Monday, October 19, 2015

राजवाडे म्हणजे आम्हीच (Movie Review - Rajwade and Sons)

मी एक पक्षीण आकाशवेडी, दुज्याचे मला भान नाही मुळी
डोळ्यात माझ्या असे एक आकाश, श्वासात आकाश प्राणातळी

कवयित्री पद्मा गोळे ह्यांच्या एका नितांतसुंदर कवितेतल्या ह्या सुरुवातीच्या ओळी. ही पक्षीण म्हणजे कोण असेल ? कवितेतली वक्रोक्ती किंवा रूपक समजल्याशिवाय खऱ्या काव्यरसिकाला चैन पडत नाही. ही पक्षीण म्हणजे 'तरुणाई' असेल का ? असू शकते. उत्साहाने सळसळणारी, स्वत:च्या पंखांवर, कुवतीवर पुरेपूर विश्वास असणारी, डोळ्यांत आभाळाची स्वप्नं जपणारी, फक्त स्वप्नं जपणारीच नव्हे, तर ती स्वप्नं सत्यात उतरवण्यासाठी उसळून उठणारी, भिडणारी, झगडणारी तरुणाई. अश्या तरुणाईला कुणीही अडवू शकत नाही, बांधून ठेवू शकत नाही. राष्ट्रबांधणीची, क्रांति घडवण्याची, समस्त मानवजातीचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोनच बदलून टाकण्याची क्षमता व हिंमत असलेलं हे एक अद्वितीय बल असतं. ह्या तरुणाईने कविमनाला वारंवार भुरळ घातली आहे. कविमन हे फक्त कविताच करत नसतं. ते कधी हातात छिन्नी घेतं, कधी कुंचला, कधी एखादं वाद्य तर कधी कॅमेरा !

तरुणाईने भारलेल्या कविमनाच्या व्यक्तीने हातात कॅमेरा घेतला की दिल चाहता हैं, ज़िन्दगी ना मिलेगी दोबारा, दिल धड़कने दो सारखे चित्रपट बनतात. तर कधी 'राजवाडे अ‍ॅण्ड सन्स' सुद्धा बनतात.
तरुणाईचे चित्रपट आजकाल मराठीत वरचेवर बनत आहेत. ही लाट 'बिनधास्त' ने आणली. त्यानंतर आजपर्यंत ती पुन्हा पुन्हा उसळून येतेच आहे. 'दुनियादारी' ने तिचं व्यावसायिक मूल्य व्यवस्थित दाखवून दिलं. 'राजवाडे अ‍ॅण्ड सन्स' म्हणजे अगदी पूर्णपणे तरुणाईचा चित्रपट नाही. ही कहाणी आहे आपल्या परंपरा, मूल्यं, संस्कार, सामाजिक व व्यावसायिक स्थान, व्यवसायाचा डोलारा वगैरे बाबींचं जतन करणाऱ्या एका मराठी कुटुंबाची. 'मराठी' म्हटलं की सहसा 'मध्यमवर्गीय' हा शब्द अध्याहृतच असतो. 'राजवाडे'सुद्धा मध्यमवर्गीय आहेत, मात्र आर्थिकदृष्ट्या नव्हे. वैचारिकदृष्ट्या. पुण्यातलं एक भलंमोठं प्रस्थ, ज्यांचे अनेकविध व्यवसाय यशस्वीरीत्या चाललेले आहेत आणि समाजात ज्यांचं नाव अतिशय विश्वास व आदराने घेतलं जातं असे 'राजवाडे' कुटुंब. एकत्र कुटुंब व कौटुंबिक व्यवसायाची जबाबदारी असलेल्या राजवाडे कुटुंबाची तिसरी पिढी, त्यांच्या आई-वडील, आजोबांनी लादलेल्या बंधनांत स्वत:ला बांधून घेताना धुसफुसते आहे. सळसळत्या तरुणाईला अडवलं, बांधलं जात आहे आणि तिला मुक्तपणे विहरायचं आहे, आभाळाचा ठाव घ्यायचा आहे. बंड करून उठलेल्या, क्रांतिकारी तरुणाईसमोर भल्याभल्यांचा टिकाव लागलेला नाही, हा तर इतिहासच आहे. पण हे होतं कसं आणि नेमकं काय होतं हे 'राजवाडे अ‍ॅण्ड सन्स' मध्ये पाहणं, हा एक जबरदस्त अनुभव आहे.


अनुभव दृश्यरुपात होत असताना ठळकपणे जाणवतो, तो चित्रपटाचा अत्यंत 'फ्रेश लुक'. त्यासाठी कला दिग्दर्शक नितीन बोरकर ह्यांचा विशेष उल्लेख आवश्यकच. प्रेत्येक फ्रेम विचारपूर्वक सजवलेली समजून येते. रंगसंगती, नेपथ्य, प्रकाशयोजना (मी एखाद्या नाटकाबद्दल बोलतो आहे, असं वाटेल कदाचित. पण हे चित्रपटातही जाणवतंच !) सारं काही आपापला उद्गार ऐकवतात.

चित्रपट एकाच वेळी तीन पिढ्यांना दाखवतो आहे. तरुण मुलांना दाखवतानाही नवतरुण (अलोक राजवाडे, सिद्धार्थ मेनन, मृण्मयी गोडबोले, कृतिका देव) आणि थोडेसे परिपक्व तरुण (अतुल कुलकर्णी, अमित्रियान पाटील) असे दोन वर्ग पडतात. त्यामुळे पात्रांची वेशभूषाही इथे खूप महत्वाची असावी.

चित्रपटाचा 'फ्रेश लुक' आपल्याला 'प्रेमाची गोष्ट'मध्ये पाहायला मिळाला होता. 'प्रेमाची गोष्ट' मध्ये सगळा भर त्या 'लुक'वरच राहिला होता, तसं सुदैवाने इथे घडत नाही. पूर्वार्ध होतो तेव्हा क्षणभर आपल्या मनात विचार येतोच की, 'Rajwade and sons, where nothing happens' आहे की काय, पण उत्तरार्धात कथानक रंग बदलत जातं. ह्यात काही ठिकाणी थोडी गडबड वाटते, पण ते किरकोळ मानता येऊ शकेल. एरव्ही सचिन कुंडलकरांची कथा-पटकथा वास्तवदर्शी आहेच. हृषिकेश मुखर्जींच्या क्लासिक 'खुबसूरत'शी हे कथानक साधर्म्य सांगत नसलं, तरी आठवणी जाग्या होतात. 'खुबसूरत'मध्ये सर्वांवर अधिकार गाजवणारी व्यक्ती घरातली स्त्री (दीना पाठक) होती, इथे पुरुष (सतीश आळेकर) आहे. तिथे सर्वांना खुलं जगायला शिकवणारी व्यक्तीही एक स्त्रीच (रेखा) असते, जी नात्यातलीही असते. इथे ती व्यक्तीही एक पुरुष (अमित्रियान पाटील) आहे, नात्यातलाच आहे. घरातली तिसरी पिढी म्हणजे तरुण मुलं मुक्त होऊ पाहत आहेत. तर वडीलधारी मंडळी, त्यांना स्वत:च्या मर्जीनुसार जगण्यासाठी भाग पाडायचा प्रयत्न करत आहेत. ही संकल्पना नुकतीच आपण 'दिल धडकने दो' मध्ये पाहिली होती. हाताळणी दोन्हीकडे वेगळी आहेच. राजवाडे साहजिकच भरपूर 'मराठाळलेला' आहे, तर 'दिल धडकने दो' पंजाबाळलेला. ह्या मूलभूत फरकाव्यतिरिक्तही अनेक फरक आहेत. त्यामुळे 'कशावर तरी बेतलेलं कथानक' असा आरोप इथे होऊ शकत नाही. मात्र, आधीच म्हटल्याप्रमाणे, 'आठवणी तर जाग्या होतातच !'

मात्र, 'खुबसूरत'मध्ये कथानकावरची हृषिदांची पकड शेवटपर्यंत ढिली होत नाही. इथे मात्र ती अधूनमधून होत राहते. काही प्रसंग अधिक चांगल्याप्रकारे रंगायला हवे होते. घरी पोलीस येणे, मुलाचे परत येणे, पात्रांचं एकमेकांवर धावून जाणे, मारणे अश्या ठिकाणी पकड ढिली होते. एका प्रणयदृश्याची, हाफ फ्राय खाण्यासोबत सांगड घातलेली आहे. ते अक्षरश: चावट विनोदी वाटतं.

संगीत आजच्या पिढीचं वाटावं म्हणून भिकार असावं, असा एक 'बेनेफिट ऑफ डाऊट' देता येऊ शकेल. कारण ह्या कानाने ऐकून त्या कानाने सोडून देत असताना, मधल्या भागात तो गोंधळ वैताग आणतो.

चित्रपटाचं सगळ्यात मोठं बलस्थान आहे, एकजात सर्वच्या सर्व पात्रांचा अप्रतिम अभिनय. कुणाही एकाचा स्वतंत्र उल्लेख करणंही अवघड वाटावं, इतका प्रत्येक जण आपापल्या व्यक्तिरेखेशी समरस झालेला आहे. मराठी चित्रपट चांगला असेल वा वाईट, आवडेल किंवा नावडेल, पण सर्व कलाकारांचे अभिनय नेहमीच लक्षात राहण्याजोगे असतात. हीच मराठी चित्रपटाची खरी श्रीमंती आहे. उत्तम निर्मितीमूल्यं, सफाईदार तंत्रज्ञान आणि कल्पक कलादिग्दर्शन ह्या सगळ्या बाबी चित्रपटाला एक टवटवीत व सुंदर चेहरा देत असतील आणि देतातच. मात्र तो चेहरा आपलासा वाटतो, तो कलाकारांच्या सहज वावरामुळे. सतीश आळेकर, सचिन खेडेकर, अतुल कुलकर्णी, राहुल मेहेंदळे, ज्योती सुभाष, मृणाल कुलकर्णी, वर उल्लेखलेले तरुण चेहरे (आणि काही राहिलेली नावं!) सर्वांनाच मनापासून दाद द्यायला हवी !
उत्तरार्धाच्या उत्तरार्धात एका दृश्यात सचिन खेडेकर एक मुलगा, बाप व भाऊ म्हणून स्वत:ची बाजू मांडतो. त्याची ती तिहेरी कोंडी सांगणारा तो प्रसंग मात्र चित्रपटाचा सर्वोच्च बिंदू म्हणता येईल. कसलाही मेलोड्रामा न करता संयतपणे आपली भिडस्त हतबलता सांगणाऱ्या त्याच्या विद्याधर राजवाडेने त्या एका प्रसंगात आपली स्वाक्षरी कॅमेऱ्यावर सोडली आहे, हे निश्चित.अनेक दिवसांनी मराठीत पुन्हा एकदा असा एक चित्रपट आला आहे, जो आवर्जून पाहावा. त्यातल्या काही अंमळ फसलेल्या जागांसह तो आवडावा, थोडासा आपणही जगावा आणि थोडासा दुसऱ्याला जगवावा.
लहान मोठे 'राजवाडे' आपल्या आजूबाजूला किंवा कदाचित आपल्यातही आहेत. म्हणूनच 'राजवाडे अ‍ॅण्ड सन्स' आपल्यास नकळत ''राजवाडे अ‍ॅण्ड अस' किंवा 'राजवाडे अ‍ॅण्ड मी' होतो. 'राजवाडे म्हणजे आम्हीच' असं वाटणं, हेच चित्रपटाचं खरं यश आहे.

रेटिंग - * * *हे परीक्षण मराठी दैनिक 'मी मराठी लाईव्ह' मध्ये १८ ऑक्टोबर २०१५ रोजी प्रकाशित झाले आहे :-


No comments:

Post a Comment

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...