Saturday, January 02, 2016

उणीवांची जाणीव - नटसम्राट (Movie Review - Natsamrat)

'नटसम्राट' पाहून झाल्यावर एक वेगळीच जाणीव जागृत होते. ही जाणीव उणीवेची की रितेपणाची, नक्की समजायला थोडा वेळ जातो. तोपर्यंत आपण आपल्या मनाची हीच समजूत घातलेली असते की हे एक रितेपणच आहे. जळून खाक झालेल्या नाट्यगृहात, त्या अवशेषांप्रमाणेच ध्वस्त, मोडकळलेला, खंगलेला एक महान कलाकार जे रितेपण अनुभवत असतो, तेच आपल्या मनातही आलं असावं, असं वाटतं. असं वाटण्यामागे कारणंही आहेत. नाना पाटेकरने साकारलेला अप्रतिम 'नटसम्राट गणपत रामचंद्र बेलवलकर', मेधा मांजरेकरनी साकारलेली 'सौ. बेलवलकर', बेलवलकरांच्या मित्राच्या सहाय्यक भूमिकेत कमाल करणारे विक्रम गोखले, मूळ संहितेचा जपलेला प्राण, एकापेक्षा एक जबरदस्त स्वगतं, सर्व सहाय्यक कलाकारांचा (एखादा अपवाद वगळता) जबरदस्त अभिनय, सक्षम तांत्रिक बाजू (कॅमेरावर्क इत्यादी) अशी अनेक कारणं.

पण काही काळ गेल्यावर आपलंच आपल्याला समजतं की ही जाणीव रितेपणाची नाही ! ही जाणीव तर उणीवेची आहे किंवा 'उणीवांची' आहे !
सगळ्यात मोठी उणीव ही की ह्या कहाणीत काही म्हणता काहीसुद्धा नाविन्य राहिलेले नाही. मुलांनी नाकारलेल्या म्हाताऱ्यांची फरफट आजपर्यंत कित्येकदा पाहिलेली आहे. वेगवेगळ्या भाषांतून पाहिलेली आहे. अगदी थेट आणि तितकीच भ्रष्ट नक्कल आपण हिंदी चित्रपट 'बागबान'मध्ये पाहिली. तो चित्रपट वेगवेगळ्या वाहिन्यांवरुन इतक्या वेळा माथी मारून झाला आहे की इच्छा नसतानाही पाहिला गेला आहे. असेच इतरही अनेक चित्रपट, मालिका आपल्या माथी मारल्या गेल्या आहेत. असेल, त्या सगळ्याचं उगमस्थान वि.वा. शिरवाडकरांचं 'नटसम्राट'च असेल आणि त्या अर्थी हा चित्रपट 'ओरिजिनल'ही असेल. पण हा ओरिजिनल अनेक 'डुप्लिकेट्स' नंतर आल्याने, त्याची 'ओरिजिनलिटी' लुप्त झालेल्या एखाद्या मोहेंजोदडोसारख्या संस्कृतीसारखी गाडली गेलेली आहे.
अर्थात, चित्रपट पाहायला जातानाच आपल्याला हे सगळं माहित असतं. असं अजिबात नाही की आपल्याला कहाणीची कल्पना नसताना हे कथानक आपल्यासमोर उलगडतं. पण मग हे जे नाट्य रंगभूमीवर गाजलं आहे, ते मोठ्या पडद्यावर सादर केलं जात असताना त्यात काय वेगळेपण असेल, हे कुतूहल उरतं. त्या कुतुहलापोटी चित्रपट पाहत असताना विक्रम गोखलेंचं 'रामभाऊ' हे पात्र वगळता ठसठशीत वेगळेपण असं काही दिसत नाही. नाटकाचं चित्रपटीकरण करताना एक अजून वाव मिळतो, तो म्हणजे संगीताचा. खासकरून प्रचंड भावनिक ओढाताण व नाट्यमयता असलेल्या कथानकात तर संगीत खूपच महत्वाचा भाग बनू शकतं. किंबहुना, ते बनायला हवं, अशी अपेक्षा असल्यासही गैर नसावं. मात्र इथे ही बाजू सपशेल लंगडी पडली आहे. १-२ गाणी जी अध्ये-मध्ये अर्धी-मुर्धी वाजतात ती एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून दिली जातात. But then, 'संगीत' हा चित्रपटाचा एक भाग असणं, ही संकल्पनासुद्धा आता कालबाह्य झालीच आहे. त्यामुळे त्याकडे होणारा कानाडोळा स्वाभाविकच.
मात्र चित्रपट पाहायला जाण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण असतं, 'नाना.' नाना निराश करत नाही. नानाने कधीच निराश केलेलं नाही. नाना हा अभिनेता निराश करणाऱ्या अभिनेत्यांच्या जमातीचा नाहीच. बेलवलकराचा विक्षिप्तपणा आणि मनस्वीपणा तो पुरेपूर साकार करतो. बापाचं हळवेपण, पतीचं प्रेमळ मन, कलावंताचा अभिमानी बाणा अशी सगळी रूपं हा महान अभिनेता अजोड सक्षमपणे सादर करतो. "मी आहे ज्युलियस सीझर, मी प्रतापराव, मी ऑथेल्लो, मी सुधाकर आणि मीच गणपत रामचंद्र बेलवलकर 'नटसम्राट!' " हे म्हणतानाचा नानाचा आवेश अंगावर काटा आणतो ! ज्यांनी डॉ. श्रीराम लागूंचा 'नटसम्राट' पाहिला आहे, त्यांना नानाच्या नटसम्राटावरही त्याचा प्रभाव जाणवेल. मात्र तो केवळ 'प्रभाव'. नानाचा 'नटसम्राट' स्वतंत्रपणे नक्कल करण्याचा विषय आहे खचितच.
रामभाऊच्या भूमिकेतले विक्रम गोखले मनावर आघात करतात. 'अरे नीच माणसा, चप्पल हरवल्याचं दु;ख लंगड्याला तरी सांगू नकोस !' असं हसत हसत आपल्या मित्राला सुनावताना त्यातली सुप्त व्यथा ते बेमालूमपणे पोहोचवतात. दोघांवर चित्रित झालेल्या प्रत्येक प्रसंगांत अश्या प्रकारची जुगलबंदी पाहायला मिळते. इस्पितळात गणपतराव आणि रामभाऊ 'कौन्तेय' मधील कृष्ण-कर्ण संवाद उत्स्फूर्तपणे सादर करतात. तो प्रसंग अभिनयाच्या जुगलबंदीचं एक शिखर आहे.
इतर वेळी कधी मेधा मांजरेकर तर कधी मृण्मयी देशपांडे जान ओततात. खासकरून मुलीच्या घरून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यावरचा जो प्रसंग आहे, ज्यात मुलीला (मृण्मयी) उपरती होऊन ती गयावया करून आई-वडिलांची क्षमा मागते आणि अपमानामुळे रागाचा पारा चढलेली आई (मेधा मांजरेकर) जळजळीत कटाक्ष टाकून दोन शब्द सुनावते, तो सगळा प्रसंग तर 'बॉयलिंग पॉईण्ट' ला पोहोचणारा आहे. सगळ्या सहाय्यक अभिनेत्यांत 'अजित परब' का आहेत, हे मात्र समजत नाही. त्यांचं संगीत जितकं नीरस वाटतं, तितकाच त्यांनी साकारलेला मुलगासुद्धा. त्या भूमिकेसाठी इतर कुणीच का मिळू नये ?

ह्या सर्व कलाकारांकडून उत्तम काम करून घेतल्याबद्दल दिग्दर्शक महेश मांजरेकरांना सलामच. मात्र हे नाटक चित्रपटात आणताना पदरचं जे काही ओतलं, घातलं आहे, ते कमी पडल्याने; त्याचं माध्यमांतर करण्याचा हेतू काय ते कळत नाही. 'पुनरुज्जीवन' हाच जर हेतू असेल, तर तो साध्य नक्कीच झाला आहे. पण त्याहून पुढे त्यांनी जायला हवं होतं. कुठे तरी त्यांच्यातला पटकथाकार बचावात्मक झाला.'नटसम्राट - असा नट होणे नाही'.
डोळ्यांत पाणी आणतो. व्याकुळ करतो. मात्र तरीही ही जाणीव मागे सोडतोच की अजूनही काही तरी हवं होतं. अगदी हीच नाही, पण अशीच थोडीशी जाणीव 'कट्यार काळजात घुसली'नेसुद्धा मागे सोडली होतीच. मात्र 'कट्यार' मध्ये असलेल्या 'नटसम्राट'च्या मानाने प्रचंड मोठ्या उणीवांवरसुद्धा 'कट्यार'ने मात केली होती, ती त्यात असलेल्या इतर काही प्राबल्यांमुळे. इथे मात्र 'अभिनय' वगळता त्या उणीवांवर मात करण्यासाठी काहीच नसल्याने 'अभिनय ह्या लोकांनी करायचा नाही, तर कुणी करायचा?' असा सरळसाधा प्रश्न पडतो आणि उणीवांवर मात केली जात नाही. थोडक्यात, ज्या कारणासाठी 'कट्यार' आवडला, त्याच कारणामुळे 'नटसम्राट' कमी आवडतो. 'आवडत नाही' असे मी म्हणणार नाही. पण अजूनही खूप आवडायला हवा होता. कारण अखेरीस आपण आवंढे गिळतो. पाणी पुसतो आणि खुल्या दिलाने ह्या कलाकृतीला दादही देतो. मात्र ती दाद खऱ्या अर्थाने असते पडद्यावर दिसलेल्या कलाकारांसाठीच. पूर्ण चित्रपटासाठी नव्हे.

रेटिंग - * * *

3 comments:

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...