Saturday, December 26, 2015

मी आदिशक्ती

भविष्यात कुठल्याही परिस्थितीत परत न करण्याच्या अटीवर एका कवी महोदयांना एक मानाचा पुरस्कार प्रदान केला गेला ! माझा त्यांच्याशी थोडासा परिचय असल्याने मला त्यांना पुरस्कार मिळणार असल्याचं आधीपासून माहीतच होतं. (हो. पुरस्कार मिळणार आहे, हे पुरस्कार जाहीर होण्याआधी माहित असतंच बहुतेकदा !) अभिनंदन करणं औपचारिक आणि आवश्यक होतं. त्यामुळे मी त्यांच्या घरी जाऊन त्यांचं अभिनंदन केलं. पुरस्कार मिळालेला कविता संग्रह मुख्यत्वेकरून स्त्रीवादी कवितांचा होता. कवी महोदय अल्पावधीतच एक आश्वासक स्त्रीवादी कवी म्हणून नावारूपास आलेले होते. औपचारिक अभिनंदन केल्यावर दिवाणखान्यातल्या सोफ्यावर मी विसावलो, गप्पा सुरु झाल्या आणि कवी महोदयांनी फर्मान सोडलं. 'चहा आण गं !' काही मिनिटांनी त्यांच्या पत्नी दोन कप चहा, बिस्किटं वगैरे घेऊन आल्या. तो चहा आम्ही प्यायलो. माझा कप मी ट्रेमध्ये ठेवला. कवी महोदयांनी त्यांचा कप त्यांच्या बाजूच्या छोट्या कॉर्नर टेबलवर ठेवला. त्यांच्या पत्नी आल्या आणि तो कप उचलून ट्रेमध्ये ठेवून घेऊन गेल्या. जाता जाता त्यांना 'अमुक अमुक पुस्तक आण' म्हणून सांगितलं गेलं, त्यांनी ते आणून दिलं आणि कवी महोदयांनी त्यांच्या दुसऱ्या एका पुस्तकाची प्रत मला स्वाक्षरीसह दिली.
स्त्रीवादी कवी. त्यांच्या वास्तववादी कविता समाजात स्त्रीला मिळणाऱ्या दुय्यम वागणुकीबद्दल ताशेरे ओढणाऱ्या, डोळ्यांत जळजळीत अंजन टाकणाऱ्या, कधी हळहळणाऱ्या, कधी निराश होणाऱ्या होत्या. ज्या वाचून महनीय समीक्षक वाहवा करत होते. आणि स्वत:च्या घरात मात्र, जिला 'लक्ष्मी' म्हटलं जात होतं, ती समोर चहाचा ट्रे आणत होती. आज्ञा स्वीकारत होती.

ह्या विरोधाभासाने मी मनाशीच खजील झालो.
घरी परत निघालो. माझ्या डोळ्यांसमोर माझ्या माहितीतल्या शेकडो स्त्रिया भन्साळीच्या सिनेमात दाखवतात तसं काही एक संबंध नसतानाही एकत्र येऊन हसत, रडत, नाचत, बोलत होत्या. त्या सगळ्यांच्या प्रत्येक कृतीतून मला त्या डिवचत असल्याचा भास होत होता. त्यात अशिक्षित, सुशिक्षित, गृहिणी, नोकरदार, विवाहित, अविवाहित, यशस्वी, अयशस्वी, प्रसिद्ध, अप्रसिद्ध, परिचित, अपरिचित अश्या सगळ्या होत्या. 'घराकडे लक्ष देणे, मुलांना सांभाळणे, वडिलधाऱ्यांची सेवा करणे, स्वयंपाक अश्या सगळ्या जबाबदाऱ्या त्या सगळ्या पेलत होत्या. भारतीय स्त्री घराला जे हवं ते करत असते. राहुल द्रविड कसा संघाला हवं तर विकेटकीपिंग, नेतृत्व, सलामीचा फलंदाज, तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज, शॉर्ट लेगचा फिल्डर, स्लीपमधला फिल्डर अश्या सगळ्या भूमिका निभवायचा, तश्याच ह्या स्त्रिया. ह्या स्त्रिया व्यावसायिक आयुष्यात अत्युच्च शिखर गाठतात, तरी त्यांच्या मुलाखतीत त्यांना एक प्रश्न हमखास विचारला जातो, 'घराची जबाबदारी कशी निभावली ?'

मला आठवलं. कसं आजही किती तरी लोकांना 'मुलगी' नकोच असते. 'मुलगी शिकली, प्रगती झाली' वगैरे गोंडस घोषणा आठवल्या. त्या किती पोकळ आहेत, हे जाणवलं. माझं लग्न ठरलं, तेव्हा एका ड्रायव्हरने बाबांना विचारलं होतं, 'किती हुंडा ठरला ?' बाबांनी 'हुंडा वगैरे काही नाही' म्हटल्यावर त्याला विश्वास बसेना ! त्याला एक मुलगा आणि एक मुलगी. जर मुलासाठी हुंडा घेतला नाही, तर मुलीसाठी हुंडा कसा देणार ? अशी त्याची भाबडी समस्या होती. हुंडा देणे आणि घेणे, हा आजही लोकांना अधिकार वाटत असताना नुसत्या घोषणा करून काय उपयोग होणार आहे ?

ह्या सगळ्या विचारात घरी आलो. समोर टेबलवर वर्तमानपत्र होतं. त्यात बातमी दिसत होती. त्यात लिहिलं होतं की, 'UN'च्या एका सर्वेक्षणात असं आढळून आलंय की स्त्री-पुरुष असमानतेत भारत पाकिस्तान आणि बांगलादेशच्याही पुढे आहे ! त्या बातमीत दिलेली आकडेवारी एक भारतीय म्हणून शरमेने मान खाली घालायला लावणारी होती. अर्थात, अशी सर्वेक्षणं कितपत विश्वासार्ह असतात, ह्यावरही वाद होऊ शकतो. मात्र महासत्ता होण्याचं, औद्योगिक केंद्र बनण्याचं स्वप्न पाहणारा भारत आजही स्वत:ची तुलना पाकिस्तानशी करण्यातच धन्यता मानतो आहे आणि त्यांच्यापेक्षा आपण सरस आहोत, ह्याचाच आनंद मानतोय हे विदारक आहे. पाकिस्तानचं जाऊ देऊ, पण जे पुढारलेले देश आहेत त्यांच्या तुलनेत आपण कुठे आहोत ? ह्या आकडेवारीचा तर उल्लेखही कुठेच नव्हता. म्हणजे ती तुलनासुद्धा होऊ शकत नव्हती.

बरोबर आहे. कशी होईल तुलना ? आजही, एका स्त्रीने देवाचं दर्शन घेतलं म्हणून आपण देवाचं शुद्धीकरण करतोय. देवाचं ? तेही मनुष्याने शुद्धीकरण करणं, ही कल्पनाच मुळात नारळाच्या झाडाला सादाफुलीने सावली देण्याचा प्रयत्न करण्यासारखी निरर्थक आहे. पण असो. मला सांगा, त्या शुद्धीकरणासाठी आणलेलं दूध बैलाचं होतं का ? की प्राण्यांमधली स्त्री वंदनीय आणि माणसातली मात्र अस्पृश्य ? पुरोगामी महाराष्ट्राची जर ही अवस्था असेल, तर उर्वरित भारताची आणि त्यातही ग्रामीण भागातल्या परिस्थितीची कल्पनाच न केलेली बरी !

मुळात 'समानता' म्हणजे काय, हेही समजून घ्यायला हवं. 'मी इतरांना समान वागणूक देतो', असं म्हणणंही चूक आहे. कारण तुम्ही समानता देत आहात, अशी जाणीवही व्हायला नको. ती अंगभूतच असायला हवी. हवं तर उलट म्हणा की, 'मी स्वत:ला इतरांसमान वागणूक देतो' !
'मी माझ्या बायको/ मुली/ बहिणीला पूर्ण स्वातंत्र्य दिलेलं आहे!' असं लोक मोठ्या अभिमानाने सांगतात.
पण 'अरे तू कोण देणारा ? कुणालाही स्वातंत्र्य देण्याचा अधिकार मिळाला कुठून तुला ? त्यांचं स्वातंत्र्य जन्मसिद्धच होतं की !' असा विचार त्यांच्या मनाला स्पर्शही करत नाही.

माझ्या एका मित्राचं काही वर्षांपूर्वी लग्न झालं. मी लग्नाला जाऊ शकलो नव्हतो. पण नंतर त्याच्या घरी गेलो. त्याची बायको त्याला 'अहो-जाहो' करताना पाहून मला फार गंमत वाटली ! मी त्याला म्हटलं, 'अहो' काय अरे ! किती विचित्र वाटतं !'
त्यावर त्याने शांतपणे हसून उत्तर दिलं, 'अरे कुणी मान देत असेल, तर देऊ द्यावा की ! काय फरक पडतो !'
आपण भारतीय इतके चाकरीलोलुप आहोत, की जर कुणी आपल्याला त्याची जाणीव करून दिली तर ते आपल्याला पटतही नाही.

डोकं बधीर झालं. पेपर खाली ठेवला आणि कवी महोदयांचं पुस्तक उघडलं. पहिलीच कविता होती.. 'मी आदिशक्ती !'
कुत्सित हसलो आणि पुढची कविता मी वाचलीच नाही. मनातल्या मनात पुढच्या ओळींची मीच कल्पना केली -

'मी आदिशक्ती
माझ्या ह्यांच्या घरात धुणी-भांडी करते
चहा-पाणी बघते
स्वयंपाक करते
आणि माझ्यावरच्या कवितांमुळे
पुरस्कारही मिळवून देते'

- रणजित पराडकर

शुक्रवार, दि. २५ डिसेंबर २०१५ रोजी 'दै. दिव्य मराठी'च्या 'मधुरिमा' पुरवणीत प्रकाशित लेख -


3 comments:

 1. विचार करायला लावणारा लेख आहे.. सुंदर.

  >>"'मी इतरांना समान वागणूक देतो', असं म्हणणंही चूक आहे. कारण तुम्ही समानता देत आहात, अशी जाणीवही व्हायला नको. ती अंगभूतच असायला हवी. हवं तर उलट म्हणा की, 'मी स्वत:ला इतरांसमान वागणूक देतो' !
  'मी माझ्या बायको/ मुली/ बहिणीला पूर्ण स्वातंत्र्य दिलेलं आहे!' असं लोक मोठ्या अभिमानाने सांगतात.
  पण 'अरे तू कोण देणारा ? कुणालाही स्वातंत्र्य देण्याचा अधिकार मिळाला कुठून तुला ? त्यांचं स्वातंत्र्य जन्मसिद्धच होतं की !' असा विचार त्यांच्या मनाला स्पर्शही करत नाही."

  अगदी पटलं..

  ReplyDelete
 2. khup mast lihilay.. aani agadi patal dekhil :)

  ReplyDelete

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...