Saturday, April 29, 2017

अ‍ॅक्शनपॅक्ड थरारनाट्याचा ४४० व्होल्ट्सचा झटका - बाहुबली - द कन्क्ल्युजन (Movie Review - Bahubali - The Conclusion)

'बाहुबली-२'चं कथानक मी सांगणार नाही. ते जाणून घ्यायचीच उत्सुकता असेल, तर हा लेख वाचू नये !

बाहुबली-१, मोहेंजोदडो आणि आता बाहुबली-२ अश्या सिनेमांमुळे भारतीय सिनेमा परदेशी (हॉलीवूड) सिनेमापेक्षा किती पिछाडलेला आहे, अश्या तुलनांना ऊत आला.

मुळात बॉलीवूड आणि हॉलीवूड ही तुलनाच अगदी अप्रस्तुत आहे. हॉलीवूड सिनेमांना किती स्क्रीन्सचं ओपनिंग मिळतं आणि आपल्याकडे जास्तीत जास्त जरी कुणाला मिळालं तरी ते किती स्क्रीन्सचं असतं, दोन्हीचं मार्केट किती आहे, अश्या बाबींचा विचार केल्यास दोन्हीच्या बजेटमध्ये तफावत न आली तरच नवल. अन्यथा, तांत्रिक सफाईदार सिनेमा आपण बनवू शकत नाही असं अजिबात नाही. हॉलीवूडचे व्हीएफएक्ससुद्धा प्रामुख्याने भारतात किंवा भारतीय तंत्रज्ञांनीच केलेले असतात.
हे झालं स्पेशल इफेक्ट्स व इतर तांत्रिक सफाईबाबत. आता दुसरा मुद्दा.
'बॉलीवूड म्हणजे मुख्यत्वेकरून मसालापट. इथे १०० सिनेमांच्या मागे एखादा 'मसान' बनतो' असं काहीसं बऱ्याच जणांचं मत असतं. मी म्हणतो, तुम्ही शंभरपैकी पन्नास तर बघा. मग तुमचं तुम्हालाच समजेल की हे प्रमाण 'शंभरपैकी एक'पेक्षा खूपच जास्त आहे !
सिनेमा, नाटक किंवा कुठलीही कला ही त्या त्या समाजाचं रिप्रेझेंटेशन असते. सिनेमा तर खूपच स्पष्ट रिफ्लेक्शन असतं समाजाचं. समाज कसा विचार करतो, ह्यावर सिनेमा बदलतो, असं मला वाटतं. इथला समाज अजून हुंडा, ऑनर किलिंग, जातीद्वेष वगैरेंत गुंतलाय, पिछाडलाय. सिनेमा बनवणारेसुद्धा ह्याच समाजाचे प्रोडक्ट्स आहेत. शहरात राहून, एका अतिशय सुरक्षित वातावरणात वाढून एका अपरिपक्व समाजाचं प्रतिनिधित्व फुटकळ ठरवणं, हे चूक आहे. आपला चित्रपट त्याच त्या विषयांत गुरफटला आहे कारण आपला समाज त्याच त्या समजांत अडकलाय. आपला चित्रपट ढिसाळ आहे कारण आपला समाज विस्कळीत आहे. आपला चित्रपट उथळ आहे कारण आपला समाज अपरिपक्व आहे. ह्या समाजाला त्याच्या आवडीनुसार चित्रपट देणं, हा धंदा आहे. इथे भावनाप्रधानता प्रायोरिटीला आहे आणि तीच असावी. आपले विचार, अापले प्रश्न आणि प्रायोरिटीज ज्या आहेत, तसा आपला सिनेमा आहे. समाज ओव्हरनाईट बदलणार नाही, चित्रपटही ओव्हरनाईट बदलत नाही. पण हळूहळू खूप सकारात्मक बदल होत आहेत. समाजातही आणि चित्रपटातही.
सिमिलरली, हॉलिवूडचा सिनेमा तसा आहे, जसा त्यांचा टार्गेट समाज आहे. दोघांची आपसांत तुलना करुन सरसकट दोन्हीपैकी कुणा तरी एकाला फुटकळ मानणं, हे फक्त आंधळेपणाचं लक्षण आहे. आणि आंधळेपणा फक्त अंधारामुळेच येतो असं नाही, खूप जास्त एक्स्पोजरमुळेही येतो.
मसान, दम लगा के हैशा, दंगल, तारे जमीं पर, पा, बुद्ध इन ट्रॅफिक जॅम वगैरे सिनेमे आपल्याकडेच बनतील. मान्य आहे की जास्त सिनेमे वाईट असतात, पण जे चांगले असतात त्यांचं कौतुक नाही तर किंमत तरी करायला हवी. आणि मी हे फक्त पटकन जे आठवले आणि तेही नव्यातले सिनेमे सांगितले. विचार केला तर अजूनही आठवतील.
असो. नमनाला घडाभर तेल झालंय !

'बाहुबली' म्हणजे भव्यता, स्पेशल इफेक्ट्स, थरारक युद्धदृश्यं, नाट्य आणि टिपिकल दाक्षिणात्य शैलीची थोडीशी हवीहवीशीच ओव्हरअ‍ॅक्टिंग अशी माझी अपेक्षा होती, जी पूर्ण झाली ! भव्यतेमध्ये सिनेमा कुठेच कमी पडत नाही. मोठमोठे सेट्स, दाही दिशांनी फिरणारा कॅमेरा, अप्रतिम रंगसंगती हे सगळं स्तिमित करणारं आहे. स्पेशल इफेक्ट्स - पहिल्या भागाप्रमाणेच - काही ठिकाणी बऱ्यापैकी फसलेले आहेत, पण बहुतांश ठिकाणी केवळ कमाल केली आहे ! युद्धदृश्यंसुद्धा पहिल्या भागाप्रमाणेच फसली/ जमली आहेत, पण त्यांचाही एकंदर परिणाम चित्तथरारकच आहे. नाट्याच्या बाबतीत मात्र हा दुसरा भाग पहिल्या भागाच्या काही पाउलं पुढेच गेला आहे. पहिल्या भागाचं कथानक अंमळ बाळबोध वाटलं होतं, इथे त्याचा वेग, वळणं वेगळी आहेत आणि सरसही. 'कटप्पाने बाहुबलीला का मारलं', ह्याचं उत्तर अपेक्षाभंग करणारं नाहीय, हे विशेष. कारण ह्या एका उत्तरासाठीची उत्सुकता इतकी शिगेला पोहोचली होती, की जर ते उत्तर तर्कशून्य असतं, तर अख्खा सिनेमाच कोलमडून पडला असता ! 'दाक्षिणात्य शैलीची थोडीशी हवीहवीशी ओव्हरअ‍ॅक्टिंग' मात्र इथे औषधापुरतीच आहे. सुरुवातीचा काही भाग जराशी बाष्कळ विनोदनिर्मिती करण्यात गेला आहे, पण तो भागही तरीही बऱ्यापैकी मनोरंजक आहे. संगीत मात्र कमजोर बाजू ठरलेलं आहे. जी काही ३-४ गाणी आहेत, ती अजिबात लक्षात राहण्यासारखी तर नाहीतच, पण 'कधी एकदा संपतायत' असं वाटावं, इतकी नीरस आहेत.
तमन्नाच्या पंख्यांसाठी अपेक्षाभंग आहे कारण ती केवळ २-३ प्रसंगांत दिसते. पण अनुष्का शेट्टीच्या पंख्यांसाठी मात्र पर्वणी आहे ! ती फक्त 'दिसत'च नाही, तर मोहवते ! तिच्या अप्रतिम सौंदर्याला तितक्याच दमदार अभिनयाचीही जोड आहे, हे विशेष. युद्धदृष्यांतलाही तिचा वावर खूप सहज वाटतो. प्रभास, राणा दग्गुबाती, राम्या, सत्य राज, नासर ह्या सगळ्यांचीच कामं उत्तम झालेली आहेत. नासर आणि सत्य राज तर व्हेटरनच आहेत. तर 'प्रभास' सिनेमाचं केंद्रस्थान. पण 'राणा दग्गुबाती' हे एक सुखद आश्चर्य आहे ! धिप्पाड शरीरयष्टीवाल्या नटांची टिपिकल 'ठोकळा' इमेज तोडणारा हा नट आहे. महान अभिनय वगैरे तो करत नाही, पण लक्षवेधी नक्कीच ठरतो आणि त्याच्या जबाबदारीत कुठेही कमी पडत नाही. 'द गाझी अटॅक' मधलंही त्याचं काम मला आवडलं होतं आणि इथलंही आवडलंय.
'मनोज मुन्तशीर' ह्यांनी लिहिलेली गाणी सपशेल उथळ वाटली, तरी त्यांनी लिहिलेले संवाद मात्र मस्त जमून आलेले आहेत. ३-४ जागांवरच्या पंचलाईन्स तर कमालीच्याच आहेत ! ह्या एका बाबतीतही दुसरा भाग पहिल्यापेक्षा सरस आहे.

गेल्या साठ-सत्तर वर्षांचा विचार केला तर भारतीय सिनेमाचा प्रवास डोळे दिपवून टाकणारा आहे. I know there is still a long way to go, पण गेल्या वीस वर्षांत भारतीय सिनेमाने अक्षरश: कात टाकलेली आहे. मला कुणाचीही स्पेसिफिक नावं घ्यायची नाहीयत. पण किमान १५-२० दिग्दर्शक असे आहेत, जे काळानुरूप किंवा काळाच्या पुढचा विचार करतात. 'एस. राजामौली' हे त्यांच्यापैकी एक नक्कीच आहेत. आजच्या काळात, जेव्हा सिनेमा इंडस्ट्री प्रचंड आर्थिक विवंचनेत आहे, एक इतक्या मोठ्या बजेटचा सिनेमा करणं, तोही स्थानिक भाषेत आणि त्याला ह्या खंडप्राय देशात लोकप्रिय करून सगळे रेकॉर्ड्स मोडणं, ही किमया फक्त मार्केटिंगची असू शकत नाही. प्रोडक्टही तितकं सशक्त आहे, म्हणूनच हे शक्य झालं आहे. 'बाहुबली' हे फक्त दिग्दर्शक राजामौली ह्यांचं ड्रीम प्रोजेक्ट नाही, हे माझ्यासारख्या लाखो-करोडो चित्रपटरसिकांचंही ड्रीम प्रोजेक्ट आहे ! हे स्वप्न स्वत: राजामौली गेली काही वर्षं जगतच असावेत, तीन तासांच्या खेळात आपणही ते नक्कीच जगतो. पण जर भारतीय चित्रपट प्रेक्षक हा मठ्ठच आहे आणि त्याला हातोहात बनवून सिनेमातून करोडो रुपये सहज मिळवले जाऊ शकतात, असा बाळबोध समज अगदी ठामच असेल तर तो ज्याचा त्याला लखलाभ ! माझ्या दृष्टीने तरी राजामौली अभिनंदनास पूर्णपणे पात्र आहेत !

To conclude the conclusion, तुलनात्मक दृष्ट्या विचार केल्यास, दुसऱ्या भागाने पहिल्या भागावर बहुतांश बाबतींत मात केलेली आहे. बाहुबलीचं हे कन्क्ल्युजन अ‍ॅक्शनपॅक्ड थरारनाट्याचा एक ४४० व्होल्ट्सचा झटका आहे. हा भारतीय मसालापटाने घेतलेला एक वेगवान टेक ऑफ आहे. अजून बराच मोठा पल्ला गाठायचा आहे, पण हा टेक ऑफ पाहता, कुठलाही पल्ला आवाक्याबाहेर नक्कीच नाही, हा विश्वास वाटतो आहे !

रेटिंग - * * * *

- रणजित पराडकर


Monday, April 17, 2017

सुश्राव्य, पण बेजान - बेगम जान (Movie Review - Begum Jaan)

सीमाभागापासून शेकडो मैलांवर राहणारे आणि स्वातंत्र्यानंतरच्या अनेक दशकांत श्वास घेणारे आपण, ह्या स्वातंत्र्याची किंमत काही लोकांसाठी किती भयंकर होती, हे समजू शकत नाही.
गुलजार साहेबांच्या 'माचीस'मध्ये (बहुतेक) एक संवाद आहे. ज्यात (पुन्हा बहुतेक) ओम पुरी म्हणतो की, "लहानपणी शाळेत एक प्रश विचारला गेला की 'स्वातंत्र्य कसं मिळालं ?' कुणी म्हणालं, अहिंसेने. कुणी म्हणालं, गांधींजींमुळे. मी म्हटलं, 'खूनखराबेसे.. खूनखराबेसे मिली आजादी !'"
फाळणीमुळे देशोधडीला लागलेल्या असंख्य कुटुंबांची हीच व्यथा आहे. त्यांची कहाणी आपल्याकडे अनेक सिनेमांत आली. हिटलर आणि त्याच्या 'हॉलोकास्ट'वर आधारलेले जितके प्रभावी परदेशी सिनेमे झाले, तितके 'फाळणी'वरचे आपल्याकडे नाही झाले. बहुतेक वेळी 'फाळणी' हे एक जोडकथानकच राहिलं. जोडकथानक असलं, तरी हरकत नाही. पण त्याचा प्रभाव म्हणावा तसा पडला नाही. खरं तर 'फाळणी' ही एक प्रचंड मोठी आणि हादरवून सोडणारी घडामोड होती, जी आपल्या इतिहासाने 'जस्ट अनदर थिंग' करून ठेवलीय. किंबहुना, स्वातंत्र्याच्या अतिरंजित आनंदसोहळ्यासमोर हे एक रक्तरंजित वास्तव सर्वशक्तिमान देवाच्या मंदिराच्या पायरीवर बसलेल्या एखाद्या महत्पीडीत व्यक्तीसारखं राहिलं आहे, जिच्याकडे पाहूनही न पाहिल्यासारखं केलं जातं किंवा अगदीच कुणी हळहळलं, तर चिल्लर किंवा तत्सम काही तरी देऊन लाचार माणुसकीची फसवणूक केली जाते. आपल्या सिनेमानेही ह्यापासून सुरक्षित अंतरच राखलं आहे. जेव्हा जेव्हा 'फाळणी'चा विषय सिनेमात आला, तेव्हा तेव्हा तथाकथित अभिव्यक्ती स्वातंत्र्याने इतिहासावरची पुटं झटकणे किंवा चेहऱ्यांवरचे मुखवटे फाडण्याचा प्रयत्न न करता व्यावसायिक गणितांना सोडवून बचावात्मक पवित्राच घेतला आहे, हातचं राखूनच ठेवलं आहे

'बेगम जान'च्या कथानकाचा प्राणही 'फाळणी'तच आहे, पण पूर्वसुरींच्या पाउलावर पाउल टाकत, हाही सिनेमा त्याकडे गांभीर्याने लक्ष न देता, बाकीच्या फापटपसाऱ्यातच अधिक रमतो.

स्वातंत्र्याचं वारं वाहत असताना पंजाब भागातील सुजाण सामान्य जनतेत एक प्रकारची असुरक्षितता वाढत चालली आहे. मुस्लीम लीगला पाकिस्तान आणि काँग्रेसला हिंदुस्थान दिला जाणार, देशाची फाळणी होणार, ह्याचे संकेत मिळत आहेत. हिंदू-मुसलमान दंगेही देशाच्या विविध भागांत सुरु झाले आहेत. पण कुठे तरी एक आशा सर्वांच्या मनात आहे की आपले राष्ट्रीय नेतृत्व असं काही होऊ देणार नाहीच. ह्यावर तोडगा निघेल. दुर्दैवाने, तसं काही होत नाही आणि 'रॅडक्लिफ लाईन' आखून देशाची फाळणी होते. लोकांच्या भूतकाळ आणि भविष्याच्या मधून एक रेष काढली जाते. त्या रेषेला 'वर्तमानकाळ' म्हटलं जातं आणि उभ्या आयुष्याचा तोल त्या रेषेवर साधता साधता कित्येक लोक बरबाद होतात.
वाटले आयुष्य होते रुंद रस्त्यासारखे
आज कळले चालणे आहे जणू धाग्यावरी
अशी काहीशी त्यांची स्थिती होते.

ही 'रॅडक्लिफ लाईन' गावांना छेदते, जिल्ह्यांना विभागते, माणसांना तोडते आणि घरांना तुडवतेसुद्धा. 'बेगम जान' (विद्या बालन) चा कोठा 'रॅडक्लिफ लाईन'च्या वाटेत येतो. कोठयाच्या मधूनच ही सीमारेषा जाणार असते. तिथे बॉर्डर चेक पोस्ट बनवायचा प्लान असतो. इथल्या आसपासच्या भागात 'रॅडक्लिफ लाईन' नुसार विभाजन करण्याची, सीमारेषा आखण्याची जबाबदारी सोपवली जाते होऊ घातलेल्या दोन देशांच्या दोन अधिकाऱ्यांवर. भारताकडून हर्षवर्धन श्रीवास्तव (आशिष विद्यार्थी) आणि पाकिस्तानसाठी इल्यास खान (रजत कपूर). बेगम जान, तिच्याकडच्या मुली व कोठ्यात राहणारी इतर मंडळी विरुद्ध हर्षवर्धन, इल्यास व संपूर्ण व्यवस्था असा हा संघर्ष आहे. बंगाली सिनेमा 'राजकहिनी' चा रिमेक असलेला 'बेगम जान' हा संघर्ष पोहोचवण्यात खूपच कमी पडतो. किंबहुना, हा संघर्ष दाखवण्यापेक्षा वेश्या, त्यांचा व्यवसाय, त्यांचं भावविश्व आणि त्या अनुषंगाने येणारी काही 'वरिष्ठ प्रमाणपत्र' पात्र दृश्यं दाखवण्यातच जास्त धन्यता मानली जाते. उदाहरणार्थ - कोठ्यातली एक वेश्या आणि तिचाच दलाल ह्यांच्यात प्रेमप्रकरण आणि त्यांच्यातल्या संवादावेळी तिने त्याचा हात स्वत:च्या छातीवर ठेवून 'यह क्या हैं', दोन पायांच्या मध्ये ठेवून 'यह क्या हैं' वगैरे म्हणण्याचे, कथानकाशी काही एक संबंध नसलेले प्रसंग केवळ 'आता बघा हं, आम्ही कसं धाडसी चित्रण करतो' हा पवित्रा दाखवणारे आहेत.
अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे संस्थानांचे खालसा होणे, हीसुद्धा एक महत्वाची घडामोड नीट हाताळता आलेली नाही. जोड-जोडकथानक म्हणूनच ही घडामोड हृषीकेश मुखर्जींच्या 'सत्यकाम'मध्ये आली आहे. त्यात थोड्याश्याच वेळात ते अतिशय प्रभावीपणे दाखवलं आहे. इथे पुन्हा एकदा सिनेमा खूप कमी पडला आहे. एकूणच एका अतिशय वजनदार कथानकाला ढिसाळ, पसरट आणि दिशाहीन पटकथेमुळे विस्कळीत करून त्याचं सगळं वजन वाया घालवलं आहे.
वर म्हटल्यासारखाच एक पवित्रा सर्व स्त्री कलाकारांच्या अभिनयातही जाणवतो. बिनधास्तपणा आणि उच्छृंखलपणा दाखवला की कोठ्यावरची बाई, वेश्या व्यवस्थित पोहोचेल असा काहीसा समज असावा. सगळ्यांचंच मोठमोठ्याने बोलणं आणि भडक भावदर्शन सगळ्याच नाट्याला खूप वरवरचं करून ठेवतं. सिनेमा जरी बंगाली सिनेमाचा त्याच लेखक-दिग्दर्शकाने केलेला हिंदी रिमेक असला, तरी कथानकामुळे मंडी, उमराव जान अश्या काही सिनेमांची आठवण येत राहते. छाप वगैरे काही जाणवत नाही. ती जाणवायला हवी होती. १९४७ सालचा कुंटणखाना आणि २०१७ सालचा कुंटणखाना ह्यातला फरक समजून घ्यायला हवा होता. तो कुठल्याही स्त्री कलाकाराने समजून घेतल्यासारखं अजिबात वाटत नाही.
'विद्या बालन' माझी आजच्या काळातली सगळ्यात आवडती अभिनेत्री आहे. कुठल्याच भूमिकेत 'ती अभिनय करते आहे', असं कधी जाणवलं नाही. इथे मात्र 'आता मी तुम्हाला कोठेवाली सादर करून दाखवते' असं आव्हान स्वीकारूनच ती कॅमेऱ्यासमोर गेली आहे. तिने साकारलेल्या 'बेगम जान'बद्दल कदाचित तिच्यावर खूप स्तुतीसुमनं उधळली जातील, तिला पुरस्कारही मिळतील. 'काही तरी वेगळं केलं', हे आणि इतकंच आजकाल स्तुतीपर होण्यासाठी पुरेसं असतं. तिच्या जोडीने अजूनही कुणाला शाबासक्या मिळतील. पण विद्याचा एक चाहता म्हणून माझी तरी सपशेल निराशा झाली. सिनेमाचं कथानक आधीपासूनच माहित होतं आणि रिमेक असल्यामुळे मूळ सिनेमातल्या उणीवा भरून काढल्या जाऊन एक जबरदस्त सिनेमा आणि जबरदस्त परफॉर्मन्सेस पाहायला मिळतील, अशी जवळजवळ खात्रीच घेऊन मी कदाचित सिनेमा पाहिला असेल म्हणूनच हा अपेक्षाभंग झाला असेल.

सर्व स्त्री कलाकारांच्या अति-अभिनयासमोर चार पुरुष कलाकारांचे अभिनय मात्र भाव खाऊन जातात. (एका स्त्रीवादी सिनेमाची अशीही एक शोकांतिका असू शकते !)
आशिष विद्यार्थी आणि रजत कपूरचे सगळेच प्रसंग जुगलबंदीचेच झाले आहेत. त्यांच्या संवादांच्या वेळी त्यांचे अर्धेच चेहरे दाखवले जाणे, हे जरा वेगळ्या प्रकारचं पण सूचक कॅमेरावर्कही आवडलं. एका प्रसंगात तंबूत बसून एकमेकांशी ते बोलत असताना कॅमेऱ्याच्या फ्रेममध्ये दोघांच्या मधून तंबूचा खांब येतो. तो खांब त्याच्या पार्श्वभूमीवर असलेल्या बेगम जानच्या कोठ्यालाही दोन भागात विभागत असतो, हेही उत्कृष्ट कॅमेरावर्क नजर टिपते. पण ह्या सगळ्यावर दोघांचा अभिनय मात करून उरतो. सूचक, अर्थपूर्ण संवाद आणि त्यांची जबरदस्त फेक. ह्या दोन्ही अनुभवी आणि ताकदवान अभिनेत्यांनी आपापल्या शैलीत आपापल्या व्यक्तिरेखा समर्थपणे साकारल्या आहेत.

चंकी पांडेला बहुतेक तरी प्रथमच एक पूर्णपणे नकारात्मक आणि वेगळी भूमिका मिळाली आहे. हा गुणी अभिनेता क्रूरकर्मा 'कबीर' साकारताना कुठेही कमी पडत नाही. दमदार अभिनय करणारा चौथा पुरुष कलाकार म्हणजे राजेश शर्मा. पोलीस ऑफिसर शाम ह्या व्यक्तिरेखेला फार काही वाव नाहीय, पण जे १-२ आव्हानात्मक प्रसंग त्याच्या वाट्याला आले आहेत, त्यांचं त्याने चीज केलं आहे.
विवेक मुश्रन आणि नसीरुद्दीन शाहसुद्धा आपापली कामं व्यवस्थित करतात. त्यांच्याबाबत आवर्जून सांगावं असं काही नाही.


आवर्जून बोलायला हवं अशी एक गोष्ट आहे, जी आजकाल क्वचितच लाभते किंवा कधी लाभतच नाही, असंही म्हणता येईल.
'संगीत' !
'अनु मलिक' नी दिलेली गाणी खूप गोड चालीची आहेत. कौसर मुनीर ह्यांचे शब्दही अर्थपूर्ण आहेत.

आह निकली हैं यहाँ, आह निकली हैं वहाँ
वाह री वाह यह आज़ादियाँ

गाणं ऐकताना खूप व्याकुळ करतं. खासकरून कोरसमध्ये गायलं जाणारं 'आज़ादियाँ' अंगावर येणारं आहे. तसंच अंगावर येतं 'ओ रे कहारों'. आसामी लोकगीतगायिका कल्पना पटोवारीच्या पहाडी आवाजातले -

झुमके झूमर नाक की कीलें, एक एक करके उतरेंगे गहने
देती हूँ तुझको जो नज़रें चुराके, चुनरी दुआओं की ये रखना तू पहने

सो जा, सो जा गुडिया सो जा
अंखियों से तू ओझल हो जा
ओ रे कहारों डोली उठाओ, पल भर भी ठहरो अब नहीं
ना है बलाएं ना है दुआएं, देने को है अब कुछ नहीं

- हे शब्द हेलावून टाकतात. गाण्याचं चित्रण आणि त्याची जागाही जबरदस्त आहे. हे गाणं सिनेमाचा एक जमून आलेला भाग आहे.

अरिजित सिंगचा आवाज आता अजीर्ण होत चालला असला, तरी त्याच्या आवाजातलं 'मुर्शिदा' गाणं दमदार आहे. इथे जरा मलिक साहेबांचा १९४७ शी संबंध तुटून ते २०१७ त आल्यासारखे वाटतात. कदाचित ते अरिजितच्या आवाजामुळेही असेल, दुसरा एखादा आवाज वापरून पाहायला हवा होता. पण इथेही -

सूखे फूल हैं हाथों में प्यार का मौसम चाहा था
उसने ज़ख्म दिए हमको जिस से मरहम चाहा था
अबके ओस की बूंदों ने दिल में आग लगायी है
दिल पे किसने दस्तक दी, तुम हो या तन्हाई है

- असे अर्थपूर्ण शब्द लक्षात राहता.

'प्रेम मी तोहरे..' तर ह्या अल्बमचा 'युएसपी'च ठरेल. 'वैष्णव जन तो तेने कहिये जे..', 'मी मज हरपून..' ची आणि इतर काही भजनांची ट्रेडिशनल चाल अशीच आहे. पण खूप आवडलंय हे कम्पोजिशन. 'सोलफुल' आहे. बऱ्याच काळानंतर असं गाणं आलंय, जे सिनेमा पाहून बाहेर आल्यानंतर दुसऱ्या दिवशीही मनात वाजत राहिलं. ह्या गाण्याचं एक वर्जन आशा भोसलेंनी आणि एक कविता सेठनी गायलं आहे. आशाबाईंचा आवाज थकलेला वाटतो तर कविता सेठचा आवाज भसाडा. मला स्वत:ला तरी थकलेल्या आवाजातलं असलं, तरी आशाबाईंचंच जास्त भावपूर्ण वाटलंय.

आता है छुप के तू मेरे दर पर घायल दिल और धड़कन बंजर
हल्दी मली जो घाव पे तोहरे हर ज़ख्म मेरा हरा हो गया
ये क्या हो गया
प्रेम में तोहरे ऐसी पड़ी मैं
पुराना ज़माना नया हो गया
ये क्या हो गया..

हे ज्या नजाकतीने त्यांनी गायलं आहे, त्याला तोडच नाहीय.

'आज़ादियाँ' गाण्यात पुन्हा पुन्हा येणारी 'हिंद पे था नाज जिनको वो हैं कहां..' ही ओळ आणि 'वह सुबह हमीं से आयेगी' हे 'फिर सुबह होगी' मधलं 'खय्याम' साहेबांनी संगीतबद्ध केलेलं गीत, ह्या सिनेमाने साहीर लुधियानवींना दिलेल्या मानवंदना आहेत. ही कल्पनासुद्धा खूप आवडली.

लेख बराच लांबला आहे. पण सगळ्यात शेवटी सांगायचं झाल्यास, एक सिनेमा म्हणून 'बेगम जान' खूपच बेजान झाला असला, तरी संवाद (राहत इंदौरी), गीतं (कौसर मुनीर) आणि संगीत (अनु मलिक) हे सिनेमाचे तीन आधारस्तंभ आहेत. ज्यांच्या जोरावर तो स्थिरपणे उभा तरी राहू शकतो आहे. ह्या संगीताला ह्या वर्षी काही महत्वाचे पुरस्कार नक्कीच मिळतील, असंही वाटतंय.

रेटिंग - * * *

- रणजित पराडकर

तू....

सूर तू संगीत तू
स्वप्न तू सत्यात तू
छंद तू धुंदीत तू
दूर तू माझ्यात तू

स्वाद तू आस्वाद तू
स्नेह तू मोहात तू
गंध तू अस्तित्त्व तू
दृश्य तू खोलात तू

आज तू अंदाज तू
मित्र तू सर्वस्व तू
साज तू श्रुंगार तू
यत्र तू सर्वत्र तू

कल्प तू आभास तू
मर्म तू गर्भीत तू
मूर्त तू साक्षात तू
कर्म तू संचीत तू

साध्य तू आरंभ मी
आस तू वर्तूळ मी
ध्येय तू मार्गस्थ मी
तोय तू व्याकूळ मी


....रसप....
१९ जुलै २००८

--------------------

वेग तू आवेग मी
जोम तू उद्ध्वस्त मी
प्राण तू शारीर मी
स्थैर्य तू अस्वस्थ मी

प्रार्थ्य तू अन् स्वार्थ मी
पूर्ण तू चतकोर मी
क्षीर तू नवनीत मी
रम्य तू घनघोर मी

पद्म तू तर भ्रमर मी
सूज्ञ तू ओढाळ मी
मेघ तू अन् मोर मी
सौम्य तू नाठाळ मी

सौर्य तू बेसूर मी
मौज तू बेरंग मी
डौल तू बेताल मी
ऐट तू बेढंग मी


....रसप....
१९ जुलै २००८

(संपादित - १७ एप्रिल २०१७)

Tuesday, April 04, 2017

टेरिफिकली ट्रॅप्ड (Trapped - Movie Review)

भारतीय सिनेमा बदलला आहे. त्याने कात टाकली आहे. आता ह्या सिनेमात कुठल्याही समग्र थिल्लरपणाला स्थान तर राहिलेले नाहीच, पण चतुराईने प्रयोगशील निर्मितीसुद्धा केली जात आहे.

खरं तर अजूनही शोकांतिकेच्या वाटेला सहसा आपण जात नाही आणि गेलोच तर ती शोकांतिका सगळं काही संपवून टाकणारीच असते. भयंकर घटना, डिझास्टर आपल्या सिनेमांत बहुतेक वेळेस तरी लार्जर दॅन लाईफ असते. रामगोपाल वर्मा (सत्या) असो की अनुराग कश्यप (सगळेच) किंवा विशाल भारद्वाज (मक़बूल, हैदर) असो की मणी रत्नम (दिल से, युवा, रावण) किंवा अजून कुणी, आपल्याकडच्या शोकांतिका नेहमीच मृत्यूपर्यंत जाणाऱ्या आणि/ किंवा सगळं काही संपवणाऱ्याच असतात.
पण शोकांतिका ही अशी 'लार्जर दॅन लाईफ'च असते असं नाही. अगदी साधे साधे प्रसंगही शोकांतिकेत बदलू शकतात. लहान लहान शक्यताही मोठी वेदना करू शकतात. छोटीशीच असली तरी तीसुद्धा एक दखलपात्र घटना असू शकते. एक माणूस एखाद्या पूर्णपणे रिकाम्या असलेल्या स्कायस्क्रेपरच्या ३५ व्या मजल्यावरच्या घरात अगदी सहजपणे अडकू शकतो. अश्या वेळी त्याच्याकडे मोबाईल व वीज नसू नसणे हीदेखील एक भयंकर घटना असू शकते. इतकी भयंकर की मदतीसाठी आरडाओरडा करून त्याचा आवाज घश्यातून बाहेर येईनासा होऊ शकतो, तो जखमी होऊ शकतो, मरूही शकतो. परिस्थिती कितीही बिकट असली, तरी तहान आणि भूक तर कधी पिच्छा सोडत नसतातच. जगण्यासाठी, ह्या कैदेतून स्वत:ची सुटका करवून घेण्यासाठी त्याला काहीही करावं लागू शकतं. एका छोट्याश्या चुकीची किंवा किरकोळ अपघाताची त्याला मोठी किंमत मोजावी लागू शकते. इतकीही मोठी नाही की त्याचं आयुष्य संपेल किंवा उद्ध्वस्त होईल, पण इतकी तर नक्कीच झालेला घाव आयुष्यभर जाणवत राहील. त्यामुळे अशी एखादी घटनासुद्धा एखाद्या शोकांतिकेपेक्षा कमी नाहीच.'ट्रॅप्ड'चं कथानक तेव्हढंच आहे जेव्हढं वर सांगितलं. इतकंसंच असलं, तरी बघण्यासारख्या आणि अनुभवण्यासारख्या काही जबरदस्त गोष्टी 'ट्रॅप्ड'मध्ये आहेत.
साधारणपणे ९९% सिनेमात तरी फ्रेममध्ये 'राजकुमार राव'च आहे. त्यातही बहुतांश अधिक भाग तर तो एकटाच आहे आणि त्यातही बहुतांश भाग तो त्या घरातच आहे. तिथून बाहेर निघण्यासाठी आणि बाहेर निघेपर्यंत तग धरण्यासाठी त्याची धडपड बेचैन करणारी वाटते. त्याच्यासोबत घडलेली दुर्घटना खूपच साधीशी असल्याने ती कुणाच्याही सोबत घडू शकते. त्यामुळे त्याच्या जागी कुणीही स्वत:ला ठेवू शकतो. म्हणूनच त्याचा संघर्ष आपलाच संघर्ष होतो. त्याच्यासोबत आपणही विचार करत राहतो की, 'अरे अमुक करायला हवं.. तमुक करायला हवं!' तो ते 'अमुक-तमुक' सगळं करतो. कधी त्यात यशस्वी होतो, तर कधी होत नाही.
तो मुंबईत राहणारा एक सामान्य तरुण आहे. एक नोकरदार. त्याचा रोजचा संघर्ष सकाळी लोकलमध्ये शिरण्यापासून रात्री लोकलमधून उतरेपर्यंत चालू असतो आणि त्याची रोजची धावपळही तशीच, घड्याळ्याच्या काट्याशी स्पर्धा करणारी असते. त्यालाही ऑफिसमधली एक मुलगी (गीतांजली थापा) आवडत असते. त्यांची आपल्यासारखीच सामान्य स्वप्नं आणि अपेक्षा असतात आणि त्या दोघांच्याही खिश्यात तितकेच पैसे असतात जितके आपल्यापैकी बहुतेकांच्या खिश्यांत असतात.
'राजकुमार राव'च्या अभिनय क्षमतेला न्याय देणाऱ्या भूमिका त्याला सतत मिळत आहेत आणि तो मिळणाऱ्या प्रत्येक संधीचं चीज करण्यासाठी हर तऱ्हेची मेहनत घेतो हे जाणवतं. आजपर्यंत केलेल्या प्रत्येक सिनेमातली प्रत्येक भूमिका त्याने एकाच प्रामाणिकपणे केलेली आहे. अगदी 'हमारी अधुरी कहानी' सारख्या टुकारकीतही त्याने त्याच्याकडून १००% दिलं आहे. 'ट्रॅप्ड'मध्येही त्याने स्वत:च्या सुटकेची धडपड कमालीच्या ताकदीने दाखवली आहे.

ईशान्येच्या राज्यांतून मुख्य प्रवाहातील सिनेमाविश्वात आजपर्यंत खूप कमी लोक आले आहेत. अ‍ॅण्ड्रिआ तरिआंग, गीतांजली थापा ही नावं म्हणूनच खूप महत्वाची आहेत. छोटीशीच भूमिका असली तरी गीतांजली आपली छाप सोडते. तिच्या चेहऱ्यात, व्यक्तीमत्वात एक प्रकारचा खट्याळपणा आहे.

सिनेमा 'लो बजेट' असला तरी तांत्रिक सफाईत कुठेही कमी पडत नाही. बाल्कनीतून खाली उतरण्याचा प्रयत्न करतानाचं कॅमेरावर्क (सिद्धार्थ दिवाण) कुठल्याही चमत्कृतीविना असलं, तरी जबरदस्त आहे. तसंच विविध प्रसंगांत घेतलेले कॅमेऱ्याचे विशिष्ट कोनही जमून आले आहेत. एखाद्या कोपऱ्यात गोणपाटासारखा कॅमेरा पडून राहून आपल्या सहनशीलतेचा अंत पाहत नाही की गरगर फिरून किंवा झूम इन-आउटचे अंगावर येणारे खेळही तो करत नाही.
त्याचप्रमाणे 'आलोकनंदा दासगुप्ता' ह्यांचं पार्श्वसंगीत प्रत्येक प्रसंगाची तीव्रता अजून वाढवतं.
'साउंड डिझाईन' ह्या भागात गेल्या काही वर्षांत एकूणच भारतीय सिनेमा खूप काही करतो आहे, असं जाणवत आहे. ट्रॅप्ड' त्यालाही अपवाद नाहीच.'उडान'मुळे दिग्दर्शक 'विक्रमादित्य मोटवाने'ला नावारूपास आणलं. विविध पुरस्कारांनी नावाजलेल्या 'उडान' नंतर आलेला 'लुटेरा' मात्र आला तसा गेला. कुणीही त्याची विशेष नोंद घेतली नाही. त्यानंतर चार वर्षांनंतर आता 'ट्रॅप्ड' आला आहे. 'ट्रॅप्ड'च्या कथानकात व्यावसायिक यश देणारा कुठलाही मालमसाला नाही. त्यात कुठला सामाजिक आशयही नाही आणि ही कहाणी 'शहरी' असल्यानेही नजरेत भरणारंही काही नाही. त्यात फक्त एक आव्हान आहे. ते स्वीकारण्याचा दम 'वि.मो.'नी दाखवला आहे. हे नक्कीच सोपं नसावं. एका मेजर फ्लॉपनंतर पुन्हा नव्याने एका अ-व्यावसायिक आव्हानाला सामोरं जाणं आणि ते यशस्वीपणे पेलणं, हे केवळ थोर आहे ! 'अनुराग कश्यप' ह्या एका 'फॅण्टम'ने ते 'बॉम्बे वेलवेट' नंतर 'रमन राघव २.०' करून केलं आणि आता ह्या दुसऱ्या 'फॅण्टम' ते 'ट्रॅप्ड'द्वारे केलंय. ह्या हिंमतीची खरोखरच दाद द्यायला हवी. कारण 'जाणकार' आणि 'रसिक' लोकांचा एक प्रचंड मोठा गट 'भारतीय सिनेमा म्हणजे दुय्यमच' ह्या ठाम मताचा आहे. चांगला सिनेमा बनवला, तरी ह्या लोकांना चित्रपटगृहाकडे ओढून आणणं शक्य नाहीय. 'चांगला असेल तर डाउनलोड करून पाहू', इथपर्यंत ह्यांचा पूर्वग्रह पोहोचलेला असल्याने सेन्सिबल भारतीय सिनेमाला भरभरून प्रतिसाद मिळणं कठीणच आहे. नेहमीच्या प्रेक्षकांची आवड खूपच भिन्न असताना आणि सुजाण प्रेक्षकांत एक प्रकारची अनास्था असतानाही आपली प्रयोगशीलता जपणं मोठं जोखमीचं आहे.
व्यावसायिक गणित काळजीपूर्वक मांडणं ह्या जोखमीसाठी खूप आवश्यक. 'रमन राघव २.०' फक्त ३ कोटींत बनवला होता आणि आता 'ट्रॅप्ड' तर फक्त अडीच कोटींत बनवला आहे. गणित इथेच जवळजवळ सुटल्यातच जमा आहे, पण पूर्णपणे सुटलेलं नाही !

असो ! नक्कीच, 'ट्रॅप्ड' आणि त्या कुटुंबातले आत्तापर्यंत येऊन गेलेले आणि येणार असलेले सिनेमे हळूहळू लोकांच्या डोळ्यांवरची झापडं बाजूला करतील. भारतीय सिनेमाला तथाकथित 'रसिक' भारतीय प्रेक्षक त्यांचा अंधविरोध किंवा पूर्वग्रह सोडून गांभीर्याने पाहतील. भारतीय सिनेमा म्हणजे फक्त चोप्रा, बडजात्या, शेट्टी किंवा सलमान आणि शाहरुख नाहीत. मोठ्या संख्येने लोक आहेत जे वेगळा विचार करत आहेत. असेही आहेत जे बदलत आहेत.
कधी तरी त्यांच्याही मेहनतीचं चीज होईल. लोकांची पाउलं सिनेमाकडे वळतील. लोकांच्या पूर्वग्रहाच्या कैदेत 'ट्रॅप्ड' असणाऱ्या भारतीय सिनेमाने जर त्यातून स्वत:ची सुटका करून घेतली, तर ती एक असामान्य सुटका असेल आणि मला खात्री आहे की ही सुटका होणारच !

कारण परिस्थिती कितीही बिकट असली, तरी तहान-भूक तर लागतेच, तसंच सिनेमा कितीही प्रामाणिक असला तरी त्याने पैसाही कमवावा लागतोच !

रेटिंग - * * * * *

- रणजित पराडकर
Related Posts Plugin for WordPress, Blogger...