Sunday, November 29, 2015

'भागते रहो' ते 'जागते रहो' ! (Movie Review - Tamasha)

इतर कुणी असतं, तर, ‘हे म्हणजे ‘तारे जमीं पर’, ‘रॉकस्टार’, यह जवानी है दीवानी’, ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ व अजून काही सिनेमांचं मिश्रण केलंय’, असं म्हणता आलं असतं. पण ‘इम्तियाझ अली’ आणि ‘इतर कुणी’ ह्यांच्यात हाच फरक आहे. उत्तम दिग्दर्शक आणि इतर दिग्दर्शक ह्यांच्यात फरक असतोच. कारण ‘कथाकथन’ (Story Telling) हीसुद्धा एक कला आहे. ती अंगभूत असायला लागते. (आठवा, ‘कट्यार काळजात घुसली’ मधले कविराजाचे ‘कला’ आणि ‘विद्या’ ह्यांच्यातला फरक सांगणारे शब्द !) उत्तम कथानक वाया घालवलेली अनेक उदाहरणं देता येतील. पण ज्याप्रमाणे आपल्या मित्रवर्गातील एखादी व्यक्ती एखादा साधासा विनोदही अश्या काही परिणामकारकतेने रंगवून सांगते की हास्याचा खळखळाट होतो, त्याचप्रमाणे इम्तियाझ अली पुन्हा एकदा एक प्रेमकहाणी सांगतो. प्रेमकहाणीचं नातं आयुष्याशी जोडतो आणि चित्रपटाकडे केवळ एक ‘मनोरंजन’ म्हणून न पाहता एक ‘कला’ म्हणूनही पाहणारे रसिक दिलखुलास दाद देतात.
का ?
कारण ह्या कहाणीतला वेद मलिक (रणबीर कपूर) प्रत्येकाने जगलेला, पाहिलेला आहे. हा ‘वेद’ दुसरा तिसरा कुणी नसून डोळ्यांना झापडं लावून धावत सुटणाऱ्या घोड्यासारखा ‘कहाँ से चलें, कहाँ के लिए’ हे खबर नसणारा नोकरदार आहे. तोच तो मर्ढेकरांच्या ‘पिपात मेले ओल्या उंदीर’ वाला सामान्य माणूस. जो कधीच, कुठेच जिंकत नसतो कारण त्याला जिंकायचं नसतंच बहुतेक. बस्स, धावायचं असतं. कारण त्याला भीती असते की जर तो थांबला, तर त्याच्या मागून बेभानपणे धावत येणारे इतर लोक त्याला पाहणारही नाहीत आणि त्याला तुडवत तुडवत पुढे निघून जातील. त्याने माधव ज्युलियनांच्या -
कायदा पाळा गतीचा, काळ मागे लागला
थांबला तो संपला
धावत्याला शक्ति येई आणि रस्ता सापडे
ह्या ओळींचा सोयीस्कर अर्थ लावलेला आहे. त्याला बहुतेक असं वाटत असतं की तो ‘यदायदाहि धर्मस्य..’ वाला ह्याच्याही मदतीला येणार आहे म्हणून तो जबरदस्तीनेच ‘ग्लानिर्भवती’ पाळत असतो. येतो. त्याच्याही मदतीला येतो. पण त्याचं रुप ओळखता आलं पाहिजे. तेच बहुतांशांना जमत नाही. मात्र वेदला जमतं. त्याचं ‘प्रेम’ त्याला रस्ता दाखवतं. हा नेहमीचाच मसाला आहे की, ‘प्रेमाने आयुष्य बदलून टाकणं’ वगैरे. पण वेदला ते कसं आणि कितपत जमतं, त्याला होणारा साक्षात्कार नेमका काय असतो, त्यासाठी काय किंमत मोजायला लागते आणि तो कुठून, कसा व काय बनतो, हे सांगण्यासाठी एखादा ‘इम्तियाझ अली’च असावा लागतो ! नाही तर, ‘ही तर ४-५ सिनेमांची मिसळ आहे’, हा शेरा नक्की असतो !

ज्या संवेदनशीलतेने इम्तियाझ अली, एका लहानपणापासून सतत मर्जीविरुद्ध झिजत राहिलेल्या व्यक्तीची मानसिकता मांडतात, ते एखादा मनोवैज्ञानिकच जाणो ! मग ते सतत आरश्याशी बोलत राहणारं एकटेपण असो की झटक्यासरशी ‘मूड स्विंग्स’ करणारं मानसिक अस्थैर्य असो की टेबलावर डोकं ठेवून एका बाजूला तोंड करून शून्यात पाहणारी असुरक्षितता असो, वेदच्या व्यक्तिरेखेला इम्तियाझ अली एकेक पैलू विचार व काळजीपूर्वक पाडतात.


रणबीरमधला सक्षम अभिनेताही हा एकेक पैलू आपलासा करतो. तो त्याच्या वेडेपणाने जितका हसवतो, तितकाच त्या वेडेपणामागच्या कारुण्याच्या छटेने व्यथितही करतो. एरव्ही माथेफिरू वाटू शकणारी एक व्यक्तिरेखा तो प्रेक्षकाच्या मनात उतरवतो आणि त्याला ती बेमालूमपणे विकतोही !
जोडीला ‘दीपिका पदुकोण’सुद्धा तितकाच सशक्त अभिनय करते. जिथे रणबीरसोबत त्याच्याइतकीच उर्जा दाखवायची आवश्यकता असते तिथे ती कमी पडत नाही आणि जिथे त्याच्या उसळून येणाऱ्या भावनांना झेलायचं असतं, तिथेही ती तितकीच कधी प्रवाही, तर कधी निश्चल राहते. ‘कॉकटेल’ आणि ‘यह जवानी है दिवानी’ मधल्या तिच्या दोन व्यक्तिरेखांचं हे एक मिश्रण होतं. जे साहजिकच आव्हानात्मक होतं. ती ते आव्हान पेलते.

संगीत ए. आर. रहमानचं आहे म्हणून ‘मस्त आहे’ असं म्हणायला हवं. काही कलाकृती आपल्या कुवतीच्या बाहेर असतातच. ‘तमाशा’मधला रहमान माझ्या कुवतीबाहेरचा असावा. मात्र हेच संगीत इतर कुणाचं असतं तर त्याला काय म्हटलं असतं, हा विचार केल्यावर वाटतं की, जर काही कमी पडलं असेल, तर संगीताची बाजूच. गाण्यांचं अप्रतिम चित्रीकरण हेसुद्धा एक इम्तियाझ अलींचं बलस्थान आहे. त्यांच्या सिनेमात गाणी कधीच घुसडलेली वाटत नाहीत आणि काही गाणी तर कथेला खूप जलदपणे पुढे नेण्यात महत्वाची भूमिका निभावतात. (उदा. ‘जब वी मेट’ मधलं ‘आओगे जब तुम ओ साजना..’ आठवा.) इथेही प्रत्येक गाणं अप्रतिम चित्रित केलं असल्याने त्या संगीताचा मला त्रास झाला नाही, इतकंच.
मात्र ‘इर्शाद कमिल’ चे शब्द मात्र सर्व गाण्यांना अर्थपूर्णही करतात, हेही खरं !

फ्रान्स, टोकियो, दिल्ली अत्यंत सुंदरपणे टिपल्याबद्दल छायाचित्रक 'एस रवी वर्मन' ह्यांचाही उल्लेख आवश्यक आहे. प्रत्येक फ्रेम कहाणीशी सुसंगतपणे कधी फ्रेश, तर कधी झाकोळलेली दिसली आहे.

सिनेमा एका वैचारिक उंचीवर आहे. त्याची मांडणी वेगळ्या धाटणीची आहे. ती कदाचित सर्वांच्या गळी उतरणार नाही. पण ज्यांना ती पटेल, त्यांना ती खूप आवडेल हे निश्चित. पण जी उंची व संवेदनशीलता एकूण हाताळणीत जाणवते ती नेमकी सिनेमाच्या शीर्षकात जाणवत नाही. ‘तमाशा’ ही शीर्षक अतिरंजित, भडक वगैरे काहीसं वाटतं. ते ह्या कहाणीशी न्याय करत नाही. सिनेमा जितका हळवा आहे, तितकंच हे शीर्षक मात्र भडक आहे.
असो.
‘तमाशा’ ही माझी कहाणी आहे. कदाचित तुमची आहे आणि तुमच्या ओळखीच्या अनेकांचीही असू शकते. मला ‘तमाशा'ने 'अंतर्मुख' केलंय की 'प्रभावित' केलंय, हे येणारा काळ सांगेल. तुम्हालाही किमान प्रभावित व्हायचं असेल, तर अवश्य पाहा. नाही पाहिलात, तरी चालतंय. शर्यत सुरू राहीलच.
'रॅट रेस' !
भागते रहो !

रेटिंग - * * * *

- रणजित पराडकर
हे परीक्षण दै. मी मराठी लाईव्ह मध्ये आज २९ नोव्हेंबर २०१५ प्रकाशित झालं आहे - 


No comments:

Post a Comment

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...