Sunday, September 20, 2015

इम्रानशी कट्टी, कंगनाशी बट्टी (Movie Review - Katti Batti)

'कट्टी' हा एक नकार आणि 'बट्टी' म्हणजे होकार. मैत्री आणि प्रेमात असे होकार-नकार चालू असतात. ह्या होकार-नकारामध्ये कायमस्वरूपी कुणा एकाचा विजय होणार असेल, तर तो नकाराचाच होऊ शकतो. कारण नकार म्हणजे एक पूर्णविराम असतो आणि होकार म्हणजे अनेक नकारांवर सतत मात करत राहणे अपेक्षित असणे. म्हणताना आपण म्हणतो की सकारात्मकतेत खूप मोठी ताकद असते, मात्र मतभेदांच्या नकारात्मक कात्रीला जर धार मिळाली, तर एखाद्या नाजूक नात्याचा धागा अगदी सहजपणे कापला जातो. एकाच ओळीचे दोन तुकडे होऊन तिला दोन जागी स्वतंत्र पूर्णविराम मिळू शकतात.
'कट्टी-बट्टी' ही कहाणी अश्याच एका नाजूक नात्यातल्या 'कट्टी-बट्टी'बद्दल आहे आणि हा चित्रपट स्वत:सुद्धा अनेक सकारात्मक-नकारात्मकतांसह आहे. चित्रपट व प्रेक्षक ह्यांच्यातल्या मतभेदांच्या कात्रीला चित्रपटाचा शेवट जवळ येईपर्यंत चांगलीच धार येते आणि त्या नाजूक नात्याचा धागा तुटतो. मात्र हे विभक्त होणं कटुता ठेवून होत नाही, हे विशेष.

ही कहाणी माधव काबरा 'मॅडी' (इम्रान खान) आणि पायल (कंगना राणावत) ची आहे. बड्या बापाची टवाळ, उनाड व बिनधास्त मुलगी पायल मॅडीला दिसते आणि पाहताक्षणीच मॅडी तिच्यासाठी मॅड होतो. तिला वारंवार आपल्या मनाची गोष्ट सांगतो, मात्र तिला कुठलीही वचनबद्धता (शुद्ध मराठीत 'कमीटमेंट') करण्याचा 'मूड' नसतो. अखेरीस सरळसाधा भाबडा मॅडी विना-कमीटमेंट नात्यासाठी तयारी दर्शवतो आणि दोघे आधी शुद्ध टाईमपास म्हणून एकत्र फिरायला लागतात. कालांतराने 'मॅडी' आर्किटेक्ट होतो, नोकरी करायला लागतो आणि दोघे 'लिव्ह इन रिलेशनशिप' स्वीकारतात. पण पाच वर्षं चाललेल्या नात्यात काही कारणाने कटुता येते आणि धागा तुटतो. तुटलेला धागा परत जोडण्यासाठी 'मॅडी' करत असलेलं जीवाचं रान म्हणजे 'कट्टी-बट्टी'चं कथानक.

आता आधी ह्यातल्या सकारात्मकता पाहू.
'फ्लॅशबॅक' तंत्राचा खुबीने वापर करत ही साधीसरळ कथा रंजकतेने मांडली आहे. 'हीरो' च्या सेटवर स्वत:च्या नावाने रिकामी खुर्ची बसवून निखिल अडवानी बहुतेक 'कट्टी-बट्टी' करत असावेत. कारण जशी 'हीरो'मध्ये प्रकर्षाने त्यांची अनुपस्थिती जाणवते, तशी इथे त्यांची उपस्थिती बऱ्यापैकी लक्षात येण्याइतपत आहे !
अंशुल सिंघलसोबत मिळून त्यांनी लिहिलेली पटकथाही चांगली आहे. 'कल हो न हो' ची जादू परत करण्याचा हा प्रयत्न असावा, हेही जाणवतं.

फार वाव नसला, तरी जिथे जिथे संधी मिळाली आहे तिथे तिथे 'तुषार कांती रे' ह्यांच्या छायाचित्रणाने छाप सोडली आहे. चित्रपट 'टवटवीत' आणि 'कोमेजलेला', अश्या दोन पातळ्यांवर एकाच वेळी चालत राहतो. दोन-तीन दृश्यांत मुंबईचं ओघाने आलेलं ओझरतं गगनचुंबी दर्शन क्षणभर आपल्याला विस्मयचकित करतं की, 'हे खरं आहे का ?' पण हीच कॅमेराची कमाल असावी.

कंगना राणावत एक अभिनेत्री म्हणून आजचं अत्यंत आश्वासक नाव. 'क्वीन', 'तनू वेड्स मनू -रिटर्न्स' मध्ये आपल्या मनाचा ताबा घेणारी कंगना इथे दिसत नाही, मात्र ती अगदीच फसतही नाही. बिनधास्त 'पायल' साकारणं हे काही आव्हानात्मक काम नव्हतंच आणि उत्तम कलाकार आव्हानात्मकतेमुळे प्रोत्साहित होतात. त्यामुळे उत्तरार्धाच्या उत्तरार्धात जेव्हा 'पायल' ची व्यक्तिरेखा जराशी आव्हानात्मक होते, तेव्हा कंगना खऱ्या अर्थाने रंगात येते. एरव्ही, ती तिचं दिलेलं काम प्रामाणिकपणे करते, इतकंच.

आता ह्यातल्या नकारात्मकता पाहू.

'कल हो न हो' ची जादू पुन्हा करण्याचा हा प्रयत्न सपशेल फसतो ह्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे फुळकट संगीत. हे संगीत 'शंकर एहसान लॉय' चं आहे, ह्यावर विश्वास ठेवणं आधी जरा कठीण जातं. मग त्यांच्या गेल्या काही चित्रपटांतील कामाकडे पाहिल्यावर दुर्दैवाने आश्चर्यच वाटत नाही ! गेल्या काही वर्षांत चित्रपटात 'संगीत' हा भाग दुय्यमतेकडून 'तिय्यम' वगैरे झाल्यामुळे असावं, पण संगीतकारांचाही उत्साह एकूणच मावळल्यासारखा वाटतो. पूर्वी कर्णमधुर संगीत देणारे 'विशाल-शेखर' कधीच कर्णकर्कश्य झाले आहेत आणि 'शंकर एहसान लॉय' सुद्धा रटाळ होत चालले आहेत.

१०-१२ चित्रपट केल्यानंतरही 'इम्रान खान' मध्ये फारसा फरक पडलेला नाही. मी शाळेत असताना चौथी आणि सातवीतल्या स्कॉलरशिप परीक्षेसाठी काही मुलांना पालक जबरदस्तीने बसवत. त्या मुलांची कुवत नसे आणि ते अपयशीच ठरत. इम्रान खानला अश्या प्रकारची जबरदस्ती करून कोण कॅमेऱ्यासमोर उभं करतंय, माहित नाही. पण त्याचीही बिचाऱ्याची कुवतच नसावी. तो कुठल्याच जागी आश्वासक वाटतच नाही. ऑफिसमध्ये मित्रासोबतची भांडणं आणि 'देवदास'चं मंचीय सादरीकरण ह्या दोन भागांत तर तो असह्यच आहे !
'देवदास' वाला भाग तर एकंदरीतच इतका भोंगळ आहे की वैतागच येतो ! अशक्य पांचटपणा व शुद्ध बिनडोक जुळवाजुळव ह्यांमुळे हा सगळा तमाशा कधी एकदा उरकतोय असं वाटतं त्या दहा मिनिटांत !

तितकाच अत्याचारी कंटाळा आणतो फक्त २-३ दृश्यांत दिसणारा 'मॅडी'चा 'बॉस'. हा नगीना कुठून शोधून काढला आहे कुणास ठाऊक. पण 'प्रेक्षकांच्या सहनशीलतेचा अंत पाहणे' हाच त्याचा एककलमी कार्यक्रम असावा बहुतेक. विनोदाच्या नावाखाली तो जो काही आचरटपणा करतो, तो संतापजनक आहे.
नकारात्मकतेत सगळ्यात मोठा हातभार आहे शेवटाचा. चित्रपटाचा शेवट साधारण अर्धा तास चालतो. ह्या अर्ध्या तासात तो एक विचित्र कलाटणी घेतो. ही अतिरंजित कलाटणी 'कैच्याकै' सदरात मोडू शकते. पण तरी त्यातल्या त्यात बरं हेच की इथून पुढे कंगना फॉर्मात येते आणि इम्रान खान जरासा लपतो !

कट्टी आणि बट्टीचा हा 'सी-सॉ' चा खेळ सव्वा दोन तासांनी संपतो. ह्या सव्वा दोन तासांत जे जे काही आपल्या मनाच्या पाटीवर लिहिलं जातं, ते सगळं शेवटानंतर पुसलं जातं आणि पुन्हा एकदा स्वच्छ पाटी घेऊन आपण बाहेर पडतो. ही कुठली अजरामर लव्ह स्टोरी नाही. अप्रतिम चित्रपटही नाही. पण सगळ्या नकारात्मकतेनंतरही मनावर कुठला चरा उमटत नाही, ह्याएकाच कारणासाठी हा चित्रपट पाहता येऊ शकेल.

बाहेर आल्यावर इम्रानशी कट्टी आणि कंगनाशी बट्टी होईल होईल, ह्याची मात्र १००% ग्यारंटी !

रेटिंग - * *


हे परीक्षण मराठी दैनिक 'मी मराठी लाईव्ह' मध्ये २० सप्टेंबर २०१५ रोजी प्रकाशित झाले आहे :-


No comments:

Post a Comment

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...