Sunday, November 15, 2015

अपरिपूर्ण तरी अद्वितीय ! (Movie Review - Katyar Kaljat Ghusli)

असं म्हणतात की ताजमहाल बनल्यानंतर शाहजहानने ती कलाकृती साकारणाऱ्या कारागिरांचे हात छाटून टाकले होते, जेणेकरून अशी दुसरी कलाकृती बनवली जाऊच नये. ह्या सृष्टीचा कर्ता-करविताही काही निर्मिती केल्यानंतर ते साचेच नष्ट करत असावा. काही व्यक्ती, वास्तू, जागा म्हणूनच एकमेवाद्वितिय ठरत असाव्यात आणि म्हणूनच महान कलाकृतीही एकदाच बनत असतात.
पण, अस्सल सोनं असलं, तरी त्यावर धुळीची पुटं जमली की त्याची लकाकी झाकली जातेच. त्यामुळे ही पुटं झटकणे हेही एक महत्वाचं कार्य आहे. एका पिढीने जर अस्सल सोनं जतन केलं असेल, तर त्यावर काळाच्या धुळीची पुटं जमू न देणे हे पुढच्या पिढ्यांनी आपलं कर्तव्यच मानायला हवं.
महान कलाकृतीला पुनर्निमित केलं जाऊ शकत नाही. पण तिच्या प्रतिकृती बनू शकतात. ह्या प्रतिकृतीच्या निमित्ताने विस्मृतीची पुटं झटकून सोनेरी स्मृतींना झळाळी दिली जाऊ शकते. गाण्यांची रिमिक्स आणि चित्रपटांचे रिमेक्स करताना हाच एक प्रामाणिक उद्देश असेल, तर होणारी पुनर्निमिती त्या पूर्वसूरींच्या आशीर्वादाने उत्तमच होईल. 'कट्यार काळजात घुसली' ला मोठ्या पडद्यावर आणताना संपूर्ण टीम आपल्या ह्या उद्देशाशी पूर्ण प्रामाणिक राहिली आहे, हे सतत जाणवतं आणि म्हणूनच भव्य पडद्यावर जेव्हा ह्या महान कलाकृतीची प्रतिकृती साकारली जाते, तेव्हा ती प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करते, टाळ्या मिळवते आणि मुक्त कंठाने दादही मिळवते.'कट्यार' हे एका पिढीने मनाच्या एका कोपऱ्यात श्रद्धेने जपलेलं सांगीतिक शिल्प. आजच्या पिढीतल्याही अनेकांनी त्या शिल्पाला मानाचं स्थान दिलं आहे. त्याचं सुबोध भावे, राहुल देशपांडे आदींनी नुकतंच नव्याने सादरीकरणही केलं होतं. पण तरी आजच्या पिढीतला एक भलामोठा वर्ग असा आहे, ज्याला हे नाट्य केवळ ऐकूनच माहित आहे. हा चित्रपट त्याही वर्गापर्यंत पोहोचणार आहे. नव्हे, पोहोचलाच आहे आणि पोहोचतोच आहे ! ह्या पिढीसाठी अमुक गाणं मूळ नाटकात होतं का की नवीन आहे ? हा प्रश्न वारंवार पडू शकेल. असा प्रश्न पडणे, ह्याचा अर्थ काय होतो ? ह्याचा हाच अर्थ होतो की मूळ संगीत व चित्रपटासाठी केलेलं नवनिर्मित संगीत हे परस्परांत बेमालूमपणे मिसळलं गेलं आहे. 'कट्यार' चा अश्या प्रकारे चित्रपट बनवत असताना 'संगीत' हेच सगळ्यात मोठं आव्हान होतं. ह्या आव्हानाला पेलायला चित्रपटकर्त्यांनी उत्तमांतल्या उत्तमांना निवडलं आणि त्यांनी आपली निवड सार्थही केली. 'शंकर-एहसान-लॉय' ह्यांनी आठ नवीन गाणी दिली आहेत आणि एकेक गाणं त्यांच्या प्रामाणिक मेहनतीचं प्रतिक आहे. कुणास ठाऊक किती वर्षांनंतर एक सांगीतिक चित्रपट - भले 'रिमेक' का असेना - आला आहे ! ह्या नव्या कट्यारीचे नवे सूरही तितकेच धारदार आहेत आणि ते काळजात न घुसल्यास काळीज दगडी आहे, हे निश्चित ! सूर निरागस हो, दिल की तपिश, यार इलाही, मनमंदिरा ही गाणी तर केवळ अप्रतिम जमून आलेली आहेत. समीर सामंत आणि मंदार चोळकर ह्यांचे आशयसंपन्न शब्द, अवीट गोडी असलेलं संगीत आणि अरिजित सिंग, शंकर महादेवन, राहुल देशपांडे ह्यांचे जवारीदार आवाज असं हे एक जीवघेणं मिश्रण आहे. कविराजांसाठी (बहुतेक समीर सामंतनेच) लिहिलेला छंदही सुंदर आहे.
अभिषेकी बुवांचे जुन्या कट्यारीचे संगीतसुद्धा नवनिर्मित करताना त्यावर चढवलेले साज त्याच्या सौंदर्यात भरच घालतात. मात्र मूळ नाटकात असलेली काही स्त्री गायिकांची पदं इथे वगळली आहेत. काही गाणी स्त्री आवाजात असणे आवश्यक होते, त्यामुळे एक प्रकारचा - कितीही नाही म्हटलं तरी - जो 'तोच-तो' पणा आला आहे, तो टाळता आला असता. कहाणीत अश्या नव्या पेरणीसाठीही जागा होत्या, त्या दिसल्याच नाहीत की जाणीवपूर्वक दुर्लक्षिल्या गेल्या, हे माहित नाही. मात्र त्यांवर जाणीवपूर्वक काम करता आले असते, जे केलेले नाही, हेही खरंच. तसेच एका प्रसंगी 'खां साहेबां'च्या संवादांतून आता इथे 'ह्या भवनातील गीत पुराणे..' सुरु होईल असं ठामपणे वाटतं, प्रत्यक्षात ते तिथेच काय, कुठेच येत नाही !

ही सगळी गाणी व कहाणी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पडद्यावर दिसणारे झाडून सगळे लोक टाळ्यांच्या कडकडाटाचे सन्माननीय धनी आहेत. सुबोध भावे तर एक जबरदस्त ताकदीचा अभिनेता आहेच. तसं त्याने लोकमान्य व छोट्या पडद्यावरील काही कामांतूनही वारंवार सिद्ध केलं आहे. इथे त्याने साकारलेला 'सदाशिव'सुद्धा अविस्मरणीयच !
बालगंधर्व,
विशेष कौतुक करायला हवं ते शंकर महादेवन ह्यांचं. पंडितजींच्या भूमिकेतला शंकर महादेवन, मला वाटतं

प्रथमच अभिनय करताना दिसला आहे. स्वत: एक महान गायक असलेल्या शंकर महादेवनना पंडितजींना गाताना साकार करणं तसं सोपं गेलं असू शकेल, मात्र जिथे फक्त आणि फक्त अभिनय हवा होता, तिथेही हा माणूस कमालच करतो ! उच्चार, संवादफेक कुठेही नवखेपण किंवा अमराठीपण औषधापुरतंही जाणवू देत नाही !
चित्रपटाचा 'मालक' मात्र ठरतो तो सचिन पिळगांवकर. छोट्या पडद्यावर व इतर काही जाहीर प्रगटनांतून गेल्या काही वर्षांत 'महागुरू' म्हणून काहीश्या हेटाळणीयुक्त विनोदाचा विषय ठरलेल्या सचिनने साकारलेल्या 'खां साहेब' ला लवून मुजरा करायला हवा. त्याने टाकलेले शेकडो कटाक्ष पडद्याला छिद्रं पाडतात, इतके धारदार आहेत. सचिनची 'महागुरू' म्हणून ओळख विसरून जाऊन त्याला इथून पुढे 'खां साहेब' म्हणूनच ओळखायला हवं. 'खां साहेब' ची आपल्या कलेवरची निस्सीम श्रद्धा, परिस्थितीमुळे आलेली हताशा, पराभवाच्या मालिकेमुळे आलेली नकारात्मकता, त्या नकारात्मकतेतून जन्मलेली खलप्रवृत्ती आणि विजयाचा उन्माद व नंतर शब्दा-शब्दातून जाणवणारा प्रचंड अहंकार हे सगळं एकाच ताकदीने व सफाईने सचिन साकार करतो.

सुबोध भावे, शंकर महादेवन आणि सचिन, ह्या तिघांसाठी आपापल्या व्यक्तिरेखा साकार करताना गाणं समजून घेणे अत्यावश्यक होतं. तिघांपैकी कुणीही त्यात तसूभरही कमी पडलेलं नाही. कुठलीही तान, हरकत आणि साधीशी मुरकीसुद्धा त्यांनी सपाट जाऊ दिलेली नाही. त्यांच्या नजरा व हातांना कुंचल्याचं रुप दिलं असतं, तर प्रत्येक गाण्याचं एक त्या गाण्याइतकंच सुंदर चित्र त्यांनी रेखाटलं असतं. देहबोलीत कुठलीही कृत्रिमता किंवा सांगितल्या बरहुकूम केल्याचं जाणवतही नाही. जे काही केलं आहे, ते त्यांनी स्वत:, उत्स्फूर्तपणे केलं आहे, हे निश्चित.

'उमा'च्या भूमिकेत मृण्मयी देशपांडे खूप गोड दिसते ! निश्चयी, खंबीर व गुणी उमा म्हणून ती शोभतेच. तर 'झरीना'च्या भूमिकेत अमृता खानविलकर समंजस अभिनयाने चकितच करते ! आधी म्हटल्याप्रमाणे उमा, झरीना, मृण्मयी आणि अमृता ह्या चौघींनाही एकेक गाणं द्यायला हवं होतं, तो त्यांचा अधिकारच होता बहुतेक !
लहानातल्या लहान भूमिकेतल्या अभिनेत्यां/ अभिनेत्रींनी त्या त्या व्यक्तिरेखेला जगलं आहे. खरं तर मराठी चित्रपट हा अभिनयाच्या बाबतीत इतर बहुतेकांपेक्षा बऱ्याच इयत्ता पुढे आहेच, त्यामुळे तसं पाहता 'मराठी चित्रपट' आणि 'अप्रतिम अभिनय' हे सूत्र कायमस्वरूपी गृहीतच धरायला हवे आणि म्हणूनच कथानकाला सादर करण्याची दिग्दर्शकाची जबाबदारी जरा वेगळ्या पातळीवरचीही मानायला हवी. सुबोध भावेंचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट आहे. तरी काही सुटे किंवा ढिले धागे खटकतातच. सदाशिव आणि उमाची प्रेमकहाणी अगदी स्पष्ट शब्दांत सांगायचं तर टिपिकल मसाला चित्रपटातला जिन्नस वाटते. मनमोहन देसाई किंवा बडजात्या टाईप. बालपणीचं प्रेम आणि मग अनेक वर्षांनी एकमेकांना भेटल्यावर ते लहानपणीचं गाणं गाऊन आपली ओळख पटवून देणे हा सगळा मसाला आता शिळा झाला आहे. तो वापरायला नकोच होता. असंही त्यामुळे कथानकाला कुठलाही महत्वपूर्ण हातभार लागत नव्हताच आणि ज्या पातळीला (कलावंताचा अहंकारेत्यादी) बाकी कथानक चाललं आहे, त्यासमोर हे सगळं प्रकरण बालिश वाटतं. चौदा वर्षांनंतर आलेल्या सदाशिवचा आगा-पिच्छाही कथानकात मांडला जात नाही. ज्यांनी मूळ नाटक पाहिलेलं आहे किंवा मूळ कथानक माहित आहे, त्यांनाच ते समजू शकतं. इतरांना 'हा कोण आहे ? ह्याच्याशी मिरजेत नेमकी ओळख कशी झालेली असेल ?' इथपासून 'चौदा वर्षं होता कुठे?' इथपर्यंत प्रश्न पडतात, ज्यांची उत्तरं मिळत नाहीत. एका इंग्रज अधिकाऱ्याचं पात्रही असंच अधांतरी आहे. त्याचीही चित्रपटात अजिबातच गरज नव्हती. 'झरीना'ला नाचताना दाखवणे, हा त्या काळाच्या मुस्लीम संस्कृतीचा विचार करता न पटणारा भाग होता, तोसुद्धा टाळता आला असता. तसेच मूळ संहितेत महत्वाचं पात्र असलेल्या काविराजाच्या भूमिकेला इथे बरीच कात्री लावली गेली आहे. इतर अनावश्यक भरणा न करता, ही भूमिका जतन केली गेली असती, तर ? असाही एक प्रश्न पडला.

असे सगळे असले तरी, 'कट्यार' हा असा चित्रपट आहे की जो पाहणे प्रत्येक चित्रपटरसिकाचं कर्तव्यच आहे. (ह्यात सर्व भाषिक आले.) कारण 'म्युझिकल'साठी संगीत देण्याची पात्रता एका हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच लोकांची असल्याने 'म्युझिकल्स' चा जमाना आता गेला आहे, हे कटू सत्य आहे. त्यामुळे, असा दुसरा चित्रपट होणे अवघडच आहे.
ह्या सुमधुर संगीतमय कट्यारीच्या घावाची सुगंधी जखम येणाऱ्या पिढ्यांना अभिमानाने दाखवण्याची एक सुवर्णसंधी सर्व रसिकांना दिल्याबद्दल संपूर्ण 'कट्यार' टीमचे मन:पूर्वक अभिनंदन आणि मानाचा मुजरा !

रेटिंग - * * * *

- रणजित पराडकर
हे परीक्षण दै. मी मराठी लाईव्हमध्ये १५ नोव्हेंबर २०१५ रोजी प्रकाशित झाले आहे.

No comments:

Post a Comment

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...