ? आपापली स्वप्नं त्या साकार करतात का ? सन्मान मिळवतात का ? ह्याची कहाणी म्हणजे 'कॅलेण्डर गर्ल्स'.

पूर्वार्धात, पाच जणींच्या पाच कहाण्या आलटून पालटून येत राहतात. उत्तरार्धांत त्यांच्या त्या कहाण्यांत परस्पर संबंध जुळत जातो. मात्र तोपर्यंत हे सादरीकरण ठोकळेबाज आहे, ह्या मतापर्यंत आपण पोहोचलेले असतोच. सतत वेगवेगळ्या दृश्यांत मधुर भांडारकरांच्या पूर्वीच्या चित्रपटांचा भास होत राहतो. ह्या दुर्दैवी तुलनेत 'कॅलेण्डर गर्ल्स' खूपच कमी पडतो. भांडारकर भांडारकरांना भारी पडतात, हरवतात.

तब्बल पाच जणींच्या कहाण्या दाखवण्याची काही आवश्यकता होती का, हाही एक प्रश्न पडतो. दोन-तीन जणींच्या कहाण्या दाखवून अधिक परिणाम साधता येऊ शकला असता. सुरुवातीच्या काही सुमार प्रदर्शनातून अशी भीती वाटते की एकदम पाच नवे चेहरे समोर आणणं, जरा अंगाशीच येणार आहे. पण हळूहळू बेसुमार अंगप्रदर्शन व काही चटपटीत, गरमागरम दृश्यं ह्यांच्यापुढे जाऊन पाचही अभिनेत्र्या थोड्या-फार प्रमाणात आपापल्या भूमिकेशी एकरूप होतात. सरतेशेवटी कायरा दत्त आणि अवनी मोदी चांगल्या कामासाठी लक्षात राहतात, तर आकांक्षा पुरी वाईट कामासाठी.

बराच काळ लक्षात राहील, असं संगीत हे मधुर भांडारकरांच्या चित्रपटाचं लक्षण कधीच नव्हतं. ते इथेही नाहीच. गाडीमधून उतरल्यावर लगेच आपल्या रस्त्याला लागावं आणि गाडीला पूर्णपणे विसरून जावं, असं हे संगीत आहे. गाणं संपतं त्या क्षणापासून आपण ते विसरून जातो. गाणी चालू असताना, त्यांच्या तथाकथित सुरावटींत इतर काही तथाकथित सुरावटींचा भास होत राहतो. सुमारपणाचीही सुमार नक्कल करू शकल्याबद्दल संगीतकार मित ब्रदर्स आणि अमाल मलिकचं अभिनंदन.

कॅमेरावर्क, छायाचित्रण हा सगळ्यात मोठा कच्चा दुवा असावा. एका दृश्यात, एक अभिनेत्री काचेच्या ग्लासातून पाणी पीत असते. तेव्हा क्षणभरासाठी तिचे दात त्या पाण्यात सोडलेल्या कवळीसारखे दिसतात ! 'आता ही मुंबई आहे बरं का?' हे सांगण्यासाठी समुद्र, वांद्रे-वरळी सी लिंक, इमारती वगैरे दाखवताना कॅमेरा केवळ औपचारिकता पूर्ण करतो, इतकी ती दृश्यं सपक झाली आहेत.

एका चित्रपटात अनेक कहाण्यांची सांगड घालताना संकलक चातुर्य व कौशल्य दाखवू शकतो. तसं तर काही होत नाहीच. उलटपक्षी केवळ ठिगळं जोडली जातात. कात्री लावायला हवी होती, असे काही प्रसंग चित्रपटांत नाहीत. पण आपसांतली वीण अधिक घट्ट होऊ शकली असतीच.

'कॅलेण्डर गर्ल्स' फार सहजपणे एक सपशेल हाराकिरी होऊ शकला असता. तुकड्या-तुकड्यांमध्ये तशी ताकदही होती. मात्र त्याचा एकत्रित परिणाम इतपत आहे की, पडद्यावरचा सगळा पसारा सोडून उठून जावंसं वाटत नाही. ह्या किरकोळ अनुभूतीने एका उत्तम दिग्दर्शकाला समाधान मिळणार असेल, तर मिळो. मात्र एका उत्तम प्रेक्षकाला मात्र ते मिळत नाहीच. महिना संपल्यावर कॅलेण्डरचं पान बदललं जातं. त्याच निर्विकारपणे अनेक चित्रपटांना चित्रपट संपल्यावर तो मागे सोडून पुढे जात असतो. अश्या संयमी प्रेक्षकाला मधुर भांडारकरांसारख्यांकडून एक विशिष्ट अपेक्षा असते. ह्याचा विचार करून आता तेच ते विषय न हाताळता काही नाविन्य आणायचा प्रयत्न त्यांनी करायला हवा. अन्यथा कॅलेण्डरच्या सरल्या महिन्याच्या पानाप्रमाणे मागे सोडलेल्या अनेक चित्रपटांबरोबरच एका चांगल्या दिग्दर्शकालाही प्रेक्षक मागे सोडून देतील.

रेटिंग - * *

हे परीक्षण मराठी दैनिक 'मी मराठी लाईव्ह' मध्ये २७ सप्टेंबर २०१५ रोजी प्रकाशित झाले आहे :-


Sunday, September 20, 2015

इम्रानशी कट्टी, कंगनाशी बट्टी (Movie Review - Katti Batti)

'कट्टी' हा एक नकार आणि 'बट्टी' म्हणजे होकार. मैत्री आणि प्रेमात असे होकार-नकार चालू असतात. ह्या होकार-नकारामध्ये कायमस्वरूपी कुणा एकाचा विजय होणार असेल, तर तो नकाराचाच होऊ शकतो. कारण नकार म्हणजे एक पूर्णविराम असतो आणि होकार म्हणजे अनेक नकारांवर सतत मात करत राहणे अपेक्षित असणे. म्हणताना आपण म्हणतो की सकारात्मकतेत खूप मोठी ताकद असते, मात्र मतभेदांच्या नकारात्मक कात्रीला जर धार मिळाली, तर एखाद्या नाजूक नात्याचा धागा अगदी सहजपणे कापला जातो. एकाच ओळीचे दोन तुकडे होऊन तिला दोन जागी स्वतंत्र पूर्णविराम मिळू शकतात.
'कट्टी-बट्टी' ही कहाणी अश्याच एका नाजूक नात्यातल्या 'कट्टी-बट्टी'बद्दल आहे आणि हा चित्रपट स्वत:सुद्धा अनेक सकारात्मक-नकारात्मकतांसह आहे. चित्रपट व प्रेक्षक ह्यांच्यातल्या मतभेदांच्या कात्रीला चित्रपटाचा शेवट जवळ येईपर्यंत चांगलीच धार येते आणि त्या नाजूक नात्याचा धागा तुटतो. मात्र हे विभक्त होणं कटुता ठेवून होत नाही, हे विशेष.

ही कहाणी माधव काबरा 'मॅडी' (इम्रान खान) आणि पायल (कंगना राणावत) ची आहे. बड्या बापाची टवाळ, उनाड व बिनधास्त मुलगी पायल मॅडीला दिसते आणि पाहताक्षणीच मॅडी तिच्यासाठी मॅड होतो. तिला वारंवार आपल्या मनाची गोष्ट सांगतो, मात्र तिला कुठलीही वचनबद्धता (शुद्ध मराठीत 'कमीटमेंट') करण्याचा 'मूड' नसतो. अखेरीस सरळसाधा भाबडा मॅडी विना-कमीटमेंट नात्यासाठी तयारी दर्शवतो आणि दोघे आधी शुद्ध टाईमपास म्हणून एकत्र फिरायला लागतात. कालांतराने 'मॅडी' आर्किटेक्ट होतो, नोकरी करायला लागतो आणि दोघे 'लिव्ह इन रिलेशनशिप' स्वीकारतात. पण पाच वर्षं चाललेल्या नात्यात काही कारणाने कटुता येते आणि धागा तुटतो. तुटलेला धागा परत जोडण्यासाठी 'मॅडी' करत असलेलं जीवाचं रान म्हणजे 'कट्टी-बट्टी'चं कथानक.

आता आधी ह्यातल्या सकारात्मकता पाहू.
'फ्लॅशबॅक' तंत्राचा खुबीने वापर करत ही साधीसरळ कथा रंजकतेने मांडली आहे. 'हीरो' च्या सेटवर स्वत:च्या नावाने रिकामी खुर्ची बसवून निखिल अडवानी बहुतेक 'कट्टी-बट्टी' करत असावेत. कारण जशी 'हीरो'मध्ये प्रकर्षाने त्यांची अनुपस्थिती जाणवते, तशी इथे त्यांची उपस्थिती बऱ्यापैकी लक्षात येण्याइतपत आहे !
अंशुल सिंघलसोबत मिळून त्यांनी लिहिलेली पटकथाही चांगली आहे. 'कल हो न हो' ची जादू परत करण्याचा हा प्रयत्न असावा, हेही जाणवतं.

फार वाव नसला, तरी जिथे जिथे संधी मिळाली आहे तिथे तिथे 'तुषार कांती रे' ह्यांच्या छायाचित्रणाने छाप सोडली आहे. चित्रपट 'टवटवीत' आणि 'कोमेजलेला', अश्या दोन पातळ्यांवर एकाच वेळी चालत राहतो. दोन-तीन दृश्यांत मुंबईचं ओघाने आलेलं ओझरतं गगनचुंबी दर्शन क्षणभर आपल्याला विस्मयचकित करतं की, 'हे खरं आहे का ?' पण हीच कॅमेराची कमाल असावी.

कंगना राणावत एक अभिनेत्री म्हणून आजचं अत्यंत आश्वासक नाव. 'क्वीन', 'तनू वेड्स मनू -रिटर्न्स' मध्ये आपल्या मनाचा ताबा घेणारी कंगना इथे दिसत नाही, मात्र ती अगदीच फसतही नाही. बिनधास्त 'पायल' साकारणं हे काही आव्हानात्मक काम नव्हतंच आणि उत्तम कलाकार आव्हानात्मकतेमुळे प्रोत्साहित होतात. त्यामुळे उत्तरार्धाच्या उत्तरार्धात जेव्हा 'पायल' ची व्यक्तिरेखा जराशी आव्हानात्मक होते, तेव्हा कंगना खऱ्या अर्थाने रंगात येते. एरव्ही, ती तिचं दिलेलं काम प्रामाणिकपणे करते, इतकंच.

आता ह्यातल्या नकारात्मकता पाहू.

'कल हो न हो' ची जादू पुन्हा करण्याचा हा प्रयत्न सपशेल फसतो ह्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे फुळकट संगीत. हे संगीत 'शंकर एहसान लॉय' चं आहे, ह्यावर विश्वास ठेवणं आधी जरा कठीण जातं. मग त्यांच्या गेल्या काही चित्रपटांतील कामाकडे पाहिल्यावर दुर्दैवाने आश्चर्यच वाटत नाही ! गेल्या काही वर्षांत चित्रपटात 'संगीत' हा भाग दुय्यमतेकडून 'तिय्यम' वगैरे झाल्यामुळे असावं, पण संगीतकारांचाही उत्साह एकूणच मावळल्यासारखा वाटतो. पूर्वी कर्णमधुर संगीत देणारे 'विशाल-शेखर' कधीच कर्णकर्कश्य झाले आहेत आणि 'शंकर एहसान लॉय' सुद्धा रटाळ होत चालले आहेत.

१०-१२ चित्रपट केल्यानंतरही 'इम्रान खान' मध्ये फारसा फरक पडलेला नाही. मी शाळेत असताना चौथी आणि सातवीतल्या स्कॉलरशिप परीक्षेसाठी काही मुलांना पालक जबरदस्तीने बसवत. त्या मुलांची कुवत नसे आणि ते अपयशीच ठरत. इम्रान खानला अश्या प्रकारची जबरदस्ती करून कोण कॅमेऱ्यासमोर उभं करतंय, माहित नाही. पण त्याचीही बिचाऱ्याची कुवतच नसावी. तो कुठल्याच जागी आश्वासक वाटतच नाही. ऑफिसमध्ये मित्रासोबतची भांडणं आणि 'देवदास'चं मंचीय सादरीकरण ह्या दोन भागांत तर तो असह्यच आहे !
'देवदास' वाला भाग तर एकंदरीतच इतका भोंगळ आहे की वैतागच येतो ! अशक्य पांचटपणा व शुद्ध बिनडोक जुळवाजुळव ह्यांमुळे हा सगळा तमाशा कधी एकदा उरकतोय असं वाटतं त्या दहा मिनिटांत !

तितकाच अत्याचारी कंटाळा आणतो फक्त २-३ दृश्यांत दिसणारा 'मॅडी'चा 'बॉस'. हा नगीना कुठून शोधून काढला आहे कुणास ठाऊक. पण 'प्रेक्षकांच्या सहनशीलतेचा अंत पाहणे' हाच त्याचा एककलमी कार्यक्रम असावा बहुतेक. विनोदाच्या नावाखाली तो जो काही आचरटपणा करतो, तो संतापजनक आहे.
नकारात्मकतेत सगळ्यात मोठा हातभार आहे शेवटाचा. चित्रपटाचा शेवट साधारण अर्धा तास चालतो. ह्या अर्ध्या तासात तो एक विचित्र कलाटणी घेतो. ही अतिरंजित कलाटणी 'कैच्याकै' सदरात मोडू शकते. पण तरी त्यातल्या त्यात बरं हेच की इथून पुढे कंगना फॉर्मात येते आणि इम्रान खान जरासा लपतो !

कट्टी आणि बट्टीचा हा 'सी-सॉ' चा खेळ सव्वा दोन तासांनी संपतो. ह्या सव्वा दोन तासांत जे जे काही आपल्या मनाच्या पाटीवर लिहिलं जातं, ते सगळं शेवटानंतर पुसलं जातं आणि पुन्हा एकदा स्वच्छ पाटी घेऊन आपण बाहेर पडतो. ही कुठली अजरामर लव्ह स्टोरी नाही. अप्रतिम चित्रपटही नाही. पण सगळ्या नकारात्मकतेनंतरही मनावर कुठला चरा उमटत नाही, ह्याएकाच कारणासाठी हा चित्रपट पाहता येऊ शकेल.

बाहेर आल्यावर इम्रानशी कट्टी आणि कंगनाशी बट्टी होईल होईल, ह्याची मात्र १००% ग्यारंटी !

रेटिंग - * *


हे परीक्षण मराठी दैनिक 'मी मराठी लाईव्ह' मध्ये २० सप्टेंबर २०१५ रोजी प्रकाशित झाले आहे :-


Monday, September 14, 2015

जवळजवळ झीरो (Movie Review - Hero)

मुंबई. मुंबईचा समुद्र. मुंबईचे लोक. रेल्वेगाड्या. मुंबईचा ट्राफिक. रस्ते आणि गल्ल्या.
चित्रपटाच्या सुरुवातीला, शीर्षकांसोबत कॅमेरा असं सगळं ओझरतं दाखवत फिरतो आणि स्थिरावतो तो एका गल्लीतल्या एका छुप्या अड्ड्यावर. इथे एक अर्ध्या माडाच्या उंचीचा खलपुरूष भल्या सकाळी चिकनच्या तंगड्या चावत बसला आहे. सोबत एक शरणागत व भेदरलेला गुजराती मनुष्य बसला आहे. पर्युषण काल कदाचित नसावा म्हणून त्याला त्या अभक्षभक्षणावर आक्षेप नसावा किंवा कदाचित तो जैनधर्मीय नसावा. तर अर्धा-माड-खलपुरुषाच्या फांद्या - अर्थात पंटर लोक - दोन तरुण पोरांना बखोटीला धरून तिथे घेऊन येतात आणि त्यांना पाहून शरणागत, भेदरलेल्या मनुष्याच्या पाचावर धारणच बसते ! का ? तर आता त्यांना सोडवायला त्यांचा बॉस कम मित्र व आपल्या चित्रपटाचा 'हीरो' येणार आहे, हे आपल्याला पुढील अर्थपूर्ण संवादांतून समजून येतं. मुंबईतल्या कुठल्याश्या किनाऱ्यावर आचरट व्यायाम करण्यात रमलेल्या 'हीरो'ला त्याचा एक पंटर टीप देतो आणि अपेक्षेनुसार तो 'त्या' गल्लीतल्या छुप्या अड्ड्यावर अवतरतो. अर्थात, गुंड असला तरी तो 'हीरो' असल्याने त्याची एन्ट्री धमाकेदार व्हायलाच हवी. ती तशी करण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे केला जातो. त्याने कुठून तरी असा एक बुलडोझर आणलेला असतो की त्या बुलडोझरच्या चालण्याने सभोवताल भूकंपसदृश थरथरतो ! धरणीकंप झाला तरी, अर्धा-माड-खलपुरुष चिकन खाण्यात रममाण असतो. बुलडोझर आत शिरतो, अड्ड्याची एक बाजू चिरडतो आणि आतून आपला 'हीरो' पराकोटीची स्टाईल मारत उडी मारून बाहेर येतो. पण कितीही उंच झालं, तरी तगरीचं झाड माडाएव्हढं होत नाही. आणि हे तर अर्धा-माड-खलपुरुषाच्या समोरही 'बचकानं' वाटतं. त्यामुळे ही एन्ट्री धमाकेदार वगैरे काही न होता हास्यास्पद होते. ह्यानंतर एक अत्यंत ढिसाळ पद्धतीने चित्रित केलेली हाणामारी होते. जिच्या अखेरीस हीरो आपल्या दोघा साथीदारांसह विजयी मुद्रेने परत येतो आणि अर्धा-माड-खलपुरूष मान टाकून सपाट होतो.
गुंड असला, तरी 'हीरो' आहे. त्यामुळे त्याच्या 'हराम की कमाई' ला त्याने गरजूंमध्ये वाटलं पाहिजे. ही रॉबिनहुडी शिकवण चित्रपटातले गुंड हीरो वर्षानुवर्ष पाळत आलेले आहेत. हा 'हीरो'सुद्धा पाळत असतोच. पण तरी मित्रांच्या आग्रहास्तव, उर्वरित पैश्यांत तो एका महागड्या पबमध्ये जातो आणि शब्द गुदमरलेल्या एका घणाघाती गाण्यावर अनाकर्षक नृत्य करतो. इथेच तो चित्रपटाच्या 'हिरोईन'ले इम्प्रेसही करणार असतो आणि करतोच.


आता अश्या प्रकारे मी अख्खा चित्रपट इथे सीन-बाय-सीन मांडू शकतो आणि तो तसा मांडला, सारं काही उघड केलं, तरी काही बिघडणारही नाही. कारण न पाहिल्यास काही चांगलं हुकल्यासारखं किंवा आधीच सगळं काही सांगितलं गेल्याने रसभंग होण्यासारखं 'अथ' पासून 'इति' पर्यंत ह्या नव्या 'हीरो' मध्ये काहीच नाही. इथे 'हीरो' म्हणजे चित्रपट. चित्रपटाचा हीरो इतकाही 'झीरो' नाही.
हीरो 'सूरज'च्या भूमिकेतल्या 'सूरज पांचोली'ला १९८३ साली झळकलेल्या मूळ 'हीरो'मधल्या जॅकी श्रॉफची सर नाही. कारण त्याचा चेहरा आणि कपडे घातल्यावर जाणवणारी देहयष्टी अ‍ॅक्शन हीरोला साजेशी वाटत नाही. तो जेव्हा प्रियकर बनतो, तेव्हा चालून जातो म्हणून 'झीरो' नाही. अगदी पाप्याचं पितर असूनही 'वासेपूर' मधला नवाझुद्दिन सिद्दीकीचा 'फैझल खान' जशी दहशत निर्माण करतो, तशी छाप आपल्या पहिल्याच चित्रपटात हे स्टारकोकरू सोडू शकेल ही अपेक्षाच चुकीची आहे. ती अपेक्षा साहजिकच दिग्दर्शकानेही ठेवलेली नसावी, म्हणून जमेल तिथे त्याने सूरजचे कपडे उतरवून त्याच्या अंगावरचं गोंदण, पाच-पंचवीस पॅक्स आणि टरटरलेले स्नायू दाखवून त्याला 'शक्तिमान' दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र हा सगळा प्रयत्न तूप-साखरेत घोळवलेल्या चेहऱ्यामुळे अयशस्वीच ठरतो.

आपल्या रोजच्या येण्या-जाण्याच्या रस्त्यात एखादं बांधकाम दोन-चार स्लॅब्स झाल्यावर अचानक दृष्टीस पडतं आणि ते पाहून आपण चपापतो की, 'अरे ! इथे इतकी जागा होती ? कधी बांधलं हे सगळं ?' असंच काहीसं मला चित्रपट सिताऱ्यांची पोरं पडद्यावर झळकली की वाटतं. (शेखर सुमनचा मुलगा ? अनिल कपूरची मुलगी ? वगैरे)
अतिया शेट्टीला पाहून एकदम जाणवलं की सुनील शेट्टीसुद्धा किती मोठा झाला !
वय सरून गेलं तरी सुनील शेट्टी अभिनय शिकला नाही, अतिया शेट्टीसुद्धा वडिलांचा कित्ता गिरवते. ती सर्वतोपरी वडिलांवर गेली आहे. दिसतेही तशीच आणि कामही तसंच. तिच्या चेहरेपट्टीत मधूनच मला 'भूमिका चावला' चाही भास झाला आणि मनातल्या मनात मी भूमिका चावलाची क्षमाही मागितली. जुन्या 'हीरो'मधल्या मीनाक्षी शेषाद्रीशी अतियाची तुलना करणं मी प्रयत्नपूर्वक टाळलं आहे. मीनाक्षी शेषाद्री तर आजही कित्येक पटींनी सुंदर दिसते.

तिगमांशू धुलियाचा आयजी श्रीकांत माथुर थोडासा स्वच्छ व नीटनेटका दाखवता येऊ शकला असता. फार नाही, फक्त ती बोकडासारखी दाढी जरी काढली असती, तरी चाललं असतं. तारवटलेले डोळे, पिंजारलेले केस, अस्ताव्यस्त पेहराव, बेढब शरीर आणि दाढीचे बुरसट खुंट हा अवतार आयपीएस अधिकाऱ्याचा वाटत नाही.

शरद केळकर मात्र छोट्याश्या भूमिकेत लक्षात राहतो. कमावलेलं शरीर, आश्वासक देहबोली आणि वजनदार आवाज ह्याच्या जोरावर तो एक इन्स्पेक्टर म्हणून फिट्ट बसतो.

आदित्य पांचोली आपलं काम चोख निभावतो तर विवान भाटेना ('चक दे इंडिया' मधला क्रिकेटपटू) दुय्यम भूमिकेतही भाव खाऊन जातो.

निखिल अडवानी हा तसा चांगला दिग्दर्शक आहे. त्याचा हा एक चित्रपट आपण आणि त्यानेही विसरायला हवा. किंवा कदाचित बनवता बनवताच तो विसरला असावा. कारण काही ठिकाणी दिग्दर्शकाच्या गैरहजेरीचे सबळ पुरावे सापडतात ! ती शारीरिक गैरहजेरी की बौद्धिक, हे कुणास ठाऊक !

जुना हीरो आठवल्यावर पाकिस्तानी गायिका 'रेशमा' नी गायलेलं अजरामर 'लंबी जुदाई' आठवतं आणि तत्क्षणी अंगावर सरसरून काटा उभा राहतो. 'डिंग डॉंग', 'तू मेरा हीरो', 'प्यार करनेवाले..' वगैरे इतर गाणीही आठवतात आणि कानांची श्रीमंती वाढल्यासारखं वाटतं. जुन्या चित्रपटांचा रिमेक करताना हीच एक महत्वाची अडचण आजच्या जमान्यात जाणवत असावी. बहुतांश चित्रपटांच्या यशात संगीताचा महत्वाचा वाटा असायचा. आज त्या ताकदीचं संगीत देणारे मोजके लोकच उरलेत. अमाल मलिक, मित ब्रदर्स अनजान आणि सचिन-जिगर ह्या लोकांनी आपापल्या परीने उत्कृष्ट काम केलं असावं. पण रिमेकच्या बाबतीत ही तुलना 'पूर्वीचं विरुद्ध आत्ताचं' अशी थेट होते आणि तिथे हे उत्कृष्ट कामही निकृष्ट ठरतं. 'मैं हूँ हीरो तेरा', 'जब वी मेट', 'यादां तेरियां' अशी ही गाणी कंटाळा आणत नाहीत. तरी, चित्रपट संपल्यावर लक्षातही राहत नाहीत.

असे रिमेक्स हे बहुतकरुन त्यांच्या तांत्रिक सफाईत जुन्यापेक्षा सरस ठरतात. उदा. - डॉन. तसंही इथे जाणवलं नाही. सुरुवातीस उल्लेख केल्याप्रमाणे अतिशय ढिसाळपणे चित्रित केलेल्या हाणामाऱ्या तर आहेतच. पण कॅमेरावर्कही काही जादू करत नाही आणि संकलन तर बुचकळ्यात टाकणारं आहे.

रिमेकच्या नावाखाली एखाद्या चांगल्या अथवा सुपरहिट (अथवा दोन्ही) जुन्या चित्रपटाची माती कशी करावी, ह्याचं 'हीरो' हे एक ठळक उदाहरण आहे, असा विचार माझ्या मनाला स्पर्श करून गेला आणि लगेच मला 'जंजीर' व 'कर्ज' (कर्ज्ज्ज्ज !) आठवले.
मग मला हा 'हीरो' 'झीरो' न वाटता 'जवळजवळ झीरो' वाटला.

रेटिंग - * *


हे परीक्षण मराठी दैनिक 'मी मराठी लाईव्ह' मध्ये १३ सप्टेंबर २०१५ रोजी प्रकाशित झाले आहे :-


Sunday, September 06, 2015

लंगडा घोडा, रेस में दौडा (Movie Review - Welcome Back)

उत्तम दिग्दर्शक हा एक 'जॉकी' असतो. कलाकार, कथानक, पटकथा, संगीत, संवाद वगैरे सगळ्या बाबींचा एक घोडा करून तो त्यावर स्वार होतो आणि रेस करतो. तो रेस स्वत:साठी पळतो. त्याला माहित असतं की आपण कितपत मजल मारू शकतो आणि तो हमखास त्याच्यापुढेच जातो. त्यामुळे हरला तरी तोच जिंकतो आणि जिंकला तर तो जिंकलेला असतोच !
बाकी लोक स्टारकास्ट, कथानक किंवा विशिष्ट काळात 'चलती' असलेलं काहीही बकवास (उदा. - हिमेश रेशमिया, यो यो हनी सिंग किंवा रिमेक्स, सीक्वल इत्यादी) पैकी १-२ ला 'जॉकी' म्हणून बसवतात आणि बाकीच्याचा घोडा बनवून दौडवतात ! अर्थातच, त्या घोड्याचा एक पाय ते स्वत:सुद्धा असतात ! अल्लाह मेहरबान हो, तो गधा भी पहलवान होता है, तो घोडा क्यूँ नहीं ? त्यामुळे बऱ्याचदा रेस चांगली होतेही. पण ते प्रत्यक्षात मिथक असतं. एका कोपऱ्यात उभं राहून ज्याने ती रेस लौकिकार्थाने जिंकली असेल, तो हिंमतवान 'जॉकी' ह्या पुचाट जॉकीच्या बेगडी यशाला गालातल्या गालात हसत असावा.

'वेलकम' (पहिला भाग) आला तेव्हा अक्षय कुमारची चलती होती. कतरिना कैफलाही चांगला भाव मिळायला सुरुवात झाली होती आणि 'नाना पाटेकर + अनिल कपूर' ही दुकलीसुद्धा वेगळाच 'फ्लेवर' घेऊन येत होती. जोडीला शिखरावर पोहोचलेला परेश रावलसुद्धा होता ! बस्स ! अनीस बाजमींनी ही तगडी स्टारकास्ट 'जॉकी' बनवून इतर सगळ्याचा घोडा केला आणि 'वेलकम बॅक'ला रेस दौडवली ! घोडा अगदी तगडा नव्हता, तरी लंगडाही नव्हता. त्यामुळे रेस मनासारखी झाली. पण हे असं मिळालेलं यश नशेसारखं असतं. पुन्हा पुन्हा चाखावंसं वाटतं.
आता अनीस बाजमींनी 'नाना + अनिल + परेश रावल' च्या जोडीला जॉन अब्राहम, डिम्पल कापडिया आणि नसिरुद्दीन शाह आणून घोड्यावर बसवले. पण ह्यावेळी घोडा लंगडा निघाला ! बकवास कथानक, पोरकट पटकथा, भिकार अभिनय, चुकार संकलन, बंडल संगीत, सुमार छायाचित्रण वगैरे हाराकिरी एकत्र आली आणि घोडा पिचला !

तर त्याचं होतं काय की -
उदय शेट्टी (नाना पाटेकर) आणि मजनू (अनिल कपूर) हे पूर्वाश्रमीचे 'भाई'लोग आता 'शराफत की जिंदगी' गुजार रहेले होते है. त्यासाठी त्यांनी दुबईत स्वत:चं एक अलिशान हॉटेल सुरु कियेला होता है. पण वाढत्या वयासोबत उदय-मजनू आपापल्या लग्नासाठी अजूनच तरस रहेले होते है. 'नजफगढ'ची महाराणी (डिम्पल कापडिया) मुलगी राजकुमारी नंदिनी (अंकिता श्रीवास्तव) ला घेऊन त्यांच्या हॉटेलात येते आणि उदय-मजनूच्या दिलांमध्ये बोले तो शहनाई बजने लगती है ! पण आपण आपल्या बाईकवर मजेत जात असताना बाजूने जाणाऱ्या एष्टीतून कुणी तरी पचकन थुंकावं, तसा अचानक कुठून तरी उदय शेट्टीचा बाप (म्हातारा नाना) उदयची एक लहान बहिण (श्रुती हासन) सोबत घेऊन उभा ठाकतो आणि तिच्या लग्नाच्या जबाबदारीची माळ उदयच्या गळ्यात घालून उंडारायला निघून जातो !
जशी स्टोरीच्या सोयीसाठी उदयची एक बहिण पैदा केली गेली, तसाच डॉ. घुंगरू (परेश रावल) चा एक मुलगासुद्धा पैदा करणे आवश्यक आहेच. नाही तर अकाऊन्ट टॅली कसं होणार ? मग उपटसुंभ मुलाच्या भूमिकेत साचेबद्ध पॅक्सयुक्त बॉडी घेऊन 'अजय' (जॉन अब्राहम) प्रकट होतो. आणि पुन्हा पहिले पाढे पंचावन्न ! पहिलाच 'वेलकम' नव्या चेहऱ्यांसह पुन्हा सुरु होतो ! हे अजून काही नवे चेहरे म्हणजे वॉण्टेड भाय (नसिरुद्दीन शाह) आणि त्याचा मुलगा हनी (शायनी आहुजा).चित्रपटात सरळसरळ दोन गट पडलेले आहेत. नाना + अनिल + डिम्पल + नसीर विरुद्ध जॉन + श्रुती + अंकिता + शायनी आहुजा. नाना + अनिलचा गट जे काही करेल, त्यावर बोळा फिरवणे हा एककलमी कार्यक्रम जॉन + श्रुतीचा गट यशस्वीपणे राबवतो. पहिल्या भागात मूर्ख बहिणीची बिनडोक भूमिका जितक्या ठोकळेबाजपणे कतरिना कैफने केली होती होती, तितक्याच किंवा त्याहूनही चांगल्या ठोकळेबाजपणे श्रुती हासन दुसऱ्या भागात करते. ती पडद्यावर आल्यावर प्रत्येक वेळेस आपल्याला कमल हासनबद्दल अतीव सहानुभूती वाटते. जॉन अब्राहमकडून कुठलीही अपेक्षा ठेवण्यापेक्षा मी सलमान, कतरिना वगैरेंकडून ठेवीन. त्यामुळे त्याचा 'ठोकळा' अपेक्षितच होता.
नसिरुद्दीन शाहचा प्रवेश मध्यंतराच्याही नंतर आहे. अश्या किरकोळ आणि तोकड्या लांबीच्या भूमिका हा महान अभिनेता का करतो, हे समजत नाही.
वर उल्लेखलेल्या दोन गटांत 'परेश रावल' येत नाहीत. कारण ते दोन्हीकडून काम करतात !
आता परेश रावल ह्यांनी जरा वेगळं काही तरी करायला हवं, असं वाटायला लागलं आहे. अगदी सुरुवातीच्या काळात ज्याप्रकारे एका पाठोपाठ एक चित्रपटांत त्यांना एकसारख्याच नकारात्मक भूमिका मिळत गेल्या होत्या, तसंच काहीसं आता परत होऊ नये, अशी एक प्रामाणिक इच्छा आहे.
नाना पाटेकर आणि अनिल कपूरची जोडी मात्र धमाल करते. दोघांपैकी एक जरी चित्रपटात नसता, तर कदाचित मध्यंतरापर्यंतसुद्धा सहन झालं नसतं ! ह्या दोघांनंतर 'राज शांडिल्य' ह्यांचे खुसखुशीत संवाद हीच एक चांगली गोष्ट चित्रपटात आहे. त्यांच्या प्रत्येक ओळीला बरोब्बर न्याय नाना आणि अनिलने दिला आहे. दोघे पूर्ण वेळ 'ट्वेंटी२०' मूडमध्ये जबरदस्त फटकेबाजी करतात, एकही चेंडू वाया घालवत नाहीत !

'टाईम लगा रै कायको..' हे 'टपोरी सॉंग' त्यातल्या त्यात बरं जमून आलं आहे. बाकी सगळा गोंधळ डोक्याचा बाजार उठवणारा आहे. (ह्या 'टपोरी सॉंग' मध्ये 'जॉन'चं सोंग बघण्यासारखं आहे. गोविंदाची नक्कल करण्याचा त्याचा प्रयत्न हास्यास्पद झाला आहे. एकूणच त्याला हा 'टपोरी' बाज झेपलाच नाहीय, हेच खरं.)

कथा-पटकथेत इतकी प्रचंड मोठी भगदाडं क्वचितच पाहायला मिळतात. ६० च्या दशकात चित्रपट केवळ गाण्यासांठी असायचे. त्या गाण्यांना पडद्यावर दाखवण्यासाठी कथानक असायचं. तेव्हा असली भगदाडं असत. आज ती बुजवायला कुणी एस डी, ओ पी, मदन मोहन, शंकर-जयकिशन, रवी, नौशाद, सज्जाद वगैरे राहिलेले नाहीत. आता तर लहानश्या छिद्रालाही लपता/ लपवता येत नाही.
भोकं बुजवायला ठिगळसुद्दा न लावण्याचा कामचुकारपणा केल्याबद्दल ह्या चित्रपटाला तिकीट खिडकीवर 'कडी से कडी सजा' मिळावी आणि 'वेलकम बॅक'ला 'गेट लॉस्ट' सुनावलं जावं, अशी मनापासून इच्छा आहे. पण चित्रपटगृहातून बाहेर पडताना, लोकांच्या ज्या गप्पा कानांवर पडल्या, त्यावरून तरी असंच वाटतंय की हा घोडा लंगडा असला, तर रेस 'फिक्स्ड' असावी !

रेटिंग - *


हे परीक्षण मराठी दैनिक 'मी मराठी लाईव्ह' मध्ये ०६ सप्टेंबर २०१५ रोजी प्रकाशित झाले आहे :-


Tuesday, September 01, 2015

थेंब

रात्रभर पडलेल्या पावसानंतरची ओलीचिंब सकाळ किंवा रंगात आलेल्या हिवाळ्यातली दवभिजली सकाळ म्हटल्यावर मला माझ्या लहानपणीचं बदलापूर आठवतं. नागमोडी रस्ते, लहान-मोठी घरं, छोट्या टेकड्या, पायवाटा, धुकं, शिवारं, फुलपाखरं, पक्षी आणि 'थेंब'. पावसाचे किंवा दवाचे.

पावसाच्या ३-४ महिन्यांत जमिनीचा एक चौरस मीटर तुकडासुद्धा कोरडा दिसत नसे त्या काळी. दररोज किमान एक सर आणि दर २-३ दिवसांत एकदा मुसळधार, हा तर पावसाचा ठरलेला रतीबच होता.
आमचं घर तसं गावाबाहेर होतं. छोटंसं, टुमदार, स्वतंत्र. तुरळक वस्ती आणि आजूबाजूला पसरलेला विस्तीर्ण मोकळा माळ. जिथे पावसाच्या पहिल्या थेंबाबरोब्बर इवले इवले पोपटी अंकुर जमिनीतून डोकं वर काढायचे आणि ३-४ चार जोरदार सरी झाल्या की सर्वदूर हिरवागार गालिचा पसरायचा. दूरवर असलेल्या डोंगरावरून ओघळणाऱ्या छोट्या-मोठ्या झऱ्यांच्या बारीक रेषा मला तेव्हा बाबांच्या काळ्याभोर केसांमध्ये असलेल्या काही पांढऱ्या शुभ्र केसांसारख्या वाटत असत, का कुणास ठाऊक ! शाळेला जाताना पाऊस आला की मला प्रचंड आनंद होत असे. पायांत गमबूट आणि डोक्यापासून पोटरीपर्यंत येणारा एक सलग रेनकोट घालून मी आणि ताई चालत चालत शाळेत जायचो. तेव्हा काही स्कूल बस वगैरे नव्हत्या आणि रिक्शाही. घरापासून आमची शाळा ३-४ किमी. तरी असावी. चिखल, पाणी, तुडवत फताड फताड करत जायला जाम मजा यायची. भिजूनही कोरडं राहण्याचा आनंद मला तेव्हापासून माहित आहे.
पावसाळ्यानंतर 'ऑक्टोबर हीट' असते ही आजकालचा शिरस्ता असावा किंवा कदाचित त्या काळीही असेल, पण मला तरी कधी ती 'हीट' जाणवली नाही. पावसाची एक कुठली तरी सर जाता जाता मागे स्वत:चा गारवा शिडकावून जायची. तो गारवा पुढचे तीन-चार महिने कमी होत नसे असंच मला आठवतंय. मग माळ्यावरच्या बॅगेत, कपाटाच्या सगळ्यात वरच्या कप्प्यात, दिवाणाच्या पोटात ठेवलेले गोधड्या, शाली, स्वेटर बाहेर यायचे. जोडीला आत्याने विणलेला एखादा नवीन स्वेटरही असे.
रात्रीचं जेवण झाल्यावर नळाच्या थंड पाण्याखाली हात धुण्यासाठी कसेबसे धरवत असत. ते पाणी थंड म्हणजे बर्फाचंच वाटायचं ! त्याने गारठलेले हात कोरडे करून मी २-३ मिनिटं कुल्ल्याखाली ठेवून दिवाणावर बसत असे, गरम व्हावेत म्हणून ! मग पाठीवरच्या कवचाच्या आत कासव किंवा गोगलगाय जशी शिरते तसा माझ्या आवडत्या पांढरट गुलाबी शालीला बाहेरून एक गोधडी किंवा ब्लँकेट जोडून मी शिरत असे.
पावसाळी पहाट असली तर बाहेर थेंबांची टपटप असे आणि हिवाळी पहाट असली तर धुक्याचा कापूस आणि दवाची रांगोळी. ह्या सगळ्यांच्या जोडीला पक्ष्यांची किलबिल, हवाहवासा गारवा आणि शालीची ऊब ! (तेव्हा चिमण्या असायच्या. एखादी तर घरातही शिरायची. पण ते बहुतकरुन दुपारी वगैरे.) मग कानाला जाणवायचा आईचा आवाज. आई रियाझाला बसलेली असायची. मी तडक शाल घेऊन तिच्याकडे जात असे आणि तिच्या मांडीवर डोकं ठेवून माझी झोपेची दुसरी इनिंग सुरु करत असे. अर्धवट झोपेत मी आईचा रियाझ ऐकत ऐकत खिडकीबाहेरच्या पन्हाळीवर रांगणारे किंवा झाडाच्या फांदीवरून पाऊस पडून गेल्यानंतर ओघळणारे किंवा त्याच डहाळीच्या पानांवर तरळणारे दवाचे थेंब पाहत असे. पावसाचं पाणी असेल तर ते टप्पकन् पडे. दवाचा थेंब मात्र मला आजीने सांगितलेल्या बेडकीण आणि बैलाच्या गोष्टीतल्या बेडकीणीसारखा टम्म फुगलेला वाटे. पण तो फुटतच नसे. मग मी उठून तो थेंब फोडायला जायचो, तर तिथे थेंबांची एक मोठ्ठी कॉलनी दिसे, अनेक पानांवर पसरलेली ! 'माझा' थेंब कोणता होता, हेच कळत नसे. मग खिडकीबाहेर हात टाकून ती फांदी हलवून किंवा सर्रकन् हात फिरवून सगळे थेंब फर्रकन् उडवून टाकायचे !
थेंबांचं, मग ते पावसाचे असोत वा दवाचे, माझ्याशी काही तरी खास नातं होतं. पण ते नक्की काय होतं, हे मला समजायचं नाही. त्यातलं सौंदर्य नेमकं काय आहे किंवा 'हे सौंदर्य आहे' हेच मला जाणवत नसावं.
लुडलुड हलून मंद गतीने एक एक करून टपकणारे थेंब, मोत्यांच्या तुटलेल्या सरीतून सुर्रकन् सुटणाऱ्या मोत्यांसारखे थेंब, पानांवर निवांत पडून एक टक बघत बसणारे संयमी थेंब, व्हरांड्याच्या किंवा बाल्कनीच्या कठड्यावर थिजणारे, जिरणारे, ओघळणारे थेंब, हात गारठवणारे, नजरेला गोठवणारे थेंब, अंगावरून निथळणारे थेंब. ह्या थेंबांची भाषा मला खूप नंतर कळली. अगदी आत्ता आत्ता.

मध्यंतरी ऑफिसमध्ये क्रिकेट स्पर्धांची घोषणा झाली. ऑगस्टचा महिना होता. स्पर्धा जानेवारीत होती. वेगवेगळ्या 'युनिट्स'ने स्वतंत्र किंवा एकत्र येऊन आपापले संघ ठरवले. वेगवेगळ्या वेळी, निरनिराळ्या जागांवर सर्वांचा सराव सुरु झाला. नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत सरावाने चांगलाच जोर धरला होता. मी रोज सकाळी सहा ते साडे सात क्रिकेट खेळत होतो. दीड तासापैकी साधारण अर्धा-पाउण तास तरी मी रोज बोलिंग करत असे. घरी येईपर्यंत एक हवाहवासा थकवा जाणवत असे. पाच मिनिटं पंख्याखाली बसून, बाटलीभर थंड पाणी पिऊन मग गरमागरम पाण्याने अंघोळ.
थकलेल्या अंगावर गरम पाण्याचे तांबे म्हणजे एक स्वर्गीय आनंदच ! बादलीत शेवटच्या ३-४ तांब्यांचं पाणी उरलं की ती बादलीच डोक्यावर उलटी करायची आणि मान खाली घालून दोन मिनिटं शांत बसून राहायचं.
तेव्हा कळलं की प्रत्येक थेंब काही तरी कुजबुजत असतो. काहींची कुजबुज ऐकू येते, काहींची नाही. ऐकू आलेली कुजबुज एकाक्षरी किंवा फार तर एका वाक्याची असते. त्याचा अन्वयार्थ लावेपर्यंत दुसरा थेंब कुजबुजतो. मुंग्यांची रांग पाहिलीय ? प्रत्येक मुंगी समोरून येणाऱ्या मुंगीच्या तोंडाला तोंड किंवा कानाला तोंड लावुन काही तरी कुजबुजते आणि दोघी आपापल्या दिशेला क्षणार्धात पुढे रवाना होतात. मुंग्यांचं गुपित मुंग्यांना ठाऊक आणि थेंबांचं गुपित थेंबांना !

हृषीकेश मुखर्जींच्या 'आनंद' मध्ये राजेश खन्ना म्हणतो की, 'प्रत्येक माणूस हा एक ट्रान्समीटर असतो आणि रिसीवरही. एकमेकांकडून एकमेकांकडे सतत काही अदृश्य लहरी जात असतात !'
निसर्गाकडून माणसाकडे येणाऱ्या दृश्य लहरी म्हणजे हे थेंब असावेत बहुतेक ! झाडावरून ओघळणारे, पन्हाळीवरून रांगणारे, पानांवर, कौलांवर, कठड्यांवर खिदळणारे थंडगार थेंब आणि अंगावरून निथळणारे, गालांवरून ओघळणारे कोमट थेंब सगळे सगळे साठवता आले पाहिजेत. त्यांच्या कुजबुजीचा कल्लोळ करवता आला पाहिजे. त्या कल्लोळातून काही हाती लागेल, काही नाही लागणार. पण जे लागेल त्यात कवितेसाठी आयुष्यभर पुरेल इतका ऐवज असेल.

थेंबाचा व्हावा शब्द
शब्दाला ओघळछंद
थेंबांची कुजबुज व्हावी
शब्दांनी अक्षरबद्ध

- असं वाटत राहतं. पण कुणास ठाऊक हे शक्य आहे की नाही ! बहुतेक नाहीच.
ओंजळीच्या बाहेरचे थेंब आणि ओळींच्या बाहेरचे शब्द टिपणारा टीपकागद होण्यासाठी बहुतेक तरी परत लहान व्हावं लागेल आणि आईचा रियाझ सुरु असताना तिच्या मांडीवर डोकं ठेवून झोपेची दुसरी इनिंग खेळायला लागेल.

तोपर्यंत सभोवताली विखुरलेले, थिजलेले, वाहून जाणारे, घरंगळणारे शब्द फक्त पाहत बसायचे. कारण पन्हाळ असलेली खिडकी, खिडकीतून डोकावणारी झाडं, धुक्याच्या चादरी, दवाची शिंपण वगैरे गोष्टी आता 'कोणे एके काळी' ह्या सदरात मोडतात. पाऊस आणि थंडी तर समतोल बिघडल्याशिवाय येत नाहीत आणि नळाला २४ तास सोलर हीटरचं गरम पाणी असल्याने हातही गारठत नाहीत.

मला एक टाईम मशीन हवंय..! ट्रान्समीटर आणि रिसीवर माझ्यात आहेतच, बहुतेक !
कारण -

असतात काही सांडलेले शब्द माझ्याभोवती
ज्यांना कधी ओळींमधे जमलेच नाही मावणे

....रसप....

(पूर्वप्रसिद्धी - मासिक 'श्री. व सौ.' -ऑगस्ट २०१५)
Related Posts Plugin for WordPress, Blogger...