Friday, July 08, 2016

संक्षिप्त 'सुलतान' (Sultaan - Not a Movie Review)

रिव्ह्यू वगैरे लिहायचा मूडही नाहीय आणि वेळही नाहीय. म्हणून जरासं संक्षिप्त. 

आवर्जून सांगावं असं 'सुलतान'बद्दल काही असेल तर हे -

१. सलमान इतका थकेल, निस्तेज, निरुत्साही वगैरे कधी दिसला नाही. त्याच्या अभिनयाला मर्यादा आहेत आणि तो त्याचं लोडही घेत नाही. आपल्या मर्यादेत राहूनच एक्स्प्रेस करत असतो. पण 'एनर्जी' आणि त्या एनर्जीमुळे असणारा जबरदस्त स्क्रीन प्रेझेन्स हा सलमान, शाहरुख, अक्षय कुमार व अजून काही १-२ लोकांचा प्लस पॉईण्ट आहे. का कुणास ठाऊक 'सुलतान' झालेला सलमान दबंग, वॉण्टेड, टायगर वगैरेसमोर अगदीच पडेल वाटला. फुग्यातली हवा कमी व्हायला लागली की तो जसा वाटतो, तसा वाटला सलमान. दया आली त्याची. तो चक्क आजारी वाटला. बहुतेक आता 'वय' आड यायला लागलं आहे. ह्या फुसकेपणामुळे सलमानपट पाहूनही पाहिल्यासारखं वाटलं नाही.

२. Anushka Sharma certainly has better jobs to do. असला तोकडा रोल तिने का केला आहे कुणास ठाऊक ! अर्थात, जितका आहे तितका तिने केला चांगलाच आहे. पण कशाला ? सोनाक्षी-फिनाक्षी, जॅकलीन-फॅकलीन ठोकळे आहेत की असले किरकोळ सहाय्यक रोल्स करायला ! दीपिका, अनुष्का, प्रियांकाने अश्या कामांत आपला वेळ, कसब वाया घालवू नये असं वाटतं. प्रियांकाने मध्यंतरी पाठोपाठ महारद्दड सिनेमे टाकायला सुरु केलं होतं. जंजीर, लव्ह स्टोरी २०५० वगैरे. बरं झालं, वेळीच सावरली. अनुष्कानेही सावरावं. सुलतान-फिलतान करण्यापेक्षा बरी कामं आहेत नक्कीच तिच्याकडे.

३. सलमान-अनुष्का ही जोडी काही केल्या पचत आणि पटतच नाही ! एक तर कॅमेऱ्याने दोघांची उंची जुळवायचा प्रयत्नही केलेला नाही आणि त्यात त्यांच्यात काही केमिस्ट्री, फिजिक्स काहीही वाटत नाही. पेनाचं टोपण पेन्सिलला लावल्यासारखं विजोड आहे हे. कुणाच्या सुपीक डोक्यातून असं अचाट कास्टिंग आलं असेल काय माहित ! 

४. बहुतेक गाणी बरी जमून आलेली आहेत. विशाल-शेखरना त्यासाठी धन्यवाद द्यावेत म्हणतो ! कारण आजकाल सिनेमातली गाणी सहन होणं म्हणजे हवामानखात्याने सांगितलेल्या अंदाजाने बरोबर ठरण्यासारखं आहे. 

५. I dont know if something is wrong with me. पण आजकाल मला दोन - सव्वा दोन तासाच्या वर सिनेमा जाणं हे आवडेनासंच झालं आहे ! तब्बल पावणे तीन तास ? काहीही गरज नव्हती इतकी. अर्धा तास कमी चालला असता आणि त्यामुळे मजाही आली असती. पण असो !
६. अब्बास अली जफरचा 'गुंडे' एक अशक्य आचरट चित्रपट होता. त्या मानाने 'सुलतान' खूपच चांगला म्हणावा लागेल. 

७. रणदीप हुडाला जरा अजून काम हवं होतं. गेल्या काही सिनेमांमुळे मला हा अभिनेता खूपच आवडायला लागला आहे. त्याच्या भूमिकेला खूप कमी जीव, लांबी आहे. ती पुरेशी वाटत नाही. I know हे unreasonable आहे. तरी जरा त्याच्या भूमिकेची लांबी वाढवली असती, तर बरं झालं असतं.

८. शेवटचा अर्धा तास 'ब्रदर्स'ची आठवण येते. खुद्द 'ब्रदर्स'सुद्धा रिमेकच होता, हा भाग वेगळा ! 

९. सलमानच्या कुस्त्या, फाईट्स चांगल्या केल्या आहेत. पण अनुष्काच्या एक नंबर बोगस. दुसरं म्हणजे ती 'लेडी पैलवान' न वाटता 'काडी पैलवान' वाटते.

१०. सर्वच जणांनी हरयाणवी भाषेचा लहेजा चांगला जपला आहे. सलमानला Flat 50% डिस्काउंट असतो ह्या सगळ्या बाबतीत. त्यामुळे 'सर्वच' मध्ये तो अर्धाच पकडावा !  

११. कहाणी अगदी थोडक्यात सांगायची तर, तो तिला पाहताक्षणी तिच्या प्रेमात पडतो. ती कुस्तीगीर असते म्हणून हाही कुस्तीगीर बनतो. नंतर काही कौटुंबिक ड्रामा होतो आणि रिंगपासून दूर गेलेला तो पुन्हा रिंगमध्ये येतो 'खोयी हुई इज्जत फिरसे पाने के लिये' असा सगळा मसाला आहे.

१२. आता तर 'दंगल' अजूनच बोअर होणार आहे.

१३. रेटिंग - * * १/२

- रणजित पराडकर


1 comment:

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...