Monday, October 05, 2015

अवस्थपणे म्यान (Movie Review - Talvar)

नुकतेच चैतन्य ताम्हाणे ह्यांच्या 'कोर्ट' ह्या चित्रपटाला ऑस्करसाठी नामांकन देण्यात आले. 'कोर्ट' हा चित्रपट एका सर्वसामान्य माणसाच्या न्यायव्यवस्थेतील ससेहोलपटीविषयी होता. एखाद्या साध्याश्या प्रकरणालाही कोर्टात किती काळ लागू शकतो, ह्याचा आपल्यापैकी प्रत्येकालाच अनुभव नसला, तरी अंदाज नक्कीच आहे. म्हणूनच आपण म्हणतोही की, 'शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये.'
मात्र कोर्टाच्या पायरीपर्यंत पोहोचण्याआधीही काही वेळेस अनेक पायऱ्या असतात. न्यायव्यवस्थेपर्यंत पोहोचायच्या आधी अनेक प्रकरणांना तपासयंत्रणा चिवडतात. संबंधित व्यक्ती त्यात भरडल्याही जातात. कोर्टाच्या संथगतीला अधोरेखित करणारा चित्रपट 'कोर्ट'सारखा दुसरा नसला, तरी तपासयंत्रणेच्या वरवंट्याखाली भरडल्या जाणाऱ्या सामान्य व्यक्तीला दाखवणारे अनेक चित्रपट आपण पाहिले आहेत. त्यांतले बहुतांश अतिरंजित, तर काही खरोखर अंगावर येणारे होते. 'अंगावर येणे', ह्याचेही दोन प्रकार होऊ शकतात. एक म्हणजे भडकपणामुळे आणि दुसरे म्हणजे उत्कटतेमुळे. 'तलवार'सुद्धा अंगावर येतो. पण त्यातल्या भडकपणामुळे नाही, तर उत्कटपणामुळे. काही चित्रपट एखाद्या धबधब्याप्रमाणे कोसळतात. तो आवाज, ते दृश्य स्तिमित करणारं असतं. 'तलवार' सारखे चित्रपट हे एखाद्या शांत ओहोळासारखे वाहत राहतात. तो संयतपणे वाहणारा प्रवाह करत असलेली संयमित नादनिर्मिती, नीरव शांततेत मनात चलबिचल करते. ही चलबिचल धबधबा पाहताना काही क्षण स्तिमित होण्यासारखी नसते. ती एक बेचैनी असते, जी अंतर्मनाला ढवळून काढते. आपल्याच नकळत आपण पडद्यावर चाललेल्या नाट्याचा एक भाग होऊन जातो. कुठल्या तरी एका पात्रात आपण स्वत:ला पाहायला लागतो. चित्रपट संपतो. ते पात्र नाहीसं होतं. मागे उरते बेचैनी. ढवळून काढणारी. पोखरणारी. पण निरुपाय. आपल्या क्षुल्लकतेचा, हतबलतेचा, असहाय्यतेचा आपल्यालाच एक वांझोटा संतापही येतो. टॅक्सी नं. ९२११ मधला 'जय' ज्या तिरस्काराने 'राघव'ला सांगतो की, 'दारु पी और अपने घर पे जा', त्याच तिरस्काराने आपणच आपल्याला सांगतो, 'गाडी काढ आणि घरी चल.'

नॉएडामध्ये काही वर्षांपूर्वी झालेल्या आरुषी तलवार व हेमराज बंजाडे ह्यांच्या दुहेरी खून प्रकरणावर 'तलवार' आधारित आहे. पण ह्या 'तलवार' शब्दाचा संदर्भ वेगळा आहे. न्यायदेवतेची डोळ्यांवर पट्टी आणि हातात तराजू घेतलेली मूर्तीच आपण आजतागायत पाहत आलो आहोत. पण तिच्याच दुसऱ्या हातात तलवारही आहे. 'ही तलवार म्हणजे आपण. पोलीस', असं चित्रपटात एके ठिकाणी एक पात्र म्हणतं. 'तलवार' हा त्या 'तलवार'बद्दल आहे.

स्वत:ची मुलगी 'श्रुती' आणि घरचा नोकर 'खेमपाल' ह्यांच्या खुनाचा आरोप असलेला डॉ. रमेश टंडन (नीरज कबी) पोलिसांच्या ताब्यात आहे. पण ह्या धक्कादायक प्रकरणाने खळबळ माजवली आहे. एक डॉक्टर बाप आपल्या मुलीचा खून करतो, पोलीस त्याला अटक करतात आणि डॉक्टर व त्याचे इतर नातेवाईक आरोपांना अमान्य करतात. हे सगळं नक्की काय आहे ? तपासयंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उठतात आणि प्रकरण 'सीडीआय'कडे दिलं जातं. ऑफिसर अश्विन कुमार (इरफान खान) ह्या अत्यंत कुशल अधिकाऱ्याकडे तपास सोपवला जातो. चीफ अश्विन कुमार आणि त्याचा एक ज्युनिअर (सोहम शाह) मिळून पाळंमुळं खणून काढतात आणि तपासातून काही वेगळीच कहाणी समोर येते.
पण सिस्टम आपला खेळ खेळते. मोहरे बदलतात. पट बदलतो. सगळ्या खेळाचा रंगच पालटतो. प्रत्येक जण आपापली चाल खेळतो. कुणीच जिंकत नाही, प्रेक्षकसुद्धा बुद्धिबळातल्या अनिर्णीत अवस्थेप्रमाणे 'स्टेलमेट' होतो.

'तलवार' सपासप वार करत नाही. मात्र तळपतो. त्रिफळा उडवणारे संवाद इथे नाहीत. मात्र नि:शब्द करणारा परिणाम साधला जातोच.
'डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी' मध्ये आपल्या नजरेत आलेला 'नीरज कबी' हा अभिनेता पुन्हा एकदा ताकदीचं सादरीकरण करतो. त्याने साकारलेला डॉ. रमेश टंडन एकेक क्षणात सच्चा वाटतो. नैराश्य, अनिश्चितता, असहाय्यता असं सगळं व्याकुळ मिश्रण त्याच्या नजरेतून दिसतं.
त्याच्या पत्नीच्या भूमिकेत कोंकना सेन-शर्माला विशेष वाव नाही आहे. आजच्या काळातल्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्र्यांमधली एक कोंकना, तिला जितका वाव मिळतो, तेव्हढ्यातही स्वत:ला सिद्ध करतेच !
चित्रपट इरफान खानच्या अश्विन कुमारचा आहे. अश्विन कुमार जो स्वत: वैयक्तिक आयुष्यात रीमा कुमार (तब्बू) घटस्फोटाला सामोरा जातो आहे, तो व्यावसायिक आयुष्यात ही एक अशी केस स्वीकारतो, जी त्याला सुरुवातीला 'किरकोळ मर्डर-बिर्डर केस' वाटत असल्याने त्याला स्वीकारायची नसते. मात्र वरवर शांत दिसणाऱ्या डोहात खाली भोवरा असावा, त्याप्रमाणे तो ह्या केसमध्ये कसा गुरफटतो, हे पाहणे रंजक आहे. कर्तव्यकुशल अश्विन कुमार त्याने जबरदस्त उर्जेने साकारला आहे. पोलीस अधिकाऱ्याच्या उलट तपासणीचा, स्वत:च्या फसगतीबद्दल कळतं तेव्हाचा आणि शेवटाकडे जातानाचे अनेक असे काही प्रसंग केवळ जबरदस्त झाले आहेत.
तब्बूला पाहुण्या कलाकाराचंच काम आहे. तेव्हढ्या वेळात ती तिचा नेहमीचा विझलेला चेहरा घेऊन वावरते.

चित्रपटाचं लेखन विशाल भारद्वाजनी केलं आहे. पटकथेत बारीक-सारीक तपशील उत्तम प्रकारे सांभाळले आणि पेरलेही आहेत. चित्रात जे चक्र पूर्ण करतो, त्यात ह्या कथा-पटकथेचा वाटा अनन्यसाधारण आहे. गाण्यांना इथे काही वाव नव्हताच. एक गाणं वाजतं, जे गुलजार साहेबांनी लिहिलं आहे. त्याला संगीतही विशाल भारद्वाजांचंच आहे. ते गाणं पूर्णपणे विस्मरणीय आहे.

ए. श्रीकर प्रसाद, हे नाव अनेक उत्तमोत्तम चित्रपटांशी एडिटर म्हणून जोडलेले आहे. कॉकटेल, फाईण्डिंग फॅनी, देढ ईश्कीया, डेव्हिड अश्या अनेक चित्रपटांशिवाय मणीरत्नमच्या रावण, गुरु, युवा वगैरेचंही त्यांनी काम केलं आहे. त्यांच्या कामाच्या ह्या यादीवरून त्यांचं इथलं काम कसं असेल, हे सांगायची आवश्यकताच नाही !

ह्यापूर्वी चांगलं, पण विशेष व्यावसायिक यश न मिळवणारं काम केलेल्या दिग्दर्शिका मेघना गुलजारने पुन्हा एकदा उत्तम काम केलंच आहे. व्यावसायिक यश मिळवणे, हा त्यामागचा उद्देश नक्कीच नसावा. पण 'तलवार' मुळे यशाची चव त्यांना चाखायला मिळेलच, असं वाटतं. कहाणीवर दिग्दर्शिकेचे घट्ट पकड जाणवत राहते. एकच प्रसंग जेव्हा वेगवेगळ्या लोकांच्या अवलोकनातून दाखवला गेला आहे, तेव्हा सांभाळलेला साधर्म्य व तफावत ह्यांतला समतोल साधण्यासाठी पटकथेतल्या बारकाव्यांची मदत झाली असेलच, मात्र 'सफाई' तर दिग्दर्शिकेचीच !

'तलवार' ही एक सत्यकथेवर आधारित असल्याने 'Real life crime thriller' म्हणवला जाऊ शकतो. आधीच म्हटल्याप्रमाणे ही तलवार अंगावर येईल. बेचैन करेल. ही तलवार स्वत:ही अस्वस्थपणे म्यान होईल आणि तुम्हालाही अस्वस्थ करून सोडेल.
हा चित्रपट न पाहण्याचं एकच कारण असू शकतं. ते म्हणजे, 'मला डिस्टर्ब व्हायला आवडत नाही.'

रेटिंग - * * * *


हे परीक्षण मराठी दैनिक 'मी मराठी लाईव्ह' मध्ये ०४ ऑक्टोबर २०१५ रोजी प्रकाशित झाले आहे :-


2 comments:

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...