Thursday, March 30, 2017

निरागसतेची रंगीत स्वप्नपूर्ती - धनक (Movie Review - Dhanak)

कैसे आकाश में सूराख़ हो नहीं सकता
एक पत्थर तो तबीयत से उछालो यारो

ह्या दुष्यंत कुमारांच्या ओळींत एक अशक्य ग्लोरिफिकेशन आहे. 'आकाश में सूराख'. 'आकाश' जे स्वत:च एक आभास आहे, त्याला छेद देण्याची बात करतो आहे कवी. अशक्यच आहे. पण जे लिहिलंय तेच सांगायचं असेल, तर तो कवी कसला ? ह्या दोन ओळींतून दुष्यंत कुमार परिस्थितीला बेडरपणे भिडण्याचा जो संदेश देतात, हा तोच संदेश आहे जो गुरु गोविंदसिंग घारीशी भिडणाऱ्या चिमणीच्या कल्पनेतून देतात.
अशक्यप्राय दिसणाऱ्या एखाद्या ध्येयाचा माग सगळेच घेत नसतात. २००६ साली ऑस्ट्रेलियाने ५० षटकांत ४३४ धावा केल्या तेव्हा कुणाला वाटलं होतं की समोरचा दक्षिण आफ्रिकेचा संघ ते अशक्यप्राय वाटणारं आव्हान यशस्वीपणे पेलेल ? पण त्यांनी ते करून दाखवलं. अर्थात, ह्या पाठलागात काही पद्धत होती, त्याचं काही शास्त्र असू शकतं.
मात्र जेव्हा एक १०-११ वर्षांची मुलगी घरी कुणालाही न सांगता स्वत:च्या ८ वर्षाच्या अंध भावाला सोबत घेऊन एका अपरिचित असामीला केवळ त्याने केलेल्या एका सामाजिक अभियानाच्या जाहिरातीचा संदर्भ घेऊन भावाच्या उपचारासाठी मदत मागण्यासाठी निघते, तेव्हा त्यामागे केवळ वेडेपणाच असतो. वेडेपणा म्हणा, पोरकटपणा म्हणा, मूर्खपणाही म्हणा. पणे तेही एक वास्तव आहेच. असतात की, वेडे, पोरकट किंवा मूर्ख लोकही. लहान मुलं तर असतातच ! 'वास्तव' म्हणजे नेहमीच भडक किंवा भयानक नसतं. 'वास्तव' म्हणजे हिंसा किंवा विकृतीचं अतिरंजनच नसतं. 'वास्तव' संघर्षमय असतं, तरीही ते आनंददायी असू शकतं. कसं ? हे समजण्यासाठी 'धनक' पाहा.

राजस्थानमधल्या एका लहानश्या दुर्गम खेड्यात राहणारे 'परी' (हेतल गाडा) आणि 'छोटू '(क्रिश छाब्रिया). आई-वडील एका दुर्घटनेत मरण पावल्यावर चाचा-चाचीकडे (विपिन शर्मा-गुलफाम खान) राहत असतात. दोघे बहिण-भाऊ एकमेकांवर जीवापाड प्रेम करतात. इतके की, भावासोबत त्याच्या वर्गात राहता यावं म्हणून हुशार असूनही परी दोन इयत्ता मुद्दाम नापास होते ! एका आजारपणात अपुरा आहार मिळाल्यामुळे हळूहळू करत दृष्टिहीन झालेल्या छोटूच्या डोळ्यांच्या उपचाराचा खर्च करण्यासाठी निरुद्योगी चाचा असमर्थ असतो आणि कजाग चाची तयार नसते. नेत्रदान अभियानाच्या एका जाहिरातीचं पोस्टर पाहून परी ठरवते की तिच्या आवडत्या शाहरुख खानला मदतीसाठी साकडे घालायचं. जवळजवळ ३०० किमी.वर असलेल्या जैसलमेरजवळच्या एका गावात शाहरुख खान शूटिंग करतो आहे, हे तिला समजतं आणि असहाय्य चाचा व फारशी आपुलकी नसलेल्या चाचीला काहीही न सांगता ती छोटूला घेऊन घरून निघते.
रस्ता माहित नाही, नेमका पत्ता ठाऊक नाही, प्रवासाची कुठलीही थेट सुविधा नाही, जवळ फारसे पैसे नाहीत, काही सामान नाही, असा हा प्रवास. त्यांना ह्या प्रवासात वेगवेगळे लोक भेटतात, अनुभव मिळतात. इंद्रधनुष्याच्या विविध रंगछटांप्रमाणे हा प्रवास आहे. ज्यादरम्यान आपल्याला 'रंगीला राजस्थान' दिसून येतो. रंगीबेरंगी कपड्यांतले लोक, त्यांच्या वागण्या-बोलण्याची ढब आणि राजस्थानी संस्कृतीचं दर्शनही सिनेमा घडवतो.

ह्या सगळ्यामुळे सिनेमा धीमा झाला आहे. खरं पाहता कथानक खूप मर्यादित आहे. त्याला अजून रंजक करता आलं असतं. थरारकही करता आलं असतं. पण मग त्यातला साधेपणा आणि मुख्य म्हणजे निरागसपणा हरवला असता. आणि सिनेमा नागेश कुकुनूरचा असल्याने इथे थरार आणि रंजकतेपेक्षा साधेपणा आणि निरागसतेला इतर लोकांच्या सिनेमांतल्यापेक्षा जास्त महत्व मिळतं. बहिण-भावातलं घट्ट प्रेम, त्यांच्यातला निष्पापपणा पुन्हा पुन्हा जाणवत राहतो. त्यांना ह्या प्रवासात काही अडचणीही येतात. पण त्यांचा निरागसपणा आणि निष्पापपणा त्यांना त्यातून बाहेर काढतो.
प्रवासावर जरी अनिश्चिततेचं सावट असलं, तरी सतत एक सकारात्मकता जाणवत राहते. रखरखीत वाळवंट, रणरणती उन्हं, निर्जन रस्ते असं सगळं डोळ्यांना दिसत असलं, तरी त्यातून कुठलीही भयाणता अंगावर येत नाही. छायाचित्रणातली ही सकारात्मकता जपल्याबद्दल चिरंतन दास ह्यांचं विशेष अभिनंदन करायला हवं.
तसाच विशेष उल्लेख आवश्यक आहे संगीतकार तपस रेलीयाचा. राजस्थानी लोकसंगीताचा अप्रतिम उपयोग त्यांनी संपूर्ण सिनेमात केला आहे. 'चल चले..' हे ओरिजिनल गाणं तर खूपच सुंदर आणि मनात रुंजी घालणारं आहे. 'दमादम मस्त कलंदर' चं रिक्रियेटेड वर्जनही जबरदस्त जमलंय !

हेतल गाडा आणि क्रिश छाब्रिया, ह्या बालकलाकारांनी तर केवळ अप्रतिम काम केलं आहे. गाण्यांना लिपसिंक देतानाही इतकं समजून-उमजून दिलं आहे की २५-२५ वर्षं काम करून सुपरस्टार बनलेल्यांनीही शिकायला हवं ! दोघांचे चेहरे अतिशय बोलके आहेत आणि 'अभिनय करतो आहोत' असं अजिबात जाणवू देत नाहीत.
विपिन शर्मा, गुलफाम खान, राजीव कृष्णन, विभा छिबर, सुरेश मेनन, निनाद कामत सगळेच लहान लहान सहाय्यक भूमिकांत आहेत. ते येतात आणि आपापलं काम चोख करून जातात.


आधीच म्हटल्याप्रमाणे 'धनक' जरा लांबलेला आहे. पण 'वास्तव असंही असतं' अशी एक वेगळी वाट पकडणारा नक्कीच असल्याने deserves an applause, for sure. कारण आयुष्य खरोखरच प्रेम करण्यासारखं असतं. इथे ठायी ठायी नकारात्मकता भरलेली नक्कीच नाही. तसं वाटत असेल, तर दृष्टीकोन बदलायला हवा.

तुम तो कहते थे, ख़ुदा तुमसे ख़फ़ा है 'क़ैसर'
डूबते वक़्त तुझे इक हाथ मिला था, क्या था?

- क़ैसर उल जाफ़री

जळजळीत, हादरवून सोडणाऱ्या वास्तवदर्शनाने निराश वाटत असेल तर, वास्तवदर्शनाचाच एक गुळमाट किंवा गोडगट्ट नव्हे, तर चमचमीत व चविष्ट डोस 'धनक' देईल.

धनक - अंधाराकडून इंद्रधनुष्याकडे !

रेटिंग - * * * *

- रणजित पराडकर

1 comment:

  1. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...