Sunday, December 27, 2015

सांगीतिक गरिबीतलं श्रीमंत वर्ष ! (२०१५ सालातल्या चित्रपटांची उजळणी)

-: २०१५ सालात प्रदर्शित झालेल्या विविध सिनेमांची एक प्रकाराची उजळणी करण्याचा माझा प्रयत्न :-

~ ~ सांगीतिक गरिबीतलं श्रीमंत वर्ष ! ~ ~  

वक़्त रहता नहीं कहीं टिककर
इसकी आदत भी आदमी सी हैं

गुलज़ार साहेबांच्या ह्या ओळी आपण साक्षात अनुभवतो प्रत्येक वर्षाच्या अखेरीस. कारण वर्ष कितीही आनंदी गेलेलं असो वा दु:खी, खडतर वा सहज, जेव्हा डिसेंबरचे शेवटचे काही दिवस शिल्लक राहतात, तेव्हा आपल्याला असंच वाटत राहतं की, 'कधी अख्खं वर्ष सरून गेलं, कळलंच नाही !' काय आलं, काय गेलं ह्याचा आपला हिशोब कधीच जुळत नसतो. मात्र चित्रपटांचं वेगळं असतं जरासं. इथले हिशोब नेहमीच जुळतात. इथे सरलेल्या वर्षातल्या प्रत्येक दिवसाने आपलं योगदान देऊन ठेवलेलं असतं आणि ते नोंदलंही जातं. सरलेल्या वर्षात आपण जे गमावलं असतं, ते कुणी न कुणी कमावलंही असतं आणि जे आपण कमावलं असतं, ते कुणी ना कुणी गमावलं असतं. मात्र पडद्याच्या पलीकडील आपल्या विरुद्ध दिशेला असेलेली व्यक्ती आपल्याला बहुतांशदा अज्ञातच असते.
बॉक्स ऑफिसवर मात्र जेव्हा एक सिनेमा काही कमावतो, तेव्हा ते ज्या दुसऱ्या कुणी गमावलेलं असतं, तोही समोर असतोच असतो. जसं, नुकतेच 'दिलवाले' आणि बाजीराव मस्तानी' एकाच दिवशी प्रदर्शित झाले. दोन्ही सिनेमांना वादाचं वलय लाभलं (की त्यांनीच ते मिळवलेलं?) होतं. शाहरुखचा चित्रपट म्हणजे दणकेबाज ओपनिंग मिळवणारच. अपेक्षेनुसार ह्या पहिल्या लढाईत 'दिलवाले' जिंकलाच. मात्र लौकरच प्रेक्षकांनी 'दिलवाले'ऐवजी 'बाजीराव'ला पसंती देण्यास सुरु केली आणि पहिल्या ३-४ दिवसांनंतर 'दिलवाले' मागे पडून 'बाजीराव'चं कलेक्शन वाढायला लागलं. ही दोन टुकारक्यांमधली भाग्यवान तुलना होती की अजून काही, हा भाग जाऊ देऊ. मात्र कुणाचा फायदा आणि कुणाचं नुकसान हे स्पष्ट समजून येतच आहे. मग भले, रोहित शेट्टीने ते कितीही नाकारलं तरी !

वर्षाखेरीस तीन खानांपैकी किमान एकाचा चित्रपट येणे, ह्यात नवीन काहीच नाही आणि एका वर्षांत अक्षय कुमारचे ३-४ सिनेमे येऊन त्या सर्वांनी बऱ्यापैकी गल्ला जमवणे, ह्यातही नवीन काहीच नसावं. २०१५ मध्येही अक्षयचे ४ सिनेमे आले आणि सर्वांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरीही केली. वर्षाची सुरुवातच अक्षयने दमदार 'बेबी'ने करून दिली. दिग्दर्शक नीरज पांडेंसोबत 'स्पेशल २६' नंतर अक्षय पुन्हा एकदा दिसला आणि पुन्हा एकदा एक वेगवान थरारपट बनला. पुढे आलेले 'सिंग इज ब्लिंग', 'ब्रदर्स' आणि 'गब्बर इज बॅक' सुद्धा बरे चालले, मात्र 'बेबी' च्या पातळीला ते पोहोचू शकणार नव्हतेच. त्यांचं यश तिकीटबारीपुरतंच मर्यादित राहिलं.

महानायक अमिताभ आणि दाक्षिणात्य सुपरस्टार धनुषला दिग्दर्शक आर. बाल्कीनी एकत्र आणलं आणि 'शमिताभ' बनवला. पण ह्या जैन पावभाजीला क्लासेस आणि मासेस दोघांनीही नापसंतीच दर्शवली. धनुषला अमिताभचा आवाज देणे, ही कल्पना सर्वांनाच अजीर्ण झाली आणि 'शमिताभ' एक फरगेटेबल अनुभव ठरला.
असाच फरगेटेबल अनुभव 'रॉय' आणि 'अब तक छप्पन - २' नीही दिला. लोक 'रणबीर कपूर'साठी 'रॉय' पाहायला गेले आणि त्यांना चित्रपटभर अर्जुन रामपालच मिळाला. चिकन बिर्याणीऐवजी फडफडीत मसाले भात वाढला आणि तो कितीही चविष्ट असला तरी विरस होणारच. 'रॉय' ने तेच केलं. तर, 'अब तक छप्पन - १' च्या प्रभावाला अजूनही न विसरलेले लोक जेव्हा त्याचा दुसरा भाग पाहायला गेले, तेव्हा त्यांना साचेबद्ध कहाणीच्या ठोकळेबाज सादरीकरणाला पाहावं लागलं. 'नाना होता म्हणून पूर्ण पाहिला तरी' अशी एका ओळीची प्रतिक्रिया लोकांनी दिली.

सर्व थरांतले प्रेक्षक पुन्हा एकदा प्रभावित झाले ते फेब्रुवारीत आलेल्या 'बदलापूर'ने. दिग्दर्शक श्रीराम राघवन ह्यांचा 'एजंट विनोद' सपशेल फसला होता. मात्र त्यांचा पहिला चित्रपट 'एक हसीना थी' आणि नंतर आलेल्या 'जॉनी गद्दार' मधून त्यांनी जी पकड दाखवली होती, ती त्यांनी पुन्हा एकदा 'बदलापूर' मध्ये दाखवली. वरुण धवनसुद्धा अभिनय करू शकतो, हेही ह्या सिनेमाने दाखवून दिले. (अर्थात, वर्षाखेरीस 'दिलवाले' मधून वरुण धवनने लोकांचा हा गैरसमज दूर केलाच !) इथला नकारात्मक भूमिकेतला नवाझुद्दिन सिद्दिकी केवळ अप्रतिम होता.

नवाझुद्दिन ह्या वर्षी नंतर अजून दोन सिनेमांत झळकला. 'दशरथ मांझी'च्या जीवनकथेवर आधारलेल्या केतन मेहता दिग्दर्शित 'मांझी - द माउन्टेन मॅन' मधला त्याचा 'मांझी' अविस्मरणीयच ! ह्या गुणी अभिनेत्याच्या कुवतीचं चीज करणारी ही भूमिका होती. चित्रपट गाजला खरा, मात्र सुपरहिट होण्याचा फॉर्म्युला त्यात नव्हताच. किंबहुना, व्यावसायिक यश डोळ्यांसमोर ठेवून तो बनवला नव्हताच. मात्र त्याच्या थोडा आधी आलेला 'बजरंगी भाईजान' मात्र भरपूर चालला. ह्या सलमानपटातला नवाझुद्दिनचा पाकिस्तानी रिपोर्टर लोकांना 'बदलापूर'मधल्या 'लायक'इतकाच आवडला. 'बजरंगी भाईजान' सुपर हिट होणार होताच आणि झालाच. मात्र तो ह्या वर्षातला पहिला सुपर हिट नव्हता.
वर्षातला पहिला 'सुपर हिट' मात्र मे महिन्यात मिळाला. कंगना राणावतच्या 'तनू वेड्स मनू रिटर्न्स' ने खऱ्या अर्थाने बॉक्स ऑफिसला खडबडून जाग आणली. चित्रपट प्रेक्षकांना आवडला आणि रसिकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिली. मात्र कंगनाच्या कामाची मात्र भरपूर प्रशंसा झाली. माधवनने स्वत:चा वेगळा चाहतावर्ग नेहमीच जपला आहे. तोही अजिबात निराश झाला नाही. सप्टेंबरमध्ये झळकलेल्या 'कट्टी बट्टी' मधून मात्र कंगनाला ही जादू पुन्हा साधता आली नाही. तीच ती कंगना पाहून लोकांना जरा कंटाळाही आला असावा आणि इम्रान खानने त्या कंटाळ्यात भर घालायचं काम चोख निभावल्याने 'कट्टी बट्टी'शी लोकांनी कट्टीच घेतली.

'दम लगा के हैश्या', 'एनएच 10' आणि 'हंटर' ह्या तीन पूर्णपणे भिन्न सिनेमांनीही उत्तम कामगिरी केली. आपापला 'टारगेट ऑडीयन्स' तर त्यांनी सिनेमागृहाकडे ओढलाच, पण समीक्षकांच्याही पसंतीची पावती मिळवली. 'दम लगा के हैश्या' ह्या एका वेगळ्याच धाटणीच्या प्रेमकहाणीने 'नव्वदचं दशक' हाही एक 'विशिष्ट चित्रपटकाल' होता, हे जाणवून दिलं. क्वचितच मिळणारं सुश्राव्य संगीत ह्या सिनेमाने दिलं. 'एनएच 10' हा बेचैन करणारा सिनेमा होता. वास्तवदर्शन करवताना अतिरंजन टाळूनही आवश्यक परिणामकारकता साधणारा पुरेसा थेटपणा - ज्याला भडकपणाही म्हणता येऊ शकेल - असा एक अत्यंत कठीण समतोल त्याने साधला. अनुष्का शर्माचं ह्या निमित्ताने निर्मिती क्षेत्रात पहिलं पाउल पडलं. एक निर्माती आणि अभिनेत्री अश्या दोन्ही आघाड्यांवर तिच्यासाठी हा चित्रपट यशस्वीच होता. 'हंटर' ही एक प्रकारची 'अ‍ॅडल्ट कॉमेडी' होती. हा प्रकार भारतीय प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल इतपत सौम्यपणा त्यात चतुराईने जपला होता आणि कदाचित त्याने अपेक्षेपेक्षाही चांगली कामगिरी केली !

'डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी', 'बॉम्बे वेलवेट' आणि 'मै और चार्ल्स' हे तीन सिनेमे वेगळ्या हाताळणीचे होते. पैकी 'डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी'ने समाधानकारक कमाई केली कारण ती व्यक्तिरेखा छोट्या पडद्यावर प्रचंड गाजलेली असल्याने लोकांना आकर्षित करणारीच होती. इथला सुशांतसिंग राजपूत लक्षवेधी ठरला. मात्र रणबीरचा 'बॉम्बे वेलवेट' आणि रणदीपचा 'मै और चार्ल्स' मात्र लोकांना काही झेपले नाहीतच. अनुराग कश्यपचा 'बॉम्बे वेलवेट' त्यातल्या वाया गेलेल्या बहुतांशामुळे लोकांनी नाकारला. हा वाया गेलेला बहुतांश म्हणजे करण जोहर (अभिनेता म्हणून), चित्रपटात रणबीर आणि अनुष्काच्या व्यक्तिरेखांच्या 'Rags to Riches' जाणाऱ्या जीवनप्रवासाचा प्रभाव, के के मेनन, संगीत वगैरे बाबी. ह्या सगळ्या बाबी चित्रपटाची बलस्थानं ठरायला हव्या होत्या. मात्र त्या निष्प्रभ ठरल्याने चित्रपटाचा एकत्रित परिणामही फारसा जमून आला नाही. 'मै और चार्ल्स' चा अपूर्णपणा त्याच्या गुंतागुंतीला अंधाऱ्या गूढतेकडून अनाकलनीयतेकडे घेऊन गेला. रणदीप हुडाने अप्रतिम साकारलेला 'चार्ल्स सोभराज' चित्रपटाच्या व्यावसायिक अपयशामुळे दुर्लक्षिला गेला.

'पिकू' आणि 'दिल धडकने दो' ने हलक्या फुलक्या मनोरंजनाची मागणी व्यवस्थित पूर्ण केली. निखळ विनोद जो 'पिकू'ने दिला, तो सध्याच्या चित्रपटविश्वात अभावानेच मिळतो. आचरटपणा आणि चावटपणाला माथी मारून विनोद केल्याचा आविर्भाव आणणे, हे सध्याचं यशस्वी समीकरण आहे. दिग्दर्शक शुजीत सरकारनी 'पिकू'द्वारे असला कोणताही थिल्लरपणा न करता निर्भेळ विनोद सादर केला आणि लोकांनीही त्याला पूर्ण पसंती दिली. 'शमिताभ' मध्ये नाकारलेला अमिताभ लोकांनी इथे उचलून धरला. तर 'दिल धडकने दो' मधून झोया अख्तरने 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' चा 'Live your life, your way' चा संदेश अजून एकदा दिला. अनिल कपूर, शेफाली शाह, प्रियांका चोप्रा, रणवीर सिंग, अनुष्का शर्मा आणि फरहान अख्तर अश्या सर्वांचा दमदार अभिनय, नेत्रसुखद चित्रीकरण आणि त्रास न देणारं संगीत ह्यांच्या जोरावर 'दिल धडकने दो' ने यश संपादन केले. स्वशोधाचा प्रवास दाखवणारा अजून एक चित्रपट 'मसान' सुद्धा होता. मात्र ह्या दोन्हींतला शोध वेगवेगळ्या प्रतलांवर होता. 'मसान' समांतर सिनेमाशी नातं सांगणारा होता. दिग्दर्शक नीरज घायवानचा हा पहिलाच सिनेमा. आणि पहिल्याच प्रयत्नात त्यांनी कमालच केली. मसानला तिकीटबारीवर यश मर्यादितच लाभलं, मात्र रसिक व समीक्षकांनी दिलखुलास दाद दिली.

वेलकम टू कराची, मिस तणकपूर हाजीर हो आणि बँगिस्तान हे तीन 'लो प्रोफाईल' विनोदी चित्रपट फ्लॉप ठरले. खरं तर हे तिन्ही 'फ्लॉप'च्या पातळीचे निश्चितच नव्हते. 'वेलकम टू कराची' आणि बँगिस्तान' हे साधारण एकाच पठडीचे. 'सिली कॉमेडी.' आणि दोघांनाही दहशतवादाच्या विषयाची जोड होती. तर 'मिस तणकपूर हाजीर हो' मधला उपरोध अनेकांना समजलाच नाही. मात्र विनोदाच्या नावाखाली काही तरी अचाट आणि अतर्क्य कथानक आणि भरमसाट पांचटपणा करूनही नाना पाटेकर, अनिल कपूरचा 'वेलकम बॅक' मात्र बऱ्यापैकी गल्ला जमवून गेला.

इतर महत्वाच्या सिनेमांत 'तमाशा' आणि 'तलवार' चा उल्लेख आवश्यक आहे. नोव्हेंबरमध्ये प्रदर्शित झालेल्या 'तमाशा'मधून रणबीर आणि दीपिका पुन्हा एकदा पडद्यावर एकत्र दिसले. त्यांची केमिस्ट्री जरी लोकांना आवडली तरी, दिग्दर्शक इम्तियाझ अलीने केलेली 'जब वी मेट' आणि 'रॉक स्टार' ची पुनरावृत्ती लोकांना फारशी पसंतीस पडली नसावी. रहमानचं संगीतही काही जादू करू शकलं नाही आणि 'तमाशा'ची कमाई 'फ्लॉप झाला नाही' एव्हढ्यावरच मर्यादित राहिली.
नॉयडामध्ये २००८ साली झालेल्या आरुषी तलवार खून प्रकरणावर आधारित मेघना गुलजार दिग्दर्शित 'तलवार' मध्ये इरफान खान, कोंकणा सेन, नीरज कबी असं गुणी व दमदार स्टार कास्ट होतं. ह्या सिनेमाने मात्र व्यावसायिक आणि कलात्मक असं दोन्ही यश मिळवलं. इरफान खानचा 'अश्विन कुमार' जबरदस्त जमून आला होता. पाठोपाठ प्रदर्शित झालेल्या 'जजबा' मध्येही इरफान खानची भूमिका तपास अधिकाऱ्याचीच होती. मात्र ऐश्वर्या रायचा पुनरागमनाचा सिनेमा असूनही 'जजबा' खूप काही करामत करू शकला नाही. 'आउटडेटेड थरार' दिल्याबद्दल संजय गुप्तांचा हा सिनेमा प्रेक्षकांनी नाकारला.

निशिकांत कामतनी दक्षिणेच्या 'दृश्यम'चा हिंदीत केलेला त्याच नावाचा रिमेकसुद्धा एक उल्लेखनीय चित्रपट होता. अजय देवगणचा विजय साळगावकर आणि त्याचा प्लान लोकांच्या इतका पसंतीस पडला की त्यावर आधारित जोक्स Whatsapp वर फिरायला लागले !

ह्या सर्वांच्या जोडीने 'मिस्टर एक्स', 'हमारी अधुरी कहानी', 'एबीसीडी-२', 'फॅण्टम', 'हीरो', 'कॅलेंडर गर्ल्स', 'शानदार', 'हेट स्टोरी-३' सारखे सपशेल फरगेटेबल सिनेमेही अधूनमधून आले आणि गेले. विशेष काही सांगावं असे काहीच नसलेलेही कित्येक येऊन गेले.
मात्र २०१५ साल लक्षात राहील ते 'बाहुबली - द बिगिनिंग' मुळे. आजपर्यंतचा सगळ्यात खर्चिक सिनेमा आणि आजपर्यंतच्या सगळ्यात यशस्वी सिनेमांपैकी एक 'बाहुबली' ही भारतीय चित्रपटाची एक मोठी उडी होती. 'बाहुबली'ने तांत्रिक सफाईचं एक उदाहरणच इतर सिनेमांसमोर ठेवलं. ह्या कहाणीचा उत्तरार्ध 'बाहुबली - द कन्क्ल्युजन' २०१६ मध्ये प्रदर्शित होणार आहे. कुठल्याही सिनेमाची केली गेली नसेल, अशी प्रतीक्षा त्याची होत आहे, ह्यातच सर्व काही आलं !

ह्या सर्व चित्रभडिमारात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे उत्तम सिनेसंगीताचा अभाव. मराठीत तरी 'कट्यार काळजात घुसली' ने ही तहान भागवली. मात्र हिंदीत सिनेसंगीताचा दर्जा इतका खालावला आहे की संपूर्ण वर्षभरातला एकही सिनेमा 'म्युझीकली' उत्तम म्हणवण्याच्या लायकीचा नाही. अगदी गाण्यांची भरमार असलेला 'प्रेम रतन धन पायो'सुद्धा अतिसुमारपट असूनही केवळ सलमानच्या स्टार पॉवरवरच चालला. 'राजश्री'च्या सिनेमांतलं संगीत एकेक पायरी उतरत 'प्रेम्रतन धन्पायो' (असाच उच्चार आहे गाण्यात!) पर्यंत गेलं आहे, ह्यात बडजात्यांना शरम वाटणार नाहीच, कारण त्यांनी त्यातूनही कोट्यवधी कमावले आहेत !

सध्या खोऱ्याने पैसा ओढत असलेल्या 'बाजीराव-मस्तानी' आणि 'दिलवाले' ना शुभेच्छा आणि येणारं वर्ष उत्तम चित्रपट, सुश्राव्य संगीत आणि दर्जेदार मनोरंजनाने सजलेलं, गच्च भरलेलं असावं हीच सदिच्छा !

- रणजित पराडकर

हा लेख दै. मी मराठी लाईव्हमध्ये आज दि. २७ डिसेंबर २०१५  रोजी प्रकाशित झाला आहे -
No comments:

Post a Comment

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...