Saturday, July 21, 2018

संक्षिप्त पुनरानुभूती - धडक - (Movie Review - Dhadak)

क़यामत से क़यामत तक़, इशक़जादे, साथिया अश्या काही सिनेमांचं 'सुधारित मिश्रण' असलेल्या 'सैराट'चं सुधारित मिश्रण 'धडक' नावाने सिनेमागृहांत धडकलं आहे. मात्र आचरट प्रादेशिक अस्मिता आणि भयाण जातवास्तवाच्या सत्यकथनाबाबत असलेला एक अनाठायी आग्रह, 'धडक'ला मारक ठरणार, ही रिमेकची घोषणा झाली तेव्हापासून वाटत असलेली भीती अगदी सेंट-पर्सेंट खरी ठरत आहे. प्रत्यक्षात जातीभेदाने पोखरलेल्या ग्रामीण भागातलं अत्यंत वास्तववादी चित्रण वगळता बाकी काहीही विशेष नसलेल्या 'सैराट'च्या तब्बल तीन तासांच्या पसरट आणि रटाळ मांडणीसमोर 'धडक'चं अडीच तासांचं कथन खूप नेमकं आणि संक्षिप्त वाटतं. जातविस्तवाचे चटके 'धडक' देत नाही, हे मात्र खरं. तरी, 'धर्मा'चा चित्रपट आहे म्हटल्यावर त्याला जरासा 'टोन डाऊन' केलं जाणार, हे अपेक्षित ठेवायलाच हवं होतं म्हणून नंतरच्या नाकं मुरडण्यालाही अर्थ उरत नाही. 'धडक'चा खरा लेट डाऊन आहे, तो म्हणजे 'त्या'च्या मित्रांचा एकंदर भाग. सल्या-लंगड्या हे 'सैराट'च्या पूर्वार्धाची जान होते. सहाय्यक भूमिकांत सहाय्यक भूमिकेत असूनही 'तानाजी गालगुंडे'ने साकारलेला लंगड्या प्रदीप आजही सगळ्यांच्याच लक्षात आहे. 'श्रीधर वत्सर' आणि 'अंकित बिश्त' ह्यांची कामं उत्तम झाली असली, तरी त्या मानाने लक्षात राहण्यासारखी नाहीत. कारण एकूणच त्यांच्या 'ट्रॅक'मध्ये 'सैराट'वाली मजाही नाही आणि वावही नाही.

मराठीतून हिंदीत आणताना हे कथानक महाराष्ट्रातून राजस्थानमध्ये गेलेलं आहे. उदयपूरमधील एक मोठ्या खानदानातली मुलगी 'पार्थवी सिंग' (जान्हवी कपूर) आणि उदयपूरमधल्याच एक हॉटेलव्यावसायिकाचा मुलगा मधुकर बागला (इशान खट्टर) ह्यांचं हे प्रकरण आहे. चित्रपटात २-३ वेळा 'वो लोग ऊँची जात के हैं' असा उल्लेख येत असला, तरी संघर्षाचं मुख्य कारण निवडणूक, राजकीय स्थानाला लागलेला धक्का असं सगळं आहे. 'सैराट'चं कथानक महाराष्ट्रातून हैद्राबादपर्यंत पोहोचतं, तर 'धडक'चं कथानक उदयपूरहून मुंबई व नागपूर व्हाया कोलकात्यात स्थिरावतं. ह्या संपूर्ण कथानकात 'धडक'ची कथा कुठेही अनावश्यक रेंगाळत, घुटमळत नाही. हा वाढवलेला वेग 'धडक'चं मुख्य आणि पहिलं बलस्थान आहे. 

दुसरं बलस्थान पात्रांची निवड आणि त्यांची कामं.
इशान खट्टर आणि जान्हवी कपूर, हे वशिल्याचे घोडे जरी असले तरी ठोकळे अजिबातच नाहीत. इशान खट्टर तर खूपच सहजाभिनय करणारा वाटला. मोठ्या भावाने सुरुवातीच्या सिनेमात जी चमक दाखवली होती, त्याची तुलना केली तर 'छोटे मियां भी सुभानअल्लाह' निघू शकतात, असा विश्वास वाटतो. चित्रपटातील बरेचसे प्रसंग मूळ चित्रपटातूनच घेतले असल्यामुळे त्या त्या जागी दोन कलाकारांची थेट तुलना नकळतच केली जाते. तिथे इशान आणि जान्हवी, आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरूपेक्षा खूप सरस ठरतात. (रिंकू राजगुरूला मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार आश्चर्यकारकच वाटला होता.) तरी, जान्हवी कपूरचा नवखेपणा जाणवत राहतो. खासकरून शेवटच्या प्रसंगात तिच्या मर्यादा स्पष्टपणे दिसून येतात. एरव्ही, दोघांची जोडी खूप टवटवीत आणि प्रभावीही वाटते.
आशुतोष राणाला ट्रेलर्समध्ये पाहताना खूप अपेक्षा निर्माण झाल्या होत्या. दुर्दैवाने, त्याच्या वाट्याला फारशी भूमिकाच नाही. मात्र वाट्याला आलेल्या काही मोजक्या प्रसंगांतही आतल्या गाठीचा, बेरक्या राजकारणी त्याने जबरदस्त वठवला आहेच. 
कहानी - १, कहानी - २, स्पेशल छब्बीस सारख्या चित्रपटांत सहाय्यक भूमिकांत दिसलेला 'खराज मुखर्जी' इथेही सहाय्यक भूमिकेत जान ओततो. 'सैराट'मध्ये छाया कदमनी साकारलेल्या कर्कश्य आक्काच्या जागी बंगाली बाबू 'सचिनदा' म्हणून खराज मुखर्जी आणणं, दोन चित्रपटांच्या उत्तरार्धांच्या तुलनेत 'धडक'चं पारडं जड करतं.
मधुकरचे मित्र म्हणून 'अंकित बिश्त' आणि 'श्रीधर वत्सर' विशेष लक्षात राहणार नाहीत, अशी काळजी बहुतेक लेखकाने घेतली आहे. कारण 'धडक' हा ठळकपणे दोन स्टारपुत्र व कन्येच्या लाँचिंगसाठीचाच चित्रपट आहे. (इशानचा ह्यापूर्वी येऊन गेलेला माजीद माजिदी दिग्दर्शित 'बिहाईंड द क्लाऊड्स' म्हणजे त्याचं व्यावसायिक हिंदी चित्रपटातलं 'लाँचिंग' नाहीच म्हणता येणार.) गाण्यांच्या पुनर्निर्मितीवरून खूप उलटसुलट मतप्रवाह आहेत. 'झिंगाट' आणि 'याड लागलं' ची नवीन वर्जन्स कानाला मराठी शब्दांची सवयच झालेली असल्यामुळे खटकत राहतात. मात्र विचार केल्यास, ही दोन्ही गाणी त्यांच्या गरजेनुसार अमिताभ भट्टाचार्यनी उत्तम लिहिलेली आहेत. 'ढूँढ गूगल पे जा के मेरे जैसा कोई मिलेगा कहाँ..' सारख्या ओळी कथानकाच्या ग्रामीण ते निमशहरी भागाकडे येण्याला साजेश्या आहेत. शीर्षक गीत 'धडक'ही उत्तम जमून आलं आहे. अजय-अतुलकडे असलेल्या येणाऱ्या चित्रपटांची यादी वजनदार आहे. ठग्स ऑफ हिंदोस्तान, झीरो, सुपर 30, पानिपत आणि शमशेरा हे सगळे आगामी चित्रपट मोठ्या बॅनर्सचे आहेत. आत्तापर्यंतचं त्यांचं हिंदीतलं कामही दखलपात्र आहेच. त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षाही जास्त आहेत.

'धडक'मध्ये ओरिजिनल जर काही असेल तर तो फक्त शेवट. 'सैराट'चाही तोच उच्चबिंदू होता. तो बिंदू बदलण्याची, तरी उंची कायम ठेवण्याची करामत शशांक खेताननी केली आहे. त्यांचे ह्या आधीचे चित्रपट काही विशेष दखलपात्र वाटले नव्हते आणि हाही चित्रपट जवळजवळ जसाच्या तसाच बनवलेला असल्याने फार काही प्रभाव मान्य करता येणार नाही. 

एकंदरीत, मूळ चित्रपटातील पसरटपणा वगळणारा, तसेच त्याला बऱ्यापैकी मवाळ करणारा 'धडक', एक स्वतंत्र चित्रपट म्हणून ठरवलं तरी पाहता येत नाही. 'सैराट'च्या प्रेमात पडलेल्या लोकांना प्रत्यक्षाहून उत्कट प्रतिमा जरी दाखवली, तरी ते आवडणार नाहीच, त्यामुळे उत्कटतेत नव्हे तर तीव्रतेत कमी असणारी ही प्रतिमा पसंतीस उतरणं कठीण आहे. मात्र, जर तुम्ही (माझ्याप्रमाणे) 'सैराट'ला 'एक बरा चित्रपट'हून जास्त काही मानत नसाल, तर 'धडक' नक्कीच पसंतीस उतरू शकतो. कारण जवळजवळ २० टक्क्यांनी कमी केलेली लांबी, हे 'धडक'चं बलस्थान खूप महत्वाचं आहे. 'धर्मा'चा असल्यामुळे निर्मितीमूल्यही वाढीव आहे. ते छायाचित्रणातून स्पष्ट जाणवतं. 

'सैराट' एकदा पाहून विसरून गेलेल्यांनी 'धडक'ही एकदा पाहून विसरून जाण्यास हरकत नसावी.

रेटिंग - * * *

- रणजित पराडकर

Thursday, July 12, 2018

थोडा है थोडे की जरुरत थी (Sacred Games - सेक्रेड गेम्स)मुंबईवर होणार असलेल्या एका मोठ्या हल्ल्याची वरवरची खबर एका इन्स्पेक्टरला एका मोस्ट वॉण्टेड गँगस्टरकडून मिळते. मग त्या कटाचा तपास व त्या गँगस्टरच्या आयुष्याचा प्रवास दोन्ही जोडीने, आलटून पालटून उलगडत जातं. हा 'सेक्रेड गेम्स'चा मुख्य गाभा आहे. नेहमीच्या क्राईम, थ्रिलर कथांप्रमाणे हा चांगला आणि वाईटातला थेट संघर्ष नाही. इथे जवळजवळ सगळ्याच पात्रांचा रंग कमी अधिक प्रमाणात फिक्कट राखाडी ते काळा आहे. हा संघर्ष मुख्यत्वेकरून प्रत्येक पात्रासाठी 'स्व'चा आहे. 'माझ्यातही काही तरी दम आहे' हे दाखवण्यासाठी संधी शोधत असणाऱ्या कुणाला ही केस म्हणजे ती संधी आहे, तर 'मी इतकाही नालायक नाहीय' हे दाखवण्यासाठी संधी शोधत असणाऱ्या कुणाला हे कांड म्हणजे ती संधी आहे. इथे सिस्टममधल्या लोकांचा परस्परांशी असलेला संघर्ष आहे, सिस्टमशी असलेला संघर्ष आहे आणि एका सिस्टमचा दुसऱ्या सिस्टमशी असलेला संघर्षही आहे. मानवी भावभावनांच्या हळुवारपणा वगैरेला अर्थातच इथे दुय्यम स्थान आहे. महत्वाकांक्षा, वासना, लोभ, ईर्ष्या अगदी ठळक आणि बेधडकपणे पात्रांच्या मनांचा व बुद्धीचा ताबा घेत आहेत. 

'सेक्रेड गेम्स' हे एक नग्न सत्य आहे. नग्नता जितकी आक्रमक, प्रभावी, भडक आणि धक्कादायक असते, तितकं ते आहेच. 'वेब सिरीज' हा प्रकार अजून सेन्सॉर बोर्डच्या पट्ट्यात आलेला नसल्याने हिंसा, विचार आणि आचारांतली भडकता खुलेपणाने दाखवता आलेली आहे. कथानक मुंबईबाबत आहे आणि मुंबईतच घडतं, त्यामुळे पात्रंही बहुतांश मराठी आहेत. त्यांच्या तोंडी अस्सल मुंबईच्या शिव्या आहेत. चांगली गोष्ट ही की त्यांचा अनावश्यक भरणा कुठेही वाटत नाही. 

सिरीजच्या सर्व आठही भागांत लेखक-दिग्दर्शकांची कथानकावरची पकड ढिली पडत नाही. मांडणीमध्ये एकसमान वेग पहिल्यापासून शेवटपर्यंत पकडून ठेवलेला आहे. अनेक पात्रं आहेत. ती येतात, जातात. काही उपकथानकं आहेत. पण त्यांच्यात रेंगाळत बसवलं जात नाही. 

सैफ अली खान, नवाजुद्दीन सिद्दिकी, राधिका आपटे, जितेंद्र जोशी, नीरज कबी, गिरीश कुलकर्णी, गीतांजली थापा, आमीर बशीर अश्या सगळ्या गुणी कलाकारांची फौज इथे आहे. ह्या सगळ्यांपैकी नावाजुद्दिनवर सध्या खूप स्तुतीसुमनं उधळली जात आहेत. मला तर तो अगदी स्टिरियोटिपिकल वाटला, अन्कन्व्हिन्सिंग आणि थोडा कंटाळवाणाही वाटला. वासेपूर, मॉन्सून शूटआउट, रमन राघव नंतर सेक्रेड गेम्स. सेम एक्स्प्रेशन्स. नो एफर्ट. उच्चार तर खूपच चुकलेले आहेत. तो एकाही प्रसंगात मराठी वाटतच नाही. स्वत:चं नाव नाव तो वारंवार 'गनेस गायतोंडे' सांगतो. इतकी वर्षं काम केल्यावर आणि मेकर्सकडेही दुनियाभरच्या लोकांची टीम असताना प्रमुख व्यक्तिरेखा साकारणाऱ्याकडून 'श' ऐवजी 'स' च्या चुका क्षम्य नाहीत.  बरं, हा बाप भिक्षुकी करणाऱ्या बापाचा मुलगा दाखवला आहे. म्हणजे ब्राह्मण. मग तर हे उच्चार अजिबातच शोभत नाहीत. असल्या अगदीच प्राथमिक पातळीच्या ठसठशीत आणि बाळबोध चुका करूनही जर ह्या लोकांना 'क्रिटीकल अक्लेम' मिळत असेल तर कुठे तरी मोठा घोळच आहे. वास्तववादी दाखवायचं म्हणून भडक व बेधडकपणाच दाखवायचा, शिव्या पेरायच्या, नग्नदृश्यं दाखवायची का ? थोडासा अभ्यास, थोडंसं संशोधन कमी पडलं का इथे ? नवाज एक वेळ गँगस्टर म्हणून पटतो, पण 'मराठी' गँगस्टर म्हणून नाहीच पटत. त्याला मराठी दाखवायची गरजही नव्हती खरं तर. पण जर दाखवायचाच होता, तर सफाईने तरी दाखवता आला असता.

राधिका आपटे सादरीकरणात कमी पडत नाहीच, पण तिचं व्यक्तिमत्व 'रॉ एजंट' म्हणून शोभलं नाही. मात्र ही उणीव ती भरपूर उर्जा दाखवून भरून काढते. तिच्या मर्जीविरुद्ध तिच्याभोवत तयार झालेल्या कोशातून बाहेर पडण्याची तिची धडपड ती उत्तम प्रकारे दाखवतेच.

जितेंद्र जोशी भाव खाऊन जातो. साध्या साध्या संवाद व प्रसंगांतही हा माणूस त्याच्या टायमिंगच्या जोरावर जबरदस्त मजा आणतो. त्याचा हवालदार काटेकर प्रत्येक छोट्या छोट्या बाबतीत पूर्णपणे खरा वाटतो. तेच गिरीश कुलकर्णीच्या बाबतीतही. एक आतल्या गाठीचा, टिपिकल मस्तवाल राजकारणी त्याने जबरदस्त उतरवला आहे. 

नीरज कबी हा एक ताकदीचा अभिनेता आहे. तो त्याची ताकद पुन्हा एकदा दाखवून देतो. 
मात्र भूमिकेची लांबी सगळ्यात मोठी नावाजुद्दिन आणि सैफचीच आहे. सैफ अली खानचा इन्स्पेक्टर 'सरताज सिंग' खूप प्रभावी आहे. त्याने स्वत:ची बॉडी लँग्वेज मस्त मेंटेन केली आहे. त्याला नैराश्यग्रस्त आणि ओव्हरवेट असल्याचं म्हटलंय. कपडेही तसेच घट्ट दिलेयत. पण त्याने चाल आणि धावणं वगैरेही फोफश्यासारखं केलंय. कुठल्याही जागी तो बेअरिंग सोडत नाही. 

एकुणात 'सेक्रेड गेम्स' थरारक आहे. धक्कातंत्राचा वापर खूप प्रभावीपणे केला आहे. काही ठिकाणी खूप काही कमी पडल्यासारखं वाटतं, पण जे आहे तेही नसे थोडके. गेल्या वीसेक वर्षांत भारतीय गँगवॉर मूव्हीजने कात टाकली आहे. त्यामुळे अस्सलपणाकडे जाणारं प्रभावी चित्रण आताशा अनपेक्षित नाहीच आणि ज्या 'सत्या'सारख्या सिनेमांनी ही लाट आणली, त्यांच्या मागे 'अनुराग कश्यप' हेच नाव मुख्य होतं. त्यामुळेही 'सेक्रेड गेम्स'च्या अस्सल चित्रिकरणाबाबत खरं तर खात्रीच होती. शेवट मात्र फारसा प्रभावीपणे पोहोचल्यासारखा वाटला नाही. एक विशिष्ट पातळीचं ज्ञान व माहिती प्रेक्षकांकडे असेलच, असं गृहीत धरून केलेलं कथन मला स्वत:ला फारसं भिडत नाही. अगदी बाळबोधपणे सगळं विशद करून सांगावं ही अपेक्षा नाहीच. थोडीशी संदिग्धता हवीच. पण 'नेमकं असतं काय, होतं काय'; हे चटकन समजूही नये ह्याला संदिग्धता नाही, अनाकलनीयता म्हणतात; ती पटत नाही. 
तसेच बिनधास्तपणाच्या नावाखाली सेक्सदृश्यं दाखवणं, ह्या मानसिकतेतून आपण आता बाहेर पडायला हवं. बिनधास्तपणा तुमच्या कथेच्या उद्गारातूनही आला पाहिजे. जर एक विशिष्ट पात्र तृतीयपंथी आहे, तर त्या जागी एका तृतीयपंथीयालाच कास्ट का केलं नाही ? असाही एक आउट ऑफ द बॉक्स विचार करायला हवा. सेन्सॉरची भीती नाही म्हणून मोकाट उधळण्यापेक्षा ह्या मिळणाऱ्या मुक्ततेचा वापर प्रभावी कल्पकपणे करायला हवा. आपण प्रत्येक बाबतीत आपल्या भोवती एक चौकट आखून घेतली आहे, इतकंच नव्हे. तर त्या चौकटीबाहेर पडल्यावर काय करायचं, ह्याचीही एक चौकट आखलेली आहे. चौकटीबाहेरच्या चौकटीच्याही बाहेर पडायची वेळ आलेली आहे पण तसा प्रयत्न कुणी करताना दिसत नाही.

अस्तु !

- रणजित पराडकर

Tuesday, July 03, 2018

सिम्प्लीफाईड संजू - (Movie Review - Sanju)

लिहायला उशीर झाला आहे, तरी 'संजू'बाबत लिहिणं खूप आवश्यक आहे कारण हा एक मोठी आर्थिक उलाढाल करणारा चित्रपट असणार आहे आणि वैचारिक उलाढाल तर आधीच सुरु झालेली आहे. 

संजय दत्तचं आयुष्य नेहमीच चर्चेत राहिलेलं आहे. त्याची शेकडो अफेअर्स असोत, ड्रग्स आणि दारूच्या आहारी जाणं असो किंवा १९९३ साली मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातला त्याचा सहभाग असो, हे सगळं टपऱ्या आणि नाक्यांपासून न्यायालयांपर्यंत, कमाल मर्यादेपर्यंत चर्चिले गेले आहे.  
पण मुन्नाभाई १ व २, थ्री इडियट्स, पीके सारखे चाकोरीबाहेरचे विषय हाताळूनही हेवा वाटेल असं व्यावसायिक यश मिळवत असतानाच जाणकारांकडूनही पसंतीची पावती मिळवणाऱ्या राजकुमार हिरानींना, इतर काही समकालीन दिग्दर्शकांप्रमाणे एक 'सेफ बेट' म्हणूनदेखिल कुठलाही चरित्रपट करायची काहीच गरज नाही. असं असूनही हिरानी हा विषय का हाताळतात ? 
कारण मुळात संजय दत्तच्या आयुष्याची कहाणी 'असामान्य' आहे. असं, इतकं पराकोटीचं आयुष्य आपल्याकडे इतर कुणीही जगलेलं नसावंच. लोकांना वाटतं की असल्या माणसावर फक्त भारतातच चित्रपट बनू शकतो. माझं मत विरुद्ध आहे. ह्या आयुष्यावर भारताबाहेरील एखाद्या चित्रपटकर्त्याने कदाचित एखादी चित्रपटमालिकाच बनवली असती. एका आदर्श व्यावसायिक चित्रपटासाठी आवश्यक असलेला सगळा मसाला - उदाहरणार्थ, रोमान्स, क्राईम, अॅक्शन, देशभक्ती, थरार, दोस्ती, कौटुंबिक ओढाताण, इ. जे म्हणाल ते - ह्या कहाणीमध्ये 'रेडी मिक्स' स्वरुपात उपलब्ध आहे! ह्या सगळ्या मसाल्याचा पुरेपूर आणि चविष्ट उपयोग हिरानी करतील, ह्याची व्यावसायिक खात्री चित्रपट पाहण्याआधीपासूनच वाटत होती आणि तसंच झालंही आहे!

'संजू'ची ही कहाणी सांगणं म्हणजे खरं तर खूप धोक्याचं काम आहे. कुठल्याही एका बाजूला आपला तोल झुकला तर ते कथन कोलमडून पडेल इतकं हे आयुष्य व्यामिश्र आहे. Living on the edge म्हणता येईल, असं हे आयुष्य. ही कहाणी सांगताना काही भाग मात्र सोयीस्करपणे गाळला आहे. माधुरी दीक्षितसोबची जवळीक, बाळासाहेब ठाकरेंची सुनील दत्तनी घेतलेली भेट व नंतर हललेली पानं, संजय दत्तच्या मान्यता दत्तव्यतिरिक्तच्या इतर दोन पत्नी, तसेच कुमार गौरव आणि त्याचे वडील राजेंद्र कुमार ह्यांचं दत्त बाप-लेकांच्या आयुष्यातलं स्थान, लहानपणी हॉस्टेलमध्ये राहणं, शिक्षा भोगत असताना कायद्यातील 'फर्लो' आणि 'पॅरोल'सारख्या पळवाटांचा खुबीने उपयोग करून, बाहेर येऊन चित्रपटांचं चित्रीकरण व इतर कामं उरकणं ह्या सगळ्या काही महत्वाच्या घटना, पात्रं व भागांना चित्रपटात स्थान नसल्याने कहाणी खूप सरळ सोपी केलेली आहे. हे आयुष्य खूप गुंतागुंतीचं आहे, इतकं सरळसाधं नक्कीच नाही की झाल्या घटनांचं खापर सरसकटपणे वृत्तपत्रांच्या आणि माध्यमांच्या माथ्यावर फोडता येईल. 
अर्थात चित्रपट माध्यमाची मर्यादा लक्षात घेता संजय दत्तच्या आयुष्याचा गुंता थोडासा सोडवून ठेवून मगच ते मांडणं एका प्रकारे नाईलाजाचंही असू शकतं. त्यामुळे हे 'सिम्प्लिफिकेशन' करण्यामागे 'ग्लोरिफिकेशन' करण्याचा हेतू नसावा. कारण, संपूर्ण चित्रपटात असं कुठेही दाखवलं नाही की ड्रग्स, मुलींची प्रकरणं किंवा बॉम्बस्फोटाचा कट ह्यांपैकी कशातही अडकलेला संजय दत्त स्वत: प्रत्यक्षात अगदी सुतासारखा सरळ वगैरे होता. लाडावलेला, दुर्लक्षही झालेला एक बिघडलेला रईसजादा, एक कलाकार आणि माणूस म्हणूनही अत्यंत सामान्य असलेली एक व्यक्ती जिने गैरकृत्यं करण्यासाठी स्वत:च लहान-मोठी निमित्ते शोधली आणि ती कृत्यं केली, अशी संजय दत्तची छबी हा चित्रपट तयार करतो. सार्वजनिक आयुष्यातील संजय दत्तने प्रत्यक्षातही कधी स्वत:ला 'निष्पाप, निरागस, साधा, सरळ' म्हणून प्रेझेंट केलेलं नाहीच, त्यामुळे चित्रपटातूनही त्याची तशीच इमेज बनणं स्वाभाविकच.


मात्र, 'संजू' ही कहाणी फक्त संजय दत्तची नाही. ती एका अश्या असामीचीही आहे जिला उच्चभ्रूंपासून गरीबांपर्यंत, फिल्म इंडस्ट्रीपासून राजकारणापर्यंत, घरच्यांपासून बाहेरच्यांपर्यंत सगळ्याच प्रकारच्या लोकांमध्ये नेहमीच एक आदराचं, मानाचं स्थान होतं. एक अशी व्यक्ती जिच्याविषयी जेव्हा कुणी काही बोललं आहे, चांगलंच बोललं आहे कारण त्यांनी कधी कुणाचं वाईट कधी केलंच नसावं. ही व्यक्ती म्हणजे 'सुनील दत्त.' 
वाया गेलेल्या मुलाला पुन्हा माणसांत, योग्य रस्त्यावर आणण्यासाठी हर तऱ्हेचे प्रयत्न करणारा एक बाप जे जे काही करेल ते सगळं सुनील दत्त साहेबांनी केलं होतं. कायदेपंडितांची मदत घेणं, स्वत:च्या राजकीय वजनाचा वापर करून पाहणं, त्यासाठी विरोधी पक्षातील बड्या नेत्यांसमोरही जाणं हे सगळं तर सर्वश्रुत आहेच. त्याशिवायही मुलाला पुनर्वसन, व्यसनमुक्ती केंद्रात पाठवणं, त्याला इमोशनल ब्लॅकमेल करायचा प्रयत्नही एक प्रकारे करणं असं सगळं दत्तसाहेबांनी केलं आहे (असावं). हे बाप-मुलाचं नातं चित्रपटात खूप प्रभावीपणे सादर झाले आहे. 

'परेश घेलानी' नावाचा संजय दत्तचा अतिशय जवळचा मित्र चित्रपटात 'कमलेश कपासी' नावाने आहे. हे पात्र 'विकी कौशल'ने साकारलं आहे. संजय आणि कमलेश ह्या दोघांची मैत्री चांगली रंगली आहे. विकी कौशलने ह्यापूर्वीच स्वत:ची कुवत मसान, रमन राघव 2.0 मधून दाखवली आहेच. सहाय्यक भूमिकेत असूनही त्याने साकारलेला कमलेश खूप भाव खाऊन जातो. माझा मित्र व्यसनांत वाया चालला आहे, मरतो आहे; हे त्या मित्राच्या वडिलांना सांगतानाचा प्रसंग भावनिक करणारा आहे. विकी कौशलने पकडलेला गुजराती अ‍ॅक्सेन्टही खूप सहज आहे. 

प्रेक्षकाला भावनिक करून डोळे पाणावणं, हे हिरानींना अचूक जमतं. दत्त बाप-लेकांचे काही प्रसंगही असेच भावनिक करतात. सुनील दत्तंच्या भूमिकेत 'परेश रावल' कुठल्याही गेट अपशिवाय कमाल करतात. बहुतांश भागात त्यांना बापाची घुसमटच दाखवायची होती, त्यामुळे ह्या भूमिकेला अनेक पैलू होते, असं नाही म्हणता येणार. ज्या तोडीच्या भूमिका त्यांनी ह्यापूर्वी केल्या आहेत, त्यांच्या तुलनेत this was an easy job for him. पण निराशा दाखवतानाही हताश दिसणार नाही, मदत मागत असला तरी लाचार वाटणार नाही; खमकाच वाटेल, असा सुनील दत्त त्यांनी खूप संयतपणे उभा केला आहे.

'संजय दत्त'च्या भूमिकेत 'रणबीर कपूर' आहे, हे फक्त श्रेयनामावलीपुरतं. एरव्ही चित्रपटात स्वत: संजय दत्तच आहे, ज्याने रणबीर कपूरसारखं दिसायचा प्रयत्न केला आहे, असं वाटतं. ह्याहून वेगळं आणि जास्त मी रणबीरच्या कामाविषयी बोलूच शकत नाही.

अनुष्का शर्मा, मनीषा कोईराला, सोनम कपूर, बोमन इराणी, सयाजी शिंदे ह्यांच्या भूमिका छोट्या छोट्या आहेत. पण सगळ्यांनीच आपापली कामगिरी चोख बजावली आहे. चक्क सोनम कपूरनेसुद्धा !

थोडासा मेलोड्रामा कमी केला असता ('कर हर मैदान फतेह..' गाण्याचं चित्रीकरण), थोडंसं कमी सिम्प्लीफिकेशन केलं असतं (अनेक पात्रं, घटना पूर्णपणे गाळणं, सगळं खापर माध्यमांच्या माथ्यावर फोडणं) तर 'संजू' व्यावसायिक चरित्रपट म्हणून मापदंड ठरू शकला असता. तसा तो दुर्दैवाने ठरत नाही. कारण हा चत्रपट, 'संजय दत्त कुणी निष्पाप, निरागस नव्हता; तो एक नालायकच होता, ज्याने व्यसनाधीनतेपायी स्वत:चं आयुष्य बरबाद तर केलंच आणि इतरही आयुष्यं नासवली', हे भडकपणे नसलं, तरी संयत प्रभावीपणे दाखवत असला तरी, 'याकुब मेननसोबत जर तुलना केली, तर पैसा, सत्ता आणि कायद्यातील पळवाटा ह्यांचा फायदा घेऊन संजय दत्त काहीच्या काही स्वस्तात सुटलेला एक गुन्हेगार होता', हे सत्य म्हणावं तितक्या ठळकपणे चित्रपटातून समोर येत नाही. 
असं असलं तरी एक सुंदर चित्रपट म्हणून 'संजू' पुरेपूर जमला आहे. पडद्यावर असणाऱ्या सर्वांचं काम अप्रतिम झालं आहे. जोडीला अभिजात जोशींचे खुसखुशीत, खुमासदार व अर्थपूर्ण संवाद आहेत आणि सगळ्यावर हिरानींची मजबूत पकडही आहे.

रेटिंग - * * * १/२

- रणजित पराडकर 
Related Posts Plugin for WordPress, Blogger...