Sunday, May 22, 2016

सरबजीत - एक जखम (Movie Review - Sarbjit)


पाकिस्तानच्या जेलमध्ये शब्दश: सडत पडलेल्या सरबजीतच्या हातावरून एक मुंगळा फिरतो आहे. तो त्याला नुसता पाहतो आहे. इतक्यात कोठडीचा बाहेरचा दरवाजा करकरतो. कुणी तरी आत येणार असतं. सरबजीत लगबगीने पाणी प्यायचा भांड्याखाली त्या मुंगळ्याला झाकून ठेवतो. 'शोले'तला गब्बर हातावर फिरणाऱ्या माशीला मारतो, तसा सरबजीत त्या मुंगळ्याला मारणार नसतोच. कारण तो स्वत:सुद्धा एका परमुलुखात चुकून घुसलेला असतो किंवा कदाचित हवा आणि उजेडही जिथे चोरट्या पावलांनी येतात अश्या त्या कोठडीत त्याला सोबत म्हणूनही तो मुंगळा काही काळ पुरणार असेल. कुणास ठाऊक नक्की काय ! दिग्दर्शक ते उलगडत बसत नाही. तो विचार आपल्याला करायचा आहे.

'सरबजीत' एकदा पाहाण्यासारखा नक्कीच आहे. दिग्दर्शक ओमंग कुमारचा पहिला सिनेमा 'मेरी कोम' ठीकच वाटला होता. प्रियांकाने तो चांगलाच उचलून धरला होता. पण इथे मात्र मुख्य भूमिकेतल्या ऐश्वर्या राय-बच्चनला दिग्दर्शकाने उचलून धरलंय. सुरुवातीला ऐश्वर्याचा अत्याभिनय (Over acting) डोक्यात गेला. नंतर नंतर ती जरा सुसह्य होत गेली. पण तरी ते चिरक्या आवाजात बोलणं काही जमलं नाहीच आणि वयस्कर स्त्री म्हणूनही तिला काही सहजपणे वावरता आलं नाही असं वाटलं. दुसऱ्या इनिंगची सुरुवात आत्तापर्यंत तरी ऐश्वर्यासाठी सामान्यच ठरली आहे.

सरबजीत सिंग चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात गेला होता. दारूच्या नशेत त्याच्याकडून ही चूक घडली. ह्या एका चुकीमुळे त्याचं अख्खं आयुष्य बरबाद झालं. ही आपल्याला ज्ञात असलेली त्याची कहाणी. जे दिसतं तेच सत्य असतं आणि जे सत्य असतं ते कधी न कधी दिसतंच, ह्यावर माझा तरी फारसा विश्वास नसल्याने, खरं खोटं देव जाणे. पण ह्या सरबजीतला पाकिस्तानात बॉम्बस्फोट केल्याच्या आरोपावरून डांबून ठेवले गेले. त्याच्यावर अनन्वित अत्याचार तर झालेच, पण त्याचा शेवटही भयंकर होता. इथे आपण अजमल कसाब आणि अफजल गुरू ह्या दहशतवाद्यांना फाशी दिले आणि तिथे त्यांनी सरबजीतला जेलमध्येच हल्ला करून ठार मारलं. त्याचा उघडपणे खून करून बदलाच घेतला एक प्रकारे. त्याच्यावर ठेवलेले बॉम्बस्फोटाचे आरोप खोटे ठरले असतानाही, त्याला सुटका मिळाली नाही. लपलेलं सत्य जरी काही वेगळं असलं, तरी दिसणारी अमानुषता खूपच संतापजनक आहे.

सरबजीतच्या हालअपेष्टा रणदीप हुडाने फार अप्रतिम सादर केल्या आहेत. भूमिकांच्या लांबीचा विचार केला, तर सिनेमा ऐश्वर्यावर - सरबजीतच्या मोठ्या बहिणीवर - बेतला आहे. मात्र रणदीप हा एक हीरा आहे. तो लपत नाहीच. सिनेमा येण्याच्या खूपच आधी, त्याचा एक फोटो आला होता. 'सरबजीत'च्या गेटअप मधला. रस्त्यावरच्या रोगट भिकाऱ्यासारखा दिसणारा तो माणूस रणदीप हुडा आहे, हे समजायलासुद्धा वेळ लागत होता. ह्या गेट अपसाठी त्याने खूप वजनही कमी केलं. त्याची घाणीने पूर्ण भरलेली नखं, पिंजारलेले केस, किडलेले दात, अंगावर पिकलेल्या जखमा, खरुजं, गालिच्छ पारोसा अवतार, कळकट फाटके कपडे वगैरे असं आहे की जे आपल्याकडे ह्यापूर्वी कधीच कुठल्या सिनेमात दाखवलं नाही. सिनेमात दाखवलेल्या अमानवी अत्याचारांचा विचार करता, त्याचं तसं दिसणं किती आवश्यक आहे हे समजून येतं. ते सगळं पडद्यावर पाहणं भयंकर आहे.


अनेक वर्षांनंतर सरबजीतला भेटायला त्याची बहिण, बायको व दोन मुली पाकिस्तानात जेलमध्ये येणार असतात. त्याला फाशीची शिक्षा सुनावलेली असते. पंधरा दिवसांवर फाशी आलेली असताना, तो आपल्या कुटुंबाला भेटणार असतो. 'आपल्या घरचे येत आहेत' हे समजल्यावर आनंदाला पारावर न उरलेला सरबजीत आपली छोटीशी कोठडी स्वच्छ करण्याचा केविलवाणा प्रयत्न करतो. घाणीचं भलंमोठं भांडं कांबळं टाकून झाकतो. थोडंसं पाणी असतं, अंगातले कपडे त्यात भिजवून ती घाणेरडी कोठडी पुसून काढतो. उरलेल्या पाण्यात कशी तरी अंघोळ वगैरेही करतो. चहा बनवतो ! त्याची ती सगळी धडपड व्याकुळ करणारी आहे. प्रत्यक्ष भेटीचा प्रसंग तर हृदयाला घरं पाडणारा आहे.
नंतर त्याची फाशी स्थगित होते आणि पुन्हा कोर्टात केस उभी राहते. मग पुन्हा एकदा त्याला भेटायला त्याची बहिण येते. तेव्हा ती त्याला धीर देण्यासाठी 'तू इतकी वर्षं इथे सलामत आहेस' म्हणते. तिच्या ह्या वाक्यावरचा सरबजीतचा आउटबर्स्ट जबरदस्त आहे ! 'कोणती सलामती ? ह्या काळ्या कोठडीत मला डांबून ठेवलंय. मी इथेच हागतो, इथेच मुततो, इथेच बाजूला बसून असतो, जेवतो, झोपतो.. एक जमाना झाला मला कुणी मिठी मारलेली नाही. कुणी बोलायला येत नाही' वगैरे त्याचं बोलणं अक्षरश: ऐकवत नाही ! अंगावरच येतं !
एकूणच रणदीपचं काम जीव पिळवटणारं आहे. एखाद्या व्यक्तिरेखेत शिरून तिला सादर करू शकण्याची अभिनय क्षमता आणि त्याच्या जोडीनेच उत्तम शरीरयष्टी, असा वेगळाच कॉम्बो त्याच्याकडे आहे. जो इतर कुणाकडेही नाही. 'मै और चार्ल्स' मध्ये त्याने चार्ल्स शोभराज ज्या बेमालूमपणे उभा केला होता, त्याच बारकाईने तो सरबजीत साकार करतो. त्याची हताशा, वेडगळपणा, वेदना आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कळकटपणा त्याने आपलासा केला आहे. सरबजीतला न्याय मिळाला नाहीच, पण रणदीपने भूमिकेला मात्र न्याय दिलाच आहे, ह्याबाबत वादच नाही.

रिचा चड्डानेही तिला जितका वाव मिळाला आहे, तेव्हढ्यात उत्तम काम केलं आहे. 'मसान'मध्ये एकसुरी वाटलेली रिचा चड्डा इथे विविध प्रसंगात वेगवेगळ्या छटा दाखवते. पण मुळात तिची भूमिका ऐश्वर्याच्या स्टारडमपुढे गुदमरली असल्याने ती झाकोळली जातेच.

दर्शन कुमार चा रोल छोटा, पण महत्वाचा आहे. पाकिस्तानी वकिलाच्या भूमिकेत तो मस्त काम करतो. NH10 आणि मेरी कोममध्येही त्याला कमी लांबीचीच कामं मिळाली होती आणि तिथेही त्याने चांगलंच काम केलं होतं. त्या मानाने इथे त्याला काही ठिकाणी थोडी संधी मिळाली आहे आणि ती त्याने वाया जाऊ दिलेली नाही. सरबजीतच्या खऱ्या वकीलाला आपल्या कुटुंबासह पाकिस्तान सोडून परदेशात आश्रय घ्यावा लागला होता. तिथल्या कट्टरवाद्यांनी त्याला दिलेला त्रास, 'सरबजीत'मध्ये थोडासाच दिसतो. पण त्यावरून साधारण कल्पना येते.

ऐश्वर्याचे काही टाळीबाज संवादांचे सुमार प्रसंग वगळले, तर संवादलेखनही (उत्कर्षिनी वशिष्ठ) मला अत्यंत आवडलंय. अतिशय अर्थपूर्ण व नेमके संवाद आहेत.
आजकाल एकाच सिनेमाला सहा सात जण संगीत देत असल्याने चांगलं काम कुणाचं आणि वाईट कुणाचं समजत नाही ! ओव्हरऑल संगीतसुद्धा चांगलं वाटलं. मुख्य म्हणजे अनावश्यक वाटलं नाही.

ओमंग कुमार ह्यांनी हा विषय निवडल्याबद्दल त्यांचं विशेष अभिनंदन करायला हवं. सरबजीत प्रत्यक्षात कोण होता ? सामान्य माणूस की हेर किंवा अजून कुणी, हा विषय वेगळा. पण त्याने एक भारतीय असल्याची भारी किंमत मोजलीच आहे. त्याच्या यातनांना ओमंग कुमारने लोकांपर्यंत पोहोचवलं आहे. ऐश्वर्याच्या जागी एखादी सकस अभिनय क्षमता असलेली ताकदीची अभिनेत्री असती, तर कदाचित खूप फरक पडला असता.


सरबजीत तर आता राहिला नाही. फक्त त्या नावाची एक जखम राहिलेली आहे. खपलीखाली अजून ओलावा आहे. 'ह्या निमित्ताने लोकांना बाजीराव पेशवा समजला' सारखे युक्तिवाद करणारे लोक ह्या निमित्ताने ही जखमही समजून घेतील. कदाचित असे किती तरी सरबजीत आजही खितपत पडले असतील किंवा संपूनही गेलेले असतील. त्या सगळ्यांना नाही, तर त्यांतल्या काहींना तरी जाणून घेण्याचा प्रयत्न होईल.
हेही नसे थोडके !

रेटिंग - * * *

- रणजित पराडकर 

Sunday, May 15, 2016

सिनेमा

सिनेमा.

मी सिनेमा का बघतो ? किंबहुना 'आम्ही सिनेमा का बघतो ? तो बघितला काय आणि नाही बघितला काय, आमच्या आयुष्याचा रहाटगाडा आम्ही असाच ओढत राहणार असतो. मग काही शे रुपये खर्चून, तीन साडे तीन तास देऊन आम्हाला हशील काय होत असतं ?
हे प्रश्न सिनेमा न पाहाणाऱ्यांना पडत असतील. आम्हालाही क्वचित कधी तरी पडतात. रिकाम्या वेळेचा चाळा म्हणून आम्ही अश्या विषयांवर तथाकथित विचारमंथन करत असतो. ह्यातूनही हशील काहीच होत नाही, पण रिकाम्या वेळचा एकटेपणा जरा लौकर निघून जातो.

बाकी काही नाही.
एव्हढ्यासाठीच आम्ही विचार करतो.

माझ्यासारख्या अगणित सामान्य माणसांसाठी 'सिनेमा' ही एक देणगी आहे.
तिथं दिसणारं बरचसं आम्हाला नेहमीच हवं असतं, पण मिळणं दुरापास्त असतं. आम्हाला दहावीनंतर हव्या त्या कॉलेजात प्रवेश मिळण्याचंही भाग्य नसतं, पण सिनेमातला तो किंवा ती मात्र हवा तो कोर्स, हवी ती डिग्री उत्तमोत्तम गुणांनी अगदी सहजपणे मिळवतात. त्याला त्याच्यावर प्रेम करणारी हमखास मिळते आणि ती नाकी डोळी इतकी नीटस असते की अशी जी मुलगी आमच्या कॉलेजात असे, तिच्यापासून आम्हीच 'हे आपल्या लेव्हलचं नाही' हे उमजून सुरक्षित अंतर ठेवत असू. त्याची पिळदार देहयष्टी आणि आमची नुसतीच पिळलेली यष्टी. त्याचा दाढी वाढलेली असतानाही स्वच्छ दिसणारा चेहरा आणि आमचं अंघोळ करून बाहेर आल्या क्षणापासून चिकट, तेलकट वाटणारं थोबाड. त्याला जमीन, हवा व पाण्यातल्या सर्व प्रकारच्या गाड्या व्यवस्थित चालवता येत असणं आणि आम्ही बुलेटवर मागे बसतानाही सावरुन/ बावरुन बसणं.
- अश्या लहान-सहान अनेक गोष्टी ज्या पडद्यावर त्याला किंवा तिला मिळतात/ जमतात त्यांत आम्ही आपलाच पूर्ततेचा आनंद मानत असतो.
तिथले 'घर' नावाचे मोठमोठे महाल, गडगंज श्रीमंत कुटुंबं, जीवाला जीव देणारे मित्र सगळं सगळं आम्हाला आपलंच वाटतं.

काही सिनेमे जरा रिअलिस्टिक असतात. पण त्यातही आम्हाला अप्रूप असतं कारण पडद्यावर घडणारी कहाणी आमच्या सपक आयुष्यापेक्षा खूपच मसालेदार असते. आमची ष्टोरी आम्हाला स्वत:लाही ऐकावीशी कधी वाटत नाही. ती इतकी कंटाळवाणी असते की रात्री बिछान्यावर पहुडलं असताना, जर झोप येत नसेल तर आम्ही 'आज काय घडलं' ह्याची उजळणी करायचा प्रयत्न करतो. अर्धा दिवसही आठवून होत नाही आणि झोप लागते.
पडद्यावरच्या व्यक्तिरेखांच्या यातनासुद्धा आम्हाला खरं सांगायचं तर हव्याहव्याश्या वाटतात. त्यांच्या असामान्य दु:खाच्या बिलोरी आरश्यात आम्हाला आमच्या नीरस आयुष्याचं प्रतिबिंब क्षणभर उजळवून पाहावंसं वाटतं. कहाणी शोकांतिका असेल, तर 'हे असं घडू शकतं' म्हणून आम्ही चक्क देवाचं अस्तित्वही नाकारतो. मग थोड्या वेळाने जाणीव होते की 'आपलं असं घडणार नाहीय' आणि पुन्हा देवाच्या अस्तित्वावर विश्वास दृढ होतो.

कधी आम्हाला तिथे असं काही दिसतं, जे आम्ही आमच्याच मनापासून लपवून ठेवलेलं असतं. ते असं एखादं सत्य असतं, ज्याच्या नजरेत नजर टाकून पाहायला आम्हीच कचरत असतो. मनाच्या डायरीत नकळतपणे आम्ही एखादी नोंद करून ठेवलेली असते. ते पान फाडायचंही नसतं आणि उलटून पाहायचंही नसतं. एखाद्या अन्प्लेएबल चेंडूवर जेव्हा एखादा फलंदाज सपशेल फसून आउट होतो, तेव्हा त्याला जे वाटत असतं, तेच आम्हाला हे सिनेमे जाणवून देतात. आमची विकेट उडालेली असते. आमचा तथाकथित अभेद्य बचाव भेदला गेलेला असतो. पण तोंडावर आपटणारं अपयश झटकून पुन्हा पुढच्या इनिंगला जसा तोच फलंदाज गार्ड घेऊन स्टान्स घेतो, तसेच आम्हीही पुन्हा पुढच्या सिनेमासाठी तयार असतोच.

सिनेमा आम्हाला सफरी घडवतो. त्या विविध स्थळांच्याच नसतात, तर विविध काळांच्या, संस्कृतींच्या असतात. विविध व्यक्तिरेखांच्या जागी सिनेमा आम्हाला उभा करतो आणि त्यांच्या भावविश्वाच्या सफरी घडवतो. आयुष्याच्या नऊ रसांच्या सफरी सिनेमा आम्हाला घडवतो. पडद्यावर उधळल्या जाणाऱ्या त्या नवरसांपैकी सर्वच रसांचा आस्वाद आम्ही त्या पडद्यामुळेच घेत असतो, एरव्ही ह्यातले काही रस आम्ही ऑप्शनला टाकलेले असतात किंवा त्यांची चव आम्हाला आम्हीच सभोवताली व स्वत:च्या आतही निर्माण केलेल्या कल्लोळात, गडबडीत, धावपळीत, काल्यात समजूनच आलेली नसते किंवा येणार नसते.

डोळे भरभरून आम्ही तंत्रज्ञानाच्या करामती पाहतो. आम्हाला स्वत:ला एक पॉवर पॉइन्ट प्रेझेन्टेशनसुद्धा नीटनेटकं जमत नसलं, तरी स्पेशल इफेक्ट्सचे बारकावे मात्र आम्ही हेरून काढत असतो. कधी त्याला दाद देत असतो तर कधी हाणतही असतो. असंच पडद्यावरच्या कलाकारांबाबतही. शाळेच्या गॅदरिंगमधल्या किरकोळ नाटिकेत 'कोपऱ्यात उभं असलेलं झाड' वगैरेचे रोल केल्याचा अनुभव गाठीशी असलेले आम्ही सिनेमातल्या प्रोटोगॉनिस्टच्या अभिनयाचा खरपूस समाचारही घेत असतो. बाथरुमबाहेर कधी आम्ही गुणगुणत नसतो किंवा पुलंनी सांगितल्याप्रमाणे 'उगीच का' मधला 'उ' कुठे वाजतो, हेही आमच्या गावी नसतं, पण सिनेमाच्या संगीतावर विशेष टिप्पणी मात्र हक्काने करतो. हे सगळं वृथा आहे, आमच्या मताला काही एक किंमत नाहीय, हेही आम्हाला माहित असतं. पण आमच्या मताला किंमत नसल्याची सवय आम्हाला आमच्या रोजच्या आयुष्याने आधीच लावलेली असते. त्यामुळे आमचे शब्द नुसतेच हवेत उडाले, तरी त्याचं वैषम्य आम्हाला तरी वाटत नाही.

सिनेमा खोटा असतो. अगदी १००% खोटाच असतो. भले तो कितीही वास्तववादी असला, तरी खोटाच असतो. हे आम्हाला तो पाहण्याआधी आणि पाहिल्यानंतरही माहित असतं. पण तो पाहत असताना मात्र आमच्यासाठी खराच असतो. ते २-३ तास आम्ही आमच्या रोजच्या आयुष्यापेक्षा वेगळे असतो. कधी दु:खी असतो, कधी आनंदी. पण जे काही असतो, ते एरव्ही नसतोच. आम्ही आमच्या आयुष्याचे हिरो/ हिरोईन नेहमीच असतो. पण आम्ही हे २-३ तास अजून एका आयुष्याचेही हिरो/ हिरोईन होण्याचा प्रयत्न करत असतो. जो कधी जमतो, कधी नाही जमत. तरी सिनेमाने त्याचं काम केलेलं असतं. आम्हा सामान्य माणसांच्या सामान्य आयुष्याला आमच्याचपासून काही काळासाठी का होईना बाजूला ठेवलेलं असतं. विश्रांती म्हणून एखाद्याने डोक्यावरचं ओझं खाली ठेवून काही मोकळे श्वास घ्यावे आणि पाण्याचे चार-दोन घोट घ्यावेत अन् मग पुन्हा एकदा ते ओझं तसंच डोक्यावर घेऊन पायपीट सुरु करावी, तसे आम्ही सिनेमाला पाहतो आणि पुन्हा हमाली सुरु करतो.

बाकी काही नाही.
एव्हढ्यासाठीच आम्हाला सिनेमा आवडतो.

- रणजित पराडकर

Related Posts Plugin for WordPress, Blogger...