Thursday, September 08, 2016

'स.न.वि.वि. - एक उत्स्फूर्त अनौपचारिक संवादी मैफल'

~ ~ 'स.न.वि.वि. - एक उत्स्फूर्त अनौपचारिक संवादी मैफल' ~ ~

स. न. वि. वि.
फोनवर एकमेकांशी थेट बोलणं, व्हिडीओ चॅटिंग करणं आताशा इतकं सहज शक्य आणि स्वस्त झालं आहे की गेल्या दोन पिढ्या कुणी एकमेकांना कधी पत्र वगैरे लिहिलं असेल असं मला तरी वाटत नाही. ई-मेल, मेसेंजर, चॅटिंग वगैरेचा जमाना आहे हा. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, हाईक वगैरेचा काळ आहे. जिथे आपण एकमेकांशी मराठीतून बोलतानाही रोमन लिपीत लिहितो, तिथे 'स. न. वि. वि.' माहित असणं अशक्यच ! इंग्राठलेल्या, हिंद्राठलेल्या व इंद्राठलेल्या लोकांना 'स.न.वि.वि.' म्हणजे 'सप्रेम नमस्कार विनंती विशेष' आणि हे पत्राच्या सुरुवातीला लिहिलं जात असे, हे विशेषत्वाने सांगावं लागायची वेळ सध्या आलेली आहे !

ह्या छोट्याश्या प्रास्ताविकातून हा अंदाज यावा की 'स. न. वि. वि.' हा कार्यक्रम म्हणजे नक्की काय असेल ? एखाद्या पत्राप्रमाणे तो संवादी असणार. तो जुन्या काळात नेणाराही असणार. काही ठिकाणी आवश्यक तितका औपचारिक, तर बहुतकरून अनौपचारिकच असणार. हा कार्यक्रम आठवणी सांगणारा असणार, अनुभवकथन करणारा असणार. तो तुम्हाला विचारात टाकणारा असणार, गुदगुल्या करणारा असणार आणि काही माहित नसलेल्या गोष्टीही सांगणारा असणार. तो बातम्या सांगेल, काही गुपितंही उघडेल, काही गूढांना उकलेल आणि तो तुम्हाला अंतर्मुखही करेल. एक सफर घडवेल अश्या विश्वाची, जे आपल्याला माहित आहे पण समजलेलं नाही.
ज्यांनी आयुष्यात कधी पत्रं लिहिलेली आहेत किंवा ज्यांना कधी पत्रं आलेली आहेत, ते लोक नक्कीच समजू शकतील की 'पत्र लिहिणं किंवा आपल्याला आलेलं पत्र वाचणं', हा एक आगळावेगळा सोहळाच असतो. ते एक खूपच वेगळं मनोरंजन असतं. 'स. न. वि. वि.' हा कार्यक्रमसुद्धा असाच एक आगळावेगळा अनुभव आहे, सोहळा आहे आणि जरा वेगळ्या प्रकारचं मनोरंजन आहे. कारण हा कार्यक्रम म्हणजे दुसरं तिसरं काही नसून हे 'कौशल इनामदार' आणि 'स्पृहा जोशी' लिखित एक पत्र आहे. हे पत्र ते दोघे मिळून, मंचावरूनच रसिकांना लिहितात.
जे त्यांच्यासमोर बसलेले असतात आणि जे त्यांच्यासमोर त्या वेळी नसतात, अश्या सगळ्याच रसिकांसाठीचं हे एक सांगीतिक, काव्यात्मक, संवादी, उद्बोधक पत्र आहे.
ही कवितांची, गाण्याची, गप्पांची मैफल हस्तलिखित पत्रासारखीच जराशी अनौपचारिक आहे. पण हे हस्ताक्षर सुंदर, सुवाच्य आहे. त्यात खाडाखोड, गिचमिड नाही. हे पत्र टापटीप, नीटनेटकं आहे आणि उत्स्फूर्त असलं तरी मुद्देसूदही आहे.

काल 'स. न. वि. वि.' चा शुभारंभाचा प्रयोग होता. पडदा उघडला आणि समोर एका छोट्याश्या मंचावर फक्त तीन जण. पुढ्यात हार्मोनियम घेऊन कौशल इनामदार, त्यांच्या एका बाजूला स्पृहा जोशी आणि दुसऱ्या बाजूला तबल्याच्या साथीसाठी मंदार गोगटे. वाद्यांचा ताफा नाही की देखाव्यांचा पसारा नाही. एकदम सरळ, साधं, एखाद्या घरगुती मैफलीसारखं मित्रत्वाचं वातावरण. मला का कुणास ठाऊक चटदिशी तलत मेहमूदच्या गाण्यांचीच आठवण झाली. तलतची गाणी ऐकताना मला असंच वाटतं की तो असा समोर बसून कुठलाही अभिनिवेश न आणता 'हे हे असं असं आहे' अश्या पद्धतीचं सरळ साधं कथन करत असतो. त्याला काही अपेक्षा नसते कुठल्या उत्तराची किंवा मदतीचीही. तो एका निरपेक्ष वृत्तीने आणि अतीव हळवेपणाने सांगतो -
'प्यार पर बस तो नहीं हैं मेरा लेकिन फिर भी
तू बता दे के तुझे प्यार करूँ या न करूँ'
'स. न. वि. वि.' मधल्या कौशल इनामदार आणि स्पृहा जोशी ह्यांची भूमिकाही मला अशीच वाटली.
अनौपचारिक व उत्स्फूर्त संवादी कार्यक्रम असल्याने तात्कालिक स्थिती व घटनांना अनुसरून पुढे जाणं साहजिकच आहे. पावसाळी वातावरणानुरूप कार्यक्रमाची सुरुवात कवी अशोक बागवेंच्या 'वासाच्या पयला पाऊस अयला' ने झाली आणि पाठोपाठ पहिल्या पावसावरची स्पृहा जोशींची एक कविता -

रिमझिमत्या सरी आठवणी होऊन वाहायला लागतात..
जरा कुठे त्याची चाहूल काय लागते, लगेच कविताच सुचायला लागतात !

कविता, गाणी, आठवणी, गंमती जंमती ह्या सर्वांची पखरण पुढील दीड तास चालू राहिली. ऑस्कर वाईल्ड, मार्क ट्वेन आदींची वचनं, तर दुष्यंतकुमार, बालकवी, कुसुमाग्रज, गदिमा, सुरेश भट, शांता शेळके, मंगेश पाडगांवकर, नारायण सुर्वे, अशोक नायगांवकर, नलेश पाटील ह्यांच्या कविता ह्या दीड तासात भेटून गेल्या. अनेक कवितांच्या, गाण्यांच्या व चालींच्या जन्माच्या कथा सांगितल्या गेल्या.
उदाहरणार्थ -

मुंबईच्या लोकल ट्रेनमधून रात्री उशीरा कविवर्य शंकर वैद्यांसोबत प्रवास करत असताना, पौर्णिमेच्या चंद्राला पाहून वैद्य सरांना आठवलेल्या -

या शुभ्र विरल अभ्रांचे शशीभवती नर्तन चाले
गंभीर धवळली रजनी बेभान पवनही डोले

- ह्या बालकवींच्या ओळी आणि त्यांनी कौशल इनामदारांना ह्या कवितेला चाल लावण्यासाठी उद्युक्त करणं. नंतर ती चार पानी अपूर्ण कविता समजावून देणं, मग ती कविता कौशल इनामदारांमधल्या संगीतकाराला उमगणं आणि तिची चाल बनणं

किंवा

'उंच माझा झोका' ह्या रमाबाई रानडेंच्या आयुष्यावर आधारित मालिकेच्या चित्रिकरणादरम्यान आलेले काही अनुभव व मालिकेच्या कथानकाचा, तसेच व्यक्तिरेखांचा स्वत:वर पडलेला प्रभाव ह्यातून स्पृहा जोशींना सुचलेली 'पर्व' ही कविता, ज्यात आपण नेहमीच 'दुसरे' असल्याची एक बोचरी जाणीव मन पोखरत जाते

किंवा

सुरेश भटांच्या -
'सूर मागू तुला मी कसा
जीवना, तू तसा मी असा'
- ह्या कवितेस कौशल इनामदारांनी दिलेली एक नवीन चाल त्यांना कशी सुचली, का द्यावीशी वाटली.

असं बरंच काही.

ह्या कार्यक्रमाला निश्चित अशी संहिता नाही. रूपरेषा आहे. बाकी सगळं उत्स्फूर्त - Extempore. अश्या स्वरूपाचा कार्यक्रम सादर करताना भरकटत जाण्याची शक्यता खूप असते. मात्र दोन्ही कलाकारांना कुठे थांबायचं ह्याचं एक भान नेहमीच असल्याने, त्यांचं उत्स्फूर्त बोलणं रसभरीत व अर्थपूर्ण तर होतंच, पण नेमकं असल्याने योग्य परिणामकारकही होतं. अनेकविध कवींच्या कविता, तत्ववेत्त्यांची भाष्यं कौशल इनामदारांना मुखोद्गत असणं निव्वळ थक्क करणारं होतं. 'संगीतकाराकडून त्याची स्वत:ची चाल ऐकणं, ह्याची बातच वेगळी असते कारण त्याला त्या चालीतल्या 'गल्ल्या' माहित असतात', 'गाणारा समाज हा सुखी समाज असतो', 'भाषा प्रवाही राहिली पाहिजेच पण त्यासाठी आधी ती 'राहिली' पाहिजे' अशी कौशल इनामदारांची अनेक वक्तव्यं लक्षात राहणारी होती.
तर, 'किती रोखा वेडं मन एकटंच गात राहतं' म्हणणाऱ्या स्पृहा जोशींच्या

रुणझुणले अनुबंध जरासे सरून उरला जरा पूरिया
नको नको म्हणता बिलगे तुझ्या मिठीची साखरमाया

आणि

हळवे तनमन, सरले 'मी'पण गर्दनिळीही भूल
निळसर मोहन, राधा झाली निशिगंधाचे फूल

अश्या कधी लयबद्ध, कधी मुक्त कविताही मनात रेंगाळल्या. कवितांवर लिहायचं म्हणजे तो एक स्वतंत्र लेखाचा विषय असतो. त्यामुळे इथे जास्त लिहित नाही.
सांगायचं इतकंच आहे की एक संगीतकार, लेखक आणि एक अभिनेत्री, कवयित्री ह्यांच्या गप्पांतून उलगडत जाणारा त्यांचा सृजनशील प्रवास जाणून घेणं आणि त्यांचे चिंतनशील विचार ऐकणं, हा एक अविस्मरणीय अनुभव 'स.न.वि.वि.' ने दिला. पहिलाच प्रयोग असल्याने इथून पुढे त्यात आणखी बदल होत जातीलच. कदाचित त्यात अजून एका 'आवाजा'ची गरज आहे. सध्या गाण्याची सगळीच जबाबदारी एकाच गळ्यावर आहे. असा जर दुसरा आवाज त्यांनी भविष्यात घेतलाच, तर तो कुणा गायक/ गायिकेचा नसावाच. कौशल इनामदारांच्याच शब्दांत 'गाता गळा' नसावा तर 'गातं नरडं'च असावं, जेणेकरून कार्यक्रमाचा सध्याचा जो अनौपचारिक चेहरा आहे, तो तसाच राहील, असं मात्र वाटलं ! येणाऱ्या काळात साथसंगतीसाठीही अजून १-२ जण नक्कीच वाढवता येतीलच.
अर्थात, आत्ताच्या स्वरुपातही जो कार्यक्रम झाला तो सुंदरच झालेला आहे ! त्यांच्या पुढील प्रयोगांना मनापासून शुभेच्छा !सरतेशेवटी, एक उल्लेख करणं अत्यावश्यक आहे.

कार्यक्रमात चित्रकार, कवी नलेश पाटील ह्यांच्या अप्रतिम सुंदर अश्या अनेक कविता सादर झाल्या. पैकी 'माझ्या चातक मैतरा..' आणि 'हिंदकळलं आभाळ..' तर कौशल इनामदारांनी गाऊन सादर केल्या. नलेश पाटील ह्यांचा प्रभाव दाखवणारी स्पृहा जोशींनी स्वत:ची एक कविताही पेश केली आणि हे सगळं मंचावर घडत असताना खुद्द नलेश पाटील मात्र आपल्या अखेरच्या प्रवासासाठी निघून गेले होते ! कार्यक्रमादरम्यानच ही बातमी येऊन धडकली, जिला कार्यक्रमानंतर जाहीर केलं गेलं. तोपर्यंत ना सादरकर्त्यांना हे माहित होतं ना उपस्थितांना. एखाद्या कवीच्या आयुष्याच्या शेवटच्या घटिकांत त्याच्याच काही सुंदर कविता कुणी ताकदीचे सादरकर्ते उत्स्फूर्तपणे एका मोठ्या श्रोतृवर्गासमोर सादर करत असणं, त्या शब्दांना व सादरीकरणाला भरभरून दाद मिळत असणं हा योगायोग जरी दुर्दैवी वाटत असला तरी विलक्षण काव्यात्मक आहे. एकाहून एक सुंदर कविता व गीतं सादर झाल्यावरही मी घरी येत असताना माझ्या मनात, कार्यक्रमाच्या पूर्वार्धात सादर झालेली 'माझ्या चातक मैतरा शिव फाटलेल्या जागा' ही कविताच घुमत राहावी आणि आतल्या आतच काही तरी उसवत राहावी, ह्याहून मोठी श्रद्धांजली एका कवीसाठी काय असू शकेल ?

कळावे.
लोभ असावा.

- रणजित पराडकर

हा लेखाला महाराष्ट्र टाईम्सने प्रसिद्धी दिली आहे - http://epaperbeta.timesofindia.com/Article.aspx?eid=31836&articlexml=11092016006013


No comments:

Post a Comment

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...