Thursday, September 29, 2016

पिंक - काही मतं (Pink - Not a Review !)


'पिंक'विषयी लिहायला बराच उशीर झालाय, पण लिहावंसं वाटतंय म्हणून लिहितोय. बहुतांश लोकांनी पाहून झाला आहे, भरपूर परीक्षणंही आलेली आहेतच. त्यामुळे मी कहाणी वगैरे न लिहिता फक्त काही मतं मांडतो. हे परीक्षण नव्हेच. फक्त मतप्रदर्शन !

१. 'पिंक' हे नाव आणि पोस्टरवरील त्याचं लेटरिंग/ डिझाईन मला खूप आवडलं. तेव्हढ्यातूनच एक संदेश पाहणाऱ्यापर्यंत प्रभावीपणे पोहोचतो आहे, असं मला वाटलं.
# 'पिंक' हा रंग 'स्त्रीत्वा'चं प्रतिनिधित्व करतो. मुलगी असेल तर 'गुलाबी' रंग आणि मुलगा असेल तर 'निळा' रंग, असा एक सर्वमान्य समज जगभरात दिसून येतो.
# पोस्टरवर 'PINK' मोठ्या अक्षरांत (Capital Letters) आहे.
# 'PINK' मधल्या 'I' आणि 'K' च्या समोर हाताच्या दोन मुठी दिसून येतात. कुणी तरी बंदिस्त असल्याचं त्यातून दिसतं आणि बंड करून उठत आहे, असंही.
सिनेमाचं हे नाव व त्याचं हे डिझाईन विचारपूर्वक बनवलेलं आहे नक्कीच.

२. पूर्वार्ध काही जणांना लांबलेला वाटला. पण मला तर तो खूपच आवडला. पहिल्या प्रसंगापासून सिनेमा कहाणीला हात घालतो, हे खूप आवडलं. जी घटना घडली आहे, त्या घटनेचा पडसाद (aftermath) ह्या भागात दिसून येतो. मात्र घडलेल्या घटनेबाबतच तपशील अजिबात दाखवला जात नाही. महत्वाचं हे की, हा तपशील दाखवला न गेल्याने काहीच बिघडत नाही. कारण सर्व मुख्य व्यक्तिरेखा (अपवाद - बच्चन) इतक्या व्यवस्थित मांडल्या जातात की त्यावरुन 'काय घडलं असावं' ह्याचा साधारण अंदाज आपल्याला येतोच आणि संदर्भासाठी तो पुरे असतो. ह्या भागातलं बच्चनचं तोंडातल्या तोंडात बोलणं मात्र फारच वैताग आणणारं वाटलं. त्याच्या बोलण्याला त्या व्यक्तिरेखेची जराशी बिघडलेली मानसिक स्थिती कारणीभूत आहे, हे पुढे समजून येतं. मात्र ती तशी असण्याची कहाणीला काही एक गरज नसताना, ही जबरदस्तीची जुळवाजुळव कशासाठी ? तर बच्चनच्या व्यक्तिरेखेला एक वलय मिळावं म्हणून ? तसं असेल, तर हा डाव उलटलाच आहे.

३. नाट्यमय, कल्पक, वेगवान व संयतपणे हाताळलेल्या पूर्वार्धानंतर मात्र गाडी घसरतेच. मुलींनी समाजात कसं वागावं ह्याबाबतचं एक मॅन्युअल बच्चन कोर्ट रूममध्ये मांडतो. वेगवेगळ्या प्रसंगांत एक एक करून तो ह्यातले मुद्दे मांडतो आणि ते सगळं उपरोधिकपणे. हा सगळा भाग खरं तर त्याच्या 'क्लोजिंग स्पीच'मध्ये यायला हवा होता. पण 'क्लोजिंग'च्या प्रसंगाच्या अगदी आधीच त्याची आजारी पत्नी (की मैत्रीण?) मृत्यू पावते. त्याच्या 'क्लोजिंग स्पीच'मध्ये 'No means NO' वाला खूप मस्त भाग आहे. त्याच्या जोडीला हे मॅन्युअल असतं, तर विजोड वाटलं असतंच आणि लांबलचकही झालं असतं. एका धक्कादायी घटनेनंतर त्याचं भलंमोठं स्पीच विचित्रही वाटलं असतं, म्हणून ते असं तुकड्या तुकड्यांत पूर्ण केसभर घेतलं असावं कदाचित. पण असं आणि इतकं अवांतर बोलणंसुद्धा कोर्टातल्या वातावरणाला शोभलं नाहीच. एकूणच कोर्ट रूम ड्रामा जरासा अजून कंट्रोल करायला हवा होता. तो 'तारीख पे तारीख' पर्यंत गेला नाही, हेच नशीब. कारण पियुष मिश्राचा वकील तापसीला प्रश्न विचारत असताना एका प्रसंगात इतका आक्रस्ताळा आणि आवेशात येतो की हा दुसराच कुठला सिनेमा मध्येच लागला की काय, असंच वाटतं. त्यानंतर बच्चनही एका प्रसंगात आरोपीला प्रश्न करताना असाच भरकटत जातो. सुरुवातीच्या संयत हाताळणीनंतर कोर्टातला हा सगळा रंजित भाग मला तरी खटकलाच.

३. बऱ्याच काळानंतर बच्चनचं काम कृत्रिम वाटलं. ८० च्या आसपासचे त्याचे अनेक सिनेमे, खासकरून त्यांतले विनोदी प्रसंग बघवत नाहीत. पण अधिक 'ठहराव'वाल्या भूमिकांत तो नेहमीच आवडत आला आहे. पहिल्यांदाच 'ठहराव'वाल्या व्यक्तिरेखेत तो कृत्रिम वाटला, हे विशेष. बऱ्याचदा आपण लोक सिनेमाच्या विषयाला पाहून अपाल्म मत बनवत असतो. उदा. - 'प्रकाश बाबा आमटे' चित्रपट. लोकांना आवडला त्याचं कारण त्यातल्या व्यक्तिरेखा. पण सिनेमा म्हणून त्यावर विचार केला का ? तसंच इथेही होतं जरासं. बच्चनची व्यक्तिरेखा स्त्रीत्वाच्या समर्थनार्थ ठाम उभी राहिलेली आहे, त्यामुळे ती आवडते. भिडते. पण पडद्यावर 'सहगल' न दिसता सतत 'बच्चन'च दिसत राहतो, त्याचं काय ?

४. बच्चनच्या इमेजपुढे सिनेमातल्या तीन अभिनेत्र्या झाकोळल्या गेल्या आहेत. खरं तर 'तापसी पन्नू'च मुख्य भूमिकेत आहे आणि तिचं काम खूपच जबरदस्त झालेलं आहे. तिच्या जोडीला इतर दोघी - कीर्ती कुल्हारी आणि अ‍ॅण्ड्रिआ तरिआंग - ह्यांनीसुद्धा तोडीस तोड काम केलं आहे. मात्र त्यांना पुरेशी दाद दिली जात नाहीय. स्त्रीत्वाचा पुरस्कार करणारा विषय आहे इथेही पुरुषप्रधानता अशी डोकावते. हे विधान कुणाला अतिरंजित वाटेल, पण खरं आहे, ह्या विषयी मला स्वत:ला तरी अजिबात संशय नाही. टेलिव्हिजनवरील एका कार्यक्रमात ('झलक दिखला जा' बहुतेक) तापसी आणि बच्चन आले होते, 'पिंक'च्या प्रमोशनसाठी. संपूर्ण कार्यक्रमात तापसीला फक्त एकदा बोलायला मिळालं. बाकी अख्खा एपिसोड बच्चन, बच्चन आणि बच्चनच होतं.आपल्याला काय मेसेज द्यायचा आहे आणि आपण तो कसा द्यायला हवा, ह्याचं भान ह्या इतक्या मोठमोठ्या लोकांना का असू नये ? खरोखर एखादा खमक्या असता, तर त्याने स्वत:हून म्हटलं असतं की 'चित्रपट माझा नाही, ह्या मुलींचा आहे, स्त्रीत्वाचा आहे. तापसीला बोलू द्या.' पण स्वत:ला ओवाळून घेण्याची संधी सोडवता सोडवत नाही बहुतेक. चित्रपटाच्या सगळ्याच प्रसिद्धीत हेच सूत्र दिसून येतं. युएसपी बच्चनच आहे. पोस्टरवर बच्चनचा चेहरा मोठा दिसतो, बाकीच्यांचा लहान किंवा नाहीच ! ज्या लोकांनी सिनेमाच्या नावावर व त्याच्या लेटरिंग/ डिझायनिंगवर विचार केला, त्यांना पब्लिसिटीसाठी असं स्टारलाचार व्हायला लागणं पटलं नाही.

५. मुख्य घटना संपूर्ण चित्रपटात दाखवलीच जात नाही. हे खूप आवडलं, असं म्हणत असतानाच अखेरीस श्रेयनामावलीसोबत सगळी घटना दाखवली जाते. ह्याची गरज काय होती ? ह्यामुळे तर सगळं कथन एकदम बाळबोध होऊन गेलं, असंही वाटलं.

६. एकंदरीत सिनेमा आवडला का ? - हो.
टीव्हीवर लागल्यावर मी पुन्हा पाहीन का ? - अर्थातच हो.
पण जितका उदो उदो चित्रपटाचा होतो आहे, तितकाही काही भारी मला वाटला नाही. पूर्वार्ध खरोखरच दमदार आहे. पण नंतर त्यावर बोळा फिरतो. बंगाली दिग्दर्शक 'अनिरुद्ध रॉय चौधरी' चा हा पहिलाच हिंदी चित्रपट (बहुतेक). पूर्वार्ध अप्रतिम आणि उत्तरार्ध कमजोर असं असलं, तरी हे काम त्यांच्या पुढील चित्रपटांबद्दल औत्सुक्य वाटेल, असं नक्कीच आहे. सुरुवातीला जो ताण त्यांनी कहाणीत आणला आहे, तो केवळ अनुभवावा असाच आहे. टिपिकल भडकपणा दाखवून वास्तवदर्शनाचा सोयीस्कर मुखवटा त्यांना ओढता आला असता, मात्र तसं न करता, त्याहीपेक्षा परिणामकारक मार्ग ते निवडतात आणि अस्वस्थ करतात. त्यासाठी मनापासून दाद !

एकदा तरी पाहावाच असा 'पिंक' आहेच. फक्त तो पाहताना बच्चनसाठी पाहण्यापेक्षा त्या तीन मुलींसाठी पाहायला हवा. त्यांतही तापसी पन्नूसाठी.
सरतेशेवटी तन्वीर ग़ाज़ी ह्यांनी लिहिलेली आणि सध्या प्रचंड गाजत असलेली 'पिंक' कविता -

तू खुद की खोज में निकल, तू किस लिये हताश है ?
तू चल तेरे वजूद की समय को भी  तलाश है !

जो तुझसे लिपटी बेड़ियाँ समझ न इन को वस्त्र तू
यह बेड़ियाँ पिघाल के बना ले इन को शस्त्र तू

चरित्र जब पवित्र है तो क्यूँ है यह दशा तेरी
यह पापियों को हक़ नहीं की ले परीक्षा तेरी

जला के भस्म कर उसे जो क्रूरता का जाल है
तू आरती की लौ नहीं तू क्रोध की मशाल है

चूनर उड़ा के ध्वज बना गगन भी कपकपाऐगा
अगर तेरी चुनर गिरी तो एक भूकंप आएगा

ही कविता बच्चनच्या दमदार आवाजात ऐकताना अंगावर काटा येतो !
बहौत बढ़िया !!

- रणजित पराडकर

No comments:

Post a Comment

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...