Saturday, December 16, 2017

जगाला तू हवा आहेस बहुधा (तरही)

तरही - जगाला तू हवा आहेस बहुधा 
(ओळीसाठी श्री. भूषण कटककर 'बेफिकीर' ह्यांचे आभार)

गझलचा पाचवा आहेस बहुधा
जगाला तू हवा आहेस बहुधा

तुझा आवाजही संतृप्त करतो
यमन वा मारवा आहेस बहुधा

कशासाठी तुला त्यांनी निवडले ?
लुटारू, पण नवा आहेस बहुधा

जवळ येताच तू येतो शहारा
उन्हाळी गारवा आहेस बहुधा

तुझ्याहुन सर्व तेजस्वीच असती
चमकता काजवा आहेस बहुधा

कधी येणार तू नाहीस नक्की
उद्याचा तेरवा आहेस बहुधा

तुझ्या नशिबात बदनामीच दिसते
मराठा पेशवा आहेस बहुधा

....रसप....
१६ डिसेंबर २०१७

Monday, November 20, 2017

सत्यकाम - एक निखारा (Movie Review - Satyakam)

आजचं जग, आजचा काळ खूप वेगवान आहे. इंटरनेटमुळे माध्यमं सहज उपलब्ध आहेत. व्यक्त होणंही अतिशय सोपं झालेलं आहे. आज खूप सहजपणे आपणच आपली एखादी विचारधारा ठरवून मोकळे होतो. 'मी अमुक-एक-वादी आहे', असं फार लौकर मानतच नाही, तर तसा काळात नकळत प्रचारही करत सुटतो. पण कुठल्याही प्रकारचा 'वाद', म्हणजेच तत्वज्ञान, विचारपद्धती स्वीकारणं, अंगिकारणं म्हणजे 'पूर्ण सत्या'चा पुरस्कार, अंगिकार करण्यासारखं असतं. मात्र आपण मात्र नेहमीच सोयीस्कर सत्य स्वीकारत असतो. कारण पूर्ण सत्य हे 'अॅब्सोल्यूट अल्कोहोल'सारखं असतं. पचवायला कठीण किंवा अशक्य तर सोडाच, गिळायलाच असह्य. कुठलाही 'इझम'ही असाच. मग तो जात, धर्म, भाषा, प्रांत विषयक असो की लिंगविषयक. जितकं आपल्याला सोयीचं असतं, तितकंच आपण पाळत असतो. जर एखाद्याने फक्त पूर्ण सत्यच स्वीकारायचं ठरवलं, तर ते किती कठीण आहे, हे लक्षात येण्यासाठी 'सत्यकाम' पाहावा. १९६९ साली आलेला 'सत्यकाम' म्हणजे हृषीकेश मुखर्जींचा एक मास्टरपीस. हा सिनेमा 'सत्यप्रिय आचार्य' (धर्मेंद्र) ह्या तरुण इंजिनियरची कहाणी सांगतो. स्वातंत्र्याचे पडघम वाजत असतानाच्या दिवसांत शिक्षण संपवून बाहेर पडलेल्या, एका नवीन देशाला घडवण्याची प्रचंड मोठी जबाबदारी खांद्यावर असलेल्या पिढीचा 'सत्यप्रिय', त्याच्या पिढीच्या इतर मुलांसारखा कधीच नसतो. त्याचं पालनपोषण त्याच्या आजोबांनी - सत्यशरण आचार्य (अशोक कुमार) ह्यांनी - केलेलं असतं. लहानपणापासून त्याला नावाप्रमाणेच 'सत्यप्रिय' घडवलेलं असतं. हे संपूर्ण घराणंच सत्यशोधाच्या कार्यास वाहिलेलं असतं, म्हणूनच त्यांच्यापैकी सर्वांची नावं 'सत्य' पासूनच सुरु होत असतात. इंजिनियर झालेल्या 'सत्यप्रिय'ला त्याची पहिली नोकरी मुंबईच्या एका कंपनीत मिळते आणि पहिल्याच दिवशी त्याला कामानिमित्त 'भवानीगढ'ला पाठवण्यात येतं. 'भवानीगढ' हे भारतातल्या शेकडो संस्थानांपैकी एक. स्वतंत्र भारताच्या नवोदयाच्या वेळी संस्थानं खालसा होऊन अस्त पावत होती. अश्या एका नाजूक काळात, एका संशयास्पद मोहिमेसाठी 'भवानीगढ'ला आलेला सत्यप्रिय तिथल्या राजाच्या शोषणातून 'रंजना' (शर्मिला टागोर) ला मुक्त करून सोबत घेऊन येतो. एका वेश्येची मुलगी, जिला राजापासून एक मूलही होणार असतं, तिला तो स्वीकारतो. आपल्या घरी ह्याचा स्वीकार होणार नाही, हे माहित असतानाही तो काहीही लपवत नाही आणि घराशी संबंधही तुटतात.
इथून पुढे सुरु होतो एका संघर्षमय आयुष्याचा अविश्रांत प्रवास. ह्या प्रवासात 'सत्यप्रिय'सोबत त्याची पत्नी आणि मुलाचीही परवड होते. हे सगळं कथानक आपण 'नरेन शर्मा' (संजीव कुमार) ह्या 'सत्यप्रिय'च्या जिवलग मित्राकडूनच ऐकत असतो. एकाच वेळी इंजिनियर झालेले हे दोघे मित्र आपापल्या 'जुळवून घेण्या/ न घेण्याच्या' क्षमते व इच्छेमुळे अर्थातच परस्परविरुद्ध आयुष्य जगत असतात. 'सत्यप्रिय'ची स्वत:च्या तत्वनिष्ठतेपायी होणारी फरफट नरेन पाहत असतो, जाणत असतो. पण कुठल्याही परिस्थितीत स्वत:च्या सत्यनिष्ठतेशी आणि तत्वनिष्ठतेशी जराशीसुद्धा तडजोड न करू शकणारा सत्यप्रिय आपला हट्ट सोडणाऱ्यांतलाही नसतो. 
सततच्या संघर्ष, अस्थैर्य आणि ताणतणावामुळे 'सत्यप्रिय'ची आर्थिक आणि शारीरिक अवस्था दिवसेंदिवस बिकट होत जाते. 
त्याचा हा संघर्ष, त्याची तत्वनिष्ठता त्याला कुठेपर्यंत नेतात ? ह्या सगळ्या त्याच्या प्रवासात त्याची पत्नी आणि मुलाची भूमिका कशी असते ? त्याचे आजोबा आणि मित्र नरेन त्याला कशी साथ देतात ? ठिकठिकाणच्या नोकऱ्या करताना त्याने नाराज केलेले अनेक लोक कोण असतात ? नरेनशिवाय कुणीच त्याला समजून घेत नाही का ? अशी अनेक उत्तरं इथे देता येऊ शकतील. ती देण्या किंवा न देण्यामागे काही कारणही नाही. पण सिनेमाची शिकवण ह्या सगळ्यापेक्षा वेगळी आहे. 
'सच्चाई एक अंगारे की तरह हैं, जिसे हाथ पर रखो और हाथ न जले ऐसा नहीं हो सकता' हे म्हणणारा 'सत्यप्रिय' हेच सांगत असतो की, सत्य नग्न, उष्ण, धारदार वगैरे असतं. त्यावर घट्ट पकड ठेवण्यासाठी प्रचंड वेदना, यातना सहन कराव्या लागतात. 


'नारायण सन्याल' ह्यांचं हे कथानक आहे, तर 'साजेन्द्र सिंग बेदी' ह्यांचे संवाद. खूप सहजपणे खूप मोठं तत्वज्ञान हे दोघे आपल्यासमोर मांडतात. ह्यातले संवाद टाळ्या घेणारे नाहीत, दाद घेणारे आहेत. ही कहाणी बॉक्स ऑफिसवर गल्ला भरणारीही नाही, पण डोळे भरून आणणारी आहे. हृषिदांच्या सिनेमांची ही एक खासियतही आहेच की कळसाध्याय गाठताना काळीज पिळवटलं जातं. 'आनंद' असो वा 'बावर्ची', शेवटी रडवतोच. 'सत्यकाम' त्याला अपवाद नाहीच. स्वत: हृषिदांचा आवडता असलेला हा सिनेमा धर्मेंद्रकडून त्याच्या आयुष्यातलं सर्वोत्कृष्ट काम करवून घेतो. 'धर्मेंद्रला अभिनय येत नाही' अश्या सर्वमान्य समजाला स्वत: धर्मेंद्र ह्या सिनेमात उभा छेद देतो. 'शर्मिला टागोर' व्यावसायिक पातळीवर जरी खूप नावाजली असली, तरी एक अभिनेत्री म्हणून माझ्या मते जरा दुर्लक्षित राहिली आहे. अनेक सिनेमांतून तिने स्वत:ची कुवत दाखवून दिली आहे. 'रंजना'ची ओढाताण, घुसमट तिने जबरदस्त सादर केली आहे. 'संजीव कुमार' तर सर्वोत्कृष्ट भारतीय अभिनेत्यांपैकी एक असावा. सहाय्यक असला, तरी छाप सोडतोच. अशोक कुमारची दाढी आणि केस अंमळ विनोदी वाटत असले, तरी he carries them with grace. शेवटच्या एका प्रसंगात हा माणूस स्वत:ची महानता सिद्ध करतो. लक्ष्मी-प्यारेंचं संगीत आणि पार्श्वसंगीत अर्थातच सुमधुर आहे. गाणी फारशी गाजली नाहीत, सिनेमाही व्यावसायिक पातळीवर अपयशीच होता. 
सुरुवातीचा बराचसा भाग जरा अनावश्यक आणि रेंगाळलेला आहे. पण त्या काळातल्या सिनेमांचा विचार करता ते साहजिकही आहेच. 'बिमल रॉय' स्कूलमधून हृषिदा पुढे आले आहेत. स्वत: बिमलदांचे मास्टरपीसही धीमे आणि पसरट होतेच. मात्र हा अनावश्यक व रेंगाळलेला भागही अगदीच निरर्थकही नाहीय. 

'सत्यकाम' एक असा सिनेमा आहे, जो प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी पाहायलाच हवा. दुनियेत फक्त चांगलं आणि वाईट अश्या दोनच गोष्टी नसतात. आयुष्य हे काही कुठलं नाणं नाहीय ज्याचा एक तर छापाच पडेल किंवा काटाच. त्याला अनेक बाजू आहेत पैलू आहेत. काळा आणि पांढरा ह्या दोघांच्या दरम्यान अगणित रंगछटा असतात. पूर्ण सत्य, सत्य, सोयीस्कर सत्य, सोयीस्कर खोटं, खोटं आणि पूर्ण खोटं अश्याही अनेक पायऱ्या असू शकतात. आपण ह्यांपैकी कुठल्या पायरीवर आहोत, आपला रंग कोणता आहे हे एखादा सिनेमा चुटकीसरशी आपल्याला जाणवून देणार नाहीच. मात्र त्याचा शोध घेण्यासाठी प्रवृत्त करायला असा एखादा सिनेमा निमित्त ठरू शकतो.

सत्यास शोधले होते, सत्यास मांडलेसुद्धा
पण सत्य नग्न असते हे आवडणे बाकी आहे


- रणजित पराडकर 

Friday, November 17, 2017

अतर्क्य, अचाट तरीही सपाट जन्म (Movie Review - Baapjanma)

( टीप - सिनेमा प्रदर्शित होऊन जवळजवळ दीड महिना उलटून गेला आहे. त्यामुळे प्रस्तुत लेखात कथानक उलगडताना हात आखडता घेतलेला नाहीय. )

पन्नास षटकांचा क्रिकेट सामना. निर्जीव खेळपट्टी. बोथट गोलंदाजी. पाच फलंदाज प्रत्येकी पन्नास धावा करतात आणि तेसुद्धा दर षटकाला बरोब्बर पाच एकेरी धावा धावून. संपूर्ण पन्नास षटकांत एकसुद्धा चौकार किंवा षटकार नाही. इतकंच काय, चेंडू जोरात किंवा उंचावरून फटकावण्याचाही प्रयत्न नाही. सगळं कसं 'ऑल अलाँग द ग्राऊण्ड', कॉपी-बुक शॉट्स, प्लेईंग इन द 'व्ही' वगैरे. जणू काही हा क्रिकेट सामना नसून नेट प्रॅक्टीसच चालली असावी.
कोण खेळतं असं ? सुनील गावस्करनी एकदा पूर्ण साठ षटकं खेळपट्टीवर उभं राहून छत्तीस धावा केल्या होत्या. But, gone are those days now.
पण मराठी चित्रपटांना मात्र असा सपाट खेळ करायची आवडच जडलेली दिसतेय सध्या. सिनेमाभर काहीही विशेष न घडणाऱ्या कथानकांचे सिनेमे बनवायचं एक 'फॅड'च आलंय बहुतेक. असं सपाट काही तरी बनवलं की ते कलात्मक वगैरे मानलं जात असावं. जितकं जास्त सपाट, तितकं जास्त कलात्मक !


'बापजन्म' ह्या सपाटपणाच्या मोजपट्टीवर साधारणपणे मध्याच्या थोडंसं पुढे वगैरे असावा. 'रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसिस विंग' अर्थात 'रॉ'साठी आयुष्यभर यशस्वीपणे काम करून निवृत्त झालेला एक सीक्रेट एजंट 'भास्कर पंडित' (सचिन खेडेकर) पत्नीच्या निधनानंतर पुण्यात एकटाच राहतो आहे. आयुष्यभर जाणीवपूर्वक कमीत कमी भावनिक ओढ ठेवल्याने मुलांशी संबंध संपुष्टातच आल्यात जमा. आपल्याला कॅन्सर असून फार तर वर्षभराचं आयुष्यच आता हाती उरलं आहे, हे समजल्यावर त्याच्या मनात कालवाकालव सुरु होते. मुलांना भेटायची ओढ लागते. पण मुलांशी संबंध इतके वाईट असतात की त्याने नुसतं बोलावल्याने ती येणार नाहीत, ह्याचीही खात्री असते.
प्रश्न - अश्या वेळी तो काय करतो ?
उत्तर - आचरटपणा.
प्रश्न - कसा ?
उत्तर - स्वत:च्या मृत्यूचं नाटक रचतो. जेणेकरून मुलं नक्की येतील.
प्रश्न - मग ती येतात आणि सारं काही सुरळीत होतं का ?
उत्तर - येतात की ! पण तरीही तो त्यांना सोडून एकta राहायला दूर अज्ञातवासात निघून जातो !
प्रश्न - म्हणजे त्यांच्यासाठी मेलेलाच राहतो ?
उत्तर - मुलाला सगळं सांगतो, मुलीला नाही सांगत !
प्रश्न - अरे मग हेच आधी का नाही करत ? किंवा जर निघूनच जायचं होतं तर इतकी नौटंकी का करतो ? केलीच आहे तर थांबत का नाही ? मुलाला सांगतो, तसं मुलीलाही का सांगत नाही ?
उत्तर - आवरा !!

एका अस्सल अचाट आणि अतर्क्य कथानकात भरपूर पाणी घालून एक अत्यंत पांचट सिनेमा कसा बनवावा, त्याचा हा परिपाठ !
मुलं नाराज आहेत, त्यांना एकदा पाहायचंय वगैरे कुठल्याही कारणाने कुणी स्वत:च्या मृत्यूचं नाटक का रचेल ? मी देशाच्या सेवेत इतकी वर्षं अमुक अमुक करत होतो, हे सांगितल्यावर ती मुलं समजून घेणार नाहीत का ? मुलगा घेतोच की ! बरं, नसतीलच जर घेणार आणि समजून घेतल्यावरही सारं काही सोडून निघून जाणंच फायनल असेल तर मग ही जबरदस्तीची सगळी जुळवाजुळव कशासाठी ?
मग हा सगळा भावनिक मूर्खपणा जस्टीफाय करण्यासाठी भास्कर पंडितला कॅन्सर वगैरे झाला असल्याचं एक ठिगळ जोडणं. घरात कॅमेरे लावून सगळ्यांना पाहू, त्यांनी घरी यावं म्हणून मेल्याचं नाटक करू असल्या आयडिया डोक्यात येण्यासाठी शेजारच्या 'आपटे' काकांच्या पात्राचं अजून एक ठिगळ !
मेलेल्या व्यक्तीच्या पायाला हात लावल्यावर 'शरीर थंड का लागत नाहीय?' असा प्राथमिक प्रश्नही कुणाला पडत नाही.
आईच्या बाजूला निजलेल्या दीड-दोन वर्षांच्या लहान बाळाला आजोबा उचलून घेऊन जातो. त्याआधी ते लहान बाळ चुळबूळ करतं, आवाजही करतं. काही तास ते बाळ तिथे नसतं, त्या काळात आई कूसही बदलते. पण तिला अजिबात जाणवतही नाही की आपलं बाळ आपल्या जवळ नाहीय ! अशी कुठली आई असते ?
हे असे साधे प्रश्न कुणाला पडूही नयेत, ह्याचं वैषम्य वाटतं.
त्याहून वैषम्य ह्याचं वाटतं की अश्या आचरट सिनेमावर अनेक लोक स्तुतीसुमनांचा वर्षाव करत आहेत. का बरं ? मराठी आहे म्हणून ? ह्या फडतूस अस्मितांमधून बाहेर पडून एखाद्या कलाकृतीचा 'एक कलाकृती' म्हणून आपण कधी आस्वाद घेणार ?

टीचभर कथेवर रचलेली सुमार पटकथा असली तरी सचिन खेडेकर, शर्वरी लोहकरे आणि सत्यजित पटवर्धन ह्या
तिघा मुख्य कलाकारांची कामं अप्रतिम वाटली. पण पुष्कराज चिरपुटकरचा नोकर 'माउली' प्रचंड कंटाळवाणा आहे. गाणी श्रवणीय आहेत आणि पार्श्वसंगीतही आवडलं.

माझ्यासारखे अनेक सिनेरसिक मराठी सिनेमाकडे एक 'प्रायोगिक सिनेमा' म्हणून पाहतात. मात्र गेल्या काही काळापासून हे 'काहीही न घडणाऱ्या' सिनेमांचं जे पीक आलं आहे, त्यामुळे ही प्रायोगिकता नकोशी वाटायला लागेल, अशी भीतीही वाटते आहे. मराठी सिनेमा तमाश्याच्या फडातून बाहेर पडला, त्यानंतर थिल्लर विनोद करत बसला आणि आता ह्या सपाटपणात रमला आहे, असं वाटतंय. जर सिनेमा प्रेक्षकांना गुंतवणार, आकर्षित करणार नसेल तर प्रेक्षकाने त्याला टाळल्याचीही त्याला तक्रार नसावी.


रेटिंग - * *

- रणजित पराडकर 

Tuesday, October 03, 2017

एक परफेक्ट नॉनसेन्स ! - जुडवा - २ (Movie Review - Judwaa 2)

व्हॉट्सअ‍ॅपवर एक मेसेज आला होता - 'Sins are like Credit Card. Enjoy now, pay later!'
एन्जॉय करून झालं आहे, आता पे-बॅक करतो !


पहिला जुडवा खूप पूर्वी पाहिला होता. इतका फरगेटेबल की, तो एकसलग पाहिला होता की तुकड्या-तुकड्यांत तेही आठवत नाहीय आता ! त्यावेळी तर सलमान जामच सुमार होता, त्यामुळे असह्यही होता. पुन्हा कधी तो पाहायची हिंमत करावीशीच वाटली नव्हती. (सलमान आता पुन्हा सुमार झाला आहे. 'सुमार -> अतिसुमार -> बरा -> सहनीय -> सुमार' असा ग्राफ असलेला हा एकमेव 'अ‍ॅक्टर(?)' असावा बहुतेक !)
रिमेकसुद्धा पाहिला नसताच पण, स्त्री-हट्टापुढे कुणाचे काय चालणार ? मॅडमनी हुकुम सोडला आणि मी गपगुमान तिच्यासोबत गेलो. खरं तर तिने हट्टाने पाहायला लावलेल्या काही सिनेमांच्या आठवणी भयाण आहेत. उदा. - जब तक हैं जान, हॅप्पी न्यू इयर, तीस मार खान, दिलवाले, वगैरे. अर्थात, चेन्नई एक्स्प्रेस, फॅन, रईस अश्या शाहरुखपटांनी जरासा बॅलन्सही केला होता. पण तरी भयाण आठवणी स्वत:चा भयाणपणा कधी कमी होऊ देत नसतातच. त्यामुळे मनात धाकधूक घेऊनच गेलो 'जुडवा-२' ला.
ह्या धाकधुकीचं दुसरं कारण म्हणजे धवनपुत्र ! 'वरुण धवन' हा वरून, खालून, डावी-उजवीकडून सगळीकडूनच सल्लूइतका उल्लू नसला, तरी ती दोन गरीबांमधली भाग्यवान तुलनाच आहे. 'बदलापूर'मध्ये तो मला आवडला होता. अगदी, 'ढिशुम'मध्येही आवडला होता. पण तसा तर सल्लूसुद्धा 'दबंग' आणि 'वॉण्टेड' मध्ये आवडला आहेच.
असो.

तर 'जुडवा-२' पाहिला आणि चक्क आवडलाही !
फार ताणला आहे आणि शेवटाकडे अगदीच रिडीक्युलसोत्तम वगैरे लेव्हल गाठली आहे, पण तरी ओव्हरऑल मजा आलीच ! अनेक वेळा खळखळून हसलो.. अनेक वेळा गडगडाटीसुद्धा हसलो ! जुन्या 'जुडवा'मधल्या सल्लूच्या टुकार आठवणी वरुणने पुसून टाकल्या आहेत. अर्थात, सिनेमा संपल्यावर सल्लू पडद्यावर डोकावून जातोच आणि मजबूत पीळतोच. पण ते 'सिनेमा संपल्यावर' असल्यामुळे तेव्हढा भाग आपण नाही पाहिला तरी चालतंय.

सिनेमाचं कथानक सर्वांना माहित असावंच. त्यामुळे त्यावर रेंगाळत बसत नाहीय. डायरेक्ट काय आवडलं, काय नाही, ह्यावरच येतो.

'जॅकलिन फर्नांडीस' ही मला पूर्वी अजिबात आवडायची नाही. (Yes ! I am sorry for this !) पण आता हळूहळू आपुन का उस पे दिल आ रैलाय. जामच खट्याळ सौंदर्य आहे हे ! तिचा स्क्रीन प्रेझेन्स चिल्ड बियरच्या पहिल्या घोटासारखा असतो. अतिशय बोलका चेहरा, जबरदस्त आत्मविश्वास, दिलखेचक अदा आणि डवरलेल्या मोगऱ्याचं सौंदर्य असं डेडली कॉम्बिनेशन असलेली ही गुलबदन नशिल्या नजरेने सटासट बाण सोडून घायाळ करते !
ऑन द अदर हॅण्ड, 'तापसी पन्नू' म्हणजे उकडलेल्या भाज्यांच्या सलाडसारखी अळणी, बेचव वाटते. तिने बेबी, नाम शबाना, पिंक सारखे सिनेमेच करावेत. रोमॅण्टिक वगैरे रोल्समध्ये तिचा खप्पड मरतुकडेपणा फारच खटकतो. जोडीला जॅकलिन असल्यामुळे तर ती जास्तच मिसफिट वाटते.
राजपाल यादवने शक्ती कपूरची इरिटेटिंग उणीव भरून काढली आहे. प्रचंड बोअर करतो !
खेडेकर, खेर, झाकीर हुसेन वगैरे मंडळी मस्तच, पण सपोर्ट कास्टमध्ये भाव खाललाय तो लंडनमधला पोलीस ऑफिसरच्या भूमिकेतल्या 'पवन मल्होत्रा'ने !

'म्युझिक' नावाचा भिकार प्रयत्न चांगला जमून आलाय. कारण ते उच्चतम भिकार बनलं आहे. पण आत्तापर्यंत आपण सुमार संगीताला सहन करण्याची दुर्दैवी सवय करून घेतलेली आहे, त्यामुळे ह्या भिकारपणाबद्दल काही वाईट वाटत नाही.

'डेव्हिड धवन' हे एक अजब रसायन आहे. पंचवीस वर्षं झाली, हा माणूस प्रेक्षकांची नस पकडून आहे. प्रेक्षक बदलतो, तसा हा पुन्हा नव्याने नस पकडतो आहे. वीस वर्षांपूर्वीच्या 'जुडवा'ला पुन्हा घेऊन येताना त्याने योग्य तो मसाला वाढवला आहे आणि नको तो कमीही केला आहे. बिनडोक सिनेमा बनवावा, तर तो डेव्हिड धवनने. बाकी कुणाचं काम नाही ते. कारण प्रत्येक जण, स्वत:च्याच नकळत असेल पण, कुठे न कुठे तरी जरासा सेन्सिबल वगैरे होतो आणि मग सगळं मिसमॅच होतं. 'अथ:'पासून 'इति'पर्यंत 'नॉट-टू-मेक-सेन्स' हे सूत्र जपणं, नक्कीच सोपं नसावं. जाणीवपूर्वक आउटराईट नॉनसेन्स करण्यासाठी प्रचंड बुद्धिमत्ता लागते, हे निश्चितच.
इथेच भन्साळीसारखे लोक कमी पडतात. कारण त्यांच्या स्वत:च्या नकळत 'नॉनसेन्स' बनत असतो आणि डेव्हिड धवनसारखे लोक विचारपूर्वक 'नॉनसेन्स' बनवतात. हाच परफेक्शनचा फरक असावा. 'जुडवा' हा एक परफेक्ट नॉनसेन्स आहे. ह्या कहाणीची मुळं 'जॅकी चॅन' च्या 'ट्विन ड्रॅगोन' नामक सिनेमापर्यंत जातात असं म्हणतात. जातही असतील, अपने को क्या ! तूर्तास तरी 'मॅडम'चा हट्ट पुरवण्यापूर्वी जी धाकधूक मनात होती, तिच्या जागी 'रिफ्रेश' झाल्याचं फिलिंग आलं आहे. कारण आपल्या रटाळ रुटीनमधून बाहेर पडण्यासाठी कधी कधी एखादा आउटराईट नॉनसेन्स असलेला मूव्ही रामबाण उपाय ठरत असतो !

रेटिंग - * * *

- रणजित पराडकर

Thursday, August 31, 2017

कभी हाँ, कभी ना - १

सुनील संध्याकाळी घरी परततो आणि बघतो.. घरच्यांनी सुनीलच्या जबरदस्त मार्क्स मिळवून पास होण्याच्या आनंदात मस्तपैकी पार्टी ठेवलेली असते.
गोव्यातल्या त्या छोट्याश्या शहरात, जिथे सगळेच एकमेकांना ओळखत असतात, आजपर्यंत सुनीलला सगळे कुचकामी समजत असतात. पण आज सुनीलचे वडील अभिमानाने त्या सगळ्यांना सांगत असतात की, 'नाही.. माझा मुलगा कुचकामी नाही! त्याने आज त्याच्या बापाला जिंकलंय.. आजपासून मी त्याला माझ्या गॅरेजमध्ये काम करण्याची जबरदस्ती करणार नाही.. त्याला 'म्युझिक'मध्ये काही करायची इच्छा आहे.. तो तेच करेल. माझा पूर्ण पाठिंबा आणि आशिर्वाद आहे त्याला..!'
उपस्थित सगळे लोक टाळ्यांच्या कडकडाटात सुनीलला शुभेच्छा देतात. अभिष्टचिंतन करतात. तिथे त्याचे मित्रही असतात, 'अ‍ॅना'ही असते, तिचे आई-वडील व भाऊसुद्धा आणि फादर ब्रीगेन्झादेखिल.

सुनीलचं मन त्याला खायला उठतं. खरं तर तो लागोपाठ चौथ्यांदा नापास झालेला असतो आणि घरच्यांना त्याने नकली मार्क्सशीट दाखवून फसवलेलं असतं !
'हे मी काय करून बसलो ! सगळ्यांचा माझ्यावर किती विश्वास, किती प्रेम आहे.. आणि मी? खोटी मार्क्सशीट बनवून ह्या सगळ्यांना फसवतोय..!'
स्वतःची शरम वाटत असते त्याला..
'पटेल.' 'चायना टाऊन'चा मालक. त्यानेच त्याला ही आयडिया दिलेली असते आणि बनावट मार्क्सशीटही बनवून आणून दिलेली असते. तो त्यालाच पकडतो.
'काय झालं यार हे, पटेल?'
'सुनील, मला पण वाटलं नव्हतं की इतकं मोठं प्रकरण होईल. पण आता तू खरं सांगितलंस तर काय होईल? कठीण आहे. कोण मदत करू शकेल आता ?'
फादर ब्रीगेन्झा..!! सुनीलवर खूप माया करणारे फादर. ते दिसतात सुनीलला. तो लगेच त्यांना बाजूला नेऊन सगळं खरं खरं सांगून टाकतो. फादर हादरतात ! चिडतातही..!
'अरे हे काय केलंस सुनील! तुझ्या आई-बापाच्या चेहर्‍यावर बघ कसा आनंद ओसंडून वाहतोय. त्यांना खरी गोष्ट कळेल, तेव्हा त्यांना काय वाटेल? काही तरी विचार करायचा होतास रे.. ते काही नाही.. आत्ताच्या आत्ता तू तुझ्या आई-बापाशी बोलायचंयस, त्यांना खरं खरं सांगायचंस.. हात जोडून, पाया पडून, काय जमेल ते करून क्षमा मागायचीस.. बस्स्स, हे सगळं कांड तू केलं आहेस, तुलाच ते निस्तरावंही लागेल.. चल जा.. सांग विनायकला - तुझ्या वडिलांना - आत्ताच्या आत्ता.. !'

सुनील जातो. आई-बापाला सांगतो.
एकीकडे पार्टी चालू आहे. सगळे हसतायत, खिदळतायत. दुसरीकडे पटेलच्या चेहर्‍यावर टेन्शन.. फादर ब्रीगेन्झा चिंताक्रांत.. आणि इतक्यात सुनीलच्या वडिलांचा - विनायकचा - आवाज चढतो ! ते त्याच्या एक मुस्कटात ठेवून देतात  आणि धक्के मारून दूर ढकलून देतात..
'चल निघ इथून..!! पुन्हा पाऊल ठेवू नकोस ह्या घरात.. चालता हो......!!'

पब्लिक सुन्न..
हात जोडून विनायक सांगतो -
'मित्रांनो, माझ्या ह्या मुलाने मला फसवलं. बनावट मार्क्सशीट दाखवली. तो फर्स्ट क्लास मिळवून पास झालेला नाही.. हा नालायक तर पुन्हा एकदा नापास झालाय.. मी मघाशी मोठ्ठं अभिमानाचं भाषण दिलं होतं, ते सगळं खोटंय.. हा माझा मुलगा आहे, ह्याची मला लाज वाटते.. लाज..! तुम्ही लोक इथे आलात मी तुमचे आभार मानतो..... पण मला माफ करा..!'
कुणाला काय करावं, काही सुचेनासंच होतं !
मटकन् खाली बसून टीपं गाळणार्‍या विनायककडे फादर जातात.. त्याच्या पाठीवर हात ठेवून म्हणतात - 'विनायक, सुनील फेल नाही, पास झालाय.. इतक्या सगळ्या लोकांसमोर आपली चूक कबूल करायला खूप मोठी हिंमत लागते. ह्यावरून हेच दिसून येतं की ह्याचं मन किती स्वच्छ आहे ! अरे, जगात असे अनेक लोक असतात ज्यांना उद्याचा विचार करणं पटत नाही.  त्यांच्यासाठी आयुष्याचा प्रवासच जास्त महत्वाचा असतो. प्रत्येक क्षण त्यांना सोहळा करायचा असतो. सुनील त्यांच्यातला आहे. त्याला असं परीक्षांच्या निकालावर पास-फेल करू नकोस.. असं बिनधास्त आयुष्य जगायसाठी जबरदस्त मानसिक बळ लागतं. अरे तो 'स्पेशल' आहे.... तो मनाने स्वच्छ आहे, त्याला क्षमा कर.. बघ, माझं म्हणणं तुला पटतंय ना ? पटत असलं तर लगेच बोल की तू त्याला क्षमा केली आहेस..'
सुनीलची आई, अ‍ॅनाचे वडिल, पटेल सगळे विनायकच्या आजूबाजूला.. त्याला 'फादरचं ऐक' असं नजरेतून सांगत आहेत.
विनायक मूक.. शांत.

सुनील आपली सॅक उचलून घराबाहेर जाऊ लागतो.......
आणि गाणं सुरू..................

'वोह तो हैं अलबेला, हजारों में अकेला
सदा तुमने ऐब देखा, हुनर को न देखा....'

मजरूह सुल्तानपुरींचे सुंदर शब्द, जतीन-ललितचं अप्रतिम संगीत आणि हृदयाच्या गाभ्यातून येणारा सानूचा गोड आवाज..........
सगळे उपस्थित लोक एकेक ओळ गाऊन विनायकचं मन वळवतात..

'बन्सी को लकडी सदा समझा किये तुम
पर उसके नग़्मों की धुन कहाँ सुन सके तुम..'

आणि मग स्वत: विनायकही म्हणतो, 'वोह तो हैं अलबेला..!!'
तो सुनीलला जवळ घेतो, मिठी मारतो आणि सगळं पब्लिक पुन्हा एकदा टाळ्यांचा कडकडाट करतं.. प्रत्येक वेळेस तिथे दोन-तीन टाळ्या मीसुद्धा वाजवतो. गलबलून आल्यावर काही गोष्टी नकळत घडून जातात.


'कभी हाँ, कभी ना' मध्ये असे अजूनही काही गलबलून आणणारे क्षण आहेत. ही कहाणी एका 'नोबडी'ची आहे. शाहरुखने लोकांच्या मनात घर करण्याचं एक कारण त्याचे हे सुरुवातीचे काही सिनेमे आहेत. ज्यात तो अगदी तुमच्या-माझ्यासारखा वाटला होता. तो आपलं रिप्रेझेंटेशन बनला होता. इथला त्याचा 'सुनील' एकदम 'परफेक्ट'! त्याचं हुरळून जाणं, निराश होणं, इतकंच काय.. 'अ‍ॅना'चं 'ख्रिस'वर आणि 'ख्रिस'चं अ‍ॅनावर प्रेम असणं, ह्यामुळे त्याचा होणारा जळफळाट हे सगळं त्याला एक 'कॉमन मॅन' च बनवतं. खरं तर इथली सगळीच कॅरेक्टर्स अशीच 'जमिनीवरची' आहेत. खऱ्याखुऱ्या आयुष्याशी नातं सांगणाऱ्या लोकांनी विणलेलं हे कथानक फक्त एक विरंगुळा देत नाही, तर आपल्यातल्या अस्तित्वहीन सामान्य माणसालाही काही कहाणी असते, ही सुखावह भावना चाळवतं.


'कुंदन शाह'च्या 'जाने भी दो यारों' ने 'ब्लॅक कॉमेडी' मध्ये स्वत:चं एक वेगळं स्थान बनवलेलं आहे. पण माझ्या मते 'जाने भी दो यारों' पेक्षाही कैक पटींनी सरस काम 'कभी हाँ, कभी ना' आहे. ह्यात काही मेसेज वगैरे नाहीय, तो असायलाच का हवा ? पण एक-एक पैलू काळजीपूर्वक पाडलेला आहे. सुरुवातीला वर्णन केलेला गाणं आणि त्याच्या आधीचा पूर्ण प्रसंग हे एक उदाहरण. प्रत्येक गाणं असंच खूप विचारपूर्वक चित्रित केलं आहे. 'आना मेरे प्यार को ना तुम..' आपल्याला गुदगुल्या करतं, 'ऐ काश के हम..' आपल्याला झुलवत झुलवत नाचवतं, तर 'दीवाना दिल दीवाना..' गायलाच लावतं. गाण्यांच्या उत्कृष्ट चित्रीकरणासाठी हा सिनेमा एक परिपाठच ठरावा.

'कभी हाँ, कभी ना' सारखे सिनेमे शाहरुखला 'शाहरुख'बनवून गेले आहेत. आज त्याचा राग येतो कारण त्याच्या 'सुनील', 'राजू' वर आम्ही जीवापाड प्रेम केलं आहे आणि करतोही. जो चेहरा कधी आम्हाला 'आमचा' वाटायचा तो आता वाटेनासा झाला आहे, हे खरं दु:ख आहे, हा खरा राग आहे.
हरकत नाही.
आयुष्यभर एकच एक काम कुणी कलाकार करत नाही, करूही नयेच. त्यानेही स्वत:ची इमेज बदलली, टिकवली आता ती पुन्हा बदलायची वेळ आली आहे. मला तो पुन्हा एकदा आपला वाटून घ्यायची इच्छा होते आहे. त्यासाठी त्याने परत बदलावं. सुनील, राजू नको, इतर काही बनावं. त्यात मला 'मी' दिसावा, तो मला 'माझा' वाटावा. कारण तोसुद्धा 'अलबेला' आहेच, नि:संशय !

- रणजित पराडकर

(क्रमश:)

Monday, August 07, 2017

सॉरी मेट सेजल (Movie Review - Jab Harry Met Sejal)

अतिशय हुशार माणसातही एखादा मठ्ठपणा असतो. कितीही विचारी, परिपक्व मनुष्य असला तरी त्याच्या आत कुठे तरी एका लहान मुलाचं पोरकटपण दडलेलं असतं. स्थितप्रज्ञ म्हणवल्या जाणाऱ्या व्यक्तीमध्येसुद्धा लपवून ठेवलेला थिल्लरपणा असतो. आणि शहाण्यातल्या शहाण्यातही एक वेडेपणाचं अंग असतंच असतं. ह्या सगळ्यांना ती-ती व्यक्ती कधी न कधी वाट करून देत असते. गुपचूप, खाजगीत, बंद दरवाज्याच्या आड किंवा मुखवटा ओढून वगैरे. हे मठ्ठपणा, पोरकटपणा, थिल्लरपणा आणि सोबतीला वेडेपणा फार क्वचितच एकत्र येतात. पण जेव्हा एकत्र येतात तेव्हा हुशार, परिपक्व, स्थितप्रज्ञ, शहाणा वगैरे बिरुदं मिरवणाऱ्या माणसाचा तद्दन बिनडोक, बावळट आणि मूर्खपणा असा काही समोर येतो की सगळी ओळख पुसून जाईल की काय असंच वाटावं ! इम्तियाझ अलीचा मो., पो., थि. आणि वे.पणा एकत्र आल्यावर त्याने ठरवलं की अमुक एका स्क्रिप्टवर काम करायला हवं. चुकलेल्या वाटेवर वर्षानुवर्षं मनापासून भरकटत चाललेला शाहरुख खान त्याला ह्यासाठी जोडीदार म्हणून लाभला. आणि ह्या ढवळ्या-पवळ्याच्या सोबतीला 'प्रीतम' नावाचा टवळासुद्धा आला ! ह्या अभूतपूर्व संगमाच्या पवित्र ठिकाणाचं अप्रतिम सुंदर असं नावसुद्धा अस्सल ओरिजिनालिटी मिरवेल असं ठरवलं गेलं - 'जब हॅरी मेट सेजल'.

नाव, ट्रेलर, म्युझिक आणि लोकांकडून मिळालेले अभिप्राय, ह्या सगळ्यानंतर खरं तर सिनेमा पाहायलाच नको होता. पण पाहिला. कारण पहिल्या तिन्ही बाबींना फक्त आणि फक्त इम्तियाझ अलीसाठी दुर्लक्षित करून रिलीजच्या तीन दिवस आधीच बुकिंग्स सुरु झाल्या झाल्या तिकिटं काढून ठेवली होती. अक्कलखाती जमा झालेल्या गडगंज संपत्तीत अजून काही शे रुपयांची भर टाकली आणि मनावर सलमान खान ठेवून सिनेमा पाहायला गेलो.


पर्यटकांच्या एका समूहाला सफर घडवणाऱ्या 'हॅरी' (शाहरुख खान) पासून सिनेमाची सुरुवात होते. पहिल्या एका मिनिटात अशक्य पांचट प्रकारात मोडणारे ३-४ बकवास विनोद-प्रयत्न पुढे येणाऱ्या फुटकळपणाची नांदी ठरतात. आधी डोक्यावर आपटून परिणाम झालेली आणि टप्पा पडून नंतर तोंडावर आपटल्याने चपटी झाल्यासारखी दिसणारी 'सेजल' (अनुष्का शर्मा) ह्या टूअर गाईड 'हॅरी'ला हाताशी धरून आपली हरवलेली एंगेजमेंट रिंग शोधण्यासाठी मुंबईला परत जाणारं विमान आणि आपलं संपूर्ण कुटुंब सोडून मागे थांबते. 'हॅरी'ची इच्छा नसताना, तो मुलींच्या बाबतीत 'कॅरेक्टर-ढिला' आहे हे समजल्यावरसुद्धा तिला तोच सोबतीला हवा असतो. नंतर हे दोघं अ‍ॅमस्टरडॅम, बुडापेस्ट, बर्लिन, लिस्बन वगैरे अनेक शहरांत एक अंगठी शोधत फिरतात. हॉटेलांतल्या टेबलांखाली, सोफ्यांत, हिरवळीत, रस्त्यांवर, पेव्हर ब्लॉक्समध्ये अश्या रॅण्डम जागांवर वाकून, झोपून, खरवडून वगैरे बघतात. ह्या दरम्यान रात्र झाल्यावर अर्धे कपडे घालून रेड लाईट क्लब्समध्ये बागडायची हुक्की सेजलला येत असते. ह्या अर्ध्या कपड्यांत ती सेक्सी दिसते आहे, असं तिला आणि दिग्दर्शकालाच केवळ वाटतं.
मूर्खपणाच्या सगळ्यात वरच्या पायरीपर्यंत चढून लिहिलेले बाष्कळ प्रसंग अंगठीशोधमोहीम आणि हॅरी-सेजल प्रेमप्रकरण दोन्हीला व पर्यायाने संपूर्ण सिनेमालाच असह्य रटाळ व कंटाळवाणेपणाच्या सर्वोच्च उंचीवर नेऊन प्रेक्षकाचा कडेलोट करतात. ही कडेलोट करेपर्यंतची मिरवणुक कानठळ्या बसवणाऱ्या भुरट्या संगीतावर नाचत नाचत काढली जाते.

माझं एक मत होतं की सिनेमात गाण्यांचा अत्यंत चतुरपणे कसा वापर करावा ह्याचा इम्तियाझ अली हा एक वस्तुपाठ आहे. आग लागली त्या वस्तुपाठाला ! 'एसीची हवा लागून कुणाला झोप वगैरे लागली, तर खाडकन कानाखाली आवाज काढावा' ह्या एकमेव हेतूने ही गाणी बनवलेली आहेत. मेलोडीच्या गळ्यात धोंडा बांधून तिला कल्लोळाच्या डोहात ढकलून दिल्यानंतरच 'प्रीतम'ने चाली बनवल्या आहेत. त्यांवर इर्शाद कमिलचे शब्द स्वत:चे हातपाय तोडून घेतात. कुठलंही गाणं कथानकाला खारीएव्हढाही हातभार लावत नाही. अर्थात, कथानकच मुंगीएव्हढं असल्याने इतका मोठा हातभार लावण्यासारखा वाटा तरी कुठून मिळणार, नाही का !

गेल्या काही सिनेमांतून वेगळ्या अपेक्षा निर्माण करणारा शाहरुख पुन्हा एकदा त्याच माकडचाळ्यांत नव्याने रमलेला पाहून अगदी मनापासून वाईट वाटलं. रईस, गौरव-आर्यन आणि जहांगीर खान अश्या ठोस व्यक्तिरेखा साकारल्यानंतर 'हॅरी'सारखा पिचकवणी रोल शाहरुखला करावासा वाटतो, ही खरोखर दु:खाची गोष्ट आहे. तो कुठेही कमी पडत नाही, नक्कीच. पण कमी पडलं जाऊ शकेल, असं आव्हानात्मक काही नव्हतंच तर !
अनुष्का शर्माबाबतही तसंच. त्यात तिला गुजराथी ढब काही नीटशी जमलेलीही नाही. त्याची गरजही काय होती, कुणास ठाऊक !

शाहरुख आणि अनुष्काबाबत माझी सध्याची मतं जरी सकारात्मक असली, तरी मी फक्त इम्तियाझ अलीसाठी तिकीट काढलं होतं. कधी तरी कुणी तरी त्याला विचारायला हवं, Et tu, Brute ? 'कॉफी विथ करण' च्या एका भागात रोहित शेट्टी, कबीर खान आणि इम्तियाझची एकत्र मुलाखत होती. पडद्यावर असणाऱ्या चौघा दिग्दर्शकांमध्ये इम्तियाझ एलियनच वाटत होता. त्याची उत्तरं, त्याचे विचार खूपच भिन्न होते. आता मला कळत नाहीय की इम्तियाझचं नाव लावून 'जब हॅरी मेट सेजल' दुसऱ्याच कुणी बनवला आहे की तो मुलाखतीत दिसलेला इम्तियाझ खोटारडा होता ? सवडीनुसार आपली बोलायची ढब सर्रास बदलणारी सेजल त्याने सहनच कशी केली ? 'तू तिकडून चालत ये.. मला कॉफी प्यायला ने' वगैरे भंकस प्रसंग, असंबद्ध गाणी हे सगळं त्याला पचलंच कसं ? एखाद्या टीव्ही सिरीयलसारखी ढिसाळ, पसरट पटकथा त्याने लिहिलीच कशी ? असे सगळे प्रश्न मलाच निरुत्तर करत आहेत. राम गोपाल वर्मा आणि मधुर भांडारकरप्रमाणे इम्तियाझ अलीसुद्धा एक 'स्पेंट फोर्स' होतो की काय, अशी भीती वाटतेय.

'जब तक हैं जान' आणि 'जब हॅरी मेट सेजल' हे शाहरुखच्या तमाम सुमारपटांमध्ये आघाडीवर समजायला हवे. 'जतहैंजा'च्या वेळेस तरी शाहरूखची बऱ्यापैकी हवा होती. पण आता परिस्थिती बदलली आहे. सुंदर सुंदर लोकेशन्स पाहायला मिळतील म्हणून तिकिटं काढेल इतका प्रेक्षक बिनडोक राहिलेला नाही आणि हळूहळू का होईना त्याची स्टारशरणताही कमी कमी होत चालली आहे. रविवार असूनही नाईट शोसाठी थिएटर जेमतेम १५-२०% भरलेलं होतं आणि त्यातही १०-१२ लोक अर्ध्यातून उठून गेले. एखाद्या आठवड्यातच 'जहॅमेसे'ला गाशा गुंडाळावा लागला, तर मला आश्चर्यही वाटणार नाही आणि वाईटही.

रेटिंग - *

- रणजित पराडकर

Saturday, July 29, 2017

कंटाळवाणी फसवणूक - इंदू सरकार (Movie Review - Indu Sarkar)

नुकताच 'डंकर्क' बघितला. दुसरे महायुद्ध आणि त्याच्याशी संबंधित पात्रं व घटना ह्यांच्यावर आधारित कित्येक परदेशी सिनेमे बनत असतात. अगदी कृष्ण-धवल कालापासून ते आत्ताच्या अत्यंत प्रगत तंत्रज्ञानाच्या काळापर्यंत ह्या एका विषयाने अनेक लोकांना प्रेरित केलं आहे. राहून राहून मला नेहमी वाटायचं की फाळणी, १९७५ साली लादली गेलेली आणीबाणी, ईशान्येकडील राज्यांचे प्रश्न, भारताचं श्रीलंकेमधलं ऑपरेशन पवन, चीन आणि पाकिस्तानसोबत झालेली अनेक युद्धं व कित्येक लहान-मोठ्या मोहिमा, इंदिरा गांधींची हत्या, राजीव गांधींची हत्या, बाबरी मशीद, गोधरा वगैरे महत्वाच्या शेकडो स्वातंत्र्योत्तर घटनांना हिंदी सिनेमा कधी सशक्त परिपक्वतेने हाताळणार ? ह्या अनेक घटनांपैकी काहींना हात घालायचे काही बरे-वाईट प्रयत्न झाले आहेत. पण पुरेसं नाहीच. त्यातही १९७५ साली लादलेली आणीबाणी तर एक प्रकारचा 'टॅबू' च !
त्यामुळे 'इंदू सरकार' विषयी ऐकल्याबरोबर उत्सुकता वाटत होती. आणीबाणीविषयीचा सिनेमा फक्त आजच्या काळातच बनू शकतो. उद्या सरकार बदललं, तर हा विषय पुन्हा एकदा दाबून ठेवला जाणार. त्यामुळे सिनेमाचं उत्तम टायमिंगसुद्धा दाद घेऊन गेलं.

पण बहुतेक अपेक्षांच्या फुग्यात आपण जितका जीव फुंकावा तेव्हढा त्याचा धमाका मोठा होत असावा !
एका स्फोटक, जोरदार, वेगवान, थरारक आणि हादरवणाऱ्या सिनेमाच्या अपेक्षेने मी गेलो आणि एक मिळमिळीत, रटाळ, विस्कळीत, मरतुकडा आणि कंटाळवणारा सिनेमा पाहून आलो.

सगळ्यात मोठा आणि घोर अपेक्षाभंग म्हणजे 'इंदू सरकार' ह्या नावाशी इंदिरा गांधींचा काही एक संबंध नाही ! 'सरकार' हे त्या व्यक्तिरेखेचं आडनाव आहे, त्याचा अर्थ 'गव्हर्न्मेंट, शासन' वगैरे नाही. अर्थात, हे मला आधीच समजलेलं होतं. तरी, कुठे तरी काही तरी रिलेट होईल असं वाटलं होतं. इंदिरा गांधींनी लादलेली आणीबाणी आणि त्याचे परिणाम भोगणारे काही लोक, अशी ही कहाणी आहेच. तेव्हढा सूचक संबंध आहे. पण 'इंदिरा गांधी' ही व्यक्तिरेखा (सुप्रिया विनोद) केवळ काही सेकंदांपुरती पडद्यावर झळकते, त्यातही एक शब्दही बोलत नाही. फक्त दिसते. त्याव्यतिरिक्त संपूर्ण सिनेमात १-२ वेळा संजय गांधींचं प्रतिनिधित्व करणाऱ्या 'चीफ'च्या (नील नितीन मुकेश) 'मम्मी' म्हणून उल्लेख होतो. बस्स् !

ही कहाणी मुख्यत्वेकरून आहे 'इंदू सरकार' (कीर्ती कुल्हारी) ची. इंदू एका अनाथालयात वाढलेली असते. एक उच्चपदस्थ सरकारी अधिकारी 'नवीन सरकार' (तोता रॉय चौधरी) तिचा पत्नी म्हणून स्वीकार करतो. आणीबाणीच्या काळात एक उच्चपदस्थ अधिकारी म्हणून 'नवीन'ची जबाबदारीतून आलेली निष्ठा आणि इंदूला अनुभवातून झालेली माणुसकीची जाणीव ह्यांचा संघर्ष आणि मग त्यांचा स्वतंत्रपणे विरुद्ध मार्गांवर प्रवास हा ह्या कथानकाचा गाभा.आणीबाणीच्या काळात विविध कारवायांच्या वरवंट्याखाली भरडल्या गेलेल्या जनतेचे हाल अत्यंत फिल्मी उथळपणे दाखवले आहेत, हा अजून एक अपेक्षाभंग. व्यथित मनांचा आणि शोषित जनांचा आकांत दाखवताना 'आक्रोश' दाखवणं आवश्यक नसतं, हे आपण का समजू शकत नाही कुणास ठाऊक ! आरडाओरडा, पळापळ, गोंधळ, कल्लोळ वगैरे अंदाधुंदी दाखवली म्हणजे ते अंगावर येतच असतं असं नक्कीच नाही. योग्य सूर वाजण्यासाठी योग्य तार छेडली जायला हवी. त्यासाठी संयम आणि ठहराव हवा, तो कधी अंगी बाणणार आहे ? पोलीस कमिशनर मिश्रा (झाकीर हुसेन) प्रसंगी भडक आणि प्रसंगी फिल्मी का असायला हवा होता ? त्याचं निर्दयीपण फक्त त्याच्या कृतींतून दिसलं असतंच की !

'चार आने की मुर्गी को बारा आने का मसाला' हे सूत्रही आपण कधी टाळणार आहोत ? आणीबाणीच्या काळातला एका स्त्रीचा संघर्ष दाखवण्यासाठी ती अनाथ असणं, तिने तोतरं असणं का आवश्यक आहे ? तिचा तोतरेपणा तर एक सपशेल मूर्खपणे जोडलेलं अनावश्यक ठिगळच आहे. ह्या असल्या फालतू पसाऱ्यामुळे मुख्य विषयापासून भरकटायला तर होतंच आणि अनावश्यक लांबी वाढते ते वेगळंच ! जेव्हा इंदू कोर्टात सरकारी वकिलाला 'जनता भी 'इनफ' कह रही हैं' असं म्हणते, तेव्हा आपणही मधुर भांडारकरला मनातल्या मनात 'इनफ' म्हणतो.

'फॅशन' नंतर आलेल्या एकेका फिल्मनिशी मधुर भांडारकरचा आलेख उतरत चालला आहे. रामू आणि भांडारकर ह्यांच्यातला हा एक दुर्दैवी समान दुवा आहे. एखाद्या दमदार विषयावर सिनेमा बनवून तो विषय वाया घालवण्याचं कर्तृत्व गेल्या काही महिन्यांत बेगम जान, मोहेंजोदडो, सरबजीत, मेरी कोम अश्या काही सिनेमांनी गाजवलं होतं. 'इंदू सरकार' ह्या सगळ्यांचा शिरोमणी आहे. उल्लेखलेले सर्व सिनेमे 'सुसह्य' ते 'चांगला' ह्या पट्ट्यात होते. 'इंदू सरकार' मात्र ह्या पट्ट्याच्या बाहेर नकारात्मक बाजूला असावा.
निर्बुद्ध पटकथा आणि दिग्दर्शकाची पकडही बऱ्यापैकी ढिली पडलेली असतानाही प्रमुख कलाकारांची कामं मात्र चांगली झाली आहेत, हा एक दिलासा ! कीर्ती कुल्हारीने 'पिंक'मध्ये जबरदस्त परफॉर्मन्स दिला होता. 'इंदू'च्या व्यक्तिरेखेचं अडखळत बोलणं अनावश्यक असल्यामुळे कंटाळा जरी आणत असलं, तरी कीर्तीचा प्रयत्न कुठेच कमी पडलेला नाही. तोता रॉय चौधरीसुद्धा छाप सोडतो. एक रुथलेस सरकारी प्रशासक आणि कधी समंजस तर कधी वर्चस्व गाजवणारा पती, असे त्याच्या व्यक्तिरेखेचे कोन आहेत, जे त्याने उत्तम प्रकारे सादर केले. अनुपम खेर, शिबा चढ्ढा, अंकुर विकल सहाय्यक भूमिका चोखपणे करतात.
'नील नितीन मुकेश' मात्र जबरदस्त प्रभाव सोडतो. त्याचा गेटअपही उत्तम जमून आला आहे. लेखकाचं बॅकिंग न मिळाल्यामुळे त्याचा 'चीफ' हा अक्षरश: वाया गेला आहे. सिनेमातील एकमेव दृश्य नकारात्मकता म्हणजे 'चीफ' आहे. तो पुरेसा व्यक्त न झाल्यामुळे सिनेमातला संघर्ष पुरेसा वाटत नाही.

हे वर्ष अनु मलिकसाठी नक्कीच चांगलं ठरत आहे.
गाण्यांना फारसा वाव नसला, तरी 'यह पल..' आणि 'यह आवाज हैं..' ही गाणी खूप सुंदर जमली आहेत. 'यह आवाज हैं..' त्याच्या ओळखीच्या चालीमुळे मनात रुंजी घालत राहतं. ज्यांनी अजीझ नाझानच्या ओरिजिनल 'चढता सूरज..' पारायणं केलीयत, त्यांना मात्र त्याचं नावं वर्जन अंमळ सपकच वाटेल. तरी, एकंदरीत संगीत आणि पार्श्वसंगीतही एक दिलास्याचाच भाग आहे.

सरतेशेवटी एक शे'र आठवतो आहे.

किस से उम्मीद करें कोई इलाज-ए-दिल की
चारागर भी तो बहुत दर्द का मारा निकला
-  लुत्फ़-उर-रहमान

मधुर भांडारकर, अगदी गेल्या काही सिनेमांतल्या सुमारपणानंतरही, एक दमदार नाव आहे आजच्या जमान्यातलं. पण त्याच्या सिनेमांमुळे पुन्हा पुन्हा होणाऱ्या अपेक्षाभंगानंतर आव्हानात्मक किंवा 'टॅबू' बनलेले विषय आपल्याकडे हाताळणार कोण ? असा प्रश्नच पडतो आहे.

रेटिंग - * *

- रणजित पराडकर

Tuesday, July 18, 2017

जग्गा जासूस आणि 'पण..'! (Jagga Jasoos - Hindi Movie)


खरं तर, 'जग्गा जासूस' पाहून ३-४ दिवस झाले. नक्की काय लिहावं, हा विचारच संपत नव्हता. किंवा माझं नक्की मत काय आहे, सिनेमा किती आवडला, किती नाही, हे ठरवताना माझाच गोंधळ उडत होता बहुतेक. Let's see.
मुळात, मी सिनेमा फक्त एका आणि एकाच कारणासाठी पाहिला होता.
'रणबीर कपूर'.
कुणी काहीही म्हणा, आपल्याला हा माणूस भारी आवडतो. Acting Skills, Looks, Screen Presence, Dancing Skills अश्या सगळ्याचं इतकं उत्तम मिश्रण सध्या तरी इतर कुणातच मला दिसत नाही. तसं म्हणायला, 'शाहीद कपूर'सुद्धा एक जबरदस्त पॅकेज आहे. म्हणून हे दोघे माझे सगळ्यात आवडते अ‍ॅक्टर्स किंवा स्टार्स - काय हवं ते म्हणा - आहेत.
तर, रणबीरचं काम अप्रतिम झालं आहे. बराचसा 'बर्फी'सारखा रोल आहे. त्याने तो त्याच ताकदीने केलाय. त्यामुळे मी ज्यासाठी सिनेमा पाहिला, ते मला नक्कीच मिळालं.
पण, रणबीरला कंसाच्या बाहेर काढलं तर कंसाच्या आत काय उरतं?

'जग्गा जासूस' हा अख्खा सिनेमा यमकायमकी आणि गाण्यांतून उलगडत जातो. This is really something different. सिनेमातून गाणी, संगीत पूर्णपणे हद्दपार करण्यात कलात्मकता मानणाऱ्या दिग्दर्शकांचा हा जमाना आहे. ह्या प्रवाहाच्या विरुद्ध कुणी एखादी संगीतिका बनवणं, हे एक खरोखर धाडसाचं काम आहे. ह्या धाडसाला मनापासून दाद द्यायला हवीच. दिलीच.
पण 'धाडस करायचं' म्हणून कुणी हत्तीला चड्डी घालत असतं का ?
आणि घालायचीच असेल तर काही तरी प्लानिंग तर करा, राव !
I mean, संगीतिका बनवायची होती ? उत्तम आयडिया ! पण त्यासाठी 'प्रीतम'च सापडतो ? फुकट काम करतो का तो ?
बरं, ठीक आहे, हरकत नाही. घेतला प्रीतम. पण मग त्याच्याकडून काम तरी करून घ्याल की नाही ? प्रेक्षकाच्या डोक्यावर तब्बल पावणे तीन तास बादल्या-बादल्या भरून म्युझिक ओतायचा प्लान आहे तुमचा. भिजला पाहिजे की थिजला पाहिजे ? की बधीर झाला पाहिजे ?
बेसिकली, स्वत:च्या एकसुऱ्या शैलीतून बाहेर पडून एकाच सिनेमासाठी २०-२२ गाणी देण्याची कुवत, तेव्हढा वेळ, पेशन्स आज कुणाकडे आहे, हा प्रश्न तरी तुम्हाला पडला का ?
आणि संगीतकाराकडून काम काढून घेईल असा चोखंदळ डायरेक्टर तरी कोण आहे आज ? एका गाण्यासाठी १०-१०, १२-१२ चाली नाकारणाऱ्या राज कपूरसारखा कुणी तरी आहे का सध्या ?

ही झाली नाण्याची एक बाजू. दुसरी बाजू, म्हणजे समजा जमवलंच एखाद्याने. खरोखर 'सुश्राव्य' म्हणता येईल असं म्युझिक कुणी दिलंच, तर ?
देणारा देईलही, पण....
ऐकणाऱ्या लोकांसाठी आत्ताच्या काळात 'म्युझिक' म्हणजे 'नॉईस' असं एक समीकरण झालं आहे. त्यात दणदणीत 'बीट्स' असले पाहिजेत. गाणारा/री तार सप्तकात उधळले पाहिजेत. गाणं ऐकताना लोकांचं हृदय तोंडात आलं पाहिजे आणि दोन कान सर्वांगाला व्यापून उरले पाहिजेत.
लोकांना 'खाना खा के दारू पी के चले गये' मध्ये 'बीट्स' आवडणार आहेत, 'गलती से मिस्टेक' मध्ये एनर्जी दिसणार आहे. हे सगळं गाणी बनवणाऱ्यालाही माहित आहेच ! त्यामुळे लोकांना जे आवडतं, तेच 'जग्गा जासूस' मध्ये दिलंय. पण लोकांना जे आवडतं, त्यालाच आता काही दर्जा राहिलेला नाही, तर जे दिलंय ते न आवडल्यास त्यात आश्चर्य काय ?

फार जुनी नावं नकोच. जरा नवीन-नवीनच घेऊ. म्हणजे नदीम-श्रवण, जतीन-ललित, आनंद-मिलिंद वगैरे. ह्यांचा काळ म्हणजे 'नॉस्टॅल्जिक नाईन्टीज'. अर्थात, तोसुद्धा फार काही सांगीतिक श्रीमंतीचा वगैरे नव्हता. पण तरी, तेव्हासुद्धा खूप मेलडी बेस्ड गाणी बनायची. 'साजन'सारख्या अस्सल व्यावसायिक टुकारपटाचं टायटलसुद्धा प्रचंड 'ठहराव'वालं कंपोजिशन होतं. आज सिनेमाचं टायटल किंवा मुख्य गाणं कोण असं बनवेल ? आणि बनवलं, तरी 'रटाळ' ठेक्यातला तो 'रडीयल'पणा कुणाला पचणार आहे ?
शाहरुखचे सिनेमे नेहमीच म्युझिकली श्रीमंत असायचे. पण अलीकडच्या काळात त्याला 'लुंगी डान्स' करताना पाहून आणि नंतर 'हॅप्पी न्यु इयर' वगैरेतल्या भंकस गाण्यांसोबत पाहून मी मनातल्या मनात सिनेसंगीताच्या फोटोला हार घातला होता. संपलं होतं ते माझ्यासाठी.

कडवट सत्य हे आहे की, चांगलं संगीत बनवायची नियत, कुवत आणि हिंमत आजच्या जमान्यातल्या कुठल्याही संगीतकारात किंवा दिग्दर्शक-निर्मात्यात नाहीय आणि चांगलं संगीत स्वीकारायची आवड, जाण आणि किंमत आजच्या प्रेक्षकालाही नाहीय !
'जग्गा जासूस' ने कंटाळा आणला नाही, त्याच्यातल्या 'उणे ड' दर्ज्याच्या सुमार संगीताने वात आणला.
एरव्ही मला रणबीरही आवडला, कतरिनाही जितकी जास्तीत जास्त आवडू शकते तितकी आवडली आणि प्रेझेन्टेशनही आवडलंच. व्हीएफएक्स मेजर गंडले असले, तरी बाकी सगळं टेक्निकली चांगलं वाटलं होतं.

पण म्युझिक ! तुमसे ना हो पायेगा !

हिंदी सिनेमात इथून पुढे बायोपिक, स्पोर्ट्सड्रामा, डॉक्यु-ड्रामा, थ्रिलर, कॉमेडी, सस्पेन्स, हॉरर, नॉयर-फॉयर काय म्हणाल ते सगळं काही बनेल एक वेळ, पण उत्तम 'म्युझिकल' ? तो मात्र कधीही बनू शकणार नाही. सिनेमाच्या शेवटी 'सीक्वल'चा संकेत दिला आहे. तोसुद्धा 'म्युझिकल'च असणार असेल तर अजून एक 'डिबॅकल' नक्कीच. कारण आपल्याकडे आता 'म्युझिकल' बनूच शकत नाही.
किसी माय के लाल में वोह दम नहीं रहा.

टॉपिक इज ओव्हर.

- रणजित पराडकर

Monday, July 10, 2017

शब्दाचे शब्दासोबत नातेच जाणवत नाही

शब्दाचे शब्दासोबत नातेच जाणवत नाही
हृदयाचे स्पंदन आता गाण्यातुन वाजत नाही

डोहामध्ये उतरावे, अर्थाचा तळ शोधावा
एखाद्या शिखरासाठी गगनाचा आशय द्यावा
प्रतिभेला काय हवे ते लिहिताना समजत नाही
....... शब्दाचे शब्दासोबत नातेच जाणवत नाही

मेघांच्या गडगडण्याचा धरतो न कुणीही ठेका
खळखळता सूर प्रवाही झाला केव्हाचा परका
मी बरेच ऐकुनदेखिल काहीही ऐकत नाही
....... शब्दाचे शब्दासोबत नातेच जाणवत नाही

हे शब्दठोकळे सगळे एका साच्यातुन आले
कल्लोळ रोजचे ह्यांचे आता सवयीचे झाले
मी कंटाळतही नाही अन् मी वैतागत नाही
....... शब्दाचे शब्दासोबत नातेच जाणवत नाही

....रसप....
३० जून २०१७

Saturday, July 08, 2017

मॉम - श्रीदेवीचा ओव्हरडोस (Movie Review - Mom)

'आई' हा प्रत्येकासाठीच एक हळवा कोपरा असतो. इतका हळवा की केवळ आईसाठी लिहिलेल्या आहेत म्हणून 'आई म्हणजे एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं' असल्या यमकायमकीसुद्धा खूप भारी वाटत असतात किंवा केवळ आईविषयी आहे म्हणून अनेक सिनेमातली बाष्कळ गाणी आणि सपक संवादही टाळ्या घेऊन जातात. उदा. - 'कुछ कुछ होता हैं' मध्ये आईविना असलेल्या लहान मुलीला शाळेत 'आई'वर बोलायला सांगितल्यावर बाबा शाहरुखने केलेली ओव्हर अ‍ॅक्टिंग.
हा हळवा कोपरा हेरून असेल किंवा नकळतही असेल, पण श्रीदेवीसारख्या सामान्य वकुबाच्या अभिनेत्रीने तिच्या करियरच्या सेकंड इनिंगची सुरुवात करताना पहिल्या सिनेमात एका आईची भूमिका केली होती. अर्थात, त्या भूमिकेला इतरही काही कंगोरे होते आणि as the say, the movie had its heart at the right place.
पण 'मॉम'......
Well, I doubt !

'मॉम' मध्ये अख्ख्या सिनेमाभर श्रीदेवी, श्रीदेवी आणि श्रीदेवीच आहे. तिचा रोल फक्त 'ऑथर बॅक्ड'च नाही तर 'ऑथर सॅक्ड' (हे असं-असं लिही, नाही तर सॅक करू, असं धमकावल्यासारखा) आहे. तुम्ही जर तिचे मनस्वी चाहते असाल, तर ठीक. अदरवाईज, हे असह्य आहे ! कारण वर्षानुवर्षं हिंदी सिनेमात काम करूनही श्रीदेवीला हेमा मालिनीप्रमाणेच अजूनही नीट हिंदी बोलता येतच नाही. 'घर' ऐवजी 'गर' वगैरे गलिच्छ उच्चार आणि जोडीला अति-अभिनयाचा डोस मिळतो !
नवाझुद्दिन सिद्दिकीसारखा सध्याच्या सिनेजगतातला 'डार्क हॉर्स' सिनेमात उगाच आहे. त्याचा बदललेला गेट-अपसुद्धा उगाच आहे. कदाचित त्या रोलमध्ये काही दम नसल्याने थोडा तरी हायलाईट व्हावा ह्यासाठीचा तो केविलवाणा प्रयत्न असावा. त्याने तो जसा आहे त्याच गेटअप मध्ये रंगवलेले पोलिस ऑफिसर्स 'कहानी' आणि 'रईस'मध्ये दाद घेऊन गेले होते. इथला त्याचा रोल एका खाजगी 'डिटेक्टिव्ह'चा आहे. ज्या एनर्जीने त्याने खान आणि मजमुदार साकारले होते, तीच एनर्जी इथेही दिसू शकली असती, पण दाखवायचीच नव्हती. सिनेमाभर फक्त श्रीदेवीला दाखवायचं होतं, म्हणून घालवला वाया !
तीच कथा अक्षय खन्नाची.
त्याचा पोलीस ऑफिसरसुद्धा एक दमदार कॅरेक्टर होऊ शकलं असतं.
नकारात्मक भूमिकेत 'अभिमन्यू सिंग' हा अजून एक तगडा अभिनेता आहे. त्याला तर समोर येऊच दिलं नाहीय !
अदनान सिद्दिकी आणि सजल अली, ह्या दोन पाकिस्तानी कलाकारांना सिनेमात घेतल्याबद्दल निर्मात्यांनी 'सैनिक फंडा'ला देणगी दिली असावीच. त्यांच्यावर इतका खर्च झाल्यावर तरी त्यांच्यात जाणवलेल्या अभिनय क्षमतेचा पूर्ण वापर करून घ्यायला हवा होता ! त्यांचे तर रोल्सही दमदार होते. पण नाही..
ह्या सगळ्या चांगल्या अभिनेत्यांना जर थोडं जरी फुटेज मिळालं, तर ते श्रीदेवीला पूर्णपणे झाकोळूनच टाकतील ह्याची पूर्ण जाणीव बोनी कपूरला असणारच.  हा सिनेमा 'श्रीदेवी'चा, 'श्रीदेवी'साठी, 'श्रीदेवी'नेच (नवऱ्याने) बनवलेला आहे, मग बाकी कुणाला वरचढ होण्याची संधीच कशी देणार ? घालवलं सगळ्यांना वाया !

बरं..
ए.आर. रहमानचं संगीत आहे. निदान ते तरी वाजवून घ्यावं ! तेही नाही ! 'ओ सोना तेरे लिये..' अगदी लक्षात राहणारं गाणं आहे. बाकी कुठेही काहीच स्कोप नाही.


मग सिनेमा आहे तरी काय ?
ट्रेलरवरून हे स्पष्ट समजून येतं की ही एका आईने घेतलेल्या सूडनाट्याची कहाणी आहे. तर श्रीदेवीच्या मुलीवर बलात्कार होतो. श्रीदेवीच्या मुलीला कायद्याने न्याय मिळत नाही. श्रीदेवी त्याचा बदला घेते.
काय ? असंच एक सूडनाट्य वर्षाच्या सुरुवातीला आपण 'काबिल'मध्ये पाहिलं होतं ? ही ! आणि त्याच्या बाष्कळपणावर बऱ्याच जणांनी भरपूर तोंडसुखही घेऊन झालं होतं. पण 'मॉम' आईविषयी आहे. बाष्कळपणात कुठेही कमी नसला, तरी काय झालं ! हं... जे काही दाखवलं आहे, तेच सगळं जर सिनेमातल्या बापाने केलं असतं, तर वेगळा विचार करता आला असता ! कारण बाप हे फक्त एक नाव असतं आणि ते कुठलंही गजबजलेलं गाव नसतं ! :D

अर्थात, काही बाबी उल्लेखनीय नक्कीच आहेत. त्या सगळ्या पूर्वार्धातच मात्र.
सामुहिक बलात्कार, हिंसा दाखवताना कुठलाही भडकपणा टाळला आहे, हे विशेष. गाडीत बलात्कार होत असताना गाडीचं नुसतं एका संथ गतीने फिरत राहताना दाखवणं, प्रचंड बोलकं आहे. सर्व जन एकानंतर एक राउंड घेत आहेत, हे त्या गाडीच्या राउंड्सवरून दाखवलं आहे. तसंच सहनशक्तीचा कडेलोट होतो आहे हे दाखवण्यासाठी पाण्याच्या फिल्टर खाली भरणारी बाटली ओव्हरफ्लो होताना दाखवणंही खूप सूचक ! पूर्वार्धात, एका शिक्षिकेचा तिच्या विद्यार्थ्यांसोबतचं नातं, मुलीसोबतचे ताणलेले संबंध अश्या सगळ्या बाबीसुद्धा खूप छान दाखवल्या आहेत. त्यासाठी दिग्दर्शक 'रवी उड्यावर'ना दाद देऊच ! खरं तर हा पूर्वार्ध, अपेक्षा खूप वाढवतो. असं वाटतं की, पुढचा भाग नेहमीचा मालमसाला नसेल. पण तसं होत नाही. सगळं काही अगदीच अपेक्षित वळणांनी जातं.

संवाद, थरार, परफॉर्मन्स, अ‍ॅक्शन, संगीत सगळ्याच बाबतींत 'अजून भरपूर काही तरी हवं होतं', ही भावना सिनेमाभर वाटत राहते. अगदीच फुसका व फसका क्लायमॅक्स तर तिला अजून तीव्र करतो.
मला स्वत:ला श्रीदेवी फारशी आवडतही नाही आणि नावडतही नाही, त्यामुळे तिचं काम फसलं तर फसेना का ! पण वाईट वाटलं नवाझुद्दीन आणि अक्षय खन्नासाठी. नवाझुद्दिनला असे फुटकळ रोल आता तरी करायला लागू नये. आज त्याची मार्केट व्हॅल्यू श्रीदेवीपेक्षा तरी किती तरी पट जास्त आहे. अक्षय खन्नाचं करियर कधी पुनरुज्जीवित होणार आहे कुणास ठाऊक ! एका चांगल्या अभिनेत्याची उमेदीची वर्षं निरर्थक सहाय्यक भूमिकांत वाया जात आहेत. होपफुली, त्यालाही हे जाणवत असावं.

अखेरीस, बऱ्यापैकी दमदार पूर्वार्ध ह्या एका जमेच्या बाजूवर श्रीदेवीचा भडक अभिनय, फुसका बार नाट्य, वाया घालवलेले इतर अनेक चांगले कलाकार, अळणी संवाद वगैरे अनेक कमजोर बाजूंना पेलता येणार असेल, तर 'मॉम' एकदा पाहू शकता !

रेटिंग - * * १/२

- रणजित पराडकर 

Wednesday, July 05, 2017

एक कविता अर्धवट होती

भाळलो पण थांबलो नाही
मुंबईला समजलो नाही

एक कविता अर्धवट होती
रात्रभर मी झोपलो नाही

शांत हो तू, मग पुन्हा बोलू
मी पुरेसा भांडलो नाही

जागतो आहेच म्हणजे, मी
खूप काही प्यायलो नाही

ती मनापासून आवडली
पण तिला मी भावलो नाही

पाठ दुखते फार कारण की
आजवर मी वाकलो नाही

ती कधी कवितेत ना आली
आणि मी गझलाळलो नाही

....रसप....
५ जुलै २०१७

Thursday, June 29, 2017

गेम ऑफ थ्रोन्स (Game of Thrones)

'गेम ऑफ थ्रोन्स' बद्दल खूप ऐकून होतो. त्याच्याशी तुलना करून भारतीय चित्रपटांन तुच्छ लेखणंही वाचलं, ऐकलं. हे सगळं इतकं झालं की आधी कंटाळा, मग वैताग आला. आणि मग असं वाटलं की, आता तर पाहतोच काय आहे तरी काय नक्की हा गेम. जवळजवळ इरेला पेटून सगळेच्या सगळे सीजन्स मिळवले. माझं इंग्रजी खूपच चांगलं असल्याने मला सबटायटल्ससुद्धा हवीच होती. तीही मिळवली आणि सगळं काही हाती आल्यावर पोटात भुकेचा गोळा उठलेला असताना ज्या पवित्र्यात आपण चारी ठाव वाढलेल्या पानासमोर बसतो, त्याच पवित्र्यात मी पीसीसमोर बसलो. पहिल्या बैठकीत ३, दुसऱ्या बैठकीत ४ आणि तिसऱ्या बैठकीत उरलेले तीन, असा पहिल्या सीजनचा फडशा पाडत असतानाच माझ्या लक्षात आलं की हे अद्भुत आहे.

आता सहाच्या सहा सीजन पाहून झाले आहेत. त्यांवर बराच विचारही करून झाला आहे. आता काही तरी लिहिणं भाग आहे !

------------------------------------------------------------------------------------

सात प्रांत. त्यांचे सात मांडलिक राजे आणि सगळ्यांचा मिळून एक राजा. ह्या सगळ्या ठिकाणी एक-एक करून माजत गेलेली अनागोंदी, अराजक.
सत्तापालट, बंड, गद्दारी, मुत्सद्देगिरी सगळं एकाच वेळी सुरु आहे.
युद्धखोर आहेत, कट्टरवादी आहेत, धर्मांध आहेत, समाजकंटकही आहेत.
कुणी समजूतदार आहेत, कुणी कपटी, कुणी तत्वनिष्ठ, कुणी दांभिक, कुणी नीच, कुणी निष्पाप, कुणी शूर, कुणी पुचाट.
मेहनती, ऐतखाऊ, हुशार, मूर्ख, कर्तबगार, नालायक, श्रद्धाळू, अंधश्रद्ध, निष्ठावंत, विश्वासघातकी असे सगळे आहेत.
युद्धखोर आहेत. शांतताप्रिय मुत्सद्दी आहेत. महत्वाकांक्षी आहेत. अल्पसंतुष्टही आहेत.
ह्या सगळ्याच्या जोडीने चमत्कार, अद्भुत, अमानवी, अवास्तव घटना व व्यक्तीसुद्धा आहेत.

हा एक प्रचंड मोठा पसारा आहे. दूरवर पसरलेला. बर्फापासून समुद्रापर्यंत आणि पर्वतरांगांपासून वाळवंटांपर्यंत. ज्यात माणसाच्या जोडीने कावळे, कुत्रे, लांडगे, घोडे, हत्ती, ड्रॅगन्स, भूतं, राक्षस हे सगळेच आहेत.
माणसंसुद्धा हर तऱ्हेची आहेत. उच्च जातीची, कनिष्ठ जातीची, गरीब, श्रीमंत, विकसित, रानटी, औरस आणि अनौरस !

हा एक शोषक वि. शोषित असा अनादीकाळापासूनचा संघर्षही आहे. एका मोठ्या प्रतलावर. भरपूर उपकथानकांचं मिळून एक कथानक बनत आहे.
कथानक बदल्याचं, संघर्षाचं, जीवन-मरणाचं. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे अस्तित्वाच्या लढाईचं.
भरमसाट व्यक्तिरेखा आहेत. त्या प्रत्येक व्यक्तिरेखेला स्वत:ची एक शैली आहे. प्रत्येक व्यक्तिरेखेचा एक आलेख आहे. चढता-उतरता. कुणाचं महत्व वाढत जातं, कुणाचं घटत जातं, तर कुणी सगळ्या गदारोळात आपलं स्थान व महत्व शिताफीने टिकवूनही आहे. ह्या सगळ्यांच्या व्यक्तिमत्वाला छटा आहेत. पांढऱ्यापासून काळ्यापर्यंत जाणाऱ्या रेषेवर वेगवेगळ्या जागांवर ह्या व्यक्तिरेखा उभ्या आहेत. त्या अधूनमधून आपली जागा बदलतातही !
नितीमत्ता, माणुसकी वगैरे काहींच्या ठायी आहेत. मात्र अस्तित्वाचा संघर्ष असा काही पेटला आहे की स्वत:च्या नकळत किंवा मनाविरुद्ध त्यांना दाबून ठेवायला लागत आहे. इतक्या विविध व्यक्तिरेखा असूनही प्रत्येक व्यक्तिरेखा व्यवस्थित उभी राहते. ह्यासाठी लागणारा वेळ त्यांनी घेतला आहे. कुठलीही घिसाडघाई केलेली नाही.

हे एक महानाट्य आहे. त्याच्यासाठी मोठा पडदा हवा.
ह्याची तांत्रिक सफाई अतुलनीय आहे. अविश्वसनीय घटना खऱ्याखुऱ्या वाटतात. व्हीएफएक्सचं ओझं पडद्यावरची प्रत्येक व्यक्ती लीलया वागवते. हे त्यांचं एकमेकांशी एकरूप होणंसुद्धा एक अद्वैतच आहे !
पार्श्वसंगीतात स्वत:चा एक आत्मा आहे. खासकरून शीर्षक संगीत तर काळजाचं ठाव घेणारं आहे.

ह्या सगळ्याला दोन गालबोटं आहेत -
१. 'अतिरंजन' - अनावश्यक हिंसा व नग्न दृश्यांची भरमार केली आहे. इतकी जास्त की त्याचं अप्रूपही वाटेनासं व्हावं. हा भडकपणा म्हणजेच प्रभावी चित्रण, असा एकंदरच आजच्या फिल्ममेकिंगचा प्रामाणिक समज असल्याने कंठशोष वृथाच आहे, तरी !
२. शीर्षक - 'गेम ऑफ थ्रोन्स' पेक्षा चांगलं नाव सुचू नये, हे दुर्दैव. मला स्वत:ला हे एखाद्या व्हिडियो गेमचं थिल्लर नाव वाटतं. कथानकातली काव्यात्मक भव्यता ह्या नावात औषधापुरतीसुद्धा जाणवत नाही. लेखक जॉर्ज रेमंड मार्टिनच्या ज्या पुस्तक-मालिकेवर ही मालिका आधारलेली आहे, त्या 'अ सॉंग ऑफ आईस अ‍ॅण्ड फायर' मधल्या सगळ्या पुस्तकांची नावं खूपच आकर्षक आहेत. (इच्छुकांनी गुगलावे.)

असो.
अजूनही काही उणीवा आहेत. कथानकात अगदी सोयीस्करपणे काही सुटे धागे आहेत, काही खड्डे किंवा भगदाडंसुद्धा आहेत. पण उणीवा आहेत म्हणून आवडू नये, असं असलं, तर त्याची सुरुवात स्वत:पासूनच व्हायला हवी ! आपल्याला स्वत:सकट अखिल विश्वातलं काही म्हणता काहीच आवडायला नको, नाही का ? उणीवा सहजपणे स्वीकारल्या जातील इतकी ताकद उर्वरित भागात असली पाहिजे. ती असली, तर ती निर्मिती यशस्वी म्हणायला हरकत नसावी.
हा 'गेम ऑफ थ्रोन्स' त्याच्यातल्या उणीवांसह आवडतो. त्यातले चांगले-वाईट सगळे लोक आपल्याला आवडतात. त्यांचे जय-पराजय, त्यांचे अंत हे सगळं आपण एकाच उत्सुकतेने पाहतो. त्याची भव्यता थक्क करते. हे एक अद्भुत सांघिक कार्य आहे, हे पदोपदी जाणवत राहतं.

१६ जुलैपासून पुढचा सीजन सुरु होतो आहे. आत्तापर्यंत सहा सीजन झाले आहेत. प्रत्येक सीजनमध्ये १० भाग. प्रत्येकी साधारण ५०-५५ मिनिटांचे. सुट्टीच्या दिवसांचा योग्य उपयोग व उर्वरित दिवसांत थोडंसं जागरण करून हा बॅकलॉग भरून काढता येऊ शकेल. मेहनतीचं काम आहे. पण एकदा लिंक लागली की आपोआप होत जाईल आणि पूर्ण झालं की दिलेल्या वेळेचं चीजच झालं आहे, हीच भावना असेल. प्रयत्न करून पहा. जरी जमलं नाही, तरी हरकत नाही. जसे सहा बाकी आहेत, तसेच सात बाकी राहतील. आठवा सीजन सुरु होईपर्यंत तरी हे नक्कीच पाहून होऊ शकेल. आत्ता फक्त सुरुवात तरी कराच !


दिग्दर्शन, लेखन, निर्मिती, अभिनय, तंत्रज्ञान, संगीत वगैरे सर्व बाबतींतली फौज भली मोठी आहे. मी कुणाचंच नाव घेणार नाही कारण कुणाचंही नाव न घेणं अन्याय असेल आणि सगळ्यांचा उल्लेख करायचा तर पाल्हाळ संपणार नाही !
मुद्दामच कथानकाविषयीही काहीही नेमकं लिहिणं टाळतो आहे ह्याची दोन कारणं -
१. साथ भागांचं कथानक एका लेखात लिहिणं अशक्य आहे आणि लेख-मालिका लिहिण्यासाठी सध्या वेळ नाही.
२. बऱ्याच लोकांनी अजून पाहिलेलं नाहीय, त्यांनी पाहावं अशी इच्छा आहे.

आणि अर्थात, सातव्या भागापासून मालिका सुरु करता येईलच !

- रणजित पराडकर

Thursday, June 01, 2017

सचिन - याद भरी पुरवाई (Sachin - A Billion Dreams)

'रॅग्स टू रिचेस' कहाण्या अनेक आहेत. संघर्षमय यशस्वी वाटचालही अनेकांची आहे. क्रिकेटेतरही अनेक खेळाडूंच्या कहाण्या स्तिमित करणाऱ्या आहेत. पण ह्या सगळ्यांमध्ये 'स्पेशल' आहे, सचिन तेंडूलकर.
का ?

तसं पाहिलं, तर २००१ ची ती इडन गार्डन्सची ऑस्ट्रेलियाविरुद्धची टेस्ट असो, जिच्यानंतर भारतीय क्रिकेटने एक वेगळाच आत्मविश्वास मिळवला होता किंवा २००२ च्या नॅटवेस्ट सिरीजची फायनल असो, जिच्यात पहिल्यांदाच तब्बल ३२५ धावा चेस करून इतिहास घडवला होता किंवा ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडीज, साउथ आफ्रिका वगैरेंतले ऐतिहासिक टेस्ट सिरीज विजय असो किंवा 'द मदर ऑफ ऑल' २०११ चा वर्ल्ड कप असो, भारतीय क्रिकेट संघाच्या प्रवासातल्या ह्या व अश्या वेगवेगळ्या महत्वाच्या टप्प्यांवरचे यशाचे शिल्पकार वेगवेगळे लोक होते. असं अजिबातच नाही सच्याने हे सगळं एकहाती घडवून आणलं किंवा ह्या सगळ्या मोठ्या मोठ्या विजयांत त्याने मोलाचा वाटा उचलला होता.
खरं तर, सच्याने एकहाती जिंकून दिलेले सामने म्हटल्यावर मला फक्त १९९७-९८ चा शारजा कप आठवतो. एरव्ही भारताचे 'बिग मॅच प्लेयर्स' वेगळेच राहिलेले आहेत.

पण तरी सच्या 'स्पेशल' का आहे ?

सचिनच्या आजवरच्या लौकिकानुसार, 'सचिन - अ बिलियन ड्रीम्स' ह्या 'डॉक्यु-ड्रामा' मध्येसुद्धा कुठल्याही स्फोटक विषयाला हात घातलेला नाही. भले मग मॅच फिक्सिंग प्रकरण असो, खळबळ माजवणारा 'प्रशिक्षक ग्रेग चॅपेल' कालखंड असो, विनोद कांबळीबरोबरचे वाद असोत, 'मंकीगेट' प्रकरण असो की असे अजूनही लहान-मोठे अनेक किस्से (साउथ आफ्रिकेत सामनाधिकारी माईक प्रॉक्टरनी घातलेल्या बंदीविरुद्धचं बंड, वगैरे) असोत, ह्या फिल्ममधून असं काहीही हाती लागत नाही, जे कधी उघड झालं नाही.
म्हणूनच ही फिल्म निव्वळ एक 'डॉक्यु-ड्रामा' म्हणून मला फारशी आवडली नाही. तरी, वारंवार मी रोमांचित का होत होतो ? पुन्हा पुन्हा माझ्या पापण्या ओलसर का होत होत्या ? आणि सगळ्यात शेवटी, फिल्म संपल्यावर डोळे पुसताना मला लोकांनी का पाहिलं होतं ?
कारण फिल्म सच्याबद्दल होती आणि सच्या स्पेशल आहे.

पण तो का स्पेशल आहे ?

कारण -

सच्या माझा चेहरा आहे. मी.. एक खऱ्या अर्थाने मध्यमवर्गीय.
गेल्या काही वर्षांत समाजातल्या ह्या 'मध्यमवर्गीय' प्रकारातही काही उपप्रकार झाले आहेत. निम्न मध्यमवर्ग, उच्च मध्यमवर्ग वगैरे. मी ह्यांपैकी कशात येतो ? माहित नाही. पण 'आहे रे' आणि 'नाही रे' ह्या दरम्यानचा जो वर्ग, त्या खऱ्या मध्यमवर्गातला मी. सुशिक्षित आई-बाप, स्वत:चं घर, कशाचीही ददात नसणं आणि तरी उधळत जावं असंही काही नसणं, असा मध्यमवर्ग.
ह्या वर्गाचा चेहरा म्हणजे सच्या. म्हणून त्याच्याशी आमची नाळ जुळते.

सच्या मिसरूड फुटण्याच्या वयातही निरागस दिसायचा आणि चाळीसाव्या वर्षी जेव्हा तो आपल्या निवृत्तीचं भाषण देत होता, तेव्हाही निरागसच दिसत होता. त्याच्या त्या निरागसपणात देशभरातल्या तमाम स्त्रियांना आपला मुलगा दिसायचा, अजूनही दिसतो. सच्या तरुण मुलींच्या 'दिल की धडकन' जितका होता, त्याहून कैक पटींनी जास्त तो करोडो स्त्रियांच्या पोटचा गोळाच होता. मुली द्रविड, गांगुली, (फिक्सिंगमध्ये अडकण्यापूर्वीचा) जडेजा वगैरेंवर जास्त मरत असाव्यात. पण त्यांच्या आयांची त्यांच्या मुलींसाठी 'सचिन' हीच पसंती असावी. सच्या अख्ख्या देशाचा सुपुत्र म्हणूनच होता.

क्रिकेटबद्दल म्हणायचं झालं, तर १६ व्या वर्षी एक कोवळं पोरगं वसीम अक्रम, वकार युनुस वगैरेंसारख्या धिप्पाड लोकांसमोर येतं काय, नाक फुटल्यावरही खेळतं काय, एका प्रदर्शनीय सामन्यातल्या फटकेबाजीमुळे अब्दुल कादिरसारख्या व्हेटरनचं करियरच संपवतं काय.. हे सगळं अद्भुतच होतं.
त्यानंतरची तब्बल २४ वर्षं हा माणूस क्रिकेटविश्वात झळकत राहिला. माझ्यासारख्या अनेक लोकांनी 'क्रिकेट'च्या आधी 'सचिन' हे नाव ऐकलं आहे. त्याची ही २४ वर्षं आमच्यासाठी आमचं संपूर्ण बालपण आणि नंतरची उमेदीची वर्षं आहेत. त्याच्या प्रत्येक शतकामागे आमच्यासाठी आमची एखादी परीक्षा, इंटरव्ह्यू किंवा कंपनीतली एखादी मीटिंग वगैरे आठवणी आहेत. कधी कधी काही लग्नं वगैरेही आहेत ! इतरांची कशाला आम्ही आमच्या स्वत:च्या लग्न-मुंजीतही 'सचिन आउट झाला नसेल ना' च्या काळजीत राहिलो आहोत.

'सचिन आउट झाला की बाकीच्यांची सुरु झालेली घसरगुंडी' ह्या आठवणीच्या भळभळत्या जखमा आम्ही आजपर्यंत जपलेल्या आहेत. त्यांतली सगळ्यात खोल जखम १३ मार्च १९९६ ह्या दिवशी आम्हाला श्रीलंकेने दिली होती, हे आम्ही कधीच विसरणार नाही. २००७ च्या वर्ल्ड कपमधल्या मानहानीनंतर आम्ही रात्री बऱ्याच उशीरापर्यंत तळमळत फक्त कूस बदलत राहिलो आहोत. २०११ च्या दिग्विजयानंतर 'We did it for Sachin' म्हणणाऱ्या युवराजने टच्चकन् आमच्याही डोळ्यांत पाणी आणलं होतं. सच्याला खांद्यावर बसवून त्याची वानखेडेवर काढलेली मिरवणूक, त्यातही एकट्या युसुफ पठाणने त्याला खांद्यावर बसवणं.. मग कोहलीने म्हणणं की, 'He has carried the nation on his shoulders for years, its time we carry him on ours' हे सगळं पाहताना आम्हाला अक्षरश: गहिवरून आलं होतं.

- ह्या सगळ्यामुळे सच्या स्पेशल आहे. सच्या हा 'नॉस्टॅल्जिया' ला असलेल्या काही समानार्थी शब्दांपैकी एक आहे. माझ्यासाठी तरी इथे द्रविड, दादा, लक्ष्मण, धोनी असे क्रिकेटमधले इतरही काही समानार्थी शब्द आहेत. पण सच्या स्पेशल आहे, कारण तो माझा चेहरा आहे.

'सचिन - अ बिलियन ड्रीम्स' ह्या सगळ्या कडू-गोड आठवणींना उजाळा देतो. मला पुन्हा एकदा माझा चेहरा दाखवतो, जो आजकालच्या भपकेबाज क्रिकेटमुळे झाकोळला गेला आहे. जो आता ह्या खेळाबाबत बऱ्याच अंशी भावनाहीन झाला आहे.
सच्याच्या सिनेमाने मला रडवलं, हसवलं, गहिवरवलं ह्याचं कारण सिनेमा नसून खुद्द 'सच्या' आहे. तो पुन्हा भेटला. काही खपल्या उघडल्या आणि काही मोरपिसं नव्याने फिरली.

यादों की बौछारों से जब पलकें भीगने लगती हैं
कितनी सौंधी लगती है तब माज़ी की रुसवाई भी
एक पुराना मौसम लौटा याद भरी पुरवाई भी
ऐसा तो कम ही होता है वो भी हों तनहाई भी

- गुलजार

बस्.. इतकंच.

- रणजित पराडकर


Saturday, April 29, 2017

अ‍ॅक्शनपॅक्ड थरारनाट्याचा ४४० व्होल्ट्सचा झटका - बाहुबली - द कन्क्ल्युजन (Movie Review - Bahubali - The Conclusion)

'बाहुबली-२'चं कथानक मी सांगणार नाही. ते जाणून घ्यायचीच उत्सुकता असेल, तर हा लेख वाचू नये !

बाहुबली-१, मोहेंजोदडो आणि आता बाहुबली-२ अश्या सिनेमांमुळे भारतीय सिनेमा परदेशी (हॉलीवूड) सिनेमापेक्षा किती पिछाडलेला आहे, अश्या तुलनांना ऊत आला.

मुळात बॉलीवूड आणि हॉलीवूड ही तुलनाच अगदी अप्रस्तुत आहे. हॉलीवूड सिनेमांना किती स्क्रीन्सचं ओपनिंग मिळतं आणि आपल्याकडे जास्तीत जास्त जरी कुणाला मिळालं तरी ते किती स्क्रीन्सचं असतं, दोन्हीचं मार्केट किती आहे, अश्या बाबींचा विचार केल्यास दोन्हीच्या बजेटमध्ये तफावत न आली तरच नवल. अन्यथा, तांत्रिक सफाईदार सिनेमा आपण बनवू शकत नाही असं अजिबात नाही. हॉलीवूडचे व्हीएफएक्ससुद्धा प्रामुख्याने भारतात किंवा भारतीय तंत्रज्ञांनीच केलेले असतात.
हे झालं स्पेशल इफेक्ट्स व इतर तांत्रिक सफाईबाबत. आता दुसरा मुद्दा.
'बॉलीवूड म्हणजे मुख्यत्वेकरून मसालापट. इथे १०० सिनेमांच्या मागे एखादा 'मसान' बनतो' असं काहीसं बऱ्याच जणांचं मत असतं. मी म्हणतो, तुम्ही शंभरपैकी पन्नास तर बघा. मग तुमचं तुम्हालाच समजेल की हे प्रमाण 'शंभरपैकी एक'पेक्षा खूपच जास्त आहे !
सिनेमा, नाटक किंवा कुठलीही कला ही त्या त्या समाजाचं रिप्रेझेंटेशन असते. सिनेमा तर खूपच स्पष्ट रिफ्लेक्शन असतं समाजाचं. समाज कसा विचार करतो, ह्यावर सिनेमा बदलतो, असं मला वाटतं. इथला समाज अजून हुंडा, ऑनर किलिंग, जातीद्वेष वगैरेंत गुंतलाय, पिछाडलाय. सिनेमा बनवणारेसुद्धा ह्याच समाजाचे प्रोडक्ट्स आहेत. शहरात राहून, एका अतिशय सुरक्षित वातावरणात वाढून एका अपरिपक्व समाजाचं प्रतिनिधित्व फुटकळ ठरवणं, हे चूक आहे. आपला चित्रपट त्याच त्या विषयांत गुरफटला आहे कारण आपला समाज त्याच त्या समजांत अडकलाय. आपला चित्रपट ढिसाळ आहे कारण आपला समाज विस्कळीत आहे. आपला चित्रपट उथळ आहे कारण आपला समाज अपरिपक्व आहे. ह्या समाजाला त्याच्या आवडीनुसार चित्रपट देणं, हा धंदा आहे. इथे भावनाप्रधानता प्रायोरिटीला आहे आणि तीच असावी. आपले विचार, अापले प्रश्न आणि प्रायोरिटीज ज्या आहेत, तसा आपला सिनेमा आहे. समाज ओव्हरनाईट बदलणार नाही, चित्रपटही ओव्हरनाईट बदलत नाही. पण हळूहळू खूप सकारात्मक बदल होत आहेत. समाजातही आणि चित्रपटातही.
सिमिलरली, हॉलिवूडचा सिनेमा तसा आहे, जसा त्यांचा टार्गेट समाज आहे. दोघांची आपसांत तुलना करुन सरसकट दोन्हीपैकी कुणा तरी एकाला फुटकळ मानणं, हे फक्त आंधळेपणाचं लक्षण आहे. आणि आंधळेपणा फक्त अंधारामुळेच येतो असं नाही, खूप जास्त एक्स्पोजरमुळेही येतो.
मसान, दम लगा के हैशा, दंगल, तारे जमीं पर, पा, बुद्ध इन ट्रॅफिक जॅम वगैरे सिनेमे आपल्याकडेच बनतील. मान्य आहे की जास्त सिनेमे वाईट असतात, पण जे चांगले असतात त्यांचं कौतुक नाही तर किंमत तरी करायला हवी. आणि मी हे फक्त पटकन जे आठवले आणि तेही नव्यातले सिनेमे सांगितले. विचार केला तर अजूनही आठवतील.
असो. नमनाला घडाभर तेल झालंय !

'बाहुबली' म्हणजे भव्यता, स्पेशल इफेक्ट्स, थरारक युद्धदृश्यं, नाट्य आणि टिपिकल दाक्षिणात्य शैलीची थोडीशी हवीहवीशीच ओव्हरअ‍ॅक्टिंग अशी माझी अपेक्षा होती, जी पूर्ण झाली ! भव्यतेमध्ये सिनेमा कुठेच कमी पडत नाही. मोठमोठे सेट्स, दाही दिशांनी फिरणारा कॅमेरा, अप्रतिम रंगसंगती हे सगळं स्तिमित करणारं आहे. स्पेशल इफेक्ट्स - पहिल्या भागाप्रमाणेच - काही ठिकाणी बऱ्यापैकी फसलेले आहेत, पण बहुतांश ठिकाणी केवळ कमाल केली आहे ! युद्धदृश्यंसुद्धा पहिल्या भागाप्रमाणेच फसली/ जमली आहेत, पण त्यांचाही एकंदर परिणाम चित्तथरारकच आहे. नाट्याच्या बाबतीत मात्र हा दुसरा भाग पहिल्या भागाच्या काही पाउलं पुढेच गेला आहे. पहिल्या भागाचं कथानक अंमळ बाळबोध वाटलं होतं, इथे त्याचा वेग, वळणं वेगळी आहेत आणि सरसही. 'कटप्पाने बाहुबलीला का मारलं', ह्याचं उत्तर अपेक्षाभंग करणारं नाहीय, हे विशेष. कारण ह्या एका उत्तरासाठीची उत्सुकता इतकी शिगेला पोहोचली होती, की जर ते उत्तर तर्कशून्य असतं, तर अख्खा सिनेमाच कोलमडून पडला असता ! 'दाक्षिणात्य शैलीची थोडीशी हवीहवीशी ओव्हरअ‍ॅक्टिंग' मात्र इथे औषधापुरतीच आहे. सुरुवातीचा काही भाग जराशी बाष्कळ विनोदनिर्मिती करण्यात गेला आहे, पण तो भागही तरीही बऱ्यापैकी मनोरंजक आहे. संगीत मात्र कमजोर बाजू ठरलेलं आहे. जी काही ३-४ गाणी आहेत, ती अजिबात लक्षात राहण्यासारखी तर नाहीतच, पण 'कधी एकदा संपतायत' असं वाटावं, इतकी नीरस आहेत.
तमन्नाच्या पंख्यांसाठी अपेक्षाभंग आहे कारण ती केवळ २-३ प्रसंगांत दिसते. पण अनुष्का शेट्टीच्या पंख्यांसाठी मात्र पर्वणी आहे ! ती फक्त 'दिसत'च नाही, तर मोहवते ! तिच्या अप्रतिम सौंदर्याला तितक्याच दमदार अभिनयाचीही जोड आहे, हे विशेष. युद्धदृष्यांतलाही तिचा वावर खूप सहज वाटतो. प्रभास, राणा दग्गुबाती, राम्या, सत्य राज, नासर ह्या सगळ्यांचीच कामं उत्तम झालेली आहेत. नासर आणि सत्य राज तर व्हेटरनच आहेत. तर 'प्रभास' सिनेमाचं केंद्रस्थान. पण 'राणा दग्गुबाती' हे एक सुखद आश्चर्य आहे ! धिप्पाड शरीरयष्टीवाल्या नटांची टिपिकल 'ठोकळा' इमेज तोडणारा हा नट आहे. महान अभिनय वगैरे तो करत नाही, पण लक्षवेधी नक्कीच ठरतो आणि त्याच्या जबाबदारीत कुठेही कमी पडत नाही. 'द गाझी अटॅक' मधलंही त्याचं काम मला आवडलं होतं आणि इथलंही आवडलंय.
'मनोज मुन्तशीर' ह्यांनी लिहिलेली गाणी सपशेल उथळ वाटली, तरी त्यांनी लिहिलेले संवाद मात्र मस्त जमून आलेले आहेत. ३-४ जागांवरच्या पंचलाईन्स तर कमालीच्याच आहेत ! ह्या एका बाबतीतही दुसरा भाग पहिल्यापेक्षा सरस आहे.

गेल्या साठ-सत्तर वर्षांचा विचार केला तर भारतीय सिनेमाचा प्रवास डोळे दिपवून टाकणारा आहे. I know there is still a long way to go, पण गेल्या वीस वर्षांत भारतीय सिनेमाने अक्षरश: कात टाकलेली आहे. मला कुणाचीही स्पेसिफिक नावं घ्यायची नाहीयत. पण किमान १५-२० दिग्दर्शक असे आहेत, जे काळानुरूप किंवा काळाच्या पुढचा विचार करतात. 'एस. राजामौली' हे त्यांच्यापैकी एक नक्कीच आहेत. आजच्या काळात, जेव्हा सिनेमा इंडस्ट्री प्रचंड आर्थिक विवंचनेत आहे, एक इतक्या मोठ्या बजेटचा सिनेमा करणं, तोही स्थानिक भाषेत आणि त्याला ह्या खंडप्राय देशात लोकप्रिय करून सगळे रेकॉर्ड्स मोडणं, ही किमया फक्त मार्केटिंगची असू शकत नाही. प्रोडक्टही तितकं सशक्त आहे, म्हणूनच हे शक्य झालं आहे. 'बाहुबली' हे फक्त दिग्दर्शक राजामौली ह्यांचं ड्रीम प्रोजेक्ट नाही, हे माझ्यासारख्या लाखो-करोडो चित्रपटरसिकांचंही ड्रीम प्रोजेक्ट आहे ! हे स्वप्न स्वत: राजामौली गेली काही वर्षं जगतच असावेत, तीन तासांच्या खेळात आपणही ते नक्कीच जगतो. पण जर भारतीय चित्रपट प्रेक्षक हा मठ्ठच आहे आणि त्याला हातोहात बनवून सिनेमातून करोडो रुपये सहज मिळवले जाऊ शकतात, असा बाळबोध समज अगदी ठामच असेल तर तो ज्याचा त्याला लखलाभ ! माझ्या दृष्टीने तरी राजामौली अभिनंदनास पूर्णपणे पात्र आहेत !

To conclude the conclusion, तुलनात्मक दृष्ट्या विचार केल्यास, दुसऱ्या भागाने पहिल्या भागावर बहुतांश बाबतींत मात केलेली आहे. बाहुबलीचं हे कन्क्ल्युजन अ‍ॅक्शनपॅक्ड थरारनाट्याचा एक ४४० व्होल्ट्सचा झटका आहे. हा भारतीय मसालापटाने घेतलेला एक वेगवान टेक ऑफ आहे. अजून बराच मोठा पल्ला गाठायचा आहे, पण हा टेक ऑफ पाहता, कुठलाही पल्ला आवाक्याबाहेर नक्कीच नाही, हा विश्वास वाटतो आहे !

रेटिंग - * * * *

- रणजित पराडकर


Monday, April 17, 2017

सुश्राव्य, पण बेजान - बेगम जान (Movie Review - Begum Jaan)

सीमाभागापासून शेकडो मैलांवर राहणारे आणि स्वातंत्र्यानंतरच्या अनेक दशकांत श्वास घेणारे आपण, ह्या स्वातंत्र्याची किंमत काही लोकांसाठी किती भयंकर होती, हे समजू शकत नाही.
गुलजार साहेबांच्या 'माचीस'मध्ये (बहुतेक) एक संवाद आहे. ज्यात (पुन्हा बहुतेक) ओम पुरी म्हणतो की, "लहानपणी शाळेत एक प्रश विचारला गेला की 'स्वातंत्र्य कसं मिळालं ?' कुणी म्हणालं, अहिंसेने. कुणी म्हणालं, गांधींजींमुळे. मी म्हटलं, 'खूनखराबेसे.. खूनखराबेसे मिली आजादी !'"
फाळणीमुळे देशोधडीला लागलेल्या असंख्य कुटुंबांची हीच व्यथा आहे. त्यांची कहाणी आपल्याकडे अनेक सिनेमांत आली. हिटलर आणि त्याच्या 'हॉलोकास्ट'वर आधारलेले जितके प्रभावी परदेशी सिनेमे झाले, तितके 'फाळणी'वरचे आपल्याकडे नाही झाले. बहुतेक वेळी 'फाळणी' हे एक जोडकथानकच राहिलं. जोडकथानक असलं, तरी हरकत नाही. पण त्याचा प्रभाव म्हणावा तसा पडला नाही. खरं तर 'फाळणी' ही एक प्रचंड मोठी आणि हादरवून सोडणारी घडामोड होती, जी आपल्या इतिहासाने 'जस्ट अनदर थिंग' करून ठेवलीय. किंबहुना, स्वातंत्र्याच्या अतिरंजित आनंदसोहळ्यासमोर हे एक रक्तरंजित वास्तव सर्वशक्तिमान देवाच्या मंदिराच्या पायरीवर बसलेल्या एखाद्या महत्पीडीत व्यक्तीसारखं राहिलं आहे, जिच्याकडे पाहूनही न पाहिल्यासारखं केलं जातं किंवा अगदीच कुणी हळहळलं, तर चिल्लर किंवा तत्सम काही तरी देऊन लाचार माणुसकीची फसवणूक केली जाते. आपल्या सिनेमानेही ह्यापासून सुरक्षित अंतरच राखलं आहे. जेव्हा जेव्हा 'फाळणी'चा विषय सिनेमात आला, तेव्हा तेव्हा तथाकथित अभिव्यक्ती स्वातंत्र्याने इतिहासावरची पुटं झटकणे किंवा चेहऱ्यांवरचे मुखवटे फाडण्याचा प्रयत्न न करता व्यावसायिक गणितांना सोडवून बचावात्मक पवित्राच घेतला आहे, हातचं राखूनच ठेवलं आहे

'बेगम जान'च्या कथानकाचा प्राणही 'फाळणी'तच आहे, पण पूर्वसुरींच्या पाउलावर पाउल टाकत, हाही सिनेमा त्याकडे गांभीर्याने लक्ष न देता, बाकीच्या फापटपसाऱ्यातच अधिक रमतो.

स्वातंत्र्याचं वारं वाहत असताना पंजाब भागातील सुजाण सामान्य जनतेत एक प्रकारची असुरक्षितता वाढत चालली आहे. मुस्लीम लीगला पाकिस्तान आणि काँग्रेसला हिंदुस्थान दिला जाणार, देशाची फाळणी होणार, ह्याचे संकेत मिळत आहेत. हिंदू-मुसलमान दंगेही देशाच्या विविध भागांत सुरु झाले आहेत. पण कुठे तरी एक आशा सर्वांच्या मनात आहे की आपले राष्ट्रीय नेतृत्व असं काही होऊ देणार नाहीच. ह्यावर तोडगा निघेल. दुर्दैवाने, तसं काही होत नाही आणि 'रॅडक्लिफ लाईन' आखून देशाची फाळणी होते. लोकांच्या भूतकाळ आणि भविष्याच्या मधून एक रेष काढली जाते. त्या रेषेला 'वर्तमानकाळ' म्हटलं जातं आणि उभ्या आयुष्याचा तोल त्या रेषेवर साधता साधता कित्येक लोक बरबाद होतात.
वाटले आयुष्य होते रुंद रस्त्यासारखे
आज कळले चालणे आहे जणू धाग्यावरी
अशी काहीशी त्यांची स्थिती होते.

ही 'रॅडक्लिफ लाईन' गावांना छेदते, जिल्ह्यांना विभागते, माणसांना तोडते आणि घरांना तुडवतेसुद्धा. 'बेगम जान' (विद्या बालन) चा कोठा 'रॅडक्लिफ लाईन'च्या वाटेत येतो. कोठयाच्या मधूनच ही सीमारेषा जाणार असते. तिथे बॉर्डर चेक पोस्ट बनवायचा प्लान असतो. इथल्या आसपासच्या भागात 'रॅडक्लिफ लाईन' नुसार विभाजन करण्याची, सीमारेषा आखण्याची जबाबदारी सोपवली जाते होऊ घातलेल्या दोन देशांच्या दोन अधिकाऱ्यांवर. भारताकडून हर्षवर्धन श्रीवास्तव (आशिष विद्यार्थी) आणि पाकिस्तानसाठी इल्यास खान (रजत कपूर). बेगम जान, तिच्याकडच्या मुली व कोठ्यात राहणारी इतर मंडळी विरुद्ध हर्षवर्धन, इल्यास व संपूर्ण व्यवस्था असा हा संघर्ष आहे. बंगाली सिनेमा 'राजकहिनी' चा रिमेक असलेला 'बेगम जान' हा संघर्ष पोहोचवण्यात खूपच कमी पडतो. किंबहुना, हा संघर्ष दाखवण्यापेक्षा वेश्या, त्यांचा व्यवसाय, त्यांचं भावविश्व आणि त्या अनुषंगाने येणारी काही 'वरिष्ठ प्रमाणपत्र' पात्र दृश्यं दाखवण्यातच जास्त धन्यता मानली जाते. उदाहरणार्थ - कोठ्यातली एक वेश्या आणि तिचाच दलाल ह्यांच्यात प्रेमप्रकरण आणि त्यांच्यातल्या संवादावेळी तिने त्याचा हात स्वत:च्या छातीवर ठेवून 'यह क्या हैं', दोन पायांच्या मध्ये ठेवून 'यह क्या हैं' वगैरे म्हणण्याचे, कथानकाशी काही एक संबंध नसलेले प्रसंग केवळ 'आता बघा हं, आम्ही कसं धाडसी चित्रण करतो' हा पवित्रा दाखवणारे आहेत.
अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे संस्थानांचे खालसा होणे, हीसुद्धा एक महत्वाची घडामोड नीट हाताळता आलेली नाही. जोड-जोडकथानक म्हणूनच ही घडामोड हृषीकेश मुखर्जींच्या 'सत्यकाम'मध्ये आली आहे. त्यात थोड्याश्याच वेळात ते अतिशय प्रभावीपणे दाखवलं आहे. इथे पुन्हा एकदा सिनेमा खूप कमी पडला आहे. एकूणच एका अतिशय वजनदार कथानकाला ढिसाळ, पसरट आणि दिशाहीन पटकथेमुळे विस्कळीत करून त्याचं सगळं वजन वाया घालवलं आहे.
वर म्हटल्यासारखाच एक पवित्रा सर्व स्त्री कलाकारांच्या अभिनयातही जाणवतो. बिनधास्तपणा आणि उच्छृंखलपणा दाखवला की कोठ्यावरची बाई, वेश्या व्यवस्थित पोहोचेल असा काहीसा समज असावा. सगळ्यांचंच मोठमोठ्याने बोलणं आणि भडक भावदर्शन सगळ्याच नाट्याला खूप वरवरचं करून ठेवतं. सिनेमा जरी बंगाली सिनेमाचा त्याच लेखक-दिग्दर्शकाने केलेला हिंदी रिमेक असला, तरी कथानकामुळे मंडी, उमराव जान अश्या काही सिनेमांची आठवण येत राहते. छाप वगैरे काही जाणवत नाही. ती जाणवायला हवी होती. १९४७ सालचा कुंटणखाना आणि २०१७ सालचा कुंटणखाना ह्यातला फरक समजून घ्यायला हवा होता. तो कुठल्याही स्त्री कलाकाराने समजून घेतल्यासारखं अजिबात वाटत नाही.
'विद्या बालन' माझी आजच्या काळातली सगळ्यात आवडती अभिनेत्री आहे. कुठल्याच भूमिकेत 'ती अभिनय करते आहे', असं कधी जाणवलं नाही. इथे मात्र 'आता मी तुम्हाला कोठेवाली सादर करून दाखवते' असं आव्हान स्वीकारूनच ती कॅमेऱ्यासमोर गेली आहे. तिने साकारलेल्या 'बेगम जान'बद्दल कदाचित तिच्यावर खूप स्तुतीसुमनं उधळली जातील, तिला पुरस्कारही मिळतील. 'काही तरी वेगळं केलं', हे आणि इतकंच आजकाल स्तुतीपर होण्यासाठी पुरेसं असतं. तिच्या जोडीने अजूनही कुणाला शाबासक्या मिळतील. पण विद्याचा एक चाहता म्हणून माझी तरी सपशेल निराशा झाली. सिनेमाचं कथानक आधीपासूनच माहित होतं आणि रिमेक असल्यामुळे मूळ सिनेमातल्या उणीवा भरून काढल्या जाऊन एक जबरदस्त सिनेमा आणि जबरदस्त परफॉर्मन्सेस पाहायला मिळतील, अशी जवळजवळ खात्रीच घेऊन मी कदाचित सिनेमा पाहिला असेल म्हणूनच हा अपेक्षाभंग झाला असेल.

सर्व स्त्री कलाकारांच्या अति-अभिनयासमोर चार पुरुष कलाकारांचे अभिनय मात्र भाव खाऊन जातात. (एका स्त्रीवादी सिनेमाची अशीही एक शोकांतिका असू शकते !)
आशिष विद्यार्थी आणि रजत कपूरचे सगळेच प्रसंग जुगलबंदीचेच झाले आहेत. त्यांच्या संवादांच्या वेळी त्यांचे अर्धेच चेहरे दाखवले जाणे, हे जरा वेगळ्या प्रकारचं पण सूचक कॅमेरावर्कही आवडलं. एका प्रसंगात तंबूत बसून एकमेकांशी ते बोलत असताना कॅमेऱ्याच्या फ्रेममध्ये दोघांच्या मधून तंबूचा खांब येतो. तो खांब त्याच्या पार्श्वभूमीवर असलेल्या बेगम जानच्या कोठ्यालाही दोन भागात विभागत असतो, हेही उत्कृष्ट कॅमेरावर्क नजर टिपते. पण ह्या सगळ्यावर दोघांचा अभिनय मात करून उरतो. सूचक, अर्थपूर्ण संवाद आणि त्यांची जबरदस्त फेक. ह्या दोन्ही अनुभवी आणि ताकदवान अभिनेत्यांनी आपापल्या शैलीत आपापल्या व्यक्तिरेखा समर्थपणे साकारल्या आहेत.

चंकी पांडेला बहुतेक तरी प्रथमच एक पूर्णपणे नकारात्मक आणि वेगळी भूमिका मिळाली आहे. हा गुणी अभिनेता क्रूरकर्मा 'कबीर' साकारताना कुठेही कमी पडत नाही. दमदार अभिनय करणारा चौथा पुरुष कलाकार म्हणजे राजेश शर्मा. पोलीस ऑफिसर शाम ह्या व्यक्तिरेखेला फार काही वाव नाहीय, पण जे १-२ आव्हानात्मक प्रसंग त्याच्या वाट्याला आले आहेत, त्यांचं त्याने चीज केलं आहे.
विवेक मुश्रन आणि नसीरुद्दीन शाहसुद्धा आपापली कामं व्यवस्थित करतात. त्यांच्याबाबत आवर्जून सांगावं असं काही नाही.


आवर्जून बोलायला हवं अशी एक गोष्ट आहे, जी आजकाल क्वचितच लाभते किंवा कधी लाभतच नाही, असंही म्हणता येईल.
'संगीत' !
'अनु मलिक' नी दिलेली गाणी खूप गोड चालीची आहेत. कौसर मुनीर ह्यांचे शब्दही अर्थपूर्ण आहेत.

आह निकली हैं यहाँ, आह निकली हैं वहाँ
वाह री वाह यह आज़ादियाँ

गाणं ऐकताना खूप व्याकुळ करतं. खासकरून कोरसमध्ये गायलं जाणारं 'आज़ादियाँ' अंगावर येणारं आहे. तसंच अंगावर येतं 'ओ रे कहारों'. आसामी लोकगीतगायिका कल्पना पटोवारीच्या पहाडी आवाजातले -

झुमके झूमर नाक की कीलें, एक एक करके उतरेंगे गहने
देती हूँ तुझको जो नज़रें चुराके, चुनरी दुआओं की ये रखना तू पहने

सो जा, सो जा गुडिया सो जा
अंखियों से तू ओझल हो जा
ओ रे कहारों डोली उठाओ, पल भर भी ठहरो अब नहीं
ना है बलाएं ना है दुआएं, देने को है अब कुछ नहीं

- हे शब्द हेलावून टाकतात. गाण्याचं चित्रण आणि त्याची जागाही जबरदस्त आहे. हे गाणं सिनेमाचा एक जमून आलेला भाग आहे.

अरिजित सिंगचा आवाज आता अजीर्ण होत चालला असला, तरी त्याच्या आवाजातलं 'मुर्शिदा' गाणं दमदार आहे. इथे जरा मलिक साहेबांचा १९४७ शी संबंध तुटून ते २०१७ त आल्यासारखे वाटतात. कदाचित ते अरिजितच्या आवाजामुळेही असेल, दुसरा एखादा आवाज वापरून पाहायला हवा होता. पण इथेही -

सूखे फूल हैं हाथों में प्यार का मौसम चाहा था
उसने ज़ख्म दिए हमको जिस से मरहम चाहा था
अबके ओस की बूंदों ने दिल में आग लगायी है
दिल पे किसने दस्तक दी, तुम हो या तन्हाई है

- असे अर्थपूर्ण शब्द लक्षात राहता.

'प्रेम मी तोहरे..' तर ह्या अल्बमचा 'युएसपी'च ठरेल. 'वैष्णव जन तो तेने कहिये जे..', 'मी मज हरपून..' ची आणि इतर काही भजनांची ट्रेडिशनल चाल अशीच आहे. पण खूप आवडलंय हे कम्पोजिशन. 'सोलफुल' आहे. बऱ्याच काळानंतर असं गाणं आलंय, जे सिनेमा पाहून बाहेर आल्यानंतर दुसऱ्या दिवशीही मनात वाजत राहिलं. ह्या गाण्याचं एक वर्जन आशा भोसलेंनी आणि एक कविता सेठनी गायलं आहे. आशाबाईंचा आवाज थकलेला वाटतो तर कविता सेठचा आवाज भसाडा. मला स्वत:ला तरी थकलेल्या आवाजातलं असलं, तरी आशाबाईंचंच जास्त भावपूर्ण वाटलंय.

आता है छुप के तू मेरे दर पर घायल दिल और धड़कन बंजर
हल्दी मली जो घाव पे तोहरे हर ज़ख्म मेरा हरा हो गया
ये क्या हो गया
प्रेम में तोहरे ऐसी पड़ी मैं
पुराना ज़माना नया हो गया
ये क्या हो गया..

हे ज्या नजाकतीने त्यांनी गायलं आहे, त्याला तोडच नाहीय.

'आज़ादियाँ' गाण्यात पुन्हा पुन्हा येणारी 'हिंद पे था नाज जिनको वो हैं कहां..' ही ओळ आणि 'वह सुबह हमीं से आयेगी' हे 'फिर सुबह होगी' मधलं 'खय्याम' साहेबांनी संगीतबद्ध केलेलं गीत, ह्या सिनेमाने साहीर लुधियानवींना दिलेल्या मानवंदना आहेत. ही कल्पनासुद्धा खूप आवडली.

लेख बराच लांबला आहे. पण सगळ्यात शेवटी सांगायचं झाल्यास, एक सिनेमा म्हणून 'बेगम जान' खूपच बेजान झाला असला, तरी संवाद (राहत इंदौरी), गीतं (कौसर मुनीर) आणि संगीत (अनु मलिक) हे सिनेमाचे तीन आधारस्तंभ आहेत. ज्यांच्या जोरावर तो स्थिरपणे उभा तरी राहू शकतो आहे. ह्या संगीताला ह्या वर्षी काही महत्वाचे पुरस्कार नक्कीच मिळतील, असंही वाटतंय.

रेटिंग - * * *

- रणजित पराडकर

तू....

सूर तू संगीत तू
स्वप्न तू सत्यात तू
छंद तू धुंदीत तू
दूर तू माझ्यात तू

स्वाद तू आस्वाद तू
स्नेह तू मोहात तू
गंध तू अस्तित्त्व तू
दृश्य तू खोलात तू

आज तू अंदाज तू
मित्र तू सर्वस्व तू
साज तू श्रुंगार तू
यत्र तू सर्वत्र तू

कल्प तू आभास तू
मर्म तू गर्भीत तू
मूर्त तू साक्षात तू
कर्म तू संचीत तू

साध्य तू आरंभ मी
आस तू वर्तूळ मी
ध्येय तू मार्गस्थ मी
तोय तू व्याकूळ मी


....रसप....
१९ जुलै २००८

--------------------

वेग तू आवेग मी
जोम तू उद्ध्वस्त मी
प्राण तू शारीर मी
स्थैर्य तू अस्वस्थ मी

प्रार्थ्य तू अन् स्वार्थ मी
पूर्ण तू चतकोर मी
क्षीर तू नवनीत मी
रम्य तू घनघोर मी

पद्म तू तर भ्रमर मी
सूज्ञ तू ओढाळ मी
मेघ तू अन् मोर मी
सौम्य तू नाठाळ मी

सौर्य तू बेसूर मी
मौज तू बेरंग मी
डौल तू बेताल मी
ऐट तू बेढंग मी


....रसप....
१९ जुलै २००८

(संपादित - १७ एप्रिल २०१७)

Tuesday, April 04, 2017

टेरिफिकली ट्रॅप्ड (Trapped - Movie Review)

भारतीय सिनेमा बदलला आहे. त्याने कात टाकली आहे. आता ह्या सिनेमात कुठल्याही समग्र थिल्लरपणाला स्थान तर राहिलेले नाहीच, पण चतुराईने प्रयोगशील निर्मितीसुद्धा केली जात आहे.

खरं तर अजूनही शोकांतिकेच्या वाटेला सहसा आपण जात नाही आणि गेलोच तर ती शोकांतिका सगळं काही संपवून टाकणारीच असते. भयंकर घटना, डिझास्टर आपल्या सिनेमांत बहुतेक वेळेस तरी लार्जर दॅन लाईफ असते. रामगोपाल वर्मा (सत्या) असो की अनुराग कश्यप (सगळेच) किंवा विशाल भारद्वाज (मक़बूल, हैदर) असो की मणी रत्नम (दिल से, युवा, रावण) किंवा अजून कुणी, आपल्याकडच्या शोकांतिका नेहमीच मृत्यूपर्यंत जाणाऱ्या आणि/ किंवा सगळं काही संपवणाऱ्याच असतात.
पण शोकांतिका ही अशी 'लार्जर दॅन लाईफ'च असते असं नाही. अगदी साधे साधे प्रसंगही शोकांतिकेत बदलू शकतात. लहान लहान शक्यताही मोठी वेदना करू शकतात. छोटीशीच असली तरी तीसुद्धा एक दखलपात्र घटना असू शकते. एक माणूस एखाद्या पूर्णपणे रिकाम्या असलेल्या स्कायस्क्रेपरच्या ३५ व्या मजल्यावरच्या घरात अगदी सहजपणे अडकू शकतो. अश्या वेळी त्याच्याकडे मोबाईल व वीज नसू नसणे हीदेखील एक भयंकर घटना असू शकते. इतकी भयंकर की मदतीसाठी आरडाओरडा करून त्याचा आवाज घश्यातून बाहेर येईनासा होऊ शकतो, तो जखमी होऊ शकतो, मरूही शकतो. परिस्थिती कितीही बिकट असली, तरी तहान आणि भूक तर कधी पिच्छा सोडत नसतातच. जगण्यासाठी, ह्या कैदेतून स्वत:ची सुटका करवून घेण्यासाठी त्याला काहीही करावं लागू शकतं. एका छोट्याश्या चुकीची किंवा किरकोळ अपघाताची त्याला मोठी किंमत मोजावी लागू शकते. इतकीही मोठी नाही की त्याचं आयुष्य संपेल किंवा उद्ध्वस्त होईल, पण इतकी तर नक्कीच झालेला घाव आयुष्यभर जाणवत राहील. त्यामुळे अशी एखादी घटनासुद्धा एखाद्या शोकांतिकेपेक्षा कमी नाहीच.'ट्रॅप्ड'चं कथानक तेव्हढंच आहे जेव्हढं वर सांगितलं. इतकंसंच असलं, तरी बघण्यासारख्या आणि अनुभवण्यासारख्या काही जबरदस्त गोष्टी 'ट्रॅप्ड'मध्ये आहेत.
साधारणपणे ९९% सिनेमात तरी फ्रेममध्ये 'राजकुमार राव'च आहे. त्यातही बहुतांश अधिक भाग तर तो एकटाच आहे आणि त्यातही बहुतांश भाग तो त्या घरातच आहे. तिथून बाहेर निघण्यासाठी आणि बाहेर निघेपर्यंत तग धरण्यासाठी त्याची धडपड बेचैन करणारी वाटते. त्याच्यासोबत घडलेली दुर्घटना खूपच साधीशी असल्याने ती कुणाच्याही सोबत घडू शकते. त्यामुळे त्याच्या जागी कुणीही स्वत:ला ठेवू शकतो. म्हणूनच त्याचा संघर्ष आपलाच संघर्ष होतो. त्याच्यासोबत आपणही विचार करत राहतो की, 'अरे अमुक करायला हवं.. तमुक करायला हवं!' तो ते 'अमुक-तमुक' सगळं करतो. कधी त्यात यशस्वी होतो, तर कधी होत नाही.
तो मुंबईत राहणारा एक सामान्य तरुण आहे. एक नोकरदार. त्याचा रोजचा संघर्ष सकाळी लोकलमध्ये शिरण्यापासून रात्री लोकलमधून उतरेपर्यंत चालू असतो आणि त्याची रोजची धावपळही तशीच, घड्याळ्याच्या काट्याशी स्पर्धा करणारी असते. त्यालाही ऑफिसमधली एक मुलगी (गीतांजली थापा) आवडत असते. त्यांची आपल्यासारखीच सामान्य स्वप्नं आणि अपेक्षा असतात आणि त्या दोघांच्याही खिश्यात तितकेच पैसे असतात जितके आपल्यापैकी बहुतेकांच्या खिश्यांत असतात.
'राजकुमार राव'च्या अभिनय क्षमतेला न्याय देणाऱ्या भूमिका त्याला सतत मिळत आहेत आणि तो मिळणाऱ्या प्रत्येक संधीचं चीज करण्यासाठी हर तऱ्हेची मेहनत घेतो हे जाणवतं. आजपर्यंत केलेल्या प्रत्येक सिनेमातली प्रत्येक भूमिका त्याने एकाच प्रामाणिकपणे केलेली आहे. अगदी 'हमारी अधुरी कहानी' सारख्या टुकारकीतही त्याने त्याच्याकडून १००% दिलं आहे. 'ट्रॅप्ड'मध्येही त्याने स्वत:च्या सुटकेची धडपड कमालीच्या ताकदीने दाखवली आहे.

ईशान्येच्या राज्यांतून मुख्य प्रवाहातील सिनेमाविश्वात आजपर्यंत खूप कमी लोक आले आहेत. अ‍ॅण्ड्रिआ तरिआंग, गीतांजली थापा ही नावं म्हणूनच खूप महत्वाची आहेत. छोटीशीच भूमिका असली तरी गीतांजली आपली छाप सोडते. तिच्या चेहऱ्यात, व्यक्तीमत्वात एक प्रकारचा खट्याळपणा आहे.

सिनेमा 'लो बजेट' असला तरी तांत्रिक सफाईत कुठेही कमी पडत नाही. बाल्कनीतून खाली उतरण्याचा प्रयत्न करतानाचं कॅमेरावर्क (सिद्धार्थ दिवाण) कुठल्याही चमत्कृतीविना असलं, तरी जबरदस्त आहे. तसंच विविध प्रसंगांत घेतलेले कॅमेऱ्याचे विशिष्ट कोनही जमून आले आहेत. एखाद्या कोपऱ्यात गोणपाटासारखा कॅमेरा पडून राहून आपल्या सहनशीलतेचा अंत पाहत नाही की गरगर फिरून किंवा झूम इन-आउटचे अंगावर येणारे खेळही तो करत नाही.
त्याचप्रमाणे 'आलोकनंदा दासगुप्ता' ह्यांचं पार्श्वसंगीत प्रत्येक प्रसंगाची तीव्रता अजून वाढवतं.
'साउंड डिझाईन' ह्या भागात गेल्या काही वर्षांत एकूणच भारतीय सिनेमा खूप काही करतो आहे, असं जाणवत आहे. ट्रॅप्ड' त्यालाही अपवाद नाहीच.'उडान'मुळे दिग्दर्शक 'विक्रमादित्य मोटवाने'ला नावारूपास आणलं. विविध पुरस्कारांनी नावाजलेल्या 'उडान' नंतर आलेला 'लुटेरा' मात्र आला तसा गेला. कुणीही त्याची विशेष नोंद घेतली नाही. त्यानंतर चार वर्षांनंतर आता 'ट्रॅप्ड' आला आहे. 'ट्रॅप्ड'च्या कथानकात व्यावसायिक यश देणारा कुठलाही मालमसाला नाही. त्यात कुठला सामाजिक आशयही नाही आणि ही कहाणी 'शहरी' असल्यानेही नजरेत भरणारंही काही नाही. त्यात फक्त एक आव्हान आहे. ते स्वीकारण्याचा दम 'वि.मो.'नी दाखवला आहे. हे नक्कीच सोपं नसावं. एका मेजर फ्लॉपनंतर पुन्हा नव्याने एका अ-व्यावसायिक आव्हानाला सामोरं जाणं आणि ते यशस्वीपणे पेलणं, हे केवळ थोर आहे ! 'अनुराग कश्यप' ह्या एका 'फॅण्टम'ने ते 'बॉम्बे वेलवेट' नंतर 'रमन राघव २.०' करून केलं आणि आता ह्या दुसऱ्या 'फॅण्टम' ते 'ट्रॅप्ड'द्वारे केलंय. ह्या हिंमतीची खरोखरच दाद द्यायला हवी. कारण 'जाणकार' आणि 'रसिक' लोकांचा एक प्रचंड मोठा गट 'भारतीय सिनेमा म्हणजे दुय्यमच' ह्या ठाम मताचा आहे. चांगला सिनेमा बनवला, तरी ह्या लोकांना चित्रपटगृहाकडे ओढून आणणं शक्य नाहीय. 'चांगला असेल तर डाउनलोड करून पाहू', इथपर्यंत ह्यांचा पूर्वग्रह पोहोचलेला असल्याने सेन्सिबल भारतीय सिनेमाला भरभरून प्रतिसाद मिळणं कठीणच आहे. नेहमीच्या प्रेक्षकांची आवड खूपच भिन्न असताना आणि सुजाण प्रेक्षकांत एक प्रकारची अनास्था असतानाही आपली प्रयोगशीलता जपणं मोठं जोखमीचं आहे.
व्यावसायिक गणित काळजीपूर्वक मांडणं ह्या जोखमीसाठी खूप आवश्यक. 'रमन राघव २.०' फक्त ३ कोटींत बनवला होता आणि आता 'ट्रॅप्ड' तर फक्त अडीच कोटींत बनवला आहे. गणित इथेच जवळजवळ सुटल्यातच जमा आहे, पण पूर्णपणे सुटलेलं नाही !

असो ! नक्कीच, 'ट्रॅप्ड' आणि त्या कुटुंबातले आत्तापर्यंत येऊन गेलेले आणि येणार असलेले सिनेमे हळूहळू लोकांच्या डोळ्यांवरची झापडं बाजूला करतील. भारतीय सिनेमाला तथाकथित 'रसिक' भारतीय प्रेक्षक त्यांचा अंधविरोध किंवा पूर्वग्रह सोडून गांभीर्याने पाहतील. भारतीय सिनेमा म्हणजे फक्त चोप्रा, बडजात्या, शेट्टी किंवा सलमान आणि शाहरुख नाहीत. मोठ्या संख्येने लोक आहेत जे वेगळा विचार करत आहेत. असेही आहेत जे बदलत आहेत.
कधी तरी त्यांच्याही मेहनतीचं चीज होईल. लोकांची पाउलं सिनेमाकडे वळतील. लोकांच्या पूर्वग्रहाच्या कैदेत 'ट्रॅप्ड' असणाऱ्या भारतीय सिनेमाने जर त्यातून स्वत:ची सुटका करून घेतली, तर ती एक असामान्य सुटका असेल आणि मला खात्री आहे की ही सुटका होणारच !

कारण परिस्थिती कितीही बिकट असली, तरी तहान-भूक तर लागतेच, तसंच सिनेमा कितीही प्रामाणिक असला तरी त्याने पैसाही कमवावा लागतोच !

रेटिंग - * * * * *

- रणजित पराडकर

Thursday, March 30, 2017

निरागसतेची रंगीत स्वप्नपूर्ती - धनक (Movie Review - Dhanak)

कैसे आकाश में सूराख़ हो नहीं सकता
एक पत्थर तो तबीयत से उछालो यारो

ह्या दुष्यंत कुमारांच्या ओळींत एक अशक्य ग्लोरिफिकेशन आहे. 'आकाश में सूराख'. 'आकाश' जे स्वत:च एक आभास आहे, त्याला छेद देण्याची बात करतो आहे कवी. अशक्यच आहे. पण जे लिहिलंय तेच सांगायचं असेल, तर तो कवी कसला ? ह्या दोन ओळींतून दुष्यंत कुमार परिस्थितीला बेडरपणे भिडण्याचा जो संदेश देतात, हा तोच संदेश आहे जो गुरु गोविंदसिंग घारीशी भिडणाऱ्या चिमणीच्या कल्पनेतून देतात.
अशक्यप्राय दिसणाऱ्या एखाद्या ध्येयाचा माग सगळेच घेत नसतात. २००६ साली ऑस्ट्रेलियाने ५० षटकांत ४३४ धावा केल्या तेव्हा कुणाला वाटलं होतं की समोरचा दक्षिण आफ्रिकेचा संघ ते अशक्यप्राय वाटणारं आव्हान यशस्वीपणे पेलेल ? पण त्यांनी ते करून दाखवलं. अर्थात, ह्या पाठलागात काही पद्धत होती, त्याचं काही शास्त्र असू शकतं.
मात्र जेव्हा एक १०-११ वर्षांची मुलगी घरी कुणालाही न सांगता स्वत:च्या ८ वर्षाच्या अंध भावाला सोबत घेऊन एका अपरिचित असामीला केवळ त्याने केलेल्या एका सामाजिक अभियानाच्या जाहिरातीचा संदर्भ घेऊन भावाच्या उपचारासाठी मदत मागण्यासाठी निघते, तेव्हा त्यामागे केवळ वेडेपणाच असतो. वेडेपणा म्हणा, पोरकटपणा म्हणा, मूर्खपणाही म्हणा. पणे तेही एक वास्तव आहेच. असतात की, वेडे, पोरकट किंवा मूर्ख लोकही. लहान मुलं तर असतातच ! 'वास्तव' म्हणजे नेहमीच भडक किंवा भयानक नसतं. 'वास्तव' म्हणजे हिंसा किंवा विकृतीचं अतिरंजनच नसतं. 'वास्तव' संघर्षमय असतं, तरीही ते आनंददायी असू शकतं. कसं ? हे समजण्यासाठी 'धनक' पाहा.

राजस्थानमधल्या एका लहानश्या दुर्गम खेड्यात राहणारे 'परी' (हेतल गाडा) आणि 'छोटू '(क्रिश छाब्रिया). आई-वडील एका दुर्घटनेत मरण पावल्यावर चाचा-चाचीकडे (विपिन शर्मा-गुलफाम खान) राहत असतात. दोघे बहिण-भाऊ एकमेकांवर जीवापाड प्रेम करतात. इतके की, भावासोबत त्याच्या वर्गात राहता यावं म्हणून हुशार असूनही परी दोन इयत्ता मुद्दाम नापास होते ! एका आजारपणात अपुरा आहार मिळाल्यामुळे हळूहळू करत दृष्टिहीन झालेल्या छोटूच्या डोळ्यांच्या उपचाराचा खर्च करण्यासाठी निरुद्योगी चाचा असमर्थ असतो आणि कजाग चाची तयार नसते. नेत्रदान अभियानाच्या एका जाहिरातीचं पोस्टर पाहून परी ठरवते की तिच्या आवडत्या शाहरुख खानला मदतीसाठी साकडे घालायचं. जवळजवळ ३०० किमी.वर असलेल्या जैसलमेरजवळच्या एका गावात शाहरुख खान शूटिंग करतो आहे, हे तिला समजतं आणि असहाय्य चाचा व फारशी आपुलकी नसलेल्या चाचीला काहीही न सांगता ती छोटूला घेऊन घरून निघते.
रस्ता माहित नाही, नेमका पत्ता ठाऊक नाही, प्रवासाची कुठलीही थेट सुविधा नाही, जवळ फारसे पैसे नाहीत, काही सामान नाही, असा हा प्रवास. त्यांना ह्या प्रवासात वेगवेगळे लोक भेटतात, अनुभव मिळतात. इंद्रधनुष्याच्या विविध रंगछटांप्रमाणे हा प्रवास आहे. ज्यादरम्यान आपल्याला 'रंगीला राजस्थान' दिसून येतो. रंगीबेरंगी कपड्यांतले लोक, त्यांच्या वागण्या-बोलण्याची ढब आणि राजस्थानी संस्कृतीचं दर्शनही सिनेमा घडवतो.

ह्या सगळ्यामुळे सिनेमा धीमा झाला आहे. खरं पाहता कथानक खूप मर्यादित आहे. त्याला अजून रंजक करता आलं असतं. थरारकही करता आलं असतं. पण मग त्यातला साधेपणा आणि मुख्य म्हणजे निरागसपणा हरवला असता. आणि सिनेमा नागेश कुकुनूरचा असल्याने इथे थरार आणि रंजकतेपेक्षा साधेपणा आणि निरागसतेला इतर लोकांच्या सिनेमांतल्यापेक्षा जास्त महत्व मिळतं. बहिण-भावातलं घट्ट प्रेम, त्यांच्यातला निष्पापपणा पुन्हा पुन्हा जाणवत राहतो. त्यांना ह्या प्रवासात काही अडचणीही येतात. पण त्यांचा निरागसपणा आणि निष्पापपणा त्यांना त्यातून बाहेर काढतो.
प्रवासावर जरी अनिश्चिततेचं सावट असलं, तरी सतत एक सकारात्मकता जाणवत राहते. रखरखीत वाळवंट, रणरणती उन्हं, निर्जन रस्ते असं सगळं डोळ्यांना दिसत असलं, तरी त्यातून कुठलीही भयाणता अंगावर येत नाही. छायाचित्रणातली ही सकारात्मकता जपल्याबद्दल चिरंतन दास ह्यांचं विशेष अभिनंदन करायला हवं.
तसाच विशेष उल्लेख आवश्यक आहे संगीतकार तपस रेलीयाचा. राजस्थानी लोकसंगीताचा अप्रतिम उपयोग त्यांनी संपूर्ण सिनेमात केला आहे. 'चल चले..' हे ओरिजिनल गाणं तर खूपच सुंदर आणि मनात रुंजी घालणारं आहे. 'दमादम मस्त कलंदर' चं रिक्रियेटेड वर्जनही जबरदस्त जमलंय !

हेतल गाडा आणि क्रिश छाब्रिया, ह्या बालकलाकारांनी तर केवळ अप्रतिम काम केलं आहे. गाण्यांना लिपसिंक देतानाही इतकं समजून-उमजून दिलं आहे की २५-२५ वर्षं काम करून सुपरस्टार बनलेल्यांनीही शिकायला हवं ! दोघांचे चेहरे अतिशय बोलके आहेत आणि 'अभिनय करतो आहोत' असं अजिबात जाणवू देत नाहीत.
विपिन शर्मा, गुलफाम खान, राजीव कृष्णन, विभा छिबर, सुरेश मेनन, निनाद कामत सगळेच लहान लहान सहाय्यक भूमिकांत आहेत. ते येतात आणि आपापलं काम चोख करून जातात.


आधीच म्हटल्याप्रमाणे 'धनक' जरा लांबलेला आहे. पण 'वास्तव असंही असतं' अशी एक वेगळी वाट पकडणारा नक्कीच असल्याने deserves an applause, for sure. कारण आयुष्य खरोखरच प्रेम करण्यासारखं असतं. इथे ठायी ठायी नकारात्मकता भरलेली नक्कीच नाही. तसं वाटत असेल, तर दृष्टीकोन बदलायला हवा.

तुम तो कहते थे, ख़ुदा तुमसे ख़फ़ा है 'क़ैसर'
डूबते वक़्त तुझे इक हाथ मिला था, क्या था?

- क़ैसर उल जाफ़री

जळजळीत, हादरवून सोडणाऱ्या वास्तवदर्शनाने निराश वाटत असेल तर, वास्तवदर्शनाचाच एक गुळमाट किंवा गोडगट्ट नव्हे, तर चमचमीत व चविष्ट डोस 'धनक' देईल.

धनक - अंधाराकडून इंद्रधनुष्याकडे !

रेटिंग - * * * *

- रणजित पराडकर
Related Posts Plugin for WordPress, Blogger...